राधिका कुंटे

एखाद्याने आपल्या ध्येयाचा रस्ता निश्चित करून त्या दिशेने ठाम आत्मविश्वासाने चालायला सुरुवात केली, की ते ध्येय साध्य झाल्यावाचून राहत नाही. भूतकाळाचा मागोवा घेतला, तरी त्यात न रमता त्याला वर्तमानाची जोड देत भविष्याचा मार्ग सुकर होऊ शकेल, यासाठी प्रयत्न करणाऱ्या डेनार्ड डिसुझा याच्या संशोधनाविषयी जाणून घेऊ या.

मंदिरं, स्तूप आणि जुन्या वास्तू आपल्यापैकी अनेक जण पाहतात. पौराणिक कथा तर आपण अनेकदा ऐकलेल्या असतात. वाचलेल्याही असतात, पण असं काही पाहून किंवा ऐकून-वाचून कुणी झपाटला (चांगल्या अर्थाने) तर? फक्त झपाटलाच नाही तर त्या सगळ्याचा अभ्यास करायचा ध्यास त्याला लागला आणि तो तसा अभ्यास करूही लागला. केवळ पदव्युत्तर शिक्षण घेऊन तो थांबला नाही तर त्यात संशोधन करायची त्याची जिद्द त्याला आजही जोमाने पुढे नेते आहे. हा आहे डेनार्ड डिसुझा. तो चेंबूरच्या ‘भावना ट्रस्ट महाविद्यालया’तून बीकॉम झाला. नंतर ‘वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’मधून त्याने फायनान्स मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. मग विवेकानंद महाविद्यालयात त्याने लॉसाठी प्रवेश घेतला खरा; पण त्या अभ्यासात त्याचं मन रमलं नाही. दरम्यान, त्याच्या आईची भोपाळमध्ये बदली झाली आणि त्यांचं कुटुंब तिथे राहायला गेलं. तिथे त्याला स्वत:ची खरी आवडनिवड गवसली. या वास्तव्यात सांची स्तूप, जबलपूरमधली मंदिरं आदी अनेक ठिकाणं त्याने पाहिली आणि त्या प्राचीन वास्तुकलेने, त्यामागच्या इतिहासाने तो प्रभावित झाला. स्थानिकांशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून, सांस्कृतिक कार्यक्रमांतून, जवळच्या ग्रंथालयातली पुस्तकं वाचून त्याला एक मार्ग गवसल्यासारखं वाटलं. त्याने एआयसी (एन्शंट इंडियन कल्चर)अर्थात प्राचीन पुरातनवस्तुशास्त्राचा अभ्यास करायचं ठरवलं. त्यावर त्याच्या पालकांची प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची होती. तो हा विषय अभ्यासणार म्हटल्यावर त्यांना त्याच्या करिअरची काळजी वाटली. त्याबद्दल घरात अनेकदा चर्चा झाली. जवळपास सहा महिन्यांनी होकार मिळाल्यावर तो मुंबईत परतला. त्याने सेंट झेव्हिअर्स महाविद्यायातून ‘मास्टर्स इन एन्शंट इंडियन कल्चर हिस्ट्री अ‍ॅण्ड आर्किओलॉजी’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

या दोन वर्षांनी त्याला खूप शिकवलं. चांगला अनुभव मिळाला. सुरुवातीच्या काही व्याख्यानांना बसल्यावर आपण योग्य निर्णय घेतल्याची खात्री त्याला पटली. एकदा आपल्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करायला मिळाल्यावर त्याला अधिक हुरूप आला. या पदव्युत्तर शैक्षणिक वर्षांखेरीस त्याच्या प्रबंधाचा विषय होता ‘मौखिक इतिहास’. डेनार्ड सांगतो की, ‘आपल्याकडे पूर्वीच्या काळाचा आढावा घेतला तर ‘लिहिणं’ ही संकल्पना फारशी खोलवर रुजलेली नव्हती. मग पिढय़ान् पिढय़ा माहितीचा ओघ- अर्थातच मौखिक माहितीचा ओघ- पोहोचत राहतो. मी तर्खड कुटुंबाचा मौखिक इतिहास अभ्यासायचं ठरवलं. खरं तर सुरुवातीला या कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास नोंदवायचं ठरत होतं, पण त्यांच्याविषयी अधिकाधिक वाचल्यावर मला त्यांच्या धार्मिकतेविषयी जाणून घ्यावंसं वाटलं. त्यांच्या कार्यामागच्या प्रेरणा या निमित्ताने जाणून घेता आल्या. त्यांच्या भावना, मानसिकतेची माहिती घेतली. त्यासाठी मी विजय तर्खड यांना भेटलो.’ या प्रबंधासाठी त्याला डॉ. जोआन डायस यांचं मार्गदर्शन लाभलं आणि डॉ. शुभदा पंडय़ा यांची मोलाची मदत झाली.

सध्या तो मुंबईच्या ‘मेरिटाइम हिस्ट्री सोसायटी’मध्ये रिसर्च असोसिएट असून ‘इंडियन नॉटिकल नॉलेज प्रोजेक्ट’ या विषयावर संशोधन करतो आहे. भारताच्या सामुद्रिक इतिहासाबद्दलच्या फारशा नोंदी आढळत नाहीत. उदाहरणार्थ – चोला राजवटीमध्ये मलेशियावर विजय मिळवला गेला होता, मात्र त्यासाठीची नाव कशी बांधली, कुणी बांधली, सैन्य उभारणी आणि आनुषंगिक गोष्टींची नोंद नाही. अशा प्रकारच्या काळाच्या उदरात दडलेल्या ऐतिहासिक गोष्टींचा शोध घेऊन भारताच्या सामुद्रिक इतिहासात काही भर घालता येईल का, यासाठी तो प्रयत्न करतो आहे. त्याचं संशोधन सुरू करून सहा महिने होत आहेत. या काळात त्याचं ओरिएंटेशन सुरू होतं. ‘म्युझिअमचे क्युरेटर आणि मार्गदर्शक कोमोडोर ओडाक्कल जॉन्सन यांनी आम्हाला सामुद्रिक इतिहासाची सखोल ओळख करून दिली. त्याविषयीची रुची वाढवली. दरम्यान, कधी कधी हा किती किचकट विषय आहे, कठीण आहे असं वाटायचं. पण मग नालासोपाऱ्याला केलेल्या फिल्ड व्हिजिटदरम्यान या विषयातल्या काही संभाव्य शक्यता जाणवल्या. येत्या काळात सामुद्रिक इतिहास समजून घ्यायची गरज वाढणार आहे. कारण अनेक क्षेत्रांमध्ये या इतिहासाच्या संदर्भाची गरज भासणार आहे. भारतीय सामुद्रिक इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर ठासून आणि ठाशीवपणे मांडावा लागणार आहे,’ असं डेनार्ड म्हणतो.

त्याच्या संशोधनाचा पाया रचण्यासाठी या विषयातले तज्ज्ञ आणि जाणकार यांच्याकडून माहिती घेणं, चर्चा करणं या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. साधारण जुलैपर्यंत हे संशोधन पूर्ण होईल, असा त्याचा अंदाज आहे. तो सांगतो की, ‘संस्थेत आम्हांला सहकारी संशोधक अशी वागणूक न मिळता सहकाऱ्यांसारखंच वागवलं जातं. त्यातला एकमेकांप्रति आदरभाव आणि जिव्हाळा मला खूप महत्त्वाचा वाटतो. केवळ संशोधनच नव्हे तर काही परिषदा व कार्यक्रमांचं आयोजन आणि समन्वय करायची जबाबदारीही मी निभावतो आहे. कारण केवळ ज्ञानात्मक माहिती असणं पुरेसं नाही तर संस्थेच्या व्यवस्थेची, यंत्रणेची माहिती असणं, त्याचा वापर करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी सध्या कोमोडोर जॉन्सन यांचं मार्गदर्शन लाभतं आहे.’ अलीकडेच त्याने ‘बिल्ट हेरिटेज अ‍ॅट द बॉम्बे डॉकयार्ड इन द १८-१९ सेंच्युरी’ या पेपरचं वाचन केलं. संस्थेच्या चाळिसाव्या वार्षिकोत्सवातल्या ‘मेरिटाइम हेरिटेज लर्निग थ्रू कल्चरल एंगेजमेंट्स’ या सेमिनारमध्ये त्याने या पेपरचं सादरीकरण केलं आणि समन्वयक म्हणून जबाबदारी निभावली. या गोदीमुळे मुंबईच्या अर्थशास्त्रात त्या काळात कशी भर पडली, याविषयी लिहिलं आहे. वाडिया बंधूंनी ही गोदी बांधण्यात तत्कालीन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला साहाय्य केलं आणि त्यानंतर काही काळाने मुंबईच्या आर्थिक भरभराटीत भर पडली होती. हा पेपर ‘सागरधारा’ या मेरिटाइम हिस्ट्री सोसायटीच्या मासिकात प्रसिद्ध होणार आहे. या सादरीकरणाचं निवृत्त कोमोडोर सी उदय भास्कर यांनी भरभरून कौतुक केलं.

मध्यंतरी त्याने अर्नाळा किल्ला व खांदेरी-उंदेरी बेटांवर लिहिलेला लेख एका बडय़ा इंग्रजी वृत्तपत्रात छापून आला होता. तेव्हा घरी अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. आई-बाबांना अतीव समाधान वाटलं होतं. त्यानं त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. पुढे पीएचडी करायचा डेनार्डचा विचार आहे. त्याला इतिहास आणि धर्म या विषयांत अधिक रस वाटतो. पीएचडीसाठी केलेल्या संशोधनातून आपले विचार जबाबदारीने आणि अधिक ठामपणे मांडता येतात. त्यांना बळकटी मिळते. त्याने प्रोफेसर अ‍ॅलेक्सिस सॅण्डर्सन यांनी लिहिलेलं The Saiva Age हे पुस्तक वाचलं होतं. त्यापासून प्रेरणा घेऊन त्याला शैवमत / वीरमाहेश्वर संप्रदायाचा सखोल अभ्यास करायचा आहे.

त्याच्या मते, इतिहासात डोकवायचं तर जिज्ञासू असणं महत्त्वाचं असतं. शोध घेणं, जाणून घ्यायला हवं. संस्कृत किंवा प्राकृत किंवा तमीळ किंवा कन्नड किंवा इतर कोणतीही भारतीय भाषा किमान बोलता, वाचता येणं हा एक अधिकचा गुण ठरतो. त्यामुळे ऐतिहासिक नोंदी वाचायला मदत होऊ शकते. जणू त्या नोंदींना स्वत:ची गोष्ट सांगाविशी वाटली तर त्यांच्याशी संवाद साधता यायला हवा. त्यात आपल्या मनमर्जीनुसार गोष्टींची भर घालू नये. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन दूर सारायला हवा. सगळ्या प्रकारच्या गोष्टी जगात अस्तित्वात असणार हे स्वीकारायला हवं आणि आपल्या वाटेने पुढं जायला हवं. ग्रंथालय हा आमच्या संशोधनाचा जणू प्राण. एशियाटिक सोसायटी आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्था या संस्थांचं महत्त्व वेगळं सांगायला हवं का? ऑनलाइन वाचायला मिळण्याची सोय असली तरीही प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याने खूप फरक पडतो, असे तो म्हणतो. शिवाय शक्य तितकं फिल्डवर्कही महत्त्वाचं. फक्त त्या ठिकाणी जाऊन बघणं पुरेसं नाही. तर तिथे गेल्यावर स्थानिकांशी संवाद साधणं, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. असेल तर त्या स्थानाचा मौखिक इतिहास जाणून घ्यावा. कारण काही वेळा त्यातून पटकन एखादी गोष्ट गवसू शकते. कविवर्य कुसुमाग्रजांनी कवितेत म्हटलंच आहे की, ‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुल पामराला..’ डेनार्डला त्याच्या संशोधनासाठी अनेक शुभेच्छा.