05 August 2020

News Flash

क्षितिजावरचे वारे : काउंटडाउंन सुरू झाले!

क्रिप्टनवासीयांना वाचवणं जोर-एलला शक्य झालं नाही. आपल्या ग्रहवासीयांना वाचवण्यासाठी काहीतरी करण्याचा काउंटडाउन मात्र आता सुरू झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सौरभ करंदीकर

वेगाने बदलत जाणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाचा माग घेणं हे तसं अवघड काम. आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचा परिणाम होत असतो, मात्र मुळात त्याची माहितीच नसल्याने परिणामांची जाणीवही दूरच असते. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडी, बदल यांचा वेध युजर एक्सपिरिअन्स डिझाइन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे सौरभ करंदीकर ‘क्षितिजावरचे वारे’ या सदरातून घेणार आहेत.

‘‘क्रिप्टन ग्रह धोक्यात आहे!’’ जोर – एल तावातावाने म्हणाला. ‘आपल्या भूगर्भात होणाऱ्या उलाढाली आपला ग्रह नष्ट करतील यात शंका नाही. त्याआधी आपण काहीतरी केले पाहिजे.’’ सगळे अधिकारी कुत्सितपणे हसले. ‘‘जरासे भूकंप झाले तर एवढा घाबरलास, जोर-एल? की प्रस्थापित सत्ता उलथून टाकायचा डाव आहे तुझा?’’, हा प्रसंग आहे सुपरमॅन या काल्पनिक सुपरहिरोच्या जन्मकथेमधला. पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या सुपरमॅनच्या मातृ-ग्रहावर त्याचा पिता, जोर-एल, सत्ताधाऱ्यांना जागतिक संकटाबद्दल सांगतो पण त्याचं कुणीच ऐकत नाही. शेवटी व्हायचं तेच होतं. क्रिप्टन ग्रहाचा विनाश होतो, परंतु त्याआधी जोर-एल लहानग्या सुपरमॅनला एका अवकाशयानात बसवून पृथ्वीच्या दिशेने धाडतो, वगैरे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबलेला पावसाळा अनुभवताना अचानक या कथेची आठवण झाली. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल आपल्या शेतीप्रधान देशाला संकटाच्या खाईत ढकलू शकतो याची जाणीव झाली. जगभरातील शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी ‘ग्लोबल वॉर्मिग’बद्दल, पर्यावरणातील असमतोलाबद्दल, सत्ताधाऱ्यांना जागरूक करत आहेत. परंतु काही सत्ताधीश या विषयाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. हे सारं जोर-एलच्या अगतिकतेची आठवण करून देतंय.

आपली पृथ्वी संकटात आहे. परंतु हे संकट सुपरमॅनच्या गोष्टीप्रमाणे नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे हे कटू सत्य आहे. पृथ्वीचं सरासरी तापमान गेल्या पाच वर्षांत सुमारे ०.९८ सेल्सियसने वाढलं आहे. या शतकाच्या अखेरीस २.६ ते ४.८ सेल्सियसने वाढेल असा अंदाज वर्तवला जातो आहे. वातावरणाच्या उष्णतेत होणाऱ्या अशा वाढीला मानवी कृती जबाबदार आहेत असा आरोप स्वान्त अरिनियस नावाच्या स्वीडिश शास्त्रज्ञाने १८९६ साली पहिल्यांदा केला. नैसर्गिक इंधनाच्या वापरातून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साइड वातावरणाचं तापमान वाढवायला कारणीभूत ठरेल असं भाकीत त्याने केलं होतं. कालांतराने या परिणामाला ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’ हे नाव दिलं गेलं. जगभरातील वैज्ञानिक तेव्हापासून पृथ्वीच्या वाढत्या तापमानावर नजर ठेवून आहेत. आज कार्बन डायऑक्साइडबरोबर मिथेन, नायट्रस ऑक्साइडसारखे इतर ‘ग्रीनहाऊस’ वायू आपली वाहनं, आपले एअरकं डिशनर आणि आपले विविध कारखाने पर्यावरणात सोडत आहेत. वाढत्या तापमानामुळे समुद्रांची उंची वाढेल, अनेक शहरं पाण्याखाली जातील, पावसाचे चक्र बिघडेल, वाळवंटाची वाढ होईल, समुद्राच्या पाण्यातील सिडचं प्रमाण वाढेल. परंतु या साऱ्याबाबत राजकीय उदासीनता पाहायला मिळते आहे. प्रगत देश औद्योगिक क्षेत्रावर निर्बंध येतील म्हणून याकडे कानाडोळा करत आहेत तर विकसनशील देश ‘हे संकट आमच्यामुळे आलेलं नाही’ असं म्हणत आहेत.

हे सारं थांबवायचं कसं?, याबाबत वर्षांनुवर्ष चर्चा सुरू होत्या. २०१५ च्या डिसेंबर महिन्यात युनायटेड नेशन्सच्या अध्यक्षतेखाली पॅरिसमध्ये १८९ देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. त्यांच्यात पर्यावरणबदल रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलायचा, आपापल्या औद्योगिक आणि सामाजिक वर्तणुकीवर निर्बंध घालायचा करार झाला. हा करार प्रत्येक देश कसे पाळतात, की अमेरिकेप्रमाणे माघार घेतात ते पाहावं लागेल. ‘‘आमच्या अर्थव्यवस्थेला हा करार मानवणार नाही’’ असं म्हणणारी अमेरिका ग्रीनहाऊस वायूंची सर्वाधिक प्रमाणात निर्मिती होऊ देते हे लक्षात घेतलं पाहिजे.

या वर्षी पॅरिस कराराच्या जनकांपैकी एक आणि युनायटेड नेशन्सच्या ‘पर्यावरण समितीच्या सचिव, क्रिस्टिना फिगर्स यांनी ‘काउंटडाउन’ नावाच्या शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. १० ऑक्टोबर २०२०, म्हणजेच १०.१०.२०२० रोजी नॉर्वेमधल्या बर्गन शहरात ही परिषद होईल.

चर्चा खूप झाल्या, आता काहीतरी कृती करावी यासाठी ही परिषद भरवण्यात येत आहे. दरवर्षी जगभरात ९ हजार कोटी मेट्रिक टन इतका कार्बन आपण वातावरणात सोडतो आहोत. २०५० साली हा आकडा शून्यावर आणायचा निर्धार क्रिस्टिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश आणायचा तर जनमत तयार करावं लागेल आणि यासाठीच हा प्रयत्न केला जाणार आहे. या परिषदेत पाच प्रमुख विषय हाताळले जाणार आहेत. ऊर्जा : ऊर्जानिर्मितीत ग्रीनहाऊस वायूंचा कमीतकमी उत्सर्ग, भौतिक आणि आर्थिक संरचना : औद्योगिक क्षेत्रात सुधारणा. दळणवळण : वाहनांच्या संरचनेत आमूलाग्र बदल. अन्न : आरोग्याला आणि पर्यावरणाला पूरक अशा अन्नवस्तूंचा स्वीकार. वनजीवन : वृक्षतोड रोखून नवीन वृक्षांची लागवड.

या परिषदेचं वैशिष्टय़ म्हणजे ही परिषद केवळ राष्ट्राध्यक्ष, प्रतिनिधी यांच्यासाठी नसून उद्योगपती, कलाकार, समाजमाध्यमांवरील लोकप्रिय व्यक्ती, अभिनेते, गायक, तसेच विद्यार्थी, शिक्षक, लहानथोर या सर्वानाच परिषदेचं निमंत्रण आहे. आपल्या पृथ्वीवरचं संकट दूर व्हावं म्हणून केवळ या परिषदेला हजेरी लावणं गरजेचं नाही तर त्यांच्या प्रतिनिधी संस्थांशी संपर्क साधता येऊ  शकेल. आणि परिषदेतील सुधारणा सत्ताधाऱ्यांना समाजमाध्यमांवर ठणकावून सांगता येतील. ‘ळएऊ’ ही संस्था जगभरात नवीन कल्पनांचा प्रसार करते. त्यांच्या टेड कॉन्फरन्स आणि संलग्न टेड-एक्स कॉन्फरन्स जगभरात ठिकठिकाणी दर वर्षी आयोजित केल्या जातात. टेडच्या क्रिस अँडरसननी क्रिस्टिना फिगर्स यांच्या बरोबरीने या परिषदेचं आयोजन करायची जबाबदारी घेतली आहे. अधिक माहितीसाठी https://countdown.ted.com या संकेतस्थळावर जाता येईल. याखेरीज #JoinTheCountdown या हॅशटॅगला समाजमाध्यमांवर सर्च करता येईल.

क्रिप्टनवासीयांना वाचवणं जोर-एलला शक्य झालं नाही. आपल्या ग्रहवासीयांना वाचवण्यासाठी काहीतरी करण्याचा काउंटडाउन मात्र आता सुरू झाला आहे.

दरवर्षी जगभरात ९ हजार कोटी मेट्रिक टन इतका कार्बन आपण वातावरणात सोडतो आहोत. २०५० साली हा आकडा शून्यावर आणायचा निर्धार क्रिस्टिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2020 12:25 am

Web Title: article on jointhecountdown movement abn 97
Next Stories
1 नाममहात्म्य
2 संशोधनमात्रे : काळाचे धागेदोरे
3 ‘मी’लेनिअल उवाच : मन, दु:ख आणि समाज
Just Now!
X