स्वप्निल घंगाळे

देशाचं नाव खराब होतं आहे, देशाबद्दलचं वाईट चित्र जगासमोर उभं राहत आहे अशा पद्धतीच्या टीका मागील काही आठवडय़ांपासून अनेकदा आपल्या वाचनात आणि ऐकण्यात आल्या असतील. देशात सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही टीका किती योग्य आहे आणि किती अयोग्य हा चर्चेचा विषय आहे. खरोखर या आंदोलनांमुळे देशाबद्दल नकारात्मक मत तयार झालं आहे का? आजच्या तरुणाईला देशाच्या ‘प्रतिमे’ची काळजी नाही का? अशाच प्रश्नांसंदर्भात..

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

‘तरुण रक्त आहे, सळसळणारच’ ही अशी चार शब्दांची साचेबद्ध व्याख्या सध्या देशात सुरू असणाऱ्या आंदोलनांबद्दल बोलताना वापरली जाते. दोन्ही बाजूंची म्हणजेच ठरावीक निर्णयांचा विरोध करणारी आणि त्या निर्णयांना पाठिंबा देणारी आंदोलने टीकेची धनी ठरत आहेत. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही बाजूंचे समर्थक अगदी सोशल मीडियापासून ते रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत. पण या सर्व गोंधळामध्ये सामान्यपणे उपस्थित केला जाणारा प्रश्न म्हणजे हे सगळं कशासाठी? आणि यातून देशाचं काय?

आता ‘देशाचं काय?’ यामध्ये अनेक अर्थानी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणजे देशाची प्रतिमा खराब होतेय, देशातील तरुणाई कोणत्या वाटेला चाललीय, भावी पिढीच्या विचारसरणीवर चर्चेची गरज आहे असं आंदोलनांना विरोध करणारे म्हणतायेत. तर देश हाच धागा पकडून समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्यांचा समाचार घेताना, भारताची सर्वधर्म सहिष्णुता धोक्यात आलीये, आधी आपल्याकडे असं होत नव्हतं, धर्माच्या नावाने फूट पाडण्याचा प्रयत्न, कधी नाही इतका असंतोष भारतात पहिल्यांदाचा पाहायला मिळतो आहे, अशा अंगानेही टीका होताना दिसते आहे. दोन्हीकडून टीका होत असतानाच यामध्ये ‘देशाबद्दलची काळजी’ दिसून येते आहे. पण खरोखरच याचा किती परिणाम झाला आहे?

या संदर्भात तरुणांशी चर्चा केल्यावर त्यांना आंदोलनांमुळे देशाची प्रतिमा खराब होते आहे असं वाटत नाही, असं ते स्पष्टपणे सांगतात. कारण या प्रश्नाकडे भारतीय म्हणून पाहण्याचा आमचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि जगाचा वेगळा असू शकतो, असं तरुणांना वाटतं. ‘‘एकीकडे या आंदोलनांमुळे देशाचं नाव खराब होत असल्याची टीका होते आहे, पण दुसरीकडे हीच खरी लोकशाही आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण आंदोलन करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. अर्थात हिंसक आंदोलनांना सर्वाचाचा विरोध आहे. पण अशा आंदोलनांमुळे देशातील तरुण त्यांच्या हक्कांबाबत जागरूक आहेत, असा विचारही करायला हवा. आज अनेक बडय़ा परदेशी कंपन्यांमध्ये भारतीय बडय़ा हुद्दय़ावर कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी काहींनी या आंदोलनाला समर्थन दर्शवणारी मते नोंदवली आहेत हेही आपण लक्षात घ्यायला हवं. विरोध असो किंवा समर्थन, पण या आंदोलनांमुळे देशाचं नाव खराब होतंय असं मला वाटतं नाही,’’ असं सस्मित फेगडे सांगतो. आज गूगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, उद्योगसम्राट लक्ष्मी मित्तल, इंद्रा नुयी, शंतनू नारायण (अ‍ॅडॉब सिस्टीमचे कार्यकारी अध्यक्ष), नुकतेच कोकणात येऊन गेलेले आर्यलडचे पंतप्रधान लिओ वडारकर अशी अनेक भारतीय नावं जगभरातील वेगवगेळ्या कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत किंवा होते. त्यामुळे भारताने या व्यक्तींच्या रूपाने जगाच्या भरभराटीमध्ये दिलेला वाटा खासकरून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये दिलेला वाटा हा महत्त्वाचा आहे. आज जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांच्या यादीमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे देशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद जगभरात उमटतात. यामध्ये दोन्हीकडील बाजू घेणाऱ्यांनी आपलं समर्थन समविचारी आंदोलकांना दिलं आहे. परदेशी प्रसारमाध्यमांनीही मागील महिन्याभरात भारतात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली आहे. आता अर्थात ही दखल घेताना त्यांनी त्यांच्या विचारसरणीप्रमाणे समर्थनार्थ किंवा विरोधात भूमिका घेत वृत्तांकन करणं आणि संपादकीय लेखांच्या माध्यमातून भारताबद्दल भाष्य केलं आहे. पण यामध्ये कु ठंही भारताबद्दल थेट वाईट प्रचार करण्यात आलेला नाही. लेख किंवा वृत्तांकनामध्ये नक्कीच मतभिन्नता आहे, पण त्याच वेळी त्यांनी थेट या निर्णयाबद्दल भाष्य केलेलं नाही.

आपण समजून घेण्यापेक्षा उत्तर देण्यासाठी ऐकू लागल्याने अडचणी वाढल्याचं स्वाती भट सांगते. ‘‘धार्मिक गोष्टीवरून फूट पाडण्याचा प्रयत्न नवीन नाही. खूप आधीपासूनच असे प्रयत्न केले जात असल्याची उदाहरणं आहेत. तेव्हाही वाद होत होते, पण तेव्हा लोकांची एकमेकांना ऐकून घेण्याची मानसिक तयारी होती. आता जरा काही झालं की आपण लगेच त्यावर रिअ‍ॅक्ट होतो; लगेच आपल्याला असुरक्षित वाटायला लागतं. जर आपल्याला बोलायचा अधिकार आहे तर तसेच तो समोरच्याला त्याचं मत मांडायचा आहे हे लोक विसरत आहेत,’’ असं स्वाती म्हणते. देशाच्या ‘इमेज’बद्दल बोलताना, ‘‘भारत देशात सर्वधर्मसमभाव आजही आहे. उगाचच लोकांना घाबरवण्याचे आणि भडकवण्याचे प्रकार होतात. तरुणांनी धर्म, जात यापलीकडे जात स्वत:ला बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर सिद्ध करण्याची गरज आहे. आणि लोकांचं ऐकून काही निर्णय घेण्यापेक्षा स्वत: नीट विचार करून व्यक्त होण्याची गरज आहे,’’ असं स्वातीला वाटतं.

मात्र त्याच वेळी दुसरीकडे देशाचं नाव खराब होतंय असं मानणारेही आहेत, पण योग्य विचार करून आपण विषयाकडे पाहिल्यास समतोल साधता येईल असा विश्वासही अनेकांना वाटतो आहे. ‘‘सध्या जे काही प्रकार देशात सुरू आहेत त्यावरून देशाचं नाव खराब झालंय का, असं विचारल्यास आपण काही प्रमाणात हो असंच उत्तर देऊ,’’ असं महेश ढाके सांगतो. ‘‘देशात बरेच गंभीर प्रश्न उभे असताना, देशाची आर्थिक गणितं  बिघडलेली असताना आपण नको त्या मुद्दय़ांवर भांडतोय, जाळपोळ करतोय, बंद करतोय. याने होणार काहीच नाहीये, मात्र देशाचं नाव खराब होतंय आणि देशासमोर उभ्या असलेल्या समस्या आहेत तिथंच आहेत. मुळात त्या समस्या दिसू नयेत म्हणून, त्यावरून लोकांचं लक्ष बाजूला जावं म्हणून सुरू असलेला हा अतिशय निंदनीय प्रकार सुरू असल्यासारखं वाटतं. ज्या कायद्यांवरून वातावरण तापलंय तेपण न समजण्यासारखंच आहे. पण त्याला विरोध करण्याचे किंवा समर्थन दर्शवण्यासाठी अनेक शांततापूर्ण मार्ग आहेत. त्या मार्गानी आंदोलनं करावीत. तरुणाईने आधी देशासमोर जे प्रश्न आहेत ते बघून पावलं उचलायला हवीत. कारण हल्लीची पिढी प्रॅक्टिकल आहे. जे नवीन कायदे येताहेत ते नेमके  आहेत काय ते समजून मगच कोणताही निर्णय घेणं किंवा बाजू मांडणं उत्तम राहील,’’ असं महेश म्हणतो.

एकंदरीत काय, तर ज्या पद्धतीने आंदोलनं सुरू आहेत त्यावरून देशाची प्रतिमा खराब होतेय असा जो आरोप केला जातोय तो तरुणांना पटलेला नाही. उलट जास्तीत जास्त तरुण आज केवळ सोशल नेटवर्किंगवर व्यक्त न होता प्रत्यक्षात रस्त्यावर येऊन आपले म्हणणं मांडताना दिसत आहेत. बरं हे दोन्ही बाजूंनी घडताना दिसतं आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात तरुण पिढी विषय त्यांच्या पद्धतीने समजून घेत मत बनवून त्या मताला पाठिंबा दर्शवण्यासाठी अगदी आंदोलनात सहभागी होण्यासही तयार असल्याचं चित्र दिसतं आहे. देशातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशामध्ये ‘हे काय चाललंय’ म्हणणाऱ्यांनी एकदा तरुणांशी चर्चा करून बघावी म्हणजे त्यांना ‘लोकशाहीमध्ये लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार असल्याने देशाची इमेज या व्यक्त होण्यातूनच बनत जाते’ हे समजेल असंच आजचे तरुण सांगू पाहत आहेत.