आपल्या सो कॉल्ड बिझी लाइफमध्ये थेट संवादालाच जागा राहिली नाहीय. मनातलं प्रेम, दाटून आलेल्या भावना थेट शब्दांतून समोरासमोर पोचवण्याची गरज असते अनेकदा. काही मित्र- मैत्रिणी त्यादृष्टीने प्रयत्न करताहेत.
एक दिवस सकाळी अचानक सकाळी कौस्तुभचा फोन. म्हणाला, ‘मत्रीण, कशी आहेस गं? आज तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला.’ मी चकितच! म्हणाला, ‘तुझ्याशी काहीतरी शेअर करावंसं वाटलं. गेले अनेक दिवस माझं शेडय़ुल खूप बिझी झालेलं. एकतर ती नाइट शिफ्ट करायची भुतासारखी. इतका दमायचो आल्यावर की, सरळ माझ्या रूममध्येच जायचो.. आधी झोप, मग फेसबुकवर जरा टाइमपास करून आवरेपर्यंत परत ऑफिसला जायची वेळ व्हायची. एवढय़ा मोठय़ा घरात एकतर राहणारे मी आणि आज्जीच. कित्येक दिवसांत आज्जीशी बोललो नव्हतो, कारण तिच्या आणि माझ्या कुठल्याही वेळा एक नव्हत्या आणि रोज रोज उठून आज्जीशी बोलणार तरी काय हाही प्रश्नच. सगळं इतकं यंत्रवत होत चाललं होतं..’
‘मग? तू काय केलंस?’ मी उत्सुकतेनं विचारलं.
त्यावर म्हणाला, ‘त्या दिवशी कामावर जाण्याआधी सहजच म्हणून खोलीत डोकावलो तर आज्जी तापाने फणफणून पडलेली. गेले चार दिवस ती आजारी होती आणि मला पत्ताच नाही. प्रचंड गिल्टी वाटलं त्या दिवशी. मी तिच्याजवळ गेलो तर म्हणाली- बस माझ्याजवळ थोडा वेळ, आपोआप बरं वाटेल मला. मी अर्थातच त्या दिवशी कामाला सुट्टी मारून अधाशासारख्या गप्पा मारल्या तिच्याशी, तिची काळजी घेतली आणि तिला सांगितलं की मला ती हवी आहे. ती फक्त माझ्याशी बोलायला आसुसली होती.’ आय.टी. इंजिनीअर कौस्तुभ अखंडपणे बोलत होता.
सी.ए. करणारी पुण्यात राहणारी सायली पण असंच काहीतरी म्हणत होती. ‘घर सोडून जेव्हा शिकायला म्हणून पुण्यात आले तेव्हा अर्थातच आई-बाबांची आठवण यायची. त्यांनाही माझी प्रचंड कमी जाणवायची. आई बाबा जेव्हा बोलायला म्हणून फोन करायचे तेव्हा मी बाहेर असायचे. त्यामुळे जुजबी विचारपूस ह्य़ापलीकडे बोलणंच व्हायचं नाही. मी फोन करायचे तेव्हा ते बिझी असायचे. आपण संवादच विसरतो आहोत की काय असं वाटायचं. एकदा ठरवून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना पत्र लिहिलं.. त्यांच्याबद्दल मला जे जे सांगायचं होतं त्यांना ते सगळं लिहिलं. काय मोकळं वाटलं माहिती आहे त्यानंतर..’
‘शब्देवीण संवादू’ ही खरंतर इतकी सुंदर उक्ती. पण कौस्तुभ आणि सायली ह्यांना  रोजच्या जगण्यात त्या उक्तीची प्रचीती येत नव्हती. आपल्यापकी अनेकांच्या बाबतीतही असंच होतं. निसर्गत: असलेली संवादाची गरज ‘तुला ह्य़ातलं कळणार नाही’ म्हणून झिडकारली जाते. आई बाबांच्या पिढीला तरुण पिढीची डिसिजन घेण्याची पद्धत समजत नाही आणि तरुण पिढीला मागच्या पिढीतल्या लोकांनी घेतलेले डिसिजन पटत नाहीत, कारण एकमेकांचे ‘पॉइंट ऑफ व्ह्य़ू’ समजून घेतले जात नाहीत आणि ते एकमेकांपर्यंत प्रभावीपणे पोचवले जात नाहीत. जनरेशन गॅपच्या नावाखाली एकमेकांपासून पळण्याच्या वाटा शोधल्या जातात. ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ म्हणत भावना आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याचे कष्ट घेतलेच जात नाहीत आणि ‘आय अ‍ॅम व्हेरी बिझी’चं लेबल लावत ‘स्वसंवाद’ही बंद पडायला लागतो. पण म्हणून संवादाची, आपल्या माणसांची आपल्याला असलेली गरज कमी होत नाही, तर ती पळणाऱ्या घडय़ाळाच्या काटय़ासोबत वाढत जाते. मनात कितीही प्रेम आणि भावना दाटून आल्या तरी गरज असते प्रसंगी त्या शब्दातून पोचवण्याची.
पण मग हा संवाद सुरू करायचा कसा, हा प्रश्न उभा राहतो. असाच काहीसा विचार करून कौस्तुभ, सायली आणि अजून काही फ्रेंड्सनी पावले उचलली.
‘‘आजीशी गप्पा मारून झाल्यावर मी ठरवून टाकलं की, रोज अज्जीसोबातच दुपारचं जेवण करायचं आणि आता जेवणाच्या टेबलावर आमच्या अगदी मिर्झा गालिब ते दहशतवाद अशा विविध विषयांवरच्या चर्चा रंगतात त्यामुळे आज्जी जाम खूश असते आजकाल.’’  इति कौस्तुभ.
‘‘मी त्यांना लग्नाच्या वाढदिवशी पाठवलेलं पत्र त्यांनी जपून ठेवलंय आणि आता आम्ही दर महिन्याला एकमेकांना पत्र पाठवतो. त्यांच्या फोनपेक्षा पत्रांचीच जास्त वाट बघते मी. मनानं अजून जवळ पोचते आहे त्यांच्या.’’ सायली आनंदाने सांगत होती.
प्रणव म्हणाला, ‘‘आम्ही दोस्तमंडळी आठवडय़ातून एकदा आमच्या कॉलनीमधल्या पार्कात जमतो आणि आठवडय़ाभरात कुणी काय केलं, काय नवीन वाचलं, काय पाहिलं याबद्दल गप्पा मारतो. whatsapp वर  wassup विचारण्यापेक्षा दोस्ताला प्रत्यक्ष भेटून त्याच्या पाठीवर थाप देण्यात जास्त फन आहे.’’
अनुप्रियाने मात्र एक नवीनच अनुभव सांगितला. ती रोज स्काइपवरून तिच्या दुबईमधल्या पाच वर्षांच्या भाचीला ‘बेड टाइम स्टोरी’ सांगते. तिला गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून आधी अनुप्रिया तिच्या आजीकडून गोष्टी ऐकून घेते आणि मग भाचीला सांगते.
नात्याचं महत्त्व आजची तरुणाई पुरेपूर जाणून आहे. कदाचित ते शब्दबद्ध करायला ती कमी पडत असेल.
काही वेळा काही निर्णयांमध्ये आपल्या माणसांची मतं जाणून घ्यावी लागतात हे कुठेतरी ठसत नाही मनावर. एखाद्या व्यक्तीविषयीच्या भावना शब्दांतून मांडायला आधी त्यावर विचार व्हावा लागतो. इमोशन्सना मूर्त रूप देण्यासाठी काहीतरी मेहनत आधी करावी लागतेच. एकदा का शब्दांचा संवाद सवयीचा झाला की मग परत लोनली आणि इनआर्टिक्युलेट नाही वाटत. सरावाने संवादाचा पूल सांधला जातो नेमक्या शब्दांनी.
आपल्या या दोस्त मंडळींनी केलेले प्रयत्न कदाचित छोटे असतील, पण त्यातून संवादाचे धागे विणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या धाग्यांचे संवादी दोरखंड बनतील आणि नात्यांना आपल्या माणसांना सदैव आपल्या जवळ प्रेमाने बांधून ठेवतील.
जेवणाच्या टेबलावर आमच्या अगदी मिर्झा गालिब ते दहशतवाद अशा विविध विषयांवरच्या चर्चा रंगतात.
कौस्तुभ
आईबाबांच्या फोनपेक्षा पत्रांचीच जास्त वाट बघते मी. मनानं अजून जवळ पोचते आहे त्यांच्या.
सायली