26 October 2020

News Flash

रास ना रंग

यंदा करोनामुळे गरब्याच्या आठवणीतच नवरात्र जागवायची वेळ आली आहे.

तेजश्री गायकवाड

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येऊन ठेपणाऱ्या नवरात्रोत्सवाची अनेक मंडळी आतुरतेने वाट बघतात. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास असतात. तरुण वर्ग वाट पाहात असतो तो नवरात्रीचे नऊ दिवस खेळायला मिळणाऱ्या गरबा रासाची. नवरात्र आणि रास गरबा म्हटलं की नटणं हे आलंच. परंतु यंदा या कलरफुल सणामध्ये ना नटता येणार आहे ना कोणतेही नवीन फॅशन ट्रेण्ड सेट होणार आहेत. यंदा करोनामुळे गरब्याच्या आठवणीतच नवरात्र जागवायची वेळ आली आहे.

मोठय़ा पटांगणात सुंदर रोषणाई, मोठय़ाने वाजणारी गाणी, पारंपरिक कपडे आणि गरब्याचा फेर, हे दृश्य यंदा कुठेच दिसणार नाही आहे. नवरात्री जवळ यायला लागली की तरुण तरुणी या वर्षी कुठे गरबा खेळायला जायचं हे ठरवायला सुरुवात करतात. ग्रुपने गरबा खेळायला जायची जणू प्रथाच असल्यासारखे अनेक जण दरवर्षी ग्रुप बनवून गरबा खेळतात. मग आपला आवडता गायक जिथे गाणार आहे तिथले पास मिळविण्यासाठी धडपड सुरू होते. असे पास मिळवणं म्हणजे एखदी स्पर्धा जिंकण्यासारखं असतं. बेधुंद गरबा खेळून झाल्यावर घेतलेले सेल्फी, फोटो, आपल्या आवडत्या गाण्याची केलेली फर्माईश, गरबा खेळताना झालेले नवीन मित्र, फुललेलं प्रेम अशा अनेक गोष्टींवर यंदा गदा आली आहे. काही ठिकाणी ऑनलाइन गरबा इव्हेंट करण्याची तयारी सुरू आहे, परंतु हा ऑनलाइन गरबा इव्हेंट लाइव्ह असला तरी त्यात लाईव्हलीनेस नसेल असं अनेकांचं मत आहे. कोणताही सण असला की सेलिब्रेशनसह अनेक आर्थिक गणितंही सोबतीला असतात. भारतातील मोठय़ा सणामुळे अनेकांची वर्षभराची कमाई होते. पण यंदा त्यांच्या हाती काहीच पडणार नाही आणि दरवर्षीच्या मज्जामस्तीलाही ते मुकणार आहेत. याबद्दल डान्सर श्रीकांत पोटफोडे सांगतो, पुढे प्रत्यक्षात गात असलेल्या गायकाच्या मागे ठुमका लावायची मज्जाच काही वेगळी आहे.

नवरात्र हा आमच्यासाठी मोठा सण असतो. वर्षभर आम्ही याची आतुरतेने वाट बघतो. नवरात्र सुरू होण्याआधी १५ दिवस आम्ही दिवसरात्र डान्सचा सराव करतो. स्टेजवर डान्स करत असताना समोरच्या प्रेक्षकांना आपल्यासारख्याच स्टेप करताना पाहून फार आनंद होतो. डान्ससाठी छान तयार होणंही ओघाने येतंच. सुंदर कपडे, मेकअप, ज्वेलरीसह तयार होण्याला यंदा मुरड घालावी लागतेय. दरवर्षी शोच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी हमखास फिरणं होतं. तेही यंदा आम्ही फार मिस करणार आहोत. यंदा लाइव्ह शो होणार आहेत, पण त्यात आम्हाला काही खास भाग घेता येईल अशी आशा दिसत नाही. कुठे कोणतेच शो होणार नसल्यामुळे गरबा क्लासची मागणीही यंदा नाही, असं तो सांगतो.

श्रीकांतप्रमाणेच म्युझिशियन असलेला पिंके शही यंदा नाराज आहे. ‘नवरात्रीच्या आधी आम्ही खूप प्लॅनिंग करतो. या वर्षी प्रेक्षकांना काय नवीन द्यायचं, कोणत्या दिवशी काय वाजवायचं, या म्युझिकवर प्रेक्षक गरबा करू शकतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधतो. यंदा हे सगळंच मिस करतो आहे. पर्याय म्हणून ऑनलाइन गरबा इव्हेंट जरी होणार असले तरी आम्हाला त्यात उत्साह जाणवत नाही. कारण आपल्या बीट वर प्रत्यक्षात लोकांना गरबा करण्याचा मिळणारा आनंद हे लाइव्ह सेशन्स देऊ शकणार नाहीत. मी आणि माझी टीम अनेकदा दुसऱ्या देशातही शो करायला जाते. या वर्षी करोनामुळे हेही शक्य नाही,’ असं तो सांगतो.  एकंदरीत नवरात्रीत अनेक तरुण कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी उत्तम संधी मिळते. मात्र करोनामुळे ना संधी मिळणार आहे, ना गरब्याचा उत्साहाचा रंग मनावर चढणार आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:04 am

Web Title: coronavirus hit navratri festival 2020
टॅग Navratra
Next Stories
1 वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं!
2 क्षितिजावरचे वारे :  स्टिअर क्लिअर..
3 ऑनलाइन बिनलाइन..
Just Now!
X