29 October 2020

News Flash

फॅशनची डिजिटल इनिंग

फॅशन शोजही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत.

वेदवती चिपळूणकर

करोना आणि लॉकडाउन यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, इंडस्ट्रीज ठप्प झाल्या. चर्चेत, रोजच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टी काही काळापुरत्या का होईना नजरेआड झाल्या. जीवनावश्यक गोष्टींमध्ये कपडय़ांचा समावेश होत नाही आणि कपडा बनवणाऱ्यांपासून ते विकणाऱ्यांपर्यंत अनेकजण ते हाताळत असल्यामुळे सर्वाधिक असुरक्षित असल्याची भावनाही लोकांच्या मनात घर करून असते. त्यामुळे साहजिकच सगळ्यात पहिला फटका बसला तो फॅशन इंडस्ट्रीला ! सर्व व्यवस्थांची आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी सर्वच इंडस्ट्रीजनी आपला ऑनलाइन प्रेझेन्स वाढवला. फॅशन इंडस्ट्री तरी त्यात मागे कशी राहील.. एरव्ही डिझायनर्स, मीडिया, मॉडेल्स, पीआर ते सेट अरेंजमेंट्स, बॅकस्टेज स्टाफपर्यंत सगळ्यांची धावपळ असणारे फॅशन शोजही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत.

दरवर्षी जगभरात शोज करणारे फॅशन डिझायनर्स या वर्षी मात्र सर्व काम बंद करून इंडस्ट्री सुरू व्हायची वाट बघत बसले होते. उन्हाळ्यात फिरायला जाण्याची परिस्थिती नाही म्हणून समर कलेक्शनला औचित्य नाही आणि एप्रिल-मेच्या लग्नसराईचा सीझनच ठप्प झाल्यामुळे समर वेडिंग कलेक्शनची गरजच नाही. अशा परिस्थितीत डिझायनर्सनी काम करावं तर कारागिरांपासून कापडापर्यंत सर्वावरच कोणती ना कोणती बंधनं आलेली. ही बंधनं हळूहळू शिथिल व्हायला लागली तशी फॅशन इंडस्ट्री आता पुन्हा जोर धरू लागली आहे. दरवर्षी धामधुमीत होणारे फॅशन शोज प्रत्यक्ष जरी होणार नसले तरी त्यावरही इंडस्ट्रीने उपाय शोधला आहे.

१८ ते २३ सप्टेंबर दरम्यान ‘फॅशन डिझाइन काउन्सिल ऑफ इंडिया’ अर्थात ‘एफडीसीआय’ने पहिलावहिला डिजिटल फॅशन वीक साजरा केला. रोज संध्याकाळी इन्स्टाग्राम लाइव्ह करून हा फॅशन वीक सेलिब्रेट करण्यात आला. जवळपास पंचवीस डिझायनर्सनी यात आपली कलेक्शन्स प्रेझेंट केली. प्रत्यक्ष फॅशन शोवर असलेल्या बंधनांमुळे प्री-शूट केलेले व्हिडीओज इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून एअर करण्यात आले. मर्यादित क्षमतेने काम करत असलेली फॅशन आणि एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री यानिमित्ताने पुन्हा उत्साहाने कामाला लागली. याच मर्यादित क्रूमुळे अनेक शोजमध्ये मॉडेल्सच एकमेकांना तयारीत मदत करताना दिसले. बहुतेक सर्व शोज हे इनडोअर शूट करण्यात आले होते. मॉडेल्सही एकमेकांच्या संपर्कात कमीतकमी येतील अशा पद्धतीने शोज कोरिओग्राफ केले गेले होते. मात्र नेहमीप्रमाणे अनेक डिझायनर्ससाठी बॉलीवूड सेलेब्रिटींनी शोस्टॉपर म्हणून शूट अथवा वॉक केलं. करोनाकाळात हा ग्लॅमरस शिरस्ता चुकला नाही, हेही नसे थोडके .

केवळ एफडीसीआय नव्हे तर ‘ब्लेंडर्स प्राइड’नेदेखील ‘फॅशन टूर २०२०’ डिजिटल माध्यमातून घडवून आणली. तरुण ताहिलीयानी या डिझायनरने यामध्ये आपल्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाला रिप्रेझेंट करणारी पंचवीस डिझाइन्स सादर केली. फॅशनच्या नाटय़ प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगितलेली गोष्ट ही डिझायनरचा व त्याच्या स्टुडिओचा आतापर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील क्रांती याबद्दल बोलणारी होती. घरूनच या शोचा कम्फर्टेबल आनंद घेण्याचा अनुभव दर्शकांना देता आला याबद्दल ‘पर्नोड रेकॉर्ड इंडिया’चे मार्केटिंग जीएम ईश्विंदर सिंग यांनी समाधान व्यक्त केले. भारतात प्रसिद्ध असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक’नेही आपल्या पहिल्यावहिल्या डिजिटल फॅ शन शोची घोषणा के ली आहे. २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान हा डिजिटल लॅक्मे फॅ शन वीक पार पडणार आहे. रिलायन्सच्या सहकार्याने हा सोहळा पार पडतो. ‘करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत फॅ शन इंडस्ट्रीला पुढे जाण्यासाठी एक ठोस दिशा देण्याची गरज आहे. या डिजिटल शोच्या माध्यमातून इंडस्ट्रीला पुढे जाण्यासाठी वाव मिळेल. डिजिटल फॅ शन शोच्या माध्यमातून देश-परदेशातील प्रेक्षक, खरेदीदार आणि डिझायनर्स यांच्यातील दुरी कमी करणे शक्य होणार आहे’, अशी माहिती ‘आयएमजी रिलायन्स’च्या लाइफस्टाइल बिझनेसेस विभागाचे प्रमुख जसप्रीत चंडोक यांनी दिली.

अनेक अडचणींवर मात करत पुन्हा सुरू होत असलेली फॅशन इंडस्ट्री आपलं रूप थोडंफार पालटून आता डिजिटल इनिंग सुरू करते आहे, असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत ऑन-साइट होत असलेले फॅशन शो त्याच वेळी ऑनलाइनही एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह एअर करायचे किंवा सोशल मीडियावर लाइव्ह करायचे प्रयोग काही वेळा झाले होते. मात्र इंडस्ट्रीवरची बंधनं लक्षात घेता कदाचित ऑनलाइन प्रायव्हेट स्क्रीनिंग्ज, डिझायनर्सचे प्री-रेकॉर्डेड इंटरवूज आणि डिजिटल व्हिडीओ कॉलिंगच्या स्वरूपात होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्स हाच पर्याय हळूहळू ‘कॉमन’ होईल आणि पुन्हा नव्याने उभ्या राहणाऱ्या फॅशन इंडस्ट्रीचा कदाचित हा एक अविभाज्य भाग बनून जाईल. त्यामुळे डिजिटल फॅशन शोजकडे फ्यूचर म्हणून बघायला हरकत नाही.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:01 am

Web Title: fashion shows now on digital platforms zws 70
Next Stories
1 ‘अ‍ॅप’निर्भर
2 वस्त्रांकित : चंद्रकळेच्या इतिहासखुणा
3 क्षितिजावरचे वारे : विस्मृतीतील खलनायक
Just Now!
X