प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून ओळखली जाणारी मलाइका देतेय स्टाइल टिप्स खास व्हिवाच्या वाचकांसाठी.
मी स्नेहल. मी २० वर्षांची असून माझे वजन ३९ किलो आहे. माझी उंची चांगली आहे. माझे केस कुरळे व खांद्यापर्यंत लांब आहेत. नुकतेच मी पदविका शिक्षण पूर्ण केले आहे. माझी फॅशनेबल दिसण्याची इच्छा आहे. माझे वजन खूप कमी आहे, तरीही मला शॉर्ट, स्केटर्स ड्रेस चांगले दिसतील का? माझ्यासाठी योग्य अशा काही ड्रेसिंग टिप्स मिळतील का?
हाय स्नेहल,
तू दिलेल्या वर्णनावरून तुझा बांधा आकर्षक आणि उंच असेल असं वाटतं आहे. खरं तर तू ड्रेसेसचे वेगवेगळे प्रकार घालून पाहायला काहीच हरकत नाही. फक्त स्केटर किंवा शॉर्ट ड्रेसेस अशी स्टायलिंगवर बंधने घालण्याची तुला अजिबात गरज नाही. (स्केटर ड्रेस- गुडघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडय़ा कमी लांबीचा वनपीस फ्रॉकसारखा ड्रेस, यात फक्त स्कर्टही असू शकतात, त्यांना स्केटर स्कर्ट असे म्हणतात.) मोहक रंगसंगतीतील रंगीबेरंगी स्केटर स्कर्ट तू वापरून पाहू शकतेस. हे स्केर्ट्स तू हायवेस्ट प्रकारे परिधान केलेले चांगले, तुझी बारीक कंबर आणि उंची यामुळे या ड्रेसप्रकारात तुझा सडपातळ बांधा छान उठून दिसेल. या स्कर्टवर तू निरनिराळे ब्लाऊजेस, टी-शर्ट वापरून नवनवीन स्टाइल्स करू शकतेस. नाही तर करडा (ग्रे) किंवा पांढरा टी-शर्ट आणि एखादा ठशठशीत नेकलेस एवढे घातले की तुला स्टायलिश लुक आलाच म्हणून समज. खास पार्टीसाठी म्हणून बॉडीकॉन ड्रेस (तंग, अंगासरशी बसणारे) उत्तम, किंवा ऑफशोल्डर (या प्रकारात गळा व दोन्ही किंवा एक खांद्याचा भाग उघडा ठेवला जातो.) प्रकारातील बॉडीकॉन ड्रेसही शोभून दिसतात, अशा तंग ड्रेसप्रकारात तुझ्या  खांद्याच्या, मानेच्या हाडांचे रेखीवपण सहजच दिसून येते. यावर सुंदरशी उंच टाचांची पादत्राणे आणि हातात चमकदार क्लच (हातात मावणारी छोटी किंवा चपटी पर्स) असले की यू आर रेडी फॉर पार्टी.
 शॉर्टस, टी-शर्ट आणि स्नीकर्स (कापडी शूज- इन्फॉर्मल वेअरचा प्रकार) हा ड्रेसही उत्तम आहे. आजकाल बरेच जण हा ड्रेस घालताना तुला दिसतील. यात तुमचा लुक स्टायलिश आणि आकर्षक दिसतो. लक्षात घे, एखादी ठरीव, साचेबद्ध स्टाइल करण्यापेक्षा अशा चाकोरीबाहेरील एखाद्या ड्रेसिंगमध्ये तू अधिक तरुण आणि स्मार्ट दिसशील. आणखी एक करता येईल, तुझ्या नेहमीच्या ड्रेसिंगमध्ये स्पोर्टी ड्रेसस्टाइलचा अंतर्भाव करून पाहा. उदाहरणार्थ, फुलाफुलांचं बॉम्बर जाकीट (आखूड लांबीचे पुढून झिप असलेले) आणि जीन्स यात तुझा लुक अगदी ‘चमको’ दिसेल. असे ड्रेसिंग मित्र-मत्रिणीसोबत किंवा कॉलेजमध्येही बेस्ट दिसेल.
 स्नेहल, आपल्या प्रत्येकाच्या मनात खरं तर एक स्टायलिस्ट दडलेला असतो. तेव्हा ग्रेट फॅशनेबल लुकसाठी, वेगवेगळे ड्रेसप्रकार आणि मनात येणाऱ्या फॅशन आयडियाज बिनधास्तपणे स्वत:वर ट्राय कर. तुझ्या स्मार्ट लुकसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा!
मलाइका अरोरा खान
(अनुवाद- गीता सोनी)             
सौजन्य – द लेबल कॉर्प
http://www.thelabelcorp.com,  http://www.theclosetlabel.com

आपल्या गर्ल्स गँगबरोबर सकाळी ब्रंचला जाणार आहात की रात्री पार्टीचा प्लॅन आहे? काय घालू, कसं दिसेल या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्टाइल दिवा मलाइका अरोरा-खान तुम्हाला मदत करेल. फॅशन, कपडे, हेअर, स्टाइलिंग याबाबतच्या तुमच्या शंकांना मलाइका या सदरामधून उत्तरं देईल. फॅशन आणि स्टाइलिंगविषयीचे आपले कोणतेही प्रश्न viva@expressindia.com या इमेल आयडीवर बिनधास्त पाठवा. आपलं नाव, राहण्याचं ठिकाण यांसह प्रश्न पाठवा आणि सब्जेक्ट लाइनमध्ये स्टाइलिंग बाय मलाइका असं आवर्जून लिहा.