News Flash

‘फॉरेन’चा सिनेमा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना तरुणाईची गर्दी आता नेहमीची झाली आहे. ही तरुणाई नवीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी, अभिनेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधते.

| November 15, 2013 01:09 am

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना तरुणाईची गर्दी आता नेहमीची झाली आहे. ही तरुणाई नवीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी, अभिनेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधते. नुकत्याच पार पडलेल्या मामि महोत्सवाच्या निमित्ताने इंटरनॅशनल सिनेमातलं तरुणाईला काय आवडतं आणि का आवडतं हे शोधण्याचा प्रयत्न..
क्रिकेट आणि सिनेमा हे दोन विषय कायमच भारतीयांच्या मनावर राज्य करत आले आहेत. सिनेमाच्या उगमापासूनच भारतीयांनी त्याला आपलंसं करून घेतलं. हळूहळू त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात दिसू लागला; आणि आताशा तर, सिनेमाची गोष्टच मुळी आपल्या दैनंदिन जीवनाची छबी म्हणून समोर येऊ लागली आहे. तरुणाईवर होणारा चित्रपटसृष्टीचा परिणाम तर किती बोलावा तितका कमी आहे. कपडय़ांच्या पद्धती, केसांची ठेवण, मित्र-मत्रिणींशी संवाद साधताना वापरले जाणारे काही खास शब्द, आपल्या प्रेमिकेला खूश करण्याच्या नवीन पद्धती, गाण्यांची आवडनिवड – अशा बऱ्यांच गोष्टींतून आपल्याला हा सिनेमा इफेक्ट थेट जाणवत असतो. मात्र आजकालच्या जागतिकीकरणानंतरच्या काळात आपल्या तरुणाईवर होणारा चित्रपटांचा परिणामही केवळ बॉलीवूडपुरता मर्यादित राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या भारतीय प्रेक्षकवर्गात वाढ झालेली दिसते. इंग्रजी चित्रपटांची चलती असली, तरी त्याचबरोबर फ्रेंच, स्पानिश, इराणी, अफगाणी असेही चित्रपट आवर्जून बघण्याकडे तरुणांचा कल दिसतो.
काय बघतात तरुण?
नुकत्याच पार पडलेल्या ‘मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’ (मामि) मध्ये हा नवीन ‘ट्रेंड’चा प्रत्यय आला, असं नक्कीच म्हणता येईल. ‘सन ऑफ केन’सारख्या स्पानिश चित्रपटाला तरुणांची गर्दी लोटली, ती साचेबद्ध चाकोरीच्या बाहेरचा म्हणून. एका नवोदित दिग्दर्शकाचा ‘सायकॉलोजिकल थ्रिलर’ बघण्याकरता मुलं रांगा लावून उभी होती. याउलट ‘सुलेमानी कीडा’ या वेगळ्या धाटणीच्या िहदी चित्रपटाने तरुणांना आकर्षति केलं ते  गोष्टीमार्फत सामोऱ्या येणाऱ्या मुंबईतल्या तरुणांच्या दैनंदिन जीवनासाठी. ‘आय एम वोचिंग ओवर यू’सारख्या फ्रेंच लघुपटाला वाहवा मिळाली ती त्यात हळुवारपणे उलगडल्या गेलेल्या आई-वडील आणि मुलांच्या नातेसंबंधांच्या विषयासाठी. ‘गोपी गवय्या, बाघा बजय्या’ यासारख्या नव्या अॅनिमेटेड िहदी चित्रपटाचंही त्याच्या नावीन्यपूर्ण मांडणीकरता कौतुक झालं. मुंबईतल्या निराधार मुलांच्या जीवनावर आधारित ‘लिटल बिग पीपल’ किंवा भारतातील क्रिकेटच्या वेडावर आधारित ‘बियाँड ऑल बाउण्ड्रीज’ यांसारख्या डॉक्युमेंटरी पद्धतीच्या चित्रपटांनाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे एवढे परकीय चित्रपट असूनही कुठल्या परप्रांतीयच नव्हे, तर मराठी चित्रपटांनीही तरुणाईला खेचून घेतलं. नागराज मंजुळे दिग्दíशत ‘फंड्री’ या मराठी चित्रपटाला तरुण प्रेक्षक वर्गाने दाद दिली. खेडेगावातल्या, दलित समाजातल्या मुलाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट सगळ्यांनीच टाळ्यांच्या कडकडाटात सन्मानित केला. या चित्रपटाने ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ या मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही पटकावला.
का बघतात?
आंतरराष्ट्रीय सिनेमा मार्फत केवळ निराळी भाषा नव्हे, तर वेगळी संस्कृती तरुणांसमोर उलगडते. त्यांचं आपल्याशी असणारं साम्य; किंवा त्यांचं वेगळेपण तरुणाईला आकर्षति करत असावं. त्याचबरोबर ‘हीरो-हीरोईन-प्रेम-गाणी-मारामारी’ या साचेबद्ध चित्रपटाच्या सूत्रातून बाहेर पडून विविध विषय हाताळणारे हे चित्रपट तरुण मंडळी अधिकाधिक उत्साहाने बघताना आढळतात.
अशा पद्धतीचे चित्रपट महोत्सव म्हणजे तरुणांकरता एक सुवर्णसंधीच! इथे आठवडय़ाभरात जगभरच्या कलाकृती बघायला मिळतात. तसंच या नवीन चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी गप्पा, प्रश्नोत्तरं; अभिनेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणं ही मुंबई फिल्म फेस्टिव्हलची वैशिष्टय़ आहेत. याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता ‘मामि’ ने खास आíथक सवलतसुद्धा दिली आहे. त्यामुळे फिल्म फेस्टिव्हलला तरुणाईची गर्दी नेहमीच दिसते.
सेंट झेवियर्स कॉलेजचा रोनित जाधव हा एस.वाय.बीएमएमचा विद्यार्थी सांगतो- ‘एवढय़ा कमी दरात एका आठवडय़ात २८ चित्रपट बघायला मिळणं, म्हणजे माझ्यासारख्या सिनेमाचं वेड असणाऱ्या माणसाला पर्वणीच आहे. शिवाय, फेस्टिव्हलला येणारा प्रेक्षक वर्गही केवळ वेळ फुकट घालवण्याकरता आलेला नसतो. त्यांनाही नवनवीन पद्धतीचे चित्रपट बघण्याची, त्यातून शिकण्याची इच्छा असते. अशा लोकांशी ओळखी करून घेतानाही मजा येते. त्यामुळे मी आणि माझे मित्र दरवर्षी न चुकता इथे हजेरी लावतो.’
परंतु, पाश्चात्त्य संस्कृतीशीही चित्रपटामार्फत साधली जाणारी जवळीक लक्षात घेता, त्याला एक नकारात्मक बाजू असल्याचंही ध्यानात येतं. बहुअंगी विचार, सामाजिक भान यांसारख्या सकारात्मक मूल्यांच्या बरोबरीनेच भारतीय युवा पिढी मद्यपान, धूम्रपान, अश्लील भाषा हे घटकदेखील आत्मसात करते आहे. आपल्या देशातील सत्यपरिस्थितीही या घटकांशिवाय नसली; तरीही आंतरराष्ट्रीय सिनेमाचा आपल्या आयुष्यातला शिरकाव लक्षात घेता, आपल्या मूळ सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होईल की काय; अशी भीती वाटल्याशिवाय राहत नाही. अनसेन्सॉर्ड मूव्हीज बघणं हा काही थोडय़ा तरुणांचा इथे येण्याचा उद्देश असेलही. पण तरीही हा टक्का थोडाच असतो. सर्वार्थाने जगाचं भान देणारा महोत्सव आणि चित्रपटाविषयी खूप काही शिकण्याची संधी मिळते म्हणूनच इथे तरुणाई लोटते हेच खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:09 am

Web Title: foreign cinema
टॅग : Bollywood,Cinema,Film,Ladies
Next Stories
1 फंक्शनल मेक-अप
2 बाराखडय़ांची क्रीम्स
3 ग्लॅमरची वाट महानगरांबाहेर
Just Now!
X