नव्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी केलं जाणारं र्मचडायझिंग आता प्रसिद्ध सिनेमाची लोकप्रियता कॅश करण्यासाठीही वापरण्यात येतंय. ‘डीडीएलजे’च्या हजार आठवडय़ांनिमित्त बाजारात आलेल्या वस्तू तेच सुचवताहेत. या सिनेमाचं नव्यानं ‘ब्रॅण्डिंग’ होतंय.

भारतीयांवर चंदेरी दुनियेची भुरळ पहिल्यापासूनच आहे. सिनेमातली फॅशन लोकप्रिय होऊन मग बाजारात त्या स्टाइलचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज दिसायचे. ‘हम आपके है कौन’मधल्या माधुरीचा लाल फ्रॉक आठवा.. आधी सिनेमा आला आणि मग फॅशन रुळली. आता चित्र थोडं बदललं आहे. आता ‘सिंघम’ रीलीज होण्यापूर्वीच त्यातला गॉगल बाजारात दिसायला लागतो. सिनेमाचं र्मचडायझिंग हे हल्ली व्यवसायाचं मोठं साधन बनलंय. सिनेमाच्या मार्केटिंग तंत्राचा तो भाग आहे, असं मानलं जातं.
असं सिनेमासाठी र्मचडायझिंग आपल्याला परिचित होतंय ना होतंय, तेवढय़ात याच्या पुढची पायरी दिसायला लागली आहे. सिनेमा रीलीज होऊन २० र्वष झाल्यानंतर त्याचं र्मचडायझिंग करण्याची किमया ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या बॉक्स ऑफिसवर विक्रम करणाऱ्या चित्रपटाने केलीय.  हा चित्रपट ९० च्या दशकात प्रदर्शित झाला तेव्हा आजच्यासारखं र्मचडायझिंगचं फॅड नव्हतं. तरीही या सिनेमातले संवाद, अभिनेत्यांची स्टाइल, त्यांनी एकमेकांना दिलेली गिफ्ट्स, सिनेमात दिसलेली स्थळं सगळं लोकप्रिय झालं. त्याचं ब्रँडिंग आपोआप झालं. आता मात्र ‘डीडीएलजे’चं नाणं आणखी खणखणीत वाजवून घेण्यासाठी नवी ब्रँडिंग आयडिया समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन.इन या शॉपिंग साइटवर ‘डीडीएलजे’चे मग, कुशन्स, बॅजेस दिसताहेत. निमित्त आहे या सिनेमाच्या

हजाराव्या आठवडय़ाचं. ‘डीडीएलजे’ने तो काळ गाजवला होताच; पण या चित्रपटाची जादू अजूनही कायम आहे. आता ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ची गोष्ट आदित्य चोप्रा पुन्हा सांगतोय, पुस्तकरूपानं आणि अर्थातच ही पडद्यामागची कथा आहे, सिनेमाच्या घडण्याची. नसरीन मुन्नी कबीर या सहलेखकाच्या मदतीनं आदित्य चोप्रानं हे लिहिलंय. ते हजाराव्या आठवडय़ानिमित्त रीलीज झालं.

लिमिटेड एडिशन काऊ बेल
राज आणि सिमरनच्या प्रेमाचं प्रतीक बनलेली ती प्रसिद्ध स्विस काऊ बेल ६५०० रुपयांना उपलब्ध आहे. शाहरुख खान, काजोल आणि आदित्य चोप्राची स्वाक्षरी यावर आहे, हा याचा यूएसपी.

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’मागची गोष्ट सांगणारं आदित्य चोप्राचं पुस्तक आणि सिनेमाशी संबंधित इतर सोव्हेनियर्स गेल्या आठवडय़ात ऑनलाइन मार्केटमध्ये दाखल झालीत. सलग हजार आठवडे बॉक्स ऑफिसवर चालणाऱ्या या चित्रपटानं एका अर्थानं विक्रम केला आहे. १९९५ च्या ऑक्टोबरमध्ये रीलीज झालेल्या या चित्रपटाने मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात सलग हजारावा आठवडा १२ डिसेंबरला पूर्ण केला. त्यानिमित्त हे सगळं र्मचडाईझ उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यात मग, कुशन कव्हर्स, टी कोस्टर्स, बटन बॅजेस, कीचेन अशा वस्तू आहेत. ‘कम फॉल इन लव्ह ऑल ओव्हर अगेन’, असं आवाहन करत हे सगळं कलेक्शन पुस्तकासह ऑनलाइन आणि रिटेल बाजारात आणलं गेलंय.