जगाच्या पाटीवर : सुशांत मोहिते

रोजच्या धावपळीतून एखादा दिवस मोकळा मिळाल्यावर मॉसन लेकच्या शांत परिसरात फिरायला मला आवडतं. आजही असाच फिरताना मनात विचार आला की, गेल्या दीड वर्षांत आयुष्य किती बदलून गेलं आपलं! फेब्रुवारी २०१८ मध्ये मी अ‍ॅडलेडला आलो. ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया’मध्ये ‘बॅचलर्स इन नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी’च्या वर्गात प्रवेश मिळाला आणि मला आभाळ ठेंगणं झालं. सायबर सिक्युरिटी या विषयाचा अभ्यास करायचं माझं स्वप्न आता पूर्ण होणार याचा आनंद मला झाला. किती अचानक झालं होतं हे सगळं..

कॉम्प्युटर आणि त्यातही सायबर सिक्युरिटी या विषयाकडे माझा लहानपणापासून ओढा होता. एकदा काकांनी, मोठा झाल्यावर ‘तुला कोण व्हायचंय?’ असं विचारल्यावर ‘हॅकर’ असं उत्तर देऊन त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. दहावीत ९१% गुण मिळाल्यामुळे बारावीनंतर आयआयटीसाठी प्रयत्न करायची इच्छा होती. त्यासाठी नेहमीच्या ज्युनियर कॉलेजऐवजी भरपूर फी भरून आई-बाबांनी मला ‘इंटिग्रेटेड कोर्स’मध्ये घातलं. तिथे रोज दिवसभर दहा-दहा तास अभ्यास करून काही महिन्यांतच मी कंटाळलो. माझे इतर मित्र मस्त कॉलेज लाइफ एन्जॉय करत होते आणि मी मात्र अभ्यास करून थकत होतो. त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ  लागला. कॉम्प्युटर सायन्स या एकाच विषयात मन रमत होतं. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय शत्रूच वाटू लागले होते. परिणामी आयआयटी प्रवेश हुकला. खरंतर दुसऱ्या चांगल्या कॉलेजमध्ये मला कॉम्प्युटर इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला होता; पण कॉलेज सुरू झालं आणि पुन्हा माझा भ्रमनिरास झाला. पहिल्या वर्षी फाउंडेशन कोर्समध्ये कॉम्प्युटर सायन्सपेक्षा इतर विषयांवरच जास्त भर होता; ज्यांचा माझ्या विषयाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. माझा जुना कंटाळा पुन्हा मला शोधत आला. काहीतरी कारण काढून मी कॉलेज बुडवू लागलो. मनातल्या मनात कुढू लागलो, एकटेपणा वाढू लागला, कुटुंबापासून तुटू लागलो. मला नेमकं काय हवंय तेच मला कळत नव्हतं, आईबाबांनी खूप समजावून पाहिलं. पण काही उपयोग झाला नाही. एक दिवस ही कोंडी फोडली बाबांच्या मित्रांनी- निकमकाकांनी. त्यांनी त्यांचा मुलगा ऑस्ट्रेलियातच शिकत असल्याचं सांगितलं. मग आम्ही आयडीपी या संस्थेत जाऊन माहिती घेतली. ऑस्ट्रेलिया एज्युकेशन फेअरमधल्या विद्यापीठांच्या प्रतिनिधींकडून  तिथल्या अभ्यासक्रमांची माहिती मिळवली. मला हवा असलेला सायबर सिक्युरिटी हा विषय ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया’ विद्यापीठात होता आणि त्यांची मला प्रवेश द्यायची तयारीही होती. तिथून परतताना, खरोखरच ऑस्ट्रेलियाला जायला मिळालं तर किती बरं होईल, हा एकच विचार मनात होता. पण ते सोपं नव्हतं. चर्चेअंती आई-बाबांनी बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय नक्की केला. त्या दिवशी माझे आईबाबा माझ्यावर खूप प्रेम करतात, सतत माझ्या भल्याचा विचार करतात, ही गोष्ट मला कळली.

पुढच्या गोष्टी भराभर घडल्या. ‘आयईएलटीएस’ परीक्षेत चांगली ग्रेड मिळाली, आयडीपी संस्थेने पुढचे सोपस्कार वेगानं पूर्ण केले. बँकेत कर्जाचं काम होऊ न मी ऑस्ट्रेलियाला जाणार हे नक्की झालं. आता मला हवा असलेला विषय कसल्याही अडथळ्याशिवाय शिकता येणार होता. तिथली शिक्षणपद्धती वेगळी असणार याची चुणूक तिथे जाण्यापूर्वीच मिळाली. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट आयडी नंबर मिळाला. लगेच विद्यापीठाने ईमेलवरून विद्यार्थ्यांसाठी असलेली नियमावली, सोयीसुविधा कळवल्या. त्यांच्या नियमानुसार माझ्या विषयांचं वेळापत्रक तयार करून त्यांना पाठवायचं होतं. लेक्चर्सच्या वेळा, असाइन्मेंट्स, टय़ुटोरियल आणि प्रॅक्टिकलच्या वेळांचा मेळ घालत हे वेळापत्रक तयार करावं लागतं. ही कठीण गोष्ट होती. मग रात्रभर जागून, तिथल्या मित्रांशी चर्चा करून ते पाठवलं. हा पहिलाच परदेश प्रवास एकटय़ाने करायचा होता. आईबाबांना काळजी वाटत होती; पण मला आत्मविश्वास वाटत होता. व्हॉट्सअ‍ॅपवरून ओळख झालेला निशिल मला घ्यायला एअरपोर्टवर येणार होता. वीस तासांच्या विमान प्रवासानंतर अ‍ॅडलेड एअरपोर्टवर उतरलो. मुळात अ‍ॅडलेड शहर सिडनी किंवा मेलबर्न या शहरांइतकं गजबजलेलं नाही. आमचा कॅम्पस शहरापासून तासाभराच्या अंतरावर असून हा भाग अतिशय शांत आहे. माझ्यासारख्या मुंबईकराला या शांततेची सवय व्हायला जरासा वेळ लागला. इथलं सिमकार्ड आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पास ही अत्यावश्यक खरेदी केली. सिमकार्डसोबत मोबाइल हँडसेट नाममात्र भाडय़ाने मिळत असल्यानं आयफोन हाती आला. राहायची सोय मुंबईतूनच केली होती. तेव्हा सहा खोल्यांच्या एका बंगल्यात वेगवेगळ्या देशांच्या मुलांबरोबर राहायचं होतं. सामायिक स्वयंपाकघरातल्या कपाटात आणि फ्रिजमध्ये माझ्या सामानाला थोडी जागा मिळाली. सुरुवातीला डॉलरमध्ये खरेदी करताना आपोआपच रुपयांचा हिशेब केला जाई. उगीच खूप खर्च झाला, असं वाटून उदास वाटे. पण अर्धवेळ नोकरी करू लागल्यावर हा अपराधीपणा हळूहळू कमी होत गेला. घरी स्वयंपाक करायची सवय आणि आवडही नव्हती. पण इथं नाइलाज होता. मग ऑम्लेटपासून सुरुवात करत आता चिकनपुलावपर्यंत प्रगती केली आहे. सुरुवातीला हातखर्चासाठी घरून पैसे येत होते. पण इथे सगळीच मुलं काही ना काही काम करून आपला खर्च भागवतात. विद्यार्थ्यांना आठवडय़ाला वीस तास काम करण्याची परवानगी असते. मलाही आता बर्गर किंगच्या रेस्तराँमध्ये नोकरी मिळाली आहे. भारतात कोणतंच काम करायची सवय नसल्याने सुरुवातीला जरा जड गेलं. इथे दोन प्रकारची कामं करायला लागतात. कधी फ्रंट काउंटरवर ग्राहकांच्या ऑर्डर्स घ्यायच्या, गल्ला सांभाळायचा, तयार ऑर्डर्स नीट पॅक करून ग्राहकाला द्यायच्या, फोनवरच्या ऑर्डर्स घ्यायच्या, त्या पाठवायची व्यवस्था करायची. ही कामं त्या मानाने सोपी. पण किचनमध्ये डय़ुटी लागली तर अगदी पिट्टय़ा पडतो. तिथे कामातून फुरसत मिळत नाही. बन्सचे, पॅटिसचे वजनदार क्रेट उचलण्यापासून ते स्वयंपाकाशी संबंधित अनेक कामं करावी लागतात. शेवटच्या पाळीला असल्यास रेस्तराँ बंद व्हायच्या वेळी सगळी आवराआवर करूनच निघावं लागतं. पैशांसाठी कष्ट केल्यावर त्यांचं खरं मोल कळतं.

नोकरी मिळाल्यानंतर खरी तारेवरची कसरत सुरू झाली. घरी आईने दहा हाका मारूनही न उठणारा मी आता अलार्मच्या एका बीपनं उठून बसतो. कधी कधी सकाळी सातला घर सोडतो ते कॉलेज, नोकरी करून रात्री दहा वाजता परत येतो. आल्यानंतर स्वयंपाक, जेवणं, आवरणं  आणि थोडा अभ्यास करून नंतर झोपेपर्यंत कधी कधी एक वाजतो. अशा वेळी घराची, आईच्या हातच्या स्वयंपाकाची खूप आठवण येते. एकटय़ानं राहायचा आत्मविश्वास वाढायला एक प्रसंग कारणीभूत ठरला. माझं घर आणि नोकरीचं ठिकाण लांब आहेत. घरून निघाल्यापासून तीन बसेस बदलून तिथे पोहोचायला दोन तास लागतात. शेवटच्या पाळीला डय़ुटी असेल तर अक्षरश: पळत शेवटची बस पकडावी लागते. ती बस चुकल्यास सकाळपर्यंत बस नसते. एकदा रात्री रेस्तराँमधून निघालो आणि बसस्टॉपवर जेमतेम पोहोचतो तो बस समोरून जाताना दिसली. क्षणभर काय करावं सुचेना. पाच-दहा मिनिटं शांत बसून राहिलो. मग उबेरसाठी प्रयत्न केला, पण एकही कॅब त्या वेळी उपलब्ध नव्हती. थोडी भीती वाटू लागली. त्या परिसरात कुणीच ओळखीचं नव्हतं. हॉटेलमध्ये रात्र काढण्याइतके पैसे नव्हते. मग स्वत:लाच धीर दिला. कानाला हेडफोन लावले, आवडीची गाणी लावली, मोबाइलवर गूगलमॅप सुरू करून सरळ चालायला सुरुवात केली. दिवसादेखील शांत असणाऱ्या या शहरातल्या रात्रीही सुनसानच असतात. एखादी धावती मोटार वगळता रस्त्यावर माझ्याखेरीज चिटपाखरू नव्हतं. तरीही एकदा चालायला सुरुवात केल्यानंतर मात्र मुळीच भीती वाटली नाही. त्या शांत रस्त्यावरून छान गाणी ऐकत जवळपास तीन तास चालत मी घरी पोहोचलो, तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता. त्या रात्री अ‍ॅडलेड शहराविषयी आपलेपणा वाटला.

‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया’च्या मॉसन लेक कॅम्पसमध्ये सगळे टेक्निकल विषय शिकवले जातात. तो सुंदर प्रशस्त कॅम्पस पाहून मी हरखून गेलो. मोठमोठय़ा पायऱ्यापायऱ्यांनी चढत गेलेले वर्ग. प्राध्यापक लॅपटॉपवरून शिकवतात ते मोठय़ा स्क्रीनवर दिसतंच, पण विद्यार्थ्यांना आपापल्या लॅपटॉपवरही पाहता येतं. चोवीस तास सुरू असणाऱ्या तीन मजली ग्रंथालयात वाचनासह कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, हे सगळं माझ्यासाठी नवीन आणि उत्साहदायी होतं. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे बारकाईनं लक्ष पुरवलं जातं. कॅम्पसमधल्या रेस्तराँखेरीज प्रत्येक इमारतीत चोवीस तास चालू असलेल्या कॅफे लाउंजमध्ये विद्यार्थ्यांच्या विश्रांतीसाठी आरामदायी खुर्च्याची सोय असते. मनोरंजनासाठी टेलिव्हिजन, पूलटेबल्स असतात. विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्याख्यानाला बसलंच पाहिजे, अशी सक्ती नसते. सगळी लेक्चर्स युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी आठवडाभरात भरपूर मोकळा वेळ दिलेला असतो. लेक्चर्सपेक्षा असाइन्मेंट्स, टय़ुटोरियल्स, प्रॅक्टिकलवर भर असतो. आम्ही विषय समजून घेऊन, त्याचे संदर्भ शोधून असाइन्मेंट्स पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा असते. प्राध्यापक सदैव मदतीला तयार असतात. गूगलवरून मिळवलेली माहिती चालत नाही. आवडीचे विषय आणि अभ्यासाला पूरक वातावरणामुळे बराचसा मोकळा वेळ अभ्यासासाठीच खर्च करतो. नेटवर्किंग अँड सायबर सिक्युरिटी असा माझा विषय आहे. इंटरनेटच्या माध्यमातून साधला जाणारा परस्परसंवाद याविषयीचं शिक्षण घेतो आहे. इंटरनेटच्या प्रसाराच्या वेगानेच सायबर गुन्ह्य़ांमध्येही वाढ झाली. आपण कॉम्प्युटरमध्ये व्हायरस शिरलाय, असा शब्दप्रयोग करतो, हा व्हायरस आपला डेटा उद्ध्वस्त करतो, त्याचा गैरवापर करतो आणि आपलं वैयक्तिक, आर्थिक नुकसान करतो. राष्ट्रीय पातळीवरही अशी गुप्त माहिती गैरमार्गाने मिळवून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली जाते. या गुन्ह्य़ांना सायबर गुन्हेगारी म्हणतात. ते रोखण्याचे उपाय म्हणजेच सायबर सिक्युरिटी. आपल्या डेटा (विदा) आणि तंत्रज्ञानावर होणारा अनधिकृत हल्ला थोपवण्याची उपाययोजना म्हणजे सायबर सिक्युरिटी. इंटरनेटवर अवलंबून असलेल्या आजच्या जगात या विषयाची गरज दिवसेंदिवस वाढतेच आहे. आपली विदा सुरक्षित राखण्याबरोबरच देशविघातक कारवाया करणाऱ्या यंत्रणांचा विदा मिळवून त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो म्हणूनच ‘हॅकर’ हा नेहमीच वाईट अर्थाने घ्यावा असा शब्द नाही. हे सगळं शिकताना खूप मजा येते. आता माझा कंटाळा मला कायमचा सोडून गेला आहे. त्याचा परिणाम सहजच निकालावर झालेला दिसतो. गेल्या तिन्ही सेमिस्टरमध्ये मला ८५%हून जास्त गुण मिळाले आहेत.

वर्षांतून दोनदा सुरू होणाऱ्या नवीन सेमिस्टरच्या निमित्ताने नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या पाटर्य़ा होतात. विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख होण्यासाठी सहलीचं आयोजन केलं जातं. या सहलींमध्येच माझी अमनशी ओळख झाली. अमन गुजराती असून माझ्यासारखाच बारावीनंतर आयटी शिकायला आला आहे. आमचे काही विषय सारखेच असले तरी त्याचं स्पेशलायझेशन वेगळ्या विषयात आहे. एकदा अमन आणि माझी आमच्याच वर्गातल्या विक्रमशी ओळख झाली. तो मूळ भारतीय असला तरी आता त्याचं कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झालंय. पुढे ग्रुप असाइन्मेंटसाठी विक्रम माझ्याच ग्रुपमध्ये आला. नंतर ओळख वाढून तो जिवलग मित्र झाला आहे. फरहानही मूळ भारतीय, पण आता ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने आमच्यासाठी रोटी, भाज्या, बिर्याणी, तंदुरी चिकन असे अनेक पदार्थ पाठवले होते. अमन, विक्रम, फरहान, यशराज, प्रणव हे मित्रच आता माझं कु टुंब बनलं आहे. विक्रम आणि फरहान यांची घरं आमच्यासाठी सदैव खुली असतात. मी, अमन, यशराज, प्रणव असे आम्ही चौघे मित्र आणि गौरी ही आमची मैत्रीण एकत्र राहतो. प्रणवला खूपच छान स्वयंपाक करता येत असल्याने आमचे जेवणाचे हाल संपले. आम्ही आळीपाळीनं घरातली कामं करतो. एकमेकांची काळजी घेतो. कधी जवळपासच्या बीचवर किंवा एखाद्या पार्कमध्ये पिकनिकला जातो. सिडनी-मेलबर्नमध्ये जाण्यासाठी पैसे साठवून सुट्टीत फिरायला जायचा आमचा बेत आहे.

आमच्या विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला महत्त्व दिलं जातं. म्हणूनच अभ्यासाच्या बरोबरीनेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणाऱ्या अशा अनेक गोष्टी इथे होतात. केवळ कलाच नव्हे तर क्रीडाप्रकारांनाही प्रोत्साहन दिलं जातं. भारतात असताना मी नियमित टेबलटेनिस खेळत असे. त्याचा फायदा मला इथे आल्यावर झाला. सहा महिन्यांपूर्वी आंतरमहाविद्यालयीन टेबलटेनिस स्पर्धा मी जिंकली. माझा आत्मविश्वास वाढायला या स्पर्धेची खूप मदत झाली. नेहमीच आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असल्यामुळे घरापासून हजारो मैल दूर असूनही फार एकटेपणा जाणवत नाही. या मोकळ्या वातावरणात वेगवेगळ्या देशांमधल्या, वेगवेगळ्या संस्कृतींमधून आलेल्या मुलांमध्ये राहून आपलीही दृष्टी व्यापक होते. पुढल्या वर्षी पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षण घेऊन भारतात परतण्याचा विचार आहे. या लेखाच्या निमित्ताने मला आई-बाबांना थँक्स म्हणावंसं वाटतं. त्यांच्यामुळे माझ्यापुढे भविष्यातल्या अनेक संधींची दारं किलकिली झाली आहेत; मला त्यांचा पुरेपूर लाभ घ्यायचा आहे.

 

कानमंत्र :- आपल्या शिक्षणाचा विचार शालेय वयातच करून त्या दृष्टीने माहिती गोळा करा. ठरावीक मार्गापेक्षा वेगळा विचार करून त्या दिशेने जायचा प्रयत्न करा. परदेशी शिक्षणासाठी जायची इच्छा असल्यास प्रचंड कष्ट करायची तयारी ठेवा.

संकलन : राधिका कुंटे viva@expressindia.com