लग्नसराईचा हंगाम आता सुरू झालाय. त्यासाठी मेक-अप आणि हेअरस्टाईल करताना काय काळजी घ्यावी?
हेअरस्टाईल कशी हवी?
दिवाळीच्या आधीपासूनच लग्ने आणि सणांसाठी कपडय़ांची खरेदी करायला सुरुवात होते आणि सगळ्यात आधी कपडे घेऊन होतात आणि मग अगदी कपडय़ांना मॅचिंग अॅक्सेसरीज घेतल्या जातात. सुंदर दिसण्याकरिता जसं कपडय़ांवर मॅचिंग कानातल्यांची किंवा सँडल्सची गरज असते, तशीच त्यावर सुयोग्य अशी हेअरस्टाईल करणं, साजेसा मेक-अप क रणंही हल्ली गरजेचं मानलं जातंय.
बऱ्याचदा छान दिसावं, वेगळं दिसावं म्हणून नवनवीन हेअरस्टाईल आणि मेकअप आपण करत करतो. केसांचं स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग आणि रिबाँडिंग तर आजकाल कॉमन गोष्ट झाली आहे. पण केसांवर यासारखे प्रयोग केल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही, तर केसांची वाट लागू शकते. तीच गोष्ट चेहऱ्याची. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळी क्रीम, बॉडी पॉलिशिंग, ब्लीचिंग सारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्यानंतर काही ठरावीक गोष्टींची काळजी घ्यावीच लागते. नाहीतर केसांचे आणि चेहऱ्याचे प्रश्न सुरू होतात. या प्रॉब्लेमपासून वाचून के सांची हेअरस्टाईल आणि मेकअप  करण्यासाठी काय उपाय आहे, याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञांशी व्हिवानं संवाद साधला.
ब्युटीशियन प्राची चौबळ म्हणाल्या, हेअरस्टाईल चांगली बसावी यासाठी स्प्रे मारला जातो. हेअर स्प्रे मारला तर केस खराब होतात. त्यामुळे हेअरस्टाईल केल्यानंतर ४ दिवसांनी हेड मसाज किंवा हेअर स्पा घ्यावा. हेअरस्टाईल करण्यापूर्वीही अशी काही ट्रीटमेंट घेतली तर केसांचं सेटिंग करणं सोपं जातं आणि केसांची नैसर्गिक चकाकीही तशीच राहते.
हेअरस्टाईल टीप्स :
*   फंक्शनच्या ८ ते १५ दिवस अगोदर ड्रेसबरोबर ट्रायल करून बघावी.
*   हेवी ड्रेस असेल तर एखादी लाईट हेअरस्टाईल करा, जी तुमच्या ड्रेसला शोभेल.   
*   तुम्ही पैठणीसारख्या ट्रेडिशनल साडय़ा नेसल्या असतील तर त्यावर सागरवेणीसारखी हेअरस्टाईल करा आणि जर डिझाइनर वेअर असेल तर त्यावर सिंपल बन किंवा फ्रेंच रोल घालावा.
*   शरारा किंवा आधुनिक फ्युजन ढंगाचे स्टाइलिश कपडे तुम्ही घातले असतील आणि जर तुम्ही बारीक असाल तर केस कर्ल करून मोकळे सोडा. पण कुरळे फुललेले केस चेहेऱ्याला साजेसे असावेत. जर तुम्ही बारीक नसाल, चेहऱ्याला गोलाई जास्त असेल तर केस वरती बांधणं सोयीचं, कारण केसांमुळे चेहेऱ्याचा गोलावा लपेल. 

मेकअप करताना…
फेस्टिवल सीझनमध्ये सगळी छान तयारी झालीय आणि नेमकं तेव्हाच चेहऱ्यावर एक भलाथोरला पिंपल आलाय? मूड जातोच ना मग. मग तो झाकायचा आटोकाट प्रयत्न होतो. पण मेक-अपने पिंपल झाकून टाकणं कितपत योग्य आहे? सौंदर्यतज्ज्ञ अपर्णा संथानम याबाबत म्हणाल्या, ‘मेकअप न करताही सुंदर दिसता येतं. त्यासाठी आरोग्यपूर्ण आहार घेतला पाहिजे. भरपूर ताजी फळं, हिरव्या भाजा आणि सुकामेवा यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्याचा त्वचेला चांगला उपयोग होतो.’ मेकअपबाबतच्या काळजीसाठी त्या म्हणाला, ‘नेहमीच हेवी, ग्लॉसी बेसचा मेक-अप करत असाल तर चेहऱ्याची रंध्रे बुजण्याची शक्यता असते. अशामुळे तैलग्रंथींवर परिणाम होऊन कॉस्मेटिक अॅक्ने यायचा धोका असतो. चेहऱ्यावर पुरळ येऊ शकते. खराब दर्जाचा मेक-अप वापरल्यास रिअॅक्शन उमटू शकते. मेक-अप रात्री स्वच्छ न केल्याचेही वाईट परिणाम होतात. पिंपल्स आलेल्या त्वचेवर ते लपवण्याच्या उद्देशाने हेवी मेकअप करणे टाळावे. पिंपल्स ही मेडिकल कंडिशन आहे. त्वचाविकारतज्ज्ञाकडून त्यावर इलाज करून घ्यावा. पिंपल्स आल्यास उन्हात थेट जाणे टाळावे. सिटील अल्कोहोल किंवा सॅलिसिलिक अॅसिड क्लिन्झरचा वापर करावा. पिंपल्स आणखी वाढवणारे साखर आणि दुधाचे पदार्थ जेवणातून तात्पुरते वगळावेत. लाल आणि केशरी रंगांच्या फळांचा आणि भाज्यांचा जेवणातील वापर वाढवावा.’
मेक-अप टीप्स
*   दररोज रात्री झोपण्यापूर्वी मेक-अप काढावा. चेहऱ्याला नॉन ऑईल बेस मॉइश्चरायझर लावून मगच झोपावे.
*   लाईट आणि मॅट फिनिशचा मेक-अप अधिक वापरावा. त्यामुळे त्वचेचे रक्षण होते आणि रंध्रे बुजत नाहीत.
*   मेक-अप काढल्यानंतर झोपण्यापूर्वी नॉन ऑईल बेस मॉइश्चरायझर लावावे.
*   आता हिवाळ्याचे वेध लागतील तेव्हा दिवसातून दोनदा तरी त्वचेला मॉइश्चराईज करावे.
*   मेक अप काढण्यासाठी क्लिनझिंग मिल्कचा वापर करावा.
*   हेवी मेक-अप केल्यानंतर कडक उन्हात जाणे टाळावे