29 October 2020

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : आयडियाची कल्पना!

आयडिएशन ही कल्पनांपर्यंत पोहोचण्याची आणि या कल्पना मार्केटपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे

डॉ. अपूर्वा जोशी

आयडिएशन म्हणजे सोप्या भाषेत योग्य कल्पना/आयडिया शोधणे. आयडिएशन ही कल्पनांपर्यंत पोहोचण्याची आणि या कल्पना मार्केटपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. हा कोणत्याही स्टार्टअपचा, निधी उभारणीच्या कामाचा आणि व्यवसाय उपक्रमांचा आधार आहे.

पहिली पायरी नेहमीच सर्वात कठीण असते, असं म्हटलं जातं. एकदा तुम्हाला कोणते प्रॉडक्ट तयार करायचे आहे आणि कोणत्या प्रकारच्या उद्योगात यायचंय हे माहिती झाल्यावर तुम्हाला कुठे आणि कसे पुढे जायचे याची दिशा मिळू लागते. असंख्य लोक कल्पनांच्या अवतीभोवती व्यवसाय तयार करतात जे व्यवसाय ग्राहकांना कधीही आकर्षित करत नाहीत आणि अशा कल्पना कधीही विकल्या जात नाहीत. स्टार्टअप प्रक्रियेच्या आयडिएशन टप्प्याचे अनुसरण करा म्हणजे अशा चुका तुम्हाला टाळता येतील. आयडिएशन म्हणजे सोप्या भाषेत योग्य कल्पना/आयडिया शोधणे. आयडिएशन ही कल्पनांपर्यंत पोहोचण्याची आणि या कल्पना मार्केटपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे. हा कोणत्याही स्टार्टअपचा, निधी उभारणीच्या कामाचा आणि व्यवसाय उपक्रमांचा आधार आहे.

तर अशा व्यापक कल्पना कुठून येतात? खरोखरच पाठपुरावा करण्यायोग्य तुमची कल्पना आहे हे तुम्हाला कसे समजेल? व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काहीतरी सुरू करण्याच्या इच्छेमधून सर्वात यशस्वी उद्योजक कसे होऊ शकतात?

एकाधिक पर्यायांचा विचार करा

आयडिएशनच्या मुख्य नियमांचा विचार करताना एक लक्षात घ्या की  काही उद्योजक ‘स्वत:चं काहीतरी शून्यातून उभं करायचंय’ या विचारसरणीतून उद्योग सुरू करतात, नक्की काय हे माहिती नसताना देखील; काही लोकं स्वत:च्या कल्पनेबद्दल खूप पॅशनेट असतात पण त्यांना हे माहिती नसतं की ही तीच कल्पना असेल का जिच्यामागे हातातलं सगळं सोडून जावं. तुम्ही अद्याप उत्कृष्ट स्टार्टअप कल्पना शोधत असल्यास, तीन सर्वात महत्त्वाचे स्टार्टिग पॉइंट्स लक्षात घ्या – १) शक्य तितका जास्त प्रवास करा २) समविचारी लोकांशी बोला ३) तुम्हाला निराश करणाऱ्या वैयक्तिक पेनपॉइंट्सचा आणि व्यवसायातल्या वादाच्या मुद्दय़ांचा सखोल विचार करा. स्टार्टअप कल्पना जिंकण्यासाठी हे पॉइंट्स सामान्यत: प्रवेगक किंवा अ‍ॅक्सलरेटर म्हणून काम करतात. जरी तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षांवर आला आहात आणि तुमचा ‘युरेका मोमेन्ट’ सापडला आहे, तरीही बहुविध कल्पनांचे मूल्यमापन करणे फायदेशीर ठरेल. काही संस्थापकांनी ज्यांनी स्टार्टअपच्या निधी उभारणीच्या प्रयत्नांमध्ये सर्वात जास्त पैसे उभे केले आहेत आणि सर्वात मौल्यवान कंपन्या बनवल्या आहेत त्यांनी अनेक कल्पनांचा शोध घेण्यासाठी हेतुपुरस्सर काही महिने घेतले आहेत. यामुळे तुम्हाला खरोखर आत्मविश्वास येऊ शकतो की तुमची मूळ कल्पना हीच पाया आहे ज्यावर तुमचा व्यवसाय उभा राहील किंवा हा पर्याय नसून आणखी चांगला परिणाम या प्रक्रियेतून मिळू शकतो.

विचारमंथनाचा (ब्रेन स्टॉर्मिग) सराव करा. सर्व काही शक्य आहे याची कल्पना करा आणि तरी काही गोष्टी फक्त वेळेनुसारच आकाराला येतील हे लक्षात ठेवा. नंतर ‘आऊट ऑफ बॉक्स’ अ‍ॅप्रोच ऐवजी ‘इनसाईड बॉक्स’ दृष्टिकोनाने विचार करण्याचा प्रयत्न करा आणि बंधनकारक / मर्यादित वातावरणात विचार करण्याद्वारे कोणती नावीन्यपूर्ण कल्पना येते हे पाहा. तुमच्या मोकळ्या वेळेतला पार्टटाइम हा यासाठी राखून ठेवा जोपर्यंत तुम्हाला यशस्वीरीत्या परिणाम मिळत नाहीत. किंवा तुम्ही एखादी ऑफिस जागा मिळवून, पुढील सहा महिन्यांत कल्पना शोध घेण्यासाठी हा एक पूर्ण वेळेचा प्रकल्प म्हणून याकडे पाहा.

कल्पनेला आकार देण्यासाठी वेळ घ्या

खरोखर चांगला व्यवसाय हा संगमरवरी तुकडय़ात किंवा झाडाच्या खोडात नाहीतर चिकणमातीच्या चिखलात दडलेल्या एखाद्या शिल्पाप्रमाणे आहे. कच्ची कल्पना बऱ्याचदा भरपूर चिपिंग, मोल्डिंग आणि पॉलिशिंग केल्यानंतर भिन्न दिसते. असे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे इतरांशी बोलणे. तुम्ही इतरांना कल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा कसे वाटते? तुम्ही विविध बिझनेस मॉडेल आणि उद्योगांकडून उत्कृष्ट भाग, नवकल्पना एकत्र आणण्यासाठी काय शिकू शकता किंवा जुन्या कल्पनांमधील अकार्यक्षमता काढून टाकण्यासाठी काय करू शकता?

विशेषत: ग्राहकांशी चर्चा करणे हा आयडिएशन विचारसरणीच्या मुख्य नियमांपैकी एक. पुन्हा पुन्हा इतर संस्थापक तुम्हाला नक्कीच हे सांगतील की सर्वात महत्त्वाची गुंतवणूक त्यांनी वेळेत केली, तो वेळ त्यांनी संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट करण्यासाठी दिला. ग्राहकांना काय वाटते? तुम्हाला समस्या काय आहे असे वाटते आणि त्याचं वाटणारं इष्ट निरसन (डिझाइरेबल सोल्युशन) या दोंन्ही गोष्टी व्हेरिफाय करून पाहा.

तातडीच्या समस्येविषयी खात्री करून घ्या..

‘अमुक एक प्रॉडक्ट छान आहे म्हणून ते घरी असावं’ अशा पद्धतीने प्रॉडक्ट व्यवसाय म्हणून टिकवणे ही खूप क्लिष्ट गोष्ट आहे. बाजारात उत्तम लक्झरी ब्रॅण्ड्स आहेत, जे अनेक दशकांपासून टिकून आहेत. तुम्हाला सक्सेस मिळण्याची शक्यता वाढवायची असेल आणि ट्रॅक्शन लगेच मिळवायचे असेल तर हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न तातडीने सोडवाल, ज्याच्या निराकरणाची किंवा ज्यावर सोल्युशन मिळवायची लोकांना जास्त उत्सुकता आहे.

फायनान्शिअल मॉडेल्सचा वापर करून पाहा

तुमच्या कल्पनेबद्दल तुम्ही पॅशनेट आहात; इतरांनाही त्यात खरोखर रस आहे अशा सोल्युशनचं चित्रही तुम्ही तयार केलं असेल. पण यात मेख अशी आहे की यात प्रत्यक्ष नंबर्स कसे काम करतात हे जाणून घ्यायला हवे. यासाठी फायनान्शिअल मॉडेल्सचा वापर करून पाहा म्हणजे कळेल इथे खरा व्यवसाय आहे का?

यात काही मुख्य प्रश्नांची उत्तरं मिळवा. १) पुरेसा नफा मार्जिन आहे का? २) एखादा व्यवसाय टिकवण्यासाठी मार्केट पुरेसे मोठे आहे का? ३) तुमचे मॉडेल स्केलेबल आहे का? ४) तुमचे रिसोर्स तुम्हाला ब्रेक इव्हन पॉइंट पार करून नफ्यामध्ये आणू शकतील का?

यातून जर मोठी व्यवसायाची संधी दिसत नसेल तर ही कल्पना मागे ठेवून परत नव्याने सुरुवात करावी लागेल; किंवा फक्त व्हाईटबोर्डवर गोष्टी मांडून हे मॉडेल नीट काम करेल याचे नवीन मार्ग शोधण्याची गरज असू शकते. क्रमश:

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 12:02 am

Web Title: fundraising ideas for startup unique fundraising ideas for startup zws 70
Next Stories
1 फॅशनची डिजिटल इनिंग
2 ‘अ‍ॅप’निर्भर
3 वस्त्रांकित : चंद्रकळेच्या इतिहासखुणा
Just Now!
X