03 August 2020

News Flash

बदलांचे चेहरे!

जेमी, मरी, ग्रेटा, रिद्धिमा आणि अशा अनेक तरुण मुली आज आपल्या पृथ्वीसाठी न थकता, न घाबरता झटत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

जिजीविषा काळे

जेमी, मरी, ग्रेटा, रिद्धिमा आणि अशा अनेक तरुण मुली आज आपल्या पृथ्वीसाठी न थकता, न घाबरता झटत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपणही पावलं उचलायला हवीत. बदल असा सहज घडून येत नाही, त्यासाठी त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते, हे या बदलाच्या चेहऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

२३ सप्टेंबर २०१९ रोजी जगभरातून १६ युवकांनी मिळून यू. एन. कमिटीच्या ‘कन्वेन्शन ऑफ द राइट्स ऑफ चिल्ड्रन’समोर एक याचिका दाखल केली होती. त्या १६ जणांपैकी ९ मुली होत्या. या मुली एरवी चारचौघांसारख्याच सामान्य, पण आपल्या कर्तृत्वाने त्या असामान्य ठरल्या. केवळ करिअरमध्ये स्वत:ला पुढे ठेवण्यापुरते मर्यादित न राहता, आपल्याला जे पटते आहे त्यासाठी लढणाऱ्या, आपापल्या पद्धतीने आवाज उठवणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या अशा अनेक स्त्रिया आज बदल घडवण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचे हे धाडस इतरांसाठीही प्रेरणादायी ठरते आहे..

ग्लोबल वॉर्मिग हे मिथ्या नसून सत्य आहे हे उघडकीस आणणाऱ्या या मुली मी एकटय़ाने काही केलं तरी काय फरक पडणार आहे, असा विचार करताना  दिसत नाहीत. नुसत्याच बोलून त्या थांबत नाहीत तर आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून दाखवून देणाऱ्या या मुली जगात महत्त्वाचे बदल घडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना  प्रश्न करताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांच्या अरेला कारे करायची हिंमत दाखवत आहेत. यात त्यांचा स्वार्थ असेल तर तो फक्त एकच, आपली पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवणे..

भारताची रिद्धिमा पांडेसुद्धा त्या १६ जणांपैकी एक आहे. उत्तराखंडमध्ये राहणारी, ११ वर्षांची रिद्धिमा आपल्याला ‘मीच का?’ याऐवजी ‘मी का नाही?’ असा विचार करायला भाग पाडते. उत्तराखंडमध्ये पूर आला तेव्हा तिकडे झालेली परिस्थिती बघितल्यानंतर अस्वस्थ झालेल्या रिद्धिमाने काही तरी पाऊल उचलायचे ठरवले. भल्याभल्यांची जिथे मजल जात नाही तिथपर्यंत ती पोहोचली आणि २०१७ मध्ये तिने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात तक्रार दाखल केली. तिने फक्त सरकारलाच नाही तर देशाच्या नागरिकांनादेखील धारेवर धरून आपल्या रोजच्या जगण्यातून आपण किती प्रदूषण करतो आहोत हे दाखवून दिले. यू. एन. समिटमध्ये बोलताना रिद्धिमा म्हणते, ‘आय वॉन्ट अ बेटर फ्युचर, आय वॉन्ट टू सेव्ह माय फ्युचर, आय वॉन्ट तो सेव्ह अवर फ्युचर’. (मला एक चांगले भविष्य हवे आहे. मला माझे भविष्य वाचवायचे आहे, मला आपले सर्वाचे भविष्य वाचवायचे आहे.) व्यक्ती ते समष्टीकडे नेणारी ही कृती तिच्यासारखी मुलगी लहान वयात करते तेव्हा साहजिकच तिचे कार्य आबालवृद्धांना विचार करायला लावणारे ठरते.

‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या मोहिमेची ग्लोबल लीडर १६ वर्षांची एक ठिणगी होते, तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचे उदाहरण आपल्यासमोर उभे ठाकते. १६ वर्षांची ग्रेटा थनबर्ग एक ‘युथ आयकॉन’ म्हणून जगभर प्रसिद्ध झाली आहे. जेमतेम ८ वर्षांची असताना, त्यांच्या शाळेत त्यांना ‘क्लायमेट चेंज’ यावर एक डॉक्युमेंटरी दाखवली. डॉक्युमेंटरी संपली तशी बरीच मुले आपापल्या विश्वात पुन्हा रममाण झाली, पण ग्रेटाच्या मनात हजारो प्रश्न थैमान घालत होते. इतके की, उठता-बसता फक्त तेवढेच विचार तिच्या मनात येत असत, पण नुसता विचार करून चालणार हेही तिच्या लक्षात आले आणि तिने ‘क्लायमेट चेंज’ची बाराखडी गिरवली, अभ्यास केला आणि ऑगस्ट २०१८ च्या एका फ्रायडेला शाळा बुडवून तिने स्वीडनच्या संसदेसमोर निदर्शने करायला सुरुवात केली. सुरुवातीला कोणीच तिच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र प्रत्येक शुक्रवारी तिने आपली निदर्शने नेटाने सुरू ठेवली. हळूहळू शाळेतील मित्रमैत्रिणी, अन्य लोकही त्यात सहभागी झाले. आणि बघता बघता नुसत्या स्वीडनमधूनच नाही तर संपूर्ण जगभरातून तिला पाठिंबा देत लोकांनी प्रत्येक शुक्रवारी रस्त्यावर उतरून तिची ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ ही मोहीम सुरू ठेवली. अगदी मुंबई, पुणे, कलकत्ता अशा शहरांमध्येही हजारोंनी माणसे नियमितपणे दर शुक्रवारी मोर्चे काढू लागली आणि २७ सप्टेंबरला जगभरातील कोटय़वधी लोक आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून वेळ काढून मोर्चे काढायला रस्त्यावर हजर झाली.

ही १६ वर्षांची मुलगी जेव्हा माइकसमोर येऊन तिच्या आधीच्या पिढय़ांना ‘हाऊ डेयर यू?’ असा थेट जाब विचारते तेव्हा जगाला ते ऐकावेच लागते. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी’. म्हणजे काय, तर कुणी तरी तारक आपल्याला हवा असतो, पण त्यासाठी काही करू बघणारे आपलेच लोक असतील तर हमखास ‘काय गरज आहे तुलाच हे करायची?’ अशी वाक्ये आपल्या कानी पडतात. त्याच सगळ्यांना ग्रेटा विचारते, हाऊ डेयर यू? कोणी आपल्या पृथ्वीसाठी काही करू बघतेय, त्यांना अडवणाऱ्यांनाही ती विचारते, हाऊ डेयर यू?

अशाच जगाला विचार करायला लावणाऱ्या आणखी दोन छोटय़ा अ‍ॅक्टिव्हिस्ट्स आहेत. एक आहे मरी कोपनी जिला नाव पडले आहे ‘लिटिल मिस फ्लिंट’. वयाच्या आठव्या वर्षी तिने तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकेतील फ्लिंट, मिशिगन या भागातल्या पाण्याच्या समस्येविषयी तक्रार करत पत्र लिहिले. फ्लिंटच्या पाण्यात जीवघेण्या प्रमाणात शिसं सापडले आणि तात्काळ त्यांनी ‘स्टेट ऑफ इमर्जन्सी’ घोषित केली. परंतु, २०२० च्या आधी त्यात प्रगती होणे अशक्य आहे असे जेव्हा तिला समजले तेव्हा तिने एका संस्थेशी हातमिळवणी केली आणि एक क्राऊड फंडेड कॅम्पेन उभे केले. या कॅम्पेनमधून त्यांनी तब्बल ५० हजार डॉलर्स एका महिन्यात गोळा केले आणि त्यातून एक लाखहून जास्ती बाटल्या स्वच्छ पाणी नागरिकांना वाटले.

अशीच दुसरी आहे अमेरिकेची जेमी मार्गोलिन. २०१७ च्या उन्हाळ्यात जेमी अणि तिच्या काही मैत्रिणीनी मिळून एक प्रचार सुरू केला आणि बघता बघता ‘झीरो अवर’ या मोहिमेला देशभरातून प्रतिसाद मिळाला. १९ जुलै २०१८ ला शंभरहून अधिक तरुण एकत्र आले आणि त्यांनी ‘झीरो अवर’साठी मोर्चा काढला.

पृथ्वीचे वातावरण बदलते आहे. पाऊस ऑक्टोबर आला तरी अजून जायचे नाव घेत नाही. आजकाल पूर्वीसारखी थंडीही पडत नाही, असे आपण दर डिसेंबर महिन्यात ऐकतो आहोत. अनेक प्रकारचे प्राणी-पक्षी नामशेष होतानाही आपल्याला लक्षात येते आहे. बर्फ वितळू लागले आहेत. वर्षांनुवर्षे पृथ्वीवर माणसाने केलेल्या जाचाचे हे परिणाम आहेत. पण या सगळ्याची सुरुवात होते लहानलहान गोष्टींपासूनच. ओला-कोरडा कचरा वेगळा करणे. रस्त्यावर कचरा न फेकणे, प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे या खरे तर खूप छोटय़ा-छोटय़ा पण आवर्जून केल्याच पाहिजेत, अशा गोष्टी आहेत. लहान असताना या सर्व गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, पण जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्या सोयीप्रमाणे आपण या गोष्टी विसरू लागतो. पण मग असाच एक दिवस मुसळधार पाऊस येतो आणि समुद्र आपल्याच दाराशी आपला कचरा सोडून जातो, तेव्हा हे सगळे अपल्याला आठवते.

जेमी, मरी, ग्रेटा, रिद्धिमा आणि अशा अनेक तरुण मुली आज आपल्या पृथ्वीसाठी न थकता, न घाबरता झटत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपणही पावलं उचलायला हवीत. बदल असा सहज घडून येत नाही, त्यासाठी त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागते, हे या बदलाच्या चेहऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 12:10 am

Web Title: global warming greta thunberg riddhima pandey environment changes abn 97
Next Stories
1 गरब्याचे बदललेले रंग
2 क्षण एक पुरे! : नृत्यार्पणमस्तु।
3 टेकजागर : ऑनलाइन जुगाराचे फॅड
Just Now!
X