स्पाइस गर्ल्सची जादू अजूनही जगभरातल्या संगीत रसिकांच्या मनात कायम आहे. असाच एक फक्त मुलींचा बँड आपल्याकडेही आहे आणि आता तो लोकप्रियही होतोय. बॉलीवूड गाजवणाऱ्या गायिका यात आहेत. ‘इंडिवा’च्या इंडियन दिवाज्शी केलेली बातचीत..
त्या चौघी वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या, वेगळ्या शैलीच्या पण संगीत या कॉमन पॅशननं झपाटलेल्या. हमसिका अय्यर, विवियन पोछा, श्रुती भावे आणि मर्लीन डिसोझा यांनी आपल्या कलेमधून प्रत्येकाच्या मनात आता आपापली जागा निर्माण केलीय. असं म्हणतात की एखादं स्वप्न आपण मनापासून बघितलं की ते स्वप्न खरं होतं. या चार मुलींनीही एक स्वप्न बघितलं होतं- स्वत:चा म्युझिक बँड काढण्याचं आणि मग ते सत्यात उतरलं ‘इंडिवा’च्या रूपात.
हमसिका अय्यर एक नावाजलेली गायिका. आज प्रत्येकाच्या मुखावर असलेली ‘छम्मक छल्लो’, आणि ‘वन टू थ्री फोर’ (चेन्नई एक्स्प्रेस) सारखी हिट गाणी हिच्या आवाजात रेकॉर्ड झाली. तिच्या सुपर हिट गाण्यासाठी तिला बेस्ट प्लेबॅक सिंगरचा अ‍ॅवॉर्डही मिळाला. हमसिकाच्या आवाजातल्या बऱ्याच अ‍ॅड जिंगल्सही आहेत. हमसिका सांगते.. मी मूळची साऊथ इंडियन- त्रिचीमधली. पण मुंबईतच वाढलेली. मी हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंय. हमसिका फक्त गातेच असं नाही तर तालवाद्यही छान वाजवते.
मर्लीन डिसोझा पियानिस्ट, कंपोजर, आणि प्रोडय़ुसर आहे. मूळची गोव्याची. तिचा संगीताकडे लहानपणापासूनच कल होता. ती सांगते, घरच्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी वयाच्या सहाव्या वर्षांपासून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली.
श्रुती भावे हे इंडिवामधलं मराठमोळं नाव. ती व्हॉयोलिन वाजवते. श्रुती म्हणते, ‘मी मुळची नागपूरची पण मुंबईतच मोठी झाले. माझी आई गायिका आणि वडील व्हॉयोलिनिस्ट आहेत. लहानपणी मी गाण्याबरोबर कथ्थक आणि भरतनाटय़म्चंही शिक्षण घेतलं. पण मी व्हॉयोलिन वाजवायला सुरुवात केली शाळा संपल्यानंतर. तरुणपणी.’ श्रुती कर्नाटकी आणि हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये पारंगत आहे.
विवियन पोछा मंगळूरची. ती मुंबई आणि कोलकाता इथे राहिली आहे. ही पाश्चिमात्य गायिका आणि गिटारिस्ट आहे. ती एक आघाडीची स्टेज परफॉर्मर आहे.
श्रुती भावेशी फोनवरच बोलणं चाललं होतं तेव्हाच तिच्यातला उत्साह जाणवत होता. मुलाखतीसाठी तिने वेळ दिला तेव्हा या सगळ्या इंडियन दिवाजना भेटायची संधी मिळाली आणि या इंडियन दिवाजची गोष्ट  उलगडली.
त्यांच्या वागण्यावरून त्या तिघी एकमेकींच्या खास मैत्रिणी असल्याचं भासत होत. इतकी छान फ्रेंडशिप असल्याचं जाणवल्यामुळे ‘‘तुम्ही चौघी एकत्र कशा आलात?’’ हाच प्रश्न पहिल्यांदा विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत मर्लीन म्हणाली, ‘‘स्वत:चा म्युझिकल बँड असावा अशी माझी सुरुवातीपासूनच इच्छा होती. मी आणि विविने ही कन्सेप्ट ठरवली. आमची भेट एका स्टुडिओत झाली. आम्ही तिघी एकमेकींना आधीपासूनच ओळखायचो आणि बऱ्याच प्रोजेक्टवर आम्ही एकत्र काम पण केलं आहे. मग एका कॉन्सर्टमध्ये श्रुतीला व्हॉयोलिन वाजवताना बघून आम्ही तिलापण आमच्या ग्रुपबरोवर जॉइन व्हायला सांगितलं.
या सगळ्यांची पाश्र्वभूमी वेगवेगळी, मातृभाषा निराळी. त्यामुळेच की काय या बँडने फक्त हिंदी-इंग्रजीच नाही तर इतर भाषांमधली गाणीसुद्धा केली आहेत.  ‘‘आम्ही आत्तापर्यंत बँडची अशी १३ ते १४ गाणी केली आहेत आणि आमची स्वत:ची अशी ९ गाणी आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत, तमीळ, कोकणी, कन्नड, बंगाली, इटालियन, लॅटिन, स्पॅनिश आणि स्वाहिली या भाषांतूनही आम्ही गाणी सादर केली. आमची गाणी प्रेम, शांतता, आनंद आणि स्वातंत्र्याचा संदेश देतात.’’ त्यांनी स्वत:बद्दल सांगताना हेही सांगितलं की, ‘‘आम्ही चौघी पृथ्वी, वायू, आग आणि पाण्यासारख्या आहोत. आमचं म्युझिकल बॅकग्राऊंड वेगवेगळं असल्याकारणाने आम्ही एकमेकींची ताकद आहोत.’’
‘‘तुम्ही इंडिवा हे नाव का ठेवलं? त्याचा अर्थ काय?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘इंडिवा म्हणजे इंडियन दिवाज आणि आम्ही इंडियन दिवाज आहोत म्हणून आमच्या म्युझिकल बँडचं असं नाव ठेवलं.’’
 ‘‘फक्त मुलींचा असा म्युझिकल बँड काढण्यामागची संक ल्पना काय होती?’’ या प्रश्नावर त्या चटकन म्हणाल्या, ‘‘आम्ही मुलांच्या विरोधात म्युझिकल बँड काढायचा अजिबात विचार केला नाही. बँड ही आम्हा सगळ्यांचीच फार वर्षांपूर्वीपासूनची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. आत्ता आमच्या म्युझिकल बँडला १ वर्ष पूर्ण झालंय आणि अजून बरंच काही करायचंय.’’