अश्लेषा मस्लेकर

हे शीर्षक वाचून थोडंसं आश्चर्य वाटलं असेल. पण नमनाला घडाभर तेल न ओतता सांगते की सध्या मी ‘ब्रँण्डेनबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये ‘हेरिटेज कॉन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड साईट मॅनेजमेंट’ (एम.ए.) हा अभ्यासक्रम शिकते आहे. तिसरं सेमिस्टर जवळजवळ संपत आलं आहे. मी मूळची मुंबईकर. माझे बाबा भारतीय वायुसेनेत असल्याने त्यांची भारतात अनेक ठिकाणी बदली झाली. महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षांसाठी मी मुंबईत परतले. आयआयटी पवईच्या केंद्रीय विद्यालयातून दहावी आणि बारावी झाले. बारावीत जीवशास्त्र विषय मला खूप आवडायचा, पण मेडिकलला अजिबात जायचं नव्हतं. लहानपणापासून पेंटिंग, ड्रॉइंग, स्केचिंगचा छंद होता. म्हणून अप्टिटय़ूड टेस्टमध्ये आढळलेल्या आर्किटेक्चरच्या क्षेत्रात यायचं निश्चित केलं. ‘एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर’मध्ये ‘बॅचलर्स इन आर्किटेक्चर’ची पदवी घेतली.

आमची ‘नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडण्ट ऑफ आर्किटेक्चर’ (नासा) ही देशभरातील आर्किटेक्चर कॉलेजची असोसिएशन आहे. त्यांच्या दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा होतात. पहिल्या वर्षांला असताना लुई काह्न् (Kahn) ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाले होते. आमचा गट कोलकात्ताजवळच्या छोटय़ा गावात गेला होता. परतल्यावर संगणकाचा वापर टाळून हातानेच ड्रॉइंग काढलं होतं. तेव्हापासून हेरिटेजविषयी (पुरातन वास्तुकला) रस वाटू लागला. या क्षेत्रात यायचं डोक्यात होतंच कुठेतरी. तरी पदवी मिळाल्यावर लगेचच पुढच्या शिक्षणासाठी अर्ज करू नका, आधी नोकरीचा अनुभव घ्या, म्हणजे कॉलेजातील शिक्षणापेक्षा वास्तवातलं काम किती आणि कसं वेगळं आहे, ते कळेल असा महत्त्वाचा सल्ला आम्हाला प्राध्यापकांनी दिला होता. त्यामुळे त्यानंतर चार वर्ष कामाचा अनुभव घेतला. एका हॉटेलच्या प्रकल्पासंदर्भातलं काम होतं. ते मला आवडलं. अधिक अनुभव मिळवण्यासाठी केलेल्या नोकऱ्यांमधलं काम मुंबईतच आणि बहुतांशी पुनर्विकासाचं होतं. त्यात फारसा वाव मिळेल असं वाटलं नाही. पुन्हा हेरिटेजमध्ये काम करायचा विचार पुढे आला. बऱ्याच शोधाअंती युनेस्कोने शिफारस केलेल्या या अभ्यासक्रमाविषयी कळलं.

जर्मनीमधील विद्यापीठातील शिक्षण चांगलं आणि स्वस्त आहे. चांगली जर्मन भाषा येत असल्यास स्थानिक जर्मन संस्थांमध्येही शिक्षण घेता येऊ  शकतं. ते आणखीन कमी खर्चात घेता येतं. अमेरिकेच्या व्हिसासंदर्भातील बदललेले नियम-कायदे पाहता आता अनेक विद्यार्थ्यांचा ओघ युरोप विशेषत: जर्मनीकडे वळतो आहे. या अभ्यासक्रमासारखे अभ्यासक्रम भारतातही आहेत, पण या अभ्यासक्रमाला फंडिंग खूप आहे. ते युनेस्कोशी संलग्न आहेत. विद्यार्थ्यांच्या स्टडी प्रोजेक्टसाठी परदेशातही सत्र घेतलं जातं. केवळ चौकटीतील अभ्यास न राहता अनुभवांची शिदोरी जमते. एका स्टडी प्रोजेक्टसाठी लाटव्हियाला जाऊन आले. त्यानंतर त्यांच्या इंटरनॅशनल रिस्टॉरेशन वर्कशॉपला मैत्रिणीसोबत उपस्थित राहता आलं. फक्त विमानाचं तिकीट काढावं लागलं होतं, बाकी खर्च त्यांनी केला होता. ‘इकॉमोस’च्या विसाव्या शतकातील वारसा या संदर्भातील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक समितीच्या वार्षिक परिषदेत हजर राहायची संधीही मिळाली. आपल्या तुलनेत युरोपमध्ये आल्यावर विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतात. या विद्यापीठातील केवळ याच अभ्यासक्रमासाठी नव्हे तर आणखी एका अभ्यासक्रमासाठी आणि आयलॅण्डच्या एका विद्यापीठातही मी अर्ज केला होता. सगळे अर्ज संमत झाले होते, मात्र त्यांची तुलना करता आयलॅण्डमधल्या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षांचा असला तरी तिथे राहणं महाग पडणार होतं. म्हणून मग या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आम्ही इजिप्त-कैरोला गेलो होतो. या सेमिस्टरसाठी कैरोतील हेलवान युनिव्हर्सटिीबरोबर टायअप झालेलं आहे.

जर्मनीतील विद्यापीठांतली चांगली गोष्ट म्हणजे त्यांना द्यावी लागणारी कागदपत्रं आणि एकूणच प्रवेशासंदर्भातील बाबींची पूर्तता त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तर सहज होते, काहीच अडचण येत नाही. त्यांनी सेंट्रल अ‍ॅप्लिकेशन सिस्टीम सुरू केली आहे. मी त्या ‘युनिअसिस्ट अ‍ॅप्लिकेशन सिस्टिम’द्वारे अर्ज भरला होता. मी प्रवेश घेताना एक प्रश्न उद्भवला की आपल्याकडचे गुणांकन १०० पैकी होतं. मात्र जर्मनीमधील विद्यापीठात ते थोडं वेगळ्या पद्धतीने सादर करावं लागल्यानं जरा धावपळ झाली होती. विद्यापीठाचं संमतीपत्र आल्यावर नोकरी सोडली. जायची तयारी केली आणि हातात व्हिसा नव्हता. मुंबईच्या जर्मन काऊ न्सिलेटमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते आणि त्याच सुमारास जर्मनीत उन्हाळी सुट्टी लागली होती. त्यामुळे व्हिसाच्या प्रक्रियेला विलंब होत होता. तिकडे माझ्या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले होते. खूपच ताण आला होता. मी प्रोग्रॅम कोऑर्डिनेटरला व्हिसा मिळाला नसल्याचा ई-मेल लिहिला. त्यावर तिने ‘आत्ता येऊ  शकली नाहीस, तरी पुढल्या वर्षी येता येईल’, असं लिहिलं. मला वर्ष वाया घालवायचं नव्हतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या व्हिसाच्या कामातल्या दिरंगाईबाबत तक्रारी गेल्यावर शेवटी व्हिसा हातात पडला.

उशिरा पोहचल्याने ओरिएंटेशन वगैरे गोष्टी हुकल्या. हॉस्टेलसाठी शेवटच्या क्षणी अर्ज केल्याने तिथे पोहचल्यावर राहायची सोय नव्हती. आमच्या फेसबुक ग्रुपवर मला तात्पुरतं राहण्यासाठी जागा हवी असल्याचं लिहिलं. एका जर्मन मुलीच्या रूममध्ये जागा मिळाली. पोहोचल्यावर सगळ्यांविषयी जाणून घेणं, विद्यापीठातील सोयीसुविधांची माहिती करून घेणं यात जवळपास आठवडा गेला. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना ई-मेल आणि पासवर्ड मिळतो. अभ्यासक्रमासंदर्भातील प्रेझेंटेशन, नोट्स वगैरे अपलोड केल्या जातात. तिथे अनेक व्यावहारिक गोष्टींची पूर्तता करावी लागली. नवीन विद्यार्थ्यांना स्थानिक ब्युरोमध्ये जाऊन स्वत:विषयी नोंदणी करावी लागते. अगदी कैरोमध्ये अभ्यासाचाच भाग असणारं सहा महिने राहाणंही नोंदवावं लागलं. केवळ मीच नव्हे तर एकूणच आशियायी देशातून विद्यार्थ्यांना यायला उशीर झाला होता. शेवटी विद्यापीठाच्या डॉर्मेटरीमध्ये मला रूम मिळाली.

आपल्याकडे प्राध्यापकांना शंका विचारायची भीती वाटते. तयार नोट्स हातात दिल्या जातात. इथे फक्त संदर्भ सांगितले जातात, ते कुठे मिळतील तेही सांगतात; पण माहिती विद्यार्थ्यांनीच काढायची असते. ऐन लेक्चरमध्ये प्रश्न विचारायला, बोलायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. सगळ्या प्राध्यापकांची आधी वेळ घेऊन भेटावं लागतं. प्राध्यापक प्रोफेशनली आणि फॉर्मली मदत करतात. आपल्याला त्यांचं हे वागणं समजून घ्यायला थोडा वेळ लागतो. काही वेळा रिसर्च असिस्टंटही शिकवतात. त्यांच्याशी थोडं मोकळेपणाने बोलता येतं. तेही मदतीला तत्पर असतात.

एकदा हेरिटेज इकॉनॉमिक्स हा विषय होता ग्रुप असाइनमेंटला. त्यात निधी संकलनासाठी जाहिरात करायची होती. आमचा तोडगा प्राध्यापकांना एवढा आवडला होता की, त्यांनी कमेंट लिहिली होती ‘इट लुक्स परफेक्ट’. एक छोटासा मुद्दा आमच्याकडून निसटला होता, तरी आम्हाला चांगले गुण मिळाले होते. आमच्या ग्रुपमध्ये बांगलादेश, चीन, लॅटिन अमेरिका, तैवान, मेक्सिको, चिली, इक्वेडोर, इजिप्त देशांचे विद्यार्थी आहेत. आम्हाला एक विषय आहे ‘इंट्रोडक्शन टू म्युझिओलॉजी.’ वस्तुसंग्रहालयाचं व्यवस्थापन, दर्शनी भाग, त्याच्याशी संबंधित असंख्य बारीकसारीक गोष्टी त्यात शिकवल्या जातात. इजिप्तमध्ये अनेक मोठाली म्युझिअम आहेत. आमच्या प्राध्यापकांच्या चांगल्या नावलौकिकामुळे आम्हाला बरीच आणि वैविध्यपूर्ण म्युझिअम्स बघता आली. इजिप्तमध्ये सध्या ग्रॅण्ड इजिप्शियन म्युझिअमची बांधणी होते आहे. जागतिक दर्जाचं हे काम पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. एरव्ही सर्वसामान्यांना सहसा पाहायला मिळणार नाही अशा अनेक पुरातन चीजवस्तू पाहायला मिळाल्या. मुख्य म्युझिअमची इमारत पाहायला मिळाली. तिथल्या आर्किटेक्टशी बोलता आलं. हा फारच अविस्मरणीय अनुभव होता.

आमच्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाची इमारत फारच सुंदर आहे. तिथल्या कॅफेटेरियात फ्री वायफाय मिळत असल्याने कामासाठी किंवा फावल्या वेळातही अनेक विद्यार्थी येतात. ग्रंथालय रात्री उशिरापर्यंत सुरू असतं. कॅ म्पसमध्ये दर महिन्याला काही ना काही इव्हेंट होतात. कल्चरल नाइट्सचं आयोजन स्टुण्टण्ड काऊन्सिल करते. हॅलोविन पार्टी, ख्रिसमस पार्टी होते. जानेवारीतल्या फॉर्मल डान्स नाइटला केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापकांसह विद्यापीठातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित असतात. भारतीय विद्यार्थ्यांच्या असोसिएशनतर्फे दिवाळी पार्टी आणि इंडियन कल्चरल नाइटचं आयोजन केलं गेलं होतं. भारतीयांखेरीज बांगलादेशी, पाकिस्तानी विद्यार्थी असून राजकारणात काहीही झालं तरी हे विद्यार्थी आमचे मित्र होतात. आम्ही सगळे विद्यार्थी एकमेकांना जेवणासाठी बोलावतो. बऱ्याचजणांना भारतीय पदार्थाची चव चाखायची असते. त्यांना आमंत्रित केलं जातं. अनेकांना भारताविषयी कुतूहल वाटतं. बॉलीवूडचे चित्रपट-गाणी, पेहेराव, खाद्यजीवन आदींविषयी प्रश्न विचारले जातात. काहींना भारतात यायचं आहे. आपल्याकडची अनेकता में एकता त्यांना गुंगवून टाकते.

परदेशात वाटणारा एकटेपणा कसा हाताळावा, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून असतं. इथे येण्याआधी मी मुंबईत कामानिमित्त एकटी राहात होते. आता आई रोज व्हॉट्स अ‍ॅप कॉल करते. ही तंत्रज्ञानाची किमया असली तरी घरातली लग्नकार्य, सणवार, भारतातल्या मित्रमंडळींचं एकत्र भेटणं, भारतीय पदार्थ अशा गोष्टी मिस करते. कधीतरी स्वयंपाक करायला जामच कंटाळा येतो.. इथले लोक फिटनेसबद्दल जागरूक आहेत. त्यामुळे मीही उन्हाळ्यात जवळच्या पार्कमध्ये धावायला जायला लागले. सुट्टीत व्हेनिस, रोम, मिलानमध्ये मी एकटी फिरले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. कैरोमध्ये आम्ही उबरने फिरलो. तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला. वास्तुकलेचा नमुना असणाऱ्या मशिदी पाहिल्या. स्थानिकांशी संवाद साधला. आमचा अभ्यासक्रम ऑक्टोबरमध्ये संपावा, अशी आखणी आहे. पण चौथ्या सेमिस्टरमध्ये रिसर्च थिसिस लिहायचा असतो. त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो. अभ्यासक्रम संपल्यावर नोकरी करेन किंवा भारतात परतून स्वत:चं स्वत: असं काही काम सुरू करेन किंवा मग विद्यापीठात शिकवायला आवडेल. स्वत:ला सिद्ध केल्यानंतर पीएच.डी. करायचा विचार आहे. एकुणात वास्तूंचा वारसा वाचवून त्याचं संवर्धन करणं महत्त्वाचं आहे, हेच अधिक खरं.

कानमंत्र

* कॉटबस या लहानशा शहरातील स्थानिक लोकांना फारसं इंग्रजी येत नाही. त्यामुळं जर्मन भाषेची तोंडओळख असलेली केव्हाही चांगली.

* विद्यापीठाबद्दल नीट जाणून घेऊन आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रं आणि अन्य व्यावहारिक बाबींबद्दलच्या सूचना त्यांनी सांगितल्यानुसार व्यवस्थित अनुसरल्यास प्रवेशप्रक्रिया सुकर होते.

शब्दांकन : राधिका कुंटे