vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

येत्या २७ तारखेला आहे वुल्फगँग अमॅडीयस मोझार्ट या महान अभिजात संगीतकाराचा २५९ वा जन्मदिवस. जेमतेम ३५ वर्षांच्या आयुष्यात आणि २४ वर्षांच्या कारकिर्दीत (हो..नवव्या वर्षांपासून..अद्भुत!) त्याने पाश्चिमात्य अभिजात संगीतात (western classical music) प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने अधिकृत माहितीनुसार ४१(नवीन मताप्रवाहानुसार ६४) सिंफन्या लिहिल्या. (ज्यातील पहिल्या १३ त्याने ९ ते १४ या वयात लिहिल्या) शेवटाकडील काही कामे अशीही आहेत, जी त्याच्या अकाली मृत्यूमुळे अर्धवट राहिली आणि नंतर त्याच्या अनुयायांनी पूर्ण केली. उदाहरणार्थ- लॉक्रेमोसा (किंवा requiem mass). मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी चर्चमध्ये गायली/ वाजवली जाणारी ही सिंफनी आहे. यातला कोरस किवा किंवा choir  अंगावर येतो; मन एकाच वेळी सुन्न आणि शांत होते. एकूणच मोझार्टची कुठलीही निर्मिती ऐकत असताना आपल्या मनाचा प्रवास हा शांततेकडेच होतो. ताण नाहीसा होतो. आपण अंतर्मुख होतो. गंमत म्हणजे आपण काही काम करत असताना जसे अभ्यास, लिखाण, शिवणकाम..काहीही..मन त्याच कामावर एकाग्र होतं. (आतासुद्धा मी हे सगळं लिहिताना मोझार्टची पियानो कॉन्सर्ट नंबर २७ ऐकत आहे!) आणि काहीही न करता फक्त सिंफनी ऐकली तर त्या सिंफनीमधल्या सूक्ष्म गोष्टी, स्वरांमध्ये होणारे अलंकारिक बदल, लयीमधील, तालामधील चढ-उतार यात आपण गुंतून जातो. मोझार्टने निर्माण केलेल्या एकूण रचनांचा (piano/ horn/ woodwind, violin concertos, piano music, violin music, solo/ dual pianos, sonatas, string quartets/ quintets dances, devotional music, masses, operas आणि असे बरेच काही..) आकडा ६२६ पर्यंत जातो. थोडक्यात, एखाद्याचा डॉक्टरीचा किवा इंजिनीयिरगचा सर्व वर्षांचा अख्खा अभ्यास एकटा मोझार्ट सहज करून घेऊ शकतो!!!
मोझार्टच्या मला आवडलेल्या ‘लिखाणा’मध्ये पुढील लिखाणे मी सारखी सारखी ऐकत असतो-
कॉन्सेटरे फॉर पियानो अँड ऑर्केस्ट्रा- नं २०, अ लिटिल लाईट नाईट म्युझिक (हे तुम्ही नक्की ऐकलेले असेल.. खूप प्रसिद्ध आहे आणि खूप ठिकाणी जाहिरातींमध्ये वगरे वापरले जाते), ’ la nozze di figaro. हे ऑपेरा संगीत आहे. ज्यात दोन स्त्रिया soprano  प्रकारात गाताना दिसतात. यात शेवटी दोघी मिळून जे गातात ते मिश्रण फारच सुंदर आहे. आम्हा गायकांना अशा गायकीतून खूप काही शिकण्यासारखं आहे. rondo alla turca हे पियानो सोनाटामध्ये मोडणारे कंपोझिशन त्या काळातील तुर्की संगीताच्या प्रभावात बनलेलं आहे. मॅजिक फ्लूट हे सुंदर कॉम्पोझिशन मोझार्टच्या शेवटच्या काही गाण्यांपकी एक.
खरं तर यूटय़ूब किंवा तत्सम सोशल साइटवर ‘मोझार्ट’ असं टाइप केल्यावर जे जे काही येतं, ते निसंशय डोळे झाकून ऐकावं असंच असतं.
मी वर लिखाण असा उल्लेख केला, कारण आपण जे आज ऐकतो ते मोझार्टने लिहिलेलं संगीत आहे. जे वाचून एखादा तयार पाश्चिमात्य ऑर्केस्ट्रा ते पुनíनर्मित करू शकतो. आज आपण जे ऐकतोय ते सगळं पुनíनर्मित आहे. एकटं बसून मनातल्या मनात अख्खा ऑर्केस्ट्रा उभा करून कोण कधी काय वाजवेल हे लिहून संगीतनिर्मिती करणं हीच तर पाश्चिमात्य अभिजात संगीताची खासियत आहे! म्हणूनच मोझार्टच्या शेवटच्या अशाही काही रचना आहेत, ज्या त्यानं स्वत कधीच ऐकल्या नाहीत वा त्याच्या हयातीत वाजवल्या गेल्याच नाहीत!
जसराज जोशी –viva.loksatta@gmail.com

हे  ऐकाच..
इतना ना मुझसे तू प्यार बढा
vv18मोझार्टचा प्रभाव हा जसा त्याच्यानंतर आलेल्या बिथोवेनसारख्या पाश्चिमात्य दिग्गजांवर जाणवतो, तसाच आपल्या सलील चौधरी किंवा शंकर-जयकिशनसारख्या भारतीय महारथींवरही झालेला दिसतो. ‘छाया’ चित्रपटातील सलील चौधरीचं तलत मेहमूद आणि लतादीदींच्या आवाजातील ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे. मोझार्टच्या सिंफनी नंबर ४० (molto allegro) वर या गाण्याची चाल बेतलेली आहे. त्या निमित्ताने ही सिंफनी तर आवर्जून ऐकावी अशी आहेच; पण या सिंफनीचा केलेला कल्पक वापर पाहून सलील चौधरींविषयीचा मनातील आदरही वृिद्धगत होतो!