News Flash

अभिमानी ‘ओळख’

एलजीबीटी काय हे समजून घेईपर्यंत त्यात आणखी क्यू आणि या ‘प्लस’ची भर पडली आहे.

विशाखा कुलकर्णी viva@expressindia.com

कल्पना करा तुम्ही समाजातल्या एका अशा समूहाचे घटक म्हणून जन्माला आला आहात, ज्याचे अस्तित्वच आजूबाजूचा समाज नाकारतोय.. सोप्या शब्दात सांगायचे तर समजा तुम्ही मुलगी आहात, पण बाकीचा समाज मुलगी वगैरे असं काही नसतंच, असं तुमच्या मनावर ठसवतोय. तुम्ही मुलगी असण्याच्या सगळ्या खुणा नाकारतोय. अशी कल्पनाही आपण करू शकत नाही.. कितीतरी आयुष्यं हा असा अस्तित्वाचा लढा देत आहेत. कितीतरी व्यक्ती अजून आपण कोण आहोत? या शोधात दिशाहीन आहेत. आणि या लढय़ातल्या काही व्यक्ती मात्र अक्षरश: जमाने से लडकर आपले अस्तित्व, आपली ओळख ठणकावून सांगत आहेत. आपल्या ओळखीचा अभिमान ‘प्राईड मंथ’ च्या निमित्ताने ते जगाला ठणकावून सांगत आहेत.

अनेकदा वर्तमानपत्रात बातमी येते, शस्त्रक्रिया करून ‘तो’ झाला ‘ती’. आपल्याकडे त्यावर तेवढय़ापुरती चर्चा होते, नंतर तो विषय तिथेच संपतो. म्हणजे नेमके  काय होते? स्त्री आणि पुरूष याव्यतिरिक्तही त्यांची ओळख कशी आणि काय आहे याचा आपण विचार करत नाही. एलजीबीटीक्यू+ या कम्युनिटीबद्दल आपण ऐकू न असतो, पण त्याबद्दल फार कमी माहिती असते. एलजीबीटी काय हे समजून घेईपर्यंत त्यात आणखी क्यू आणि या ‘प्लस’ची भर पडली आहे. सरकारी अर्ज भरताना, मेल, फीमेल आणि अदर असे विभाग असतात. यातल्या ‘अदर’ला सहज हसण्यावारी नेले जाते. स्त्री – पुरुष या दोन लिंगाच्या पलिकडे काही असते, हेच मान्य न करणाऱ्या समाजामध्ये ‘अदर्स’ म्हणजे कोण हे कधी समजून घेतले जाणार? या आणि अशा कित्येक गोष्टींविषयी चर्चा व्हावी यासाठी दरवर्षी जगभर ‘प्राईड मंथ’ साजरा केला जातो.

‘एलजीबीटीक्यू+’  म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर किंवा क्वेश्चनिंग अर्थात आपली ओळख अजून शोधत असणारे, आपल्या ओळखीविषयी संभ्रमात असणारे.  याव्यतिरिक्त कुठलीही संकल्पना याच कम्युनिटीचा भाग व्हावी यासाठी यात प्लसचा समावेश करण्यात आला. आपली ‘ओळख’ समाजाच्या रूढ लैंगिकतेपेक्षा वेगळी असेल, तर ती अभिमानाने वेगळी आहे असं सांगणाऱ्या सर्वांचा समावेश यात असावा, यासाठी हा प्लस! सुरुवातीला के वळ गे आणि लेस्बियन एवढय़ाच दोन वर्गाची ओळख आपल्याला होती. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीविषयी वाटणारे लैंगिक आकर्षण आणि पुरूषाला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण एवढाच समावेश होता. मग पुढे यात बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर या  संकल्पना देखील आल्या. समाजात वेगवेगळ्या लैंगिकतेच्या लोकांचा समावेश आहे याची जाणीव आणि त्यांना समाजमान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढत गेले. तसतसा या लोकांचा समावेश एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये झाला, आता एक सर्वसमावेशक संकल्पना म्हणून एलजीबीटीक्यू+ ही संज्ञा वापरली जाते. यातील प्रत्येक घटकाला समानता मिळावी, न्याय मिळावा या अनुषंगाने जून महिना हा ‘प्राईड  मंथ’ म्हणून साजरा केला जातो.

याची सुरुवात अमेरिकेतील न्यूयॉर्क मधल्या स्टोनवॉल इन इथल्या बारवर टाकलेल्या धाडीपासून झाली. जून १९६९ मध्ये पोलिसांनी  तिथे असलेल्या अनेक गे आणि लेस्बियन बार्सवर धाड टाकली. त्यानंतर त्याविरोधात गावातील लोक आणि गे – लेस्बियन कम्युनिटीतील लोकांनी एकत्र येऊन याचा प्रतिकार केला. याआधीही गे, लेस्बियन समुदायाच्या लोकांना प्रचंड त्रास देणे, दबाव आणणे अशा गोष्टी होत होत्या, पण या घटनेत पहिल्यांदाच गे,लेस्बियन, कृष्णवर्णीय अशा सर्वच लोकांनी एकत्र येऊन या हल्लय़ांना प्रत्युत्तर दिले. ‘गे मुक्ती चळवळी’ला अशारितीने सुरुवात झाली. पुढे जूनमध्ये या घटनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून या कम्युनिटीच्या लोकांनी दिलेल्या लढय़ाची जाणीव म्हणून दरवर्षी हा ‘प्राईड मंथ’ म्हणून साजरा केला जातो. वेगळी लैंगिक ओळख ‘नॉर्मलाईझ’ करण्याबरोबरच प्राईड मंथमध्ये आपली ओळख,आपलं वेगळेपण ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी,  वेगवेगळ्या पद्धतीने हा महिना साजरा करतात. एलजीबीटीक्यू समुदायाबद्दल लोकांना माहिती व्हावी, त्यांच्याविषयी असणारी उत्सूकता, प्रश्न यावर चर्चा व्हावी आणि आपल्या ओळखीचा हा उत्सव अभिमानाने साजरा करता यावा यावर प्राईड मंथ साजरा करताना भर दिला जातो.

या महिन्यात जगभरात वेगवेगळे इव्हेंट्स होतात, ज्यात अगदी टीनएजर्स पासून सगळ्यांचा समावेश असतो. यंदा कोविडच्या निमित्ताने हे इव्हेंट्स ऑनलाइन होत आहेत. दरवर्षी या इव्हेंट्समध्ये अगदी डीजे पार्टी, पिकनिक, कार्यशाळा, कॉन्फरन्स, सिम्पोझियम असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम होतात. निरनिराळ्या शहरांमधून ‘प्राईड परेड’ काढली जाते, ज्यात एलजीबीटीक्यू कम्युनिटीचा सप्तरंगी झेंडा अगदी अभिमानाने मिरवला जातो. निरनिराळ्या, चित्रविचित्र पोशाखांमध्ये या परेडमध्ये आपल्या स्वातंत्र्याचा आनंद घेत शहरभर ही रॅली फिरते. या निमित्ताने विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात, यात टी शर्ट पेंटिंग, फेस किंवा बॉडी पेंटिंग सारख्या स्पर्धाचा समावेश असतो. अनेक कपल्स यात भाग घेत उत्साहाने प्राईड मंथ साजरा करतात. या निमित्ताने कम्युनिटीतील गरजूंसाठी फंड उभारणीचे कार्यही के ले जाते.

भारतातही दरवर्षी प्राईड मंथमध्ये अनेक कार्यक्रम साजरे के ले जातात. याविषयी ‘वुमन्स स्टडी सेंटर’ येथील विद्यार्थी ट्रान्सवुमन ऋषिकेश कोरडे सांगतात, दरवर्षी पुणे विद्यापीठातील एलजीबीटीक्यू+ कम्युनिटीमधील आम्ही विद्यार्थी एकत्र येऊन प्राईड मंथ साजरा करायचो, मग यात वेगवेगळ्या सेक्शुअल ओरिएंटेशन समजून घेणे, मानसिक आरोग्य, आपल्याला आलेले अनुभव अशा विषयांवर चर्चा चालत असे. आता हेच कार्यक्रम ऑनलाइन होत आहेत. आपल्या देशात प्राईड मंथ सेलिब्रेशनचे असलेले महत्व सांगताना ‘मेन अगेन्स्ट व्हॉयलेन्स’चे अनिकेत गुळवणी याची एक वेगळी बाजू देखील सांगतात.  ते म्हणतात, ‘समाजातील वंचित, शोषित घटकांवर उच्च वर्गाकडून कायमच अन्याय होत आला आहे. एलजीबीटीक्यू+ कम्युनिटीवर तर या उच्च निम्न, सर्वच वर्गांकडून अन्याय होतो आहे, तेव्हा समाजातील ‘प्रिव्हिलेज’ मिळालेल्या घटकांनी पुढाकार घेऊन हा अन्याय होऊ न देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे’, असे ते सांगतात.  समता आणि न्याय हा खरंतर सर्वच घटकांना मिळायला हवा. प्राईड मंथच्या निमित्ताने ज्याविषयी फारसे बोलले जात नाही, अशा घटकांना समोर येऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळते, असेही ते पुढे म्हणाले.

एलजीबीटीक्यू+ कम्युनिटीबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. अगदी क ोणाला आपण समाजाच्या या गटातील आहोत असे वाटत असेल तरी बोलण्याचे धाडस होत नाही. अशावेळी समानतेचा हक्क आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीचा हा ‘रंगीत’ महिना  खऱ्या अर्थाने प्राईड मंथ होवो. समाजातील प्रत्येक घटकाला आपली ओळख अभिमानाने सांगता येवो, याच या प्राईड मंथच्या निमित्ताने शुभेच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 12:13 am

Web Title: lgbtq celebration lgbtq parades pride month 2021 zws 70
Next Stories
1 वस्त्रान्वेषी :  कान्होबा तुझी घोंगडी चांगली
2 नवं दशक नव्या दिशा :  कचऱ्याची उठाठेव – १
3 संशोधनमात्रे : विचारी मना तूचि शोधूनि पाहे
Just Now!
X