17 December 2017

News Flash

कलाकाराला दाद हवीच!

व्हिवा लाऊंजच्या कार्यक्रमात आरती अंकलीकर-टिकेकर यांचं आगमन झाल्यावर कार्यक्रमात एक अनोखी रंगत आली. शास्त्रीय

संकलन : रेश्मा राईकवार | Updated: March 1, 2013 1:06 AM

व्हिवा लाऊंजच्या कार्यक्रमात आरती अंकलीकर-टिकेकर यांचं आगमन झाल्यावर कार्यक्रमात एक अनोखी रंगत आली. शास्त्रीय संगीत आणि त्यासंदर्भातील गप्पा उत्तरोत्तर रंगल्या. सोनाली कुलकर्णीने विचारलेल्या प्रश्नांना आरतीताईंनी दिलखुलास उत्तरं दिली. या कार्यक्रमाचा हा सुरमयी वृत्तान्त

दीड तासांच्या मैफिलीत पहिल्या स्वरापासून तुमचे शंभर टक्के द्यायचे हे मोठे आव्हान
पूर्वी असं व्हायचं की रात्र रात्रभर मैफिली चालत असत रंगत असत. गायकाला आवाज लागण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी बराच अवधी मिळे. आत्ता दीड तासच असतो. तसा तो दीड तासही असतो असं नाही. पहिला गायक उठून जात असतो. आमची वाद्ये सुसाट वेगाने तिथे व्यासपीठावर आणली जातात. पडद्याच्या मागे हे सगळं सुरू असतं आणि मी पण, अशी ग्रीनरूममध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून एखाद्या रागाचा विचार करत असते. तेवढय़ात कोणीतरी धावत येतं.. चला, चला तुमची वेळ आहे. आणि मी तिथे बसते तेवढय़ातच मला सांगण्यात येतं की आत्ता सव्वातासात तुम्हाला संपवायचं आहे. म्हणजे माझ्यात अजून गाण्याच्या विचाराने मूळ धरलेलंही नसतं तेव्हाच ते संपवायचा विचार मांडला जातो. परंतु, अशावेळेला तिथे जायचं आपलं मन एकाग्र करायचं आणि पहिल्या स्वरापासून शंभर टक्के द्यायचे हे एक मोठं आव्हानच असतं. त्यासाठी आपला आवाज लागणं दोन-तीन मिनिटांत आवाजावर हुकूमत येणं याकरता बरीच तयारी करावी लागत असे.

आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ

शास्त्रीय संगीतात अध्यात्मिक गुण नक्कीच आहे.
मनाविरूध्द गायला लागतं जे माझ्या आराखडय़ात नसतं तेव्हा पहिल्यांदा मन थोडं खट्टू होतं. किंवा पुन्हा पुन्हा तेच गाणं गाण्याची फर्माईश केली जाते तेव्हा असं होतं पण, आपल्याला गावं लागतंय ना मग आपण त्याचा आनंद घेऊया, असा विचार मी करते. आणि थोडावेळ असं होतं पण, गायला लागल्यानंतर त्या स्वराकृतीत मी इतकी हरवून जाते की त्या गाण्यांचा आनंद वाटतो. त्यावरून एक गोष्ट आठवली. पुण्याचे एक प्रसिध्द साडय़ांचे व्यापारी आहेत. ते मला सांगत होते, की आरतीताई मी शास्त्रीय संगीत कधीही ऐकलेलं नाही. कारण ते मला विशेष आवडत नाही. ते तीन महिन्यांपूर्वी कोणाच्यातरी शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला त्यांना जावं लागलं. म्हणजे मी त्यांच्याकडून इतकी वर्ष साडय़ा घेते आहे पण, ते एकदाही माझ्या मैफिलीला आलेले नाहीत. पण, तिथे ते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेले आणि मग असं झालं की त्या आठवडय़ाभरात त्यांना तीन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना हजर रहावं लागलं. नंतर ते मला गेल्या आठवडय़ात म्हणाले, ताई मला आता शास्त्रीय संगीतच ऐकावंसं वाटतं हो. आता सुगम संगीत नाही,  भावगीत नाही, काही ऐकावंसं वाटत नाही. ते शास्त्रीय संगीत काहीतरी असं ‘उंची’ आहे असं वाटतं. त्यांचं ते बोलणं ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तांत्रिकदृष्टय़ा शास्त्रीय संगीत काय आहे याची त्यांना काहीही माहिती नाही. ते बौध्दिक आहे, भावनिक आहे की अध्यात्मिक आहे याची त्यांना काहीही जाण नाही पण तरीही ते त्यांच्या मनाला कुठेतरी भिडतं आहे. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतात अध्यात्मिक गुण नक्कीच असावेत.

रागमांडणी सुंदर आकृतीबंध आहे
कार्यक्रमाचे राग मला आधी ठरवायला खूप आवडतात. हा राग. या रागानंतर दुसरा कोणता राग त्याच्यावर छान वाटेल. कारण, रागाची ती सुरावट असते. म्हणजे मी कल्याण गायले आहे तर दुसरा कोणता राग गायचा. किंवा त्याच्यानंतर मी टप्पा सादर क रेन किंवा एखादं भजन. मग गेल्यावेळी मी नागपूरला काय गायले होते..असा आराखडा करायला मला खूप आवडतं. आणि त्या आराखडय़ानुसार मला गाऊ दिलं लोकांनी तर त्यांना खूप चांगलं ऐकायला मिळेल. फर्माईश केली की काय होतं.. एक विचारांची धारा, एक सुसूत्र असा विचार सुरू असतो मनामध्ये, त्याचा एक आकृतिबंध असतो त्यात अडथळा येतो. राग मांडणं हाही एक आकृतिबंधच असतो. काही काही वेळेला सहजतेने विचार येतात. पण, प्रस्तुती करत असताना ते नियोजनबध्द यायला हवं. शिवाय, मैफिलीचा मूडही बनवायचा असतो. त्यामुळे मग एक राग, नंतर दुसरा वेगळा राग, कधी उपशास्त्रीय. काही ठिकाणी शास्त्रीयच ऐकवायचं असतं.

गाणं आणि बोलणं हे वेगळं नाही…
गाणं आणि बोलणं हे वेगळं नाही. जर बोलताना मनात आलेला एखादा विचार आणि जे मला म्हणायचं आहे ते जर मी प्रभावीपणे मांडू शकते तर गाण्यातूनही मांडू शकते. म्हणजे हे मी विचार मांडण्याबद्दल बोलत्येय. आवाजाचं तंत्र पुन्हा वेगळं आहे. मला जे मांडायचं आहे प्रभावीपणे ते मी मांडू शकले तर ते समोरच्याला  पोहोचेलही. मला वाटलं, मी व्यक्त के लं, मी सांगितलं, समोरच्याने ऐकलं, त्याला कळलं, त्याला कळलं हे मला कळलं आणि तिथेच एक वर्तुळ पूर्ण होतं.

चली पि के नगर गाताना…
चित्रपटासाठी गाण्याचा विषय येतो तेव्हा मला ‘चली पि के नगर’ नक्कीच आवडतं. ‘चली पि के नगर’ जेव्हा जावेद अख्तरांनी लिहिलं होतं तेव्हा त्याच्यामागची प्रेरणा जी आहे ती ‘बाबुल मोरा.. ’ची होती. आणि ‘बाबुल मोरा’ इतक्या वेळा, इतक्या सुंदर वेगवेगळ्या पध्दतीने ऐकलेलं होतं की चली पि के नगरचा जो भाव आहे त्याच्याशी लगेचच मी एकरू प झाले.

अनुकरण ही कोणत्याही गोष्टीसाठी पहिली पायरी आहे…
परंपरा गाणं यात कमीकतमी धोका आहे. कारण तिथे आपलं स्वतचं खूप काही पणाला लागलेलं नसतं. अनुकरण ही कोणत्याही गोष्टीची पहिली पायरी आहे. जोपर्यंत आत्मशोध, आत्मचिंतन होत नाही तोपर्यंत अनुकरण करणारच तो गुरूचं. मला वाटतं जो शिष्य पहिल्या दिवसापासूनच गुरूसमोर आपल्याच पद्धतीने आवाज लावतो, स्वतचीच गायकी गातो तो कधी गायक होईल का?  कारण तो परंपराही शिकू शकणार नाही. अनुकरण करून जेव्हा त्याच्यावर अभ्यास होतो, चिंतन होतं..
कसं आहे ना..   गुरू, एका खिडकीतून आकाश दाखवतो. परंतु, शिष्याने त्या खिडकीतून बाहेर पडून संचार करायला हवा मगच त्याला अंतराळ दिसेल. आणि मग आकाशात विहरत असताना मी कोण आहे, माझी काय पात्रता आहे, मी कसं उडायला पाहिजे आणि कशातून मला आनंद होतो आहे याचा शोध घ्यायला हवा. मला वाटतं आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा. आपलं गाणं हे आपल्याला स्पर्श करत असतं. जोपर्यंत माझं समाधान होत नाही तोपर्यंत आपण तयार होत नाही. त्यामुळे अनुकरण करायलाच पाहिजे पण काही काळानंतर त्यातून बाहेरही पडायला हवं.

शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नाही हे आत्मरंजनासाठी आहे
माझे गुरू कायकिणींचे एक वाक्य आहे, शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नाही तर ते आत्मरंजनासाठी आहे. संगीताकडे बघताना घरातील संस्कारही तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला घरातून सांगितलं गेलं असेल की तुम्हाला संगीतातले सेलिब्रिटी व्हायचे आहे. तुम्हाला जबरी पैसे मिळवायचे आहेत. तर मुलंही तसाच विचार करू लागतात. मला भरपूर कार्यक्रम आणि पैसा मिळायला हवा. पण अशावेळी त्यांना थोडे कार्यक्रम थोडे पैसे नक्की मिळतात. पण त्यांना गाणं मात्र मिळत नाही. सुदैवाने मला आमच्या घरातून कायम असं विचारचे, की तु रियाज किती करतेस ते सांग.  

उदयचा मला पूर्ण पाठिंबा असतो
माझ्या आणि उदयच्या नात्याबद्दल बोलायचं तर त्याने गायिकेशी नाही तर आरती बरोबर लग्न केलं आहे. आणि तो मला नेहमी म्हणतो की तु एवढया गंभीरतेने गाणं करणार हे माहित असतं तर मी लग्नच केलं नसतं. यातला गंमतीचा भाग सोडून द्या. पण, उदय हा पूर्णत: वेगळा माणूस आहे. त्याचा मला नेहमी पाठिंबा असतो. मला कधीही काही अडचण आली तर मी त्याच्याशी बोलते. तो निव्वळ दोन मिनिटांत असं काही माझ्या शंकांचं निरसन करतो की, गळून पडलेली मी त्यातून मला पुन्हा उभारी येत. म्हणजे मी नेहमी असं त्याला म्हणते की तो स्पंज असतो ना तो कसं पाणी शोषून घेतो तसं ते सर्व नकारात्मक विचार तो पुसून टाकतो, जादूची कांडी फिरवतो.

चिंतनाला वेळ असतोच
मला कधीच भिती वाटत नाही की, मला रियाजाला व चिंतनाला कसा वेळ मिळेल. चिंतनाला वेळ असतोच. ज्याला ज्याला जे जे करायचंय त्याला त्यासाठी वेळ असतोच. जी व्यक्ति करत नाही म्हणजे त्याला त्याची गरज वाटत नाही. त्याच्यामुळे आत्ताच्या मुलांना चिंतनासाठी वेळ नक्कीच आहे. गंभीरपणे संगीत करण्यासाठीसुद्धा वेळ आहे. फक्त त्यांना त्याची  गरज वाटते आहे की नाही हा प्रश्न आहे. प्रत्येकाची स्वत:ची एक गरज असते. मला काय करायचंय आहे, कुठली गोष्ट मनापासून आनंद देते त्याचा थोडा विचार केला ना मग मार्ग मिळतो. माझ्याकडे गुरूकुल आहे. चार मुली आहेत. त्यांना कार्यक्रम वगैरे सध्यातरी नाही आहेत हो. पण, त्यांना आता सध्या कार्यक्रमांची चिंताच नाही. साधना चालू आहे,  पाच-सहा तासांचा रियाज चालू आहेत. त्यांना फक्त चांगलं गाणं गायचं आहे, त्यांचं चिंतन सुरू आहे. आणि कि शोरीताई नेहमी म्हणायच्या, ‘चांगलं गाणं गायल्यावर कार्यक्रम का नाही मिळणार, चांगले पैसे का नाही मिळणार..’. पण, याची जाणीव क रून देणारा गुरू, अशी माणसं पाहिजेत.

गाणं ऐकण्यासाठी श्रोताही तितकाच तयारीचा असायला हवा…
गाण्यातून यमन दाखवायचा असतो. म्हणजे बघ..मला यमन असा दिसला. प्रत्यक्षात मी यमन दाखवतच नसते. त्याच्यामागे हेतू असा असतो की, मी गाणं सुरू करते तेव्हा मला दिसलेला यमन मी घेतलेला तो अनुभव तुम्हालाही गाण्यातून द्यायचा असतो.
यमन गायल्यानंतर मी ज्या मनोवस्थेला पोहोचले त्या मनोवस्थेत तुम्हाला घेऊन जायचं असतं आणि त्यासाठी तुमचीही तितकीच तयारी असावी लागते. अनेकवेळेला खूप धावपळ करून आपण मैफिलीला येऊन बसतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की मीसुध्दा एकाग्र होणं गरजेचं आहे. जसं गायकाने एकोग्र व्हायला हवं. त्यामुळे जर आपण वेळेआधी येऊन बसलो, छान श्वासावर एकाग्र होत आपली मनस्थिती तयार केली तर आपल्याला त्या मैफिलीचा जास्त आनंद घेता येतो. जर श्रोता तयार असेल तर मला त्याला यमनची गोष्ट सांगणं फारच सोपं आहे ना! मला असं वाटतं माझं गाणं जर श्रोत्यांना कळतं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे तर त्याला श्रोतेही तेवढेच जबाबदार आहेत.

गायनाचं श्रेय माझ्या सासू-सासऱ्यांनाच…
मी आज इथे आहे त्याचं श्रेय माझ्या सासू-सासऱ्यांनाही जातं. त्यांचा मला चांगला पाठिंबा आहे. माझ्या सासूबाई स्वत: चांगलं गाणाऱ्या, त्यांच्या काळात नावाजलेल्या. अतिशय कर्तव्यदक्ष आणि सुगृहिणी. मी कधीतरी पंधरा दिवसांत चुकून एखादवेळी स्वयंपाक घरात गेले की माझे सासरे म्हणायचे तु इथे काय करते आहेस.. जा तू आधी तुझा रियाज कर..या सगळ्या गोष्टी होत राहतील. म्हणजे गाण्यासाठी काय हवं, याची त्यांना जाण होती. आणि यात त्यांनी सून, मुलगी, मुलगा-जावई असा भेदभाव कधीच केला नाही. ही चांगलं गाते आणि आपण तिला पाठिंबा द्यायचा, एवढाच विचार त्यांच्या मनात होता. खूप म्हणजे खूपच मोठी माणसं आहेत ही..

दाद हवीच…
कधीकधी श्रोत्यांच्या दादेला बळी पडून कलाकार गाणं बिघडवतात. असं होतं पण काही वेळेला कलाकार प्रयोग करत असतात आणि जर चोखंदळ श्रोता असेल तर तो जो काही विचार आहे तो उचलून धरतो आणि तिथे अशी काही दाद मिळते की.. कधी त्याचं गाणं समृद्ध होतं.  कलाकाराला दादेचा मोह असतोच नाहीतर तो घरी बसून गायला असता. मी माझ्यातला श्रोत्याला प्रशिक्षित केले आहे. गायक  जेव्हा श्रोता असतो तेव्हा.. आपले काही विचार बनलेले असतात. आवाज असा लावायचा, शब्द असे म्हणायचे, असे विचार मनात घट्ट असतात.  त्यामुळे मला वाटतं की, आपण गायकी अगदी  जवळून पाहिलेली असते, अनुभवलेली असते की आपली बुद्धी बाजूला ठेवून दुसऱ्याचं गाणं ऐकणं त्याचा आनंद घेणं हा एक प्रयास होऊन बसतो. आपण जरी ऐकलं तरी ते मनाकडून स्वीकारलं जात नाही. असे कित्येक कलाकार गाणं ऐकत असतात पण, वास्तवात ते ऐकत नसतात ते गातच असतात. मी आता जाणीवपूर्वक सवय लावून घेतली आहे. स्वरांचा, बंदिशीक डे पाहण्याचा, रागाच्या मांडणीचा गाण्याच्या विविध पैलूंकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. आणि एक श्रोता म्हणून मी गाण्याकडे भावनिक दृष्टीनेदेखील पाहते. खरंतर, चार वेगवेगळ्या स्तरावर गाणं सुरू असतं ते म्हणजे शरीर, आत्मा, मन आणि बुध्दी. पण, मी आता गाणं ऐकताना ते फक्त मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करते. हा राग भैरव आहे का?, संध्याकाळी गायला जातो आहे का?, कुठल्या या घराण्याचा राग गातो आहे का? या कशाकडेही लक्ष न देता मी भावनिक पातळीवर त्या गाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आता मला असं वाटतं आहे की, लवकरच मी जरा बरं ऐकू शकेन.

रागांमुळे भावनिर्मिती होते मग ‘मारवा’ हा संध्याकाळीच म्हटला पाहिजे किंवा तत्सम समज किती खरे आहेत?
‘षड्जा’शी असलेलं दुसऱ्या स्वराचं नातं हे भाव सांगतं. तुम्ही संपूर्ण राग जर घेतलात पाच-सहा स्वरांत तर ते स्वर ‘सा’च्या माध्यमातून जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा एक भावविश्व नक्कीच निर्माण होतं. पण, भाव निर्माण होण्यामध्ये दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. केवळ स्वर नाही, राग नाही तर त्यातील लय, मांडणी, स्वरांना दिलेली ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी त्यात येत असतात.
सूर्याच्या किरणांचा पृथ्वीशी होणारा कोन असतो तसा षड्जाशी प्रत्येक स्वराचा कोन आहे, संबंध आहे. मला वाटतं त्या त्या वेळेला ते राग गाणं यात फार खोल अर्थ असावा. कुठलीही गोष्ट खोडून टाकणं सोपं असावं. माझ्यात तेवढी कुवत नाही. पण, मला नक्की असं वाटतं की गाणाऱ्याचीही एक अवस्था असते. पूर्ण दिवस गेलेला आहे. सकाळी उठले, माध्यान्ह झाली मग संध्याकाळ आली तर माझीही एक भावावस्था असते ना. मारवा हा संध्याकाळच्या निसर्गाशी जोडला गेलेला आहे. मी पण निसर्गाचा एक भाग आहे त्यामुळे मलाही संध्याकाळ जाणवतेच. मलाही दुपार जाणवते, रात्र जाणवते त्यामु़ळे मी जो राग गाणार आहे..तर माझ्या मनोवस्थेचा परिणामही त्या रागावर होणार आहे. त्यामुळे त्या त्या वेळेशी तो राग जोडला गेला आहे, यात तथ्य आहे असं मला वाटतं. हल्ली रात्रीच्या मैफिली कमी झाल्या आहेत त्यामुळे आम्हीसुध्दा रात्रीचे राग संध्याकाळीच गातो. पुन्हा तिथे संस्कारांचाही भाग येतो. म्हणजे आपण भैरव संध्याकाळी गायला तर ते आपल्या संस्कारात नसतं. आई आंघोळी करून आली आणि तिच्या कपाळावर कुंकू नसेल तर आपण अस्वस्थ होतो कारण आई म्हणजे कपाळावर कुंकू, ही आपली आई अशी प्रतिमा आपल्या मनात असते. तसं सूर्य उगवला की भैरव गायचा हा संस्कार आहे.

रागदारी संगीत हे संपूर्ण स्वरप्रधान आहे त्यात शब्दांना फारसे महत्त्व नाही
रागातून जे सांगायचं असेल, मांडायचं असेल ते प्रभावीपणे येत नसेल तर बंदिशीचे शब्द कामी येतात. तेवढय़ासाठीच बंदिशीचा उगम झाला असेल, असं मला वाटतं. एखाद्या रागातून आपल्याला आत्यंतिक वेदना मांडायच्या असतील, ते तसं तळमळीने मांडता येत नसेल तर शब्दातून म्हणजे स्थुलातून ते मांडता येऊ शकतं. म्हणजे या मुलींना शिकवताना मला लक्षात येतं की कधी कधी रागदारीच्या स्वराकृतीत त्या फारशा रमत नाहीत पण मोरे सैंय्या नही आएॅं.. असं म्हटलं की त्या सहज त्या भावावस्थेत पोहोचतात. स्थूलात माणूस पटकन शिरतो त्यामुळे अशा ठिकाणी शब्दांचा उपयोग नक्कीच होतो. पण, उपशास्त्रीय संगीतात शब्दांना महत्त्व आहे. शास्त्रीय संगीतात शब्दांना तेवढं महत्त्व नाही. याचा अर्थ बंदिशी नीट म्हणू नयेत, असं नाही. मी स्वत: बंदिशी श्रोत्यांना त्यातला प्रत्येक शब्द समजेल अशा तऱ्हेने गायचा प्रयत्त्न करते. परंतु, बंदिशीच्या शब्दांना तेवढे महत्त्व द्यायची अजिबात गरज नाही कारण, रागदारी संगीत हे पूर्णत: स्वरप्रधान संगीत आहे. तिथे शब्द दुय्यमच आहेत.

उपस्थितांचे मनोगत
संकलन : राधिका कुंटे

अर्चना ठावरे
बहीण आणि मत्रिणीसोबत या कार्यक्रमाला जायचं ठरल्यावर ‘घनश्यामाच्या राधिका आणि प्रेमिका’ मनात फेर धरू लागल्या होत्या. आरतीताईंची प्रसन्न मुद्रा, देखणं व्यक्तिमत्त्व आणि कार्यक्रमाची समधुर सुरुवात संपूर्ण मुलाखतभर भरून राहिली होती. मी ‘तानसेन’ नसले तरी ‘कानसेन’ मात्र नक्कीच आहे. म्हणूनच हा कार्यक्रम मनमोकळ्या गप्पा असला तरीही काहीतरी नवीन आणि चांगलं ऐकायला मिळणार याची खात्री होती नि तसंच झालं. ‘सरदारी बेगम’मधली बंदीश विशेष लक्षवेधी वाटली. खास लोकांसाठीच शास्त्रीय संगीत आहे न् ते तसंच राहायला हवं, हे ताईंचं ठाम मत आवडलं. गायक नि प्रेक्षकांमधला त्यांनी उलगडलेला सूरसंवाद भावला. प्रेक्षकांनी खूप आग्रह करूनही ताईंनी ‘मी राधिका’ गाणं गायलंच नाही, याची बोच मनाला लागली. पण तरीही आरतीताईंना प्रत्यक्ष ऐकण्याचा आनंद काही औरच होता. थँक्यू ‘लोकसत्ता’ टीम.  

निहारिका शिंदे
शास्त्रीय संगीत शिकत असल्यामुळे मला ही मुलाखत फार जवळची वाटली. सोनाली कुलकर्णी यांच्या अप्रोप्रिएट सूत्रसंचालनामुळे मनातल्या खूप प्रश्नांची उत्तरं मिळाली. आरतीताईंना फार जवळून ओळखायला मिळालं. मुलाखत फार छान होती. ज्या लहानसहान गोष्टी तानेबद्दल कळल्या त्यामुळे एक अबोल नातं निर्माण झालं. शास्त्रीय संगीताची परंपरा ही केवढी मोठी आहे आणि कशी जपली पाहिजे हे त्यांनी फार छान सांगितलं. पुन्हा एकदा एवढय़ा मोठय़ा कलाकारांना भेटायला दिल्याबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा’च्या टीमचे खूप आभार.

जान्हवी देशपांडे
या कार्यक्रमाला आरतीताईंची एक चाहती म्हणून मी उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय छान झाला. आरतीताईंच्या बोलण्यातून त्यांचा संगीताचा सखोल अभ्यास, त्यांचे गाण्याबद्दलचे विचार लक्षात आले. विशेषत: त्या म्हणाल्या की, ‘मी जे गाणं सादर करते, ते श्रोत्यांपर्यंत पोचतं, त्यांची मला दाद मिळते आणि संवादाचं वर्तुळ पूर्ण होतं,’ हे खूप आवडलं. संगीत हे अध्यात्मापर्यंत नेतं, ही अनुभूती आली म्हणजेच संगीत ही ‘ओंकार नादब्रह्म’ ही संगीतातील संकल्पना त्यांनी आमच्यापर्यंत अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत पोचवली. संगीतातून मिळणारा निर्मळ आनंद त्यांनी आम्हाला नेहमीच दिलाय आणि देत राहतील. एवढा छान कार्यक्रम ऐकण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता व्हिवा‘ला धन्यवाद !

प्रदीप क्षिरे
आरतीताईंचा मी खूप मोठा फॅन आहे. मला त्यांचं गाणं ऐकायला मन:पूर्वक आवडतं. त्यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. मी गाणं शिकलो नाही, परंतु माझे मामा शास्त्रीय संगीत शिकलेले आहेत. त्यांचं गाणं ऐकून-ऐकून मला गाण्याची आवड निर्माण झाल्येय. म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. आरतीईंचं ‘मी राधिका’ हे गाणं मला खूप आवडतं. ते ऐकायला मी दहिसरहून आलो होतो. परंतु थोडी निराशा झाली. तरीही एकूण कार्यक्रम चांगला झाला.

First Published on March 1, 2013 1:06 am

Web Title: loksatta viva lounge aarti ankalikar tikekar talking about classical singing and music in loksatta viva lounge