News Flash

‘मराठी’चा कोलाज

‘मराठी’ भाषादेखील फ्रिक्शन किंवा मराठीत ज्याला घर्षण म्हणतात, अशा प्रक्रियेतून सध्या आपण अनुभवत आहोत.

आम्हा तरुणांना इंग्रजी, हिंदी आणि मराठी मिळून स्वनिर्मित भाषेचा असा काही झकास कोलाज आज बनवता येतो की, खरंच कधीकधी हे सुचतं कसं, असाही उद्गारवाचक प्रश्न मनाला पडतो. पण या मराठीच्या ‘कोलाज’ला जबाबदार केवळ आमची पिढीच आहे का?

‘परिवर्तनही संसार का नियम है’ लेक्चरात मास्तर पुन्हा पुन्हा सांगत होते, परंतु काळानुरूप घडणारे बदल हे सर्वमान्य होतातच असं नाही. कदाचित म्हणूनच हो हो-नाही नाही या सतत घडणाऱ्या फ्रिक्शनमध्ये संक्रमण घडतं आणि कालांतराने नवं आणि जुन्याचं असं ‘बायप्रॉडक्ट’ आपल्या भेटीला येतं. आजच्या मराठीत थोडक्यात सांगायचं झालंच तर, दोन पिढय़ांमध्ये मांडवली होते. ‘मराठी’ भाषादेखील फ्रिक्शन किंवा मराठीत ज्याला घर्षण म्हणतात, अशा प्रक्रियेतून सध्या जाताना आपण अनुभवत आहोत.

आम्हा तरुणांना इंग्रजी, हिंदी आणि मराठी मिळून स्वनिर्मित (सेल्फ-मेड) भाषेचं असं काही झकास कोलाज आज बनवता येतं की, खरंच कधी कधी हे सुचत कसं, असाही उद्गारवाचक प्रश्न मनाला पडतो. आजची मराठी भाषा म्हणजे जीन्सवर एखाद्या मुलीने टिकली लावावी, अशा थाटात सजताना दिसतेय. परंतु याही स्थितीत आज होतंय असं की, शाळा-कॉलेजात शिकतोय इंग्रजी, समाजात बोलतो हिंदी आणि मातृभाषा मराठी अशा त्रि-भागलेल्या आमच्या पिढीसमोर भाषेचं असं निराळंच आव्हान उभं राहताना दिसत आहे.

हे आव्हान आहे की नाही? यावर चर्चा, वाद होऊ  शकतात. कारण आपल्याच आसपास अनेक जण आपण पाहतोय की ज्यांनी हे वाचेचं विभागलेपण स्वत:च्याही नकळत सहजपणे स्वीकारलेलं आहे. या स्वीकार-कृतींची उदाहरणंच जर द्यायची झाली तर, ‘रूम खाली आहे’चे बोर्ड हल्ली सर्रास दिसतात. त्या भरात आपणही ‘रिक्षा खाली आहे का?’ असं ‘शुद्ध’ मराठीत विचारतो. एखाद्याने जास्त पैसे घेतले असता ती व्यक्ती सहज बोलून जाते, ‘अरे ‘जादा’ पैसे घेतले’ किंवा आमचा मित्र आग्रहाची विनवणी करताना हमखास बोलतो, ‘चल ना भावा’ किंवा कलाकृतीचे कौतुक करताना आमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, ‘काय ‘भारी’ आहे राव!’ किंवा ‘पकवणं’ हा शब्दप्रयोग भटारखाना वगळून इतर सर्व ठिकाणी प्रचलित झालेला दिसतो आणि ‘भेंडी-गवार’ या केवळ भाज्याच न राहता तरुणाई त्यांचा विविध ठिकाणी सदुपयोग करताना दिसते. असे आवर्जून मराठी बोलणारेही आपल्या भाषेचा ‘गर्व’ असल्याचं सांगतात. आम्हाला बुवा मराठीचा ‘अभिमान’ असतो, अशी शेकडो उदाहरणं देता येतील.

आज भाषा कात टाकतेय की नवीन पेहेराव परिधान करतेय याचा विचार व्हायला हवा. आजची भाषा धेडगुजरी म्हणून या साऱ्याचा दोष अगदी अलगदपणे तरुणाईच्या पदरात लोटला जातो. पण याच तरुणाईला घडत्या काळात इंग्रजी माध्यमात टाकणारी ‘पालक’पिढी हीसुद्धा तितकीच जबाबदार आहे किंवा तीच जबाबदार आहे याची आपण नोंद घेतो का? मराठी भाषा घरातूनच लांब केल्यावर वयाने वाढत जाणाऱ्या मुलावर मातृभाषेचे संस्कार होणार तरी कसे? मुलं मराठी पुस्तकं वाचत नाहीत असा कांगावा करताना, त्यांचे पालक मराठी पुस्तक वाचताना कितीदा दिसतात? हादेखील आजच्या भाषेत ‘सवाल’ आहे. म्हणूनच ‘भाषा संवर्धन’ पंधरवडा हा ‘भाषा ‘संरक्षण’’ या ‘लेबला’खाली साजरा व्हावा, निदान त्यामुळे आमच्यासारख्या नव्या पिढीच्या सामान्यजनांना ‘संवर्धन’ आणि ‘संरक्षण’ यातील फरक तरी स्पष्ट होईल.

आज कदाचित गंमत म्हणून किंवा सहजही असेल म्हणून, गरज म्हणून, सवय म्हणून मिंग्लिश किंवा तत्सम भाषा वापरताना, ही आपली भाषा नव्हे याचं भान जरी आपल्या मनात जागृत असेल तरी आपल्याकडून भाषेचं संवर्धन झाले असे आपल्याला म्हणता येईल. कारण पोटासाठी बोलली जाणारीच भाषा, जर आपण दर्जेदार मानून बसलो तर खऱ्या मराठी भाषेची समृद्धी कधीच आपल्या कळणार नाही.

म्हणून आजच्या परिस्थितीतही सघन भाषेकडे हळूहळू का होईना, आपण आपला मोर्चा वळवला पाहिजे. इंग्रजी, हिंदी इतर कुठत्याही भाषेला जवळ करताना आपल्या हक्काची मराठी भाषा आपली आतुरतेने वाट बघतेय याचे स्मरण जरी असले तरी भाषेच्या प्रवासाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. कुसुमाग्रज, गडकरी, खांडेकर असे आपल्या भाषेतले आदरणीय आजोबा आपल्या नातवंडांसाठी कधीही न संपणारा खजिना मागे सोडून गेलेत. भाषेची श्रीमंती कळून तिचा आस्वाद पुनश्च घेणे हीच भाषेला दिलेली खरी प्रेमसाद असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:32 am

Web Title: marathi kolag
Next Stories
1 बोले तो..आमची मराठी ट्रेण्ड में हैं!
2 Wear हौस : ‘ओव्हरसाइज’ ड्रेसिंग
3 व्हायरलची साथ : डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीह्ण
Just Now!
X