vv12सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य
अभिव्यक्तिस्वातंत्र्याची सीमारेषा, मुक्त विचारांचा होणारा संकोच, वाढती असहिष्णूता यांच्या निषेधार्थ काही ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केलेत. यानिमित्तानं सोशल मीडियावर सातत्यानं चर्चा सुरू आहे. कोण चूक, कोण बरोबर, वास्तव नि अवास्तव घटनांचे संदर्भ, पुरस्कार परत करणं योग्य की अयोग्य अशा विविध मतमतांतरांचे पडसाद उमटताहेत.

‘इमोजी’चा फंडा
फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर ‘लाइक’ आणि ‘कमेंट’ या दोनच ऑप्शनखेरीज विविध भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजी आणण्यासाठी ‘फेसबुक’चे प्रयत्न सुरू आहेत. ‘फेसबुक’चा सीईओ मार्क झुकेरबर्गनं काही इमोजींचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओत दाखविल्याप्रमाणं इमोजीची सोय देण्यात आली तर यापुढं प्रत्येक पोस्टखाली लाइकसह संबंधित पोस्टवरील भावना व्यक्त करण्यासाठी एकूण सात बटन्स उपलब्ध होतील. त्यात प्रेम, हास्य, यश, आश्चर्य, दु:ख आणि राग या बटणांचा समावेश असेल.

व्हायरल व्हिडीओज
कायमच चर्चेत असणाऱ्या ‘एआयबी’ टीमनं एक नवा व्हिडीओ शेअर केलाय. यंगस्टर्समध्ये तो व्हायरल होतोय. एव्हरी गर्ल मस्ट वॉच धिस, असं सांगणारी ही ‘क्रिपी कव्वाली’ आहे. ती पाहून ऑसम, ग्रेट, तर कुणी फनी, कुणी फेमिनिस्ट म्हणून त्याची खिल्ली उडवलेय. बघा तर खरं..

‘टीव्हीएफ’च्या टीमनं सध्या जनरेशन गॅपचे धडे गिरवायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळं असेल कदाचित ऑनलाइन शॉपिंगसाठी वडिलांना सल्ला देणारा लेक किंवा ट्विटर अकाउंट ओपन करण्याविषयी वडील नि मुलामध्ये घडलेले संवाद हे आपल्याच घरातले वाटू लागतात. ते पटू लागतात नि आपसूकच पुढं फॉरवर्ड केले जातात.
नवरात्रीत गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करणारे खूप असतात. त्यांचेही व्हिडीओज सध्या फिरताहेत. मग तो ‘बजरंगी भाईजान’ स्टाइल ‘सेल्फी ले रे’ म्हणत मोबाइल नाचवत केलेला डान्स असो किंवा बेली डान्सर्ससारखा कंबर लचकवत केलेला डान्स असो..

#एव्हरग्रीन..
काही जण कायमच वर्षांनुर्वष चर्चेत राहतात, ती त्याच्या दिसण्यानं, वागण्यानं, बोलण्यानं. पिढय़ान पिढय़ांना भुरळ घालतात. त्यातल्या दोघांचे वाढदिवसही लागोपाठ येतात. त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या अभिनयासोबत, त्यांच्या खासगी जीवनाच्या चर्चेचं गुऱ्हाळही दरवर्षी चालवलं जातं. अजूनही ‘तो’ चित्रपट, मालिका, इव्हेंट्स, सार्वजनिक जीवनात सॉलिड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ती’ तुलनेनं कमी काम करते, तरी ‘तिच्या’वरचा लाइमलाइट अद्याप कमी झालेला नाही. म्हणूनच दोघांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं ते सोशल मीडियावर ट्रेण्डिंग टॉपिक ठरले होते. त्यांचे किस्से-कहाण्या, त्यांचे संवाद-गाणी आणि अर्थातच फोटो त्यांच्या चाहत्यांनी भरभरून शेअर केले. वाढदिवस होता एव्हरग्रीन रेखा नि अमिताभ बच्चन यांचा..

किंगखान नि भाईजान..
शाहरुख खान आणि काजोलची जोडीची केमिस्ट्री रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ या चित्रपटातून पाहायला मिळारेय. हे दोघे जण बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताहेत. हैदराबादमध्ये चालू असणाऱ्या शूटिंगमधल्या एका सीनचा फोटो शाहरूखनं ट्विटरवर अपलोड केला होता. तो पाहताना एखाद्या रोमँटिक आणि भावनिक प्रसंगाचे असल्याचा अंदाज बांधत नेटकरांनी त्यावर कमेंट केल्या होत्या.

सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’मधलं ‘प्रेम लीला’ हे गाणं रिलीज झालंय. सलमान खाननं ही माहिती ट्विट केली. हे गाणं अमन त्रिखा नि विनीत सिंगनी गायलंय. हिमेश रेशमियानं त्याला संगीतबद्ध केलंय. या चित्रपटात सोनम कपूर, नील नितीन मुकेश, अनुपम खेर नि स्वरा भास्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

#इंडिया अ डे
‘गुगल’च्या होमपेजवर ‘#इंडिया अ डे’ ही कॅम्पेन लॉन्च करण्यात आली होती. त्यात त्या दिवशी घडलेली एखादी घटना शूट करून पाठवायची होती. मग ते मित्रांसोबत सोशल होणं असो किंवा कुटुंबासोबतचे आनंदी क्षण असोत, तुमचं वर्कलाइफ असो किंवा तुमच्या भावनांची अभिव्यक्ती असो.. त्या एका दिवसातली एक घटना व्हिडीओ शूट करायची होती.

सीमारेषा..
भारत-पाकिस्तान सीमेचे अवकाशातून टिपलेला फोटो ‘नासा’नं शेअर केलाय. सीमारेषेवर सुरक्षेच्या कारणास्तव लावण्यात आलेल्या दिव्यांमुळं रात्रीच्या काळोखात भारत-पाक सीमारेषा या फोटोत अगदी स्पष्ट उठून दिसते. नासाच्या एका अंतराळवीरानं निकॉन डी४ डिजिटल कॅमेरातून २८ मिलिमीटर लेन्सच्या साहाय्याने हा फोटो काढलाय. फोटोत भारत-पाक सीमारेषा केशरी रंगात अतिशय ठळकपणं पाहायला मिळते. तसेच पाकिस्तानातील कराची हे शहर या फोटोत दिव्यांच्या प्रकाशामुळं उजळलेलं दिसतं. सिंधू नदीचं पात्र आणि हिमालयाचाही भाग यात नमूद करण्यात आलाय.

#काव्यदिंडी
‘फेसबुक’वर काही नाही काही चॅलेंज चालूच असतात. सध्या आहे #काव्यदिंडी या उपक्रमाची धूम. बुक बकेट चॅलेंजप्रमाणंच आपण आपल्या आवडीच्या पाच कविता पोस्ट करायच्या आणि आपल्या फ्रेण्ड्सना टॅग करून या काव्यदिंडीत सामील व्हायचं निमंत्रण द्यायचं. या कवितांना भाषेचा अडथळा अजिबात नाही. त्यामुळं मराठी, हिंदी, तामिळ, इंग्रजी, अनुवादित अशा विविध भाषांमधल्या आणि नव्या-जुन्या धाटणीच्या कवितांचा रसास्वाद काव्यप्रेमींना घेता येतोय.

फॉरवर्डेड –
शांताबाई रॉक्स
बराक ओबामाच्या बायकोच्या उखाणा..
अमेरिकेची फर्स्ट लेडी मी
लांब माझा फराक
शांताबाईची ओटी भरते
नवरा माझा बराक..
*
या वर्षीच्या ‘आयएएस’ परीक्षेचे सर्वात कठीण प्रश्न..
– जान्हवीचे ९ महिने कधी पूर्ण होणार?
– कटप्पानं बाहुबलीला का मारलं?
– म्हाळसाला अजून किती वर्षांनी समजणार की ती पार्वती आहे?
– गढुळाचं पाणी कोणी गढूळ केलं?
– २ ऑक्टोबरला अजय देवगण कुठं होता?
– इंद्राणीचे नवरे किती?
आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न..
– शांताबाई ही कोण?
*
नवरात्र सुरू होण्याआधीच काही उत्साहींनी नवरात्र स्पेशल जोक्स फॉरवर्ड केले..
पोलीस : आम्ही तुम्हाला चारी बाजूंनी घेरलंय..
चोर : चला, मग गरबा खेळू या..
*
प्रिय मुलींनो,
नवरात्रात बिनाचप्पल राहण्यापेक्षा बिनास्कार्फच राहा. अंबाबाईला निदान आपली भक्त कोण आहे एवढं तरी कळेल..
– देवीचा एक जागरूक भक्त.
*
मेहुणीला पाहून प्रत्येक जावयाच्या मनात सासूविषयी खुन्नस का असते?
कारण जर तुमच्या घरात रसगुल्ला होता तर मला दहीवडा का दिला?
*
शेवटी कुणीच नाही तर सगळे जण अ‍ॅडमिनच्या मागं लागतात, ते असे.. परेशानी का कोई माप दंड नहीं होता साहब.. हमारा अ‍ॅडमिन केवल ये सोचकर ही परेशान रहता हैं की.. कॅमरा गोल होता है.. फिर.. फोटो चौकोनी क्यों आती हैं..
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com