‘त्याची’ लागते चाहूल.. मन होतं कावरंबावरं.. ‘त्याच्या’ एकेका थेंबानं.. सगळे होतात निवांत.. मग ‘तो’ कोसळतो.. सरसर.. झरझर.. ‘विथ म्युझिक’ धडाऽमधूम.. कडाऽऽडकड.. सकाळपासून रात्रीपर्यंत ? २७ बाय ७.. विरघळत राहतो आपण सारे ‘त्याच्या’ त्या बसरण्यात.. ओलेचिंब होऊन जातो आतूनबाहेरून.. ‘त्याच्या’ येण्याचं होतं दणक्यात सेलिब्रेशन.. खादाडीचे, फिरस्तीचे, गाण्यांचे, गप्पांचे नाना बेत होतात.
 ‘तो’ एन्जॉय करण्याचे फंडे शेकडय़ानं असतात.. पण या चार महिन्यांचा यूएसपी एकच.. फक्त ‘तो’! अस्तित्वानं ‘त्याच्या’ कवितांची होते बरसात.. ‘त्याच्या’मुळं होतं मोकळं मन.. जो तो पळतो डोंगरदऱ्यांत.. वाटतं तिथं एकदम रिफ्रेिशग.. ती हिरवाई डोळ्यांत सामावत अनेकजण वर्षभराची एनर्जी साठवतात. मग कोणकोणत्या आठवणी दाटून येतात.. कागदी होडय़ांच्या.. तडतडणाऱ्या भुट्टय़ाच्या.. एका छत्रीच्या.. त्या आठवणींनीच चिंब होत मनं होतात गच्च.. तेवढय़ात पुन्हा ‘तो’ येतोच.. नेहमीसारखाच भरभर.. त्यात भिजभिजून ‘आपण’ होऊन जातो ‘तो’ आणि मग गाणं फुलतं..  ‘मन ‘पाऊस पाऊस..’
काही ‘पाऊसप्रेमीं’नी आपापल्या ‘पाऊसगप्पा’ ‘व्हिवा’शी  शेअर   केल्यात.

अंकिता नरोडे
‘पाऊस’ म्हणजे मनावरचं मळभ दूर करणारा मित्र. पाऊस पडून गेल्यावर काळे ढग दूर सरल्यानं आकाश कसं मोकळं होतं. सगळीकडं हिरवळ पसरून जे काही प्रसन्न वातावरण होतं ते पाहून मलाही खूप प्रसन्न नि उत्साही वाटतं. पण मुंबईत अशा प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घ्यायला मिळणं तसं दुर्मीळच. त्यामुळं पावसाळ्यात मित्र-मत्रिणींबरोबर एकतरी ट्रेक करायला मला खूप आवडतं. डोंगरदऱ्यांत रिमझिम पावसात सगळ्यांसोबत मज्जा-मस्ती करणं, हा एक वेगळाच अनुभव असतो. त्यामुळं काही तासांसाठी रुटीनचा अक्षरश: विसर पडतो. याशिवाय सॉफ्ट म्युझिक ऐकत खिडकीत बसून गरम भजी खात जुन्या आठवणींना उजाळा देत वेळ घालवायला मला खूप आवडतं. लहानपणी कागदाच्या होडय़ा करून पाण्यात सोडायलाही मला खूप आवडायचं नि आवडतं. पावसामुळं चिखलाचा नि ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन करावा लागत असला तरीही पाऊस जगण्यासाठी नवी उमेद नि उत्साह देऊन जातो, हेच खरं.

प्रियांका श्रोत्री
पाऊस.. अवघ्या थेंबाथेंबांनी आनंदाचं शिंपण करणारा.. पाऊसधारांत वय विसरून नाचायला लावणारा.. सगळं वातावरण थंड आणि हिरवंगार करून हळूच प्रेमाची चाहूल लावणारा.. लहानपणी मित्रमत्रिणी मिळून आम्ही चार-पाचजण दोन छत्र्या शेअर करताना अर्धेअधिक भिजायचोच. मग छत्री बंदच करून पूर्णपणं भिजत असू. मी लहानपणापासूनच फक्त पावसाची मज्जा घेण्यासाठी छत्री घरीच ठेवते नि विसरले म्हणून सांगते. कारण ‘‘पाऊस पहिला जणू कान्हुला, बरसून गेला बरसून गेला..’ हे माझं आवडतं पाऊसगाणं आहे. ते पावसात भिजत खाल्लेलं गरमागरम कणीस किंवा गरम गरम कांदाभजी.. हे सगळं मी खूप मिस करतेय सध्या. शाळा-कॉलेजमधले मित्रमत्रिणी नि त्यांच्यासोबतची पावसातली मजा हे सगळं काही औरच होतं. एखाद दिवस तरी आपल्या बिझी लाइफमधून काढा नि पावसाचा मनसोक्त आनंद आपल्या जवळच्या माणसांसोबत चिंब भिजून लुटा.

विपुला कीर-तोडणकर
‘पाऊस’.. हा शब्द कानी पडला की आठवतो तो एका छत्रीत खाल्लेला तो चटकमटक भुट्टा.. गरमागरम कटिंग चायसोबत गरमागरम कांदाभजी.. पावसाचा आस्वाद घ्यायचा असेल तर सोबत असावी आपल्या प्रियकराची. माळशेज, माथेरान, लोणावळा, खंडाळा अशा पावसात फिरण्याजोगी ठिकाणांची लिस्ट करायला बसले, तर पान अपुरं पडेल. शिवाय भिवपुरी, खोपोली, पळसदरी या ठिकाणचे धबधबे खुणावत असतातच. पावसात हे धबधबे बघण्याची मज्जा काही औरच आहे. पावसाळ्यातलं निसर्गाचं रूप खूपच आकर्षक नि देखणं असतं. पाऊस शेतकऱ्यांना समाधान देतो, तसाच तो प्राणी-पक्ष्यांनाही आनंदित करतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत ओलंचिंब भिजण्यातली मजा काही वेगळीच आहे. असा हा मनमोही पाऊस सगळ्यांना हवाहवासा वाटतो.

मृण्मयी मुजुमदार
पावसाळा हा माझा फेव्हरेट सीझन आहे. पावसात भिजायला, खेळायला सगळ्यांनाच आवडतं. तसंच मलाही भिजायला खूप आवडतं. मला पावसात बाइकवर फिरायला खूप आवडतं नि तेही विशेषत: हायवे किंवा एक्स्प्रेसवेवरून. पावसाच्या सरींवर सरी कोसळताहेत नि त्यात आपण लाँग वॉकला बाहेर पडलोय, ही मजा काही औरच. त्यामुळं तेही मला आवडतं. पाऊस पडताना घरात जाम पकायला होतं. त्यामुळं कुठल्या तरी हिल स्टेशनवर जायचे प्लॅन मी करू लागते. हे प्लॅिनग पूर्ण होऊन हिल स्टेशनला जायला मला आवडेल. आऊटिंग प्लॅन करताना मी माझं आवडतं पाऊसगाणं गुणगुणते.. ‘सरीवर सर..’

मनीषा कुलकर्णी
पाऊस म्हणजे आनंदीआनंद, उत्साह, उल्हास चोहिकडे.. जणू काही धरित्रीनं हिरवा शालू नेसलाय.. चातक जसा चकोरीची वाट पाहतो तशीच धरित्री उन्हाचा दाह कमी करण्यासाठी पावसाची आतुरतेनं वाट पाहते. हा पाऊस सगळ्यांच्याच आवडीचा असतो. त्याविषयी खूप काही बोलण्यापेक्षा खरंतर तो अनुभवायचा असतो.. मला घरी बसून पाऊस बघत वाफाळत्या चहाचे घुटके घ्यायला खूप आवडतं. आईनं केलेल्या पाऊसस्पेशल खमंग मेनू कांदाभज्यांवर ताव मारते.. कधी ‘मेघा रे मेघा रे, मत परदेस जा रे..’ हे माझं आवडतं पाऊसगाणं मी ऐकते.. निवांतपणे.. कधी पुस्तक वाचण्यात गर्क होते.. साइड ऱ्हिदम असतोच तो पावसाचा..

आदिती वाळिंबे
पाऊस म्हटल्यावर वाटते खरी काहीशी हुरहुर.. पण लगेचच पॉझिटिव्हिटी येते आपल्या जगण्यात, ती मरगळ घालवून टाकणाऱ्या पावसामुळंच. पावसाळ्याइतकं रिफ्रेिशग कधीच वाटत नाही. फॅमिली नि फ्रेण्ड्ससोबत मी पावसाळ्यात लोणावळा नि मरिन ड्राइव्हला जाते. ‘‘बहका हैं मन कहीं..’ हे माझं आवडतं पाऊसगाणं आहे. फिरायला गेल्यावर हवेतला तो गारवा.. तो लोभसवाणा हिरवळलेला निसर्ग.. खळाळणारं पाणी.. पावसाळ्यात मस्त लाँग ड्राइव्ह किंवा राइडवर जायला फार आवडतं मला. खूप भिजायचं, मस्त गरमागरम कटिंग आणि मक्याचं कणीस खायचं.. आऽऽऽहा.. ट्रेनचा कंटाळवाणा प्रवास सोडला तर पावसाळ्यात सगळंच खूप छान वाटतं.