‘व्हिवा लाउंज’च्या पंचविसाव्या कार्यक्रमाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. माटुंग्याचे यशवंत नाटय़ मंदिर तरुणाईनं तुडुंब भरले होते. अश्विनी भिडे आणि कमांडर सोनल द्रविड यांना प्रेक्षकांनी अनेक प्रश्न विचारले. अभ्यास कसा करावा, यापासून ते घर आणि करिअरचा समतोल राखण्याच्या कौशल्याबद्दल मुलींनी शंका विचारल्या. वेगळ्या वाटांवरून चालणाऱ्या स्त्रियांच्या कर्तबगारीचे दर्शन या गप्पांमधून घडले आणि अनेकांना त्यांच्या वाटचालीतून प्रेरणा मिळाली, त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली.

कठोर तरीही संवेदनशील व्यक्तिमत्त्व
nm11अश्विनी भिडे आणि कमांडर सोनल यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू या संवादातून समोर आले. प्रशासन एकहाती चालत नाही. त्याला अनेक आयाम असतात असं सांगत अश्विनी भिडे यांनी जिल्हा परिषद ते आताच्या मेट्रो उभारणीपर्यंतचे अनुभव सांगितले. विकास करताना सामान्य नागरिक विस्थापित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते, असं सांगत सहनशीलता, संवेदनशीलता नि चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात, हा अनुभव शेअर केला. तर नौदलासारख्या अपरिचित कार्यक्षेत्राचा परिचय सोनल यांनी करून दिला. शारिरीक क्षमतेबरोबर मानसिक क्षमतेचाही इथे कस लागतो. युद्ध सुरू नसतानाच्या कालावधीतही तिन्ही दलांचं काम सुरू असतं. असं सोनल यांनी सांगितलं.

करिअर निर्णयाबाबत ठाम झालेय
nm01मी पहिल्यांदाच ‘व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा संवाद ऐकताना अक्षरश: भारावून गेले. या दोघींकडे असलेला पॉझिटिव्ह अ‍ॅप्रोच खरोखरच प्रत्येक स्त्रीने अंगीकारला पाहिजे.  या दोघींकडून मला खूपच शिकायला मिळालंय. मला पुढे काय करायचं याबद्दल मी जास्त जागरूक झालेय आणि करिअर निर्णयाबद्दल अधिक ठाम झालेय.
मनाली कानडे

प्रेरणादायी संवाद
nm02समाजाच्या विकासात, देशाच्या संरक्षणात स्त्रियांचा किती मोठा वाट आहे, ते या दोन स्त्रियांना पाहून समजलं. सनदी सेवेतील स्त्रिया आणि संरक्षण दलातील स्त्रियांबद्दल केवळ ऐकून होते. पण ‘लोकसत्ता व्हिवा’मुळे मला त्यांना प्रत्यक्ष बघण्याची, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. अश्विनी भिडे आणि कमांडर सोनल द्रविड या दोघींचं व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरलं आहे. त्यांना ऐकून मला वेगळीच जिद्द मिळाली आहे. ‘लोकसत्ता’चे मनापासून आभार!
डिम्पल गुजराथी

स्त्री शक्तीचं प्रेरणादायी दर्शन
nm03आपण स्त्री आहोत म्हणून कुठेही कमीपणा वाटून न घेता आपल्या ध्येयपूर्तीची वाट कशा प्रकारे चालावी, हे या दोघींकडून समजलं. आपल्याला हव्या त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारची मेहनत, फोकस आणि दृष्टी असावी, हेदेखील दोघींकडून शिकायला मिळालं. स्त्री-शक्तीची ही दोन उदाहरणं प्रेरणादायी वाटली.
ऋचा सावरगांवकर

कर्तबगार स्त्रीची व्याख्या सापडली
nm04व्हिवा लाउंजचा हा पंचविसावा कार्यक्रम मला खूपच आवडला. या दोघींमुळे माझ्या ध्येयाला दिशा मिळाली आहे. सनदी सेवेत जाण्यासाठी काय करावं लागतं, हे आधी अनेकदा ऐकलं होतं. पण सेवेत जाऊन अधिकारी झाल्यावर काय काय जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात हे समजलं. ‘लोकसत्ता’ने ‘कर्तबगार स्त्रीच्या व्याख्ये’संदर्भात स्पर्धा आयोजित केली होती, तेव्हा ही व्याख्या मला सुचली नव्हती, पण आज या दोघींना ऐकल्यावर मला उत्तर सापडलंय.
कीर्ती भावसार

कामाबद्दल पॉझिटिव्हिटी मिळाली
nm05व्हिवा लाउंजचा कार्यक्रम अप्रतिम होता. या दोन व्यक्तिमत्त्वांनी उपस्थित सर्व मुलींना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आपल्या कामाबद्दल पॉझोटिव्हिटी मिळाली आहे. अशा स्त्रिया आपल्या समाजात, आसपास आहेत, याचा मला एक स्त्री म्हणून खूप अभिमान आहे. त्या माझ्यासाठी इन्स्पिरेशन बनल्या आहेत. ‘लोकसत्ता’ची मी मनापासून आभारी आहे.
फरहीन सईद

नवी दिशा सापडली
nm06आज मला पहिल्यांदाच व्हिवा लाउंजला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मी खूप इन्स्पायर झाले आहे. नेव्हीत भरती होण्याबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर झाले. मला खूप काही शिकायला मिळालं. नवी दिशा सापडली. या दोन्ही स्त्रियांनी आपलं स्वत:चं असं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. कर्तबगार स्त्रीच्या व्याख्येला न्याय देणाऱ्या अशा या दोघी आहेत.
पूर्वा साळवी

नव्या क्षमतांची जाणीव
nm07दोन्ही कर्तबगार स्त्रिया घरगुती आणि प्रशासकीय दोन्ही जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडतात. घर सांभाळून करिअर घडवण्याची तारेवरची कसरत करीत दोन्ही भूमिका समर्थपणे बजावण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळते. दोघींकडून अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वेगळे काही तरी करण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते याची जाणीव झाली.
कल्याणी फणसे

युनिफॉर्ममागची मेहनत जाणवली
nm08कमांडर सोनल आणि अश्विनी भिडे यांना ऐकल्यावर खूप वेगळं समाधान वाटलं. कार्यक्रम खूप छान वाटला. नेहमीपेक्षा वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या कर्तबगार स्त्रिया म्हणून त्यांचे कौतुक वाटत होतेच. उत्सुकताही होती. त्यांना मिळणारा मान दिसत होता. त्यांना ऐकल्यानंतर मात्र त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट दिसले. अनेक नव्या गोष्टी समजल्या.
सायली फोडकर

भविष्यात याच व्यासपीठावर पोहोचण्याचं स्वप्न
nm09हा संवादाचा कार्यक्रम इच्छांना उभारी देणारा होता. प्रत्येक जण काही ना काही स्वप्ने घेऊन येत असतो. त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दृष्टिकोनाची शिदोरी मिळाली. उपस्थित सगळ्या तरुणांसाठी हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे. भविष्यात याच स्टेजवर पोहोचण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करण्याचे स्वप्न घेऊन जाते आहे.
सरिता कोपरे  

ध्येय गाठण्याचा विश्वास मिळाला
nm10पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटता आलं. त्यांच्याशी संवाद साधायला मिळाला. आपण स्त्री आहोत याबद्दल त्यांनी स्वत: कधी न्यूनगंड बाळगला नाही आणि कोणती जबाबदारीही नाकारली नाही. एक एक पाऊल पुढे टाकत आपण आपले ध्येय गाठू शकतो, हा विश्वास मिळाला.
मंदिरा कामत
शब्दांकन : प्राची परांजपे, वेदवती चिपळूणकर
छाया : मानस बर्वे, सम्जुक्ता मोकाशी