मेक-अप करताना काय काळजी घ्यायची, सौंदर्यप्रसाधनं कोणती वापरायची, मेक-अप बेस कसा असावा, आधी काय लावायचं, कसं लावायचं अशा अनेक शंका मनात असतात. त्यांचं समाधान करणारी लेखमालिका.
आतापर्यंत आपण मेकअपच्या सर्व स्टेप्स, विविध प्रॉडक्ट्स, त्यांचा वापर, फायदे-तोटे, याबद्दल माहिती घेतलीत. मेकअप करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कुठल्या वेळेसाठी कसा मेक-अप हवा हे लक्षात ठेवलं पाहिजे. अजून महत्त्वाची बाब ही की तुम्ही मेकअप कुठल्या प्रसंगासाठी करीत आहात. ऑफिसला किंवा एखाद्या मुलाखतीला जसे आपण घागरा चोळी घालून जाऊ शकत नाही तसेच मेकअपचेही आहे. त्याचाच विचार करून मेकअपचे काही प्रकार केले आहेत जसे की – फॉर्मल मेकअप, इंडियन फेस्टिवल मेकअप, ब्रायडल मेकअप, पार्टी मेकअप, डे मेकअप, इव्हनिंग मेकअप इत्यादी. आपल्याकडे आता सणांची सुरुवात झाली आहे. श्रावण झाला, आता गणपती बसले आहेत. नंतर दसरा आणि दिवाळी. गणेशोत्सवामुळे सगळीकडे मंगलमय वातावरण आहे. या दिवसात आप्त, मित्र-मैत्रिणी यांच्याकडे आवर्जून जाणे-येणे होते. त्यानिमित्ताने छोटेसे गेट-टुगेदर होते. अशा साधाशा पण तरीही महत्त्वाच्या प्रसंगी तुमचा लूक हलक्या मेक-अपनं उठून दिसू शकतो. तुम्ही कुणाकडे गणपतीच्या दर्शनाला जाणार असाल किंवा तुमच्याकडे पाहुण्यांची ये-जा असेल, अशा वेळी मेकअप कसा असावा त्यासाठी काही टिप्स..
* गणपतीच्या दिवसात सगळीकडे मंगलमय, पवित्र वातावरण असते. त्यामुळे मेकअपमध्ये कुठेही भडकपणा येणार नाही याची काळजी घ्या.
* या दिवसात वातावरण कधी दमट तर कधी थंड असे संमिश्र असल्यामुळे प्रॉडक्ट्स वॉटर रेसिस्टंट किंवा वॉटर प्रूफ वापरा.
* फाउंडेशनची शेड निवडताना गोंधळ होत असेल किंवा फाउंडेशन लावायला वेळ लागत असेल तर त्याला इइ क्रीमचा उत्तम पर्याय आहे. त्यावर कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर लावून सेट होऊ द्या.
*  पारंपरिक धार्मिक सणांमध्ये तयार होताना मेक-अप हलकासाच हवा. डोळ्यांना कधीही स्मोकी एफेक्ट द्यायचा नाही.
* आयशॅडोची शेड ही ड्रेसला मॅचिंगच असायला हवी असे नाही. जर ड्रेस किंवा साडी हिरव्या रंगाची असेल आणि हिरव्याच रंगाचा आयशॅडो वापरलात तर दिसायला खूप वाईट दिसेल. त्याऐवजी न्यूट्रल शेड वापरलीत तर मेकअप सौम्य वाटेल. पण जर ड्रेस फिकट गुलाबी किंवा केशरी रंगाचा असेल आणि त्याच रंगाचे आयशॅडो तुमच्या स्किन टोनशी मॅच करीत असतील तर मॅचिंग आयशॅडो लावायला हरकत नाही.
* आयशॅडो निवडताना नेमके काय लक्षात घ्यायला हवे – स्किन टोन, ड्रेस कलर की ऑकजन, असा प्रश्न पडला असेल आणि त्यामुळे मनात खूपच गोंधळ असेल तर यावर साधा सोपा मार्ग म्हणजे न्यूट्रल शेड्सचा वापर. त्याही मॅट फिनिश असतील तर उत्तम. त्याने तुम्हाला नॅचरल लूक मिळेल.
* आयलाइनरची शेड शक्यतो ब्लॅकच ठेवा फार फार तर ब्राउन ठीक. पण ब्लू किंवा नेव्ही अजिबात नको.
* आयलाइनर जाड किंवा बारीक कसेही ठेवा, जे तुमच्या डोळ्यांच्या आकाराला साजेसे असेल तसे वापरा. पण क्लिओपात्रा स्टाइल टाळलेलीच बरी.
* संपूर्ण मेकअप लाइट असल्यामुळे ओठ आकर्षक बनवा. फिकट लिपस्टिक वापरली असल्यास वरून लिपग्लॉस लावला तरी चालेल. गडद रंगाच्या लिपस्टिकचीही निवड करू शकता परंतु काळपट शेड्स टाळा.
*  सर्वामध्ये थोडे हटके दिसायला हवं असेल तर बिंदी किंवा टिकलीमध्ये नावीन्य आणा. सध्या पेशवे कालीन स्टाइलचा लूक पॉप्युलर होतोय. अर्धचंद्रकोर आकाराची टिकली, हनुवटीवर काळा ठिपका अशा प्रकारे लूकला वेगळा टच देऊ शकता.