‘बास झालं ते इंटरनेट! सकाळ, दुपार, संध्याकाळ.. पाहावं तर इंटरनेट सुरूच. कामं करा काही तरी’.. तरुणाईच्या पाचवीला पुजलेला हा डायलॉग ! इंटरनेटवरच्या सिनेमा, फॅशन, सेलेब्रिटींच्या विश्वात शिरताच आपण भान हरपतो हे खरं. आईबाबांच्या जनरेशनला हे रिकामटेकडेपणाचे धंदे वाटतात. पण इंटरनेटवर सतत अपडेट राहणं हाच कोणाचा व्यवसाय असेल तर? यातूनच कोणी प्रसिद्धीच्या झोतात आलं असेल तर? सोशल मिडीयातून लोकप्रिय झालेल्या दोन माध्यम सम्राज्ञींशी बातचीत..
vv02ब्लॉगिंगच्या माध्यमातून नाव कमावणाऱ्या, स्वतच्या पॅशनचं व्यवसायात रुपांतर करणाऱ्या आणि आता त्यातूनच ‘युथ आयकॉन’ बनू पाहणाऱ्या मिस मालिनी अर्थात मालिनी अग्रवालची गोष्ट.

सध्या काही चेहरे आपल्याला परिचयाचे झाले आहेत, चेहरे नाही तरी काही जणांचं काम, त्यांचे ब्लॉग, त्यांच्या पोस्ट्स आपण अगदी मनोभावे फॉलो करत असतो. हे चेहरे इंटरनेट नसतं तर आपल्यापर्यंत पोचलेच नसते. त्यातली एक मालिनी अग्रवाल. ‘मिस मालिनी’ हा ब्लॉग ठाऊक नाही, असा बॉलीवूड आणि फॅशनप्रेमी इंटरनेटवेडा तरुण भारतात सध्या तरी सापडणं मुश्किल. बॉलीवूडमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबर इतर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांपर्यंत पोहचण्याआधी मालिनीच्या ब्लॉगवर झळकून त्यावर खमंग चर्चा झालेली असते. मालिनीने बॉलीवूड, फॅशन आणि लाइफस्टाइल हे तरुणांचे आवडते विषय निवडले आणि वाचकांची नेमकी नाळ ओळखली. एखादी पूर्वी वाचलेलीच बातमी, मालिनीच्या ब्लॉगवर केवळ तिच्या लिखाणाच्या शैलीमुळे तरुणाई चार-पाच वेळाही वाचते. हेच तिचं वैशिष्टय़.
प्रोफेशनल डान्सर ते एक आरजे आणि मग ब्लॉगर.. मालिनीच्या बायोडेटावरून तिच्या व्यवसायाचा संबंध लावणं थोडंसं कठीणच आहे; आणि तो लावूही नये असं ती सांगते. रेडिओवर तिने घेतलेल्या पहिल्या बॉलीवूड सेलेब्रिटीच्या मुलाखतीनंतर त्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवले. नंतर लिखाणाच्या सवयीचा उपयोग तिला एका वृत्तपत्रासाठी ‘बॉलीवूड गॉसिप’चा कॉलम लिहताना झाला. दरम्यानच्या काळात छंद म्हणून ब्लॉग लिहिणं चालू होतं. तिने ब्लॉग लिहायला घेतला, तेव्हा ब्लॉगिंग भारतात तितकं रुळलं नव्हतं. मुळात इंटरनेटच आजच्या इतकं सार्वत्रिक झालं नव्हतं. या छंदाचं रूपांतर तिने पूर्णवेळ व्यवसायात करावं, हा मित्राचा सल्ला ऐकून २०११ मध्ये मिस मालिनी या ब्लॉगसाठी तिनं पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं. नवरा नौशाद रिझवानुल्ला हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून पदवी घेऊन आल्यावर, त्याच्यासोबत तिने ‘मिस मालिनी’ ब्लॉग सुरू केला.
आज ती ‘बॉलीवूडची गॉसिप क्वीन’ आणि ‘फॅशन आयकॉन’ म्हणून प्रसिद्ध आहे. ब्लॉगला नाव देताना फॅन्सी नाव ठेवण्यापेक्षा, स्वत:चं नाव देण्याचं तिने ठरवलं. कारण त्यातून तिला स्वत:चा दृष्टिकोन मांडायचा होता. आता तिचा ब्लॉग फेसबुक, ट्विटर,  गुगल प्लस यांसोबतच आणि वाईबरसारख्या अ‍ॅप्समधून मोबाइलमध्येही शिरला आहे. सोशल मीडियावर तिला चार कोटी फॉलोअर्स आहेत. गुगल हँगआऊटपासून लाइव्ह इव्हेंट्सपर्यंत ती तिचा ब्लॉग घेऊन गेली आहे आणि आता तर ती स्वत:चे टीव्ही शोजसुद्धा करते.
आपल्या छंदाचं रूपांतर व्यवसायात करण्याचं भाग्य फार कमी जणांना मिळतं. त्यातली एक नशीबवान मालिनी. बॉलीवूड, नाइटलाइफ, पार्टीज, पॉप कल्चर म्हणजे तिचा जीव की प्राण, नेहमी फॅशन फॉरवर्ड राहायला तिला आवडतं आणि भटकंतीच्या छंदापोटी तिने तिच्या नवऱ्यासोबत जगभरातले विविध प्रदेश आणि सोबत बर्लिन ‘ब्रेड अँड बटर फेस्टिव्हल’, साऊथ आफ्रिकेत केप टाऊनचा प्रसिद्ध फॅशन शो आणि जगातील इतरही काही फॅशन शोजना हजेरी लावली आहे. या सगळ्याचं प्रतिबिंब तिच्या ब्लॉगमध्ये दिसून येतं. परदेशात डिस्कव्हरीसारख्या चॅनल्समधून भारत म्हणजे गरिबांचा, दारिद्रय़ाचा देश असं चित्र उभ राहतं, ते खरं असलं, तरी यापलीकडे भारतातला युथ कसा आहे, हे कोणाला कळत नव्हतं. ब्लॉग सुरू करण्यामागे हा तिचा उद्देश होता.
अर्थात वरवर पाहता सुंदर, छान वाटणारं हे काम करताना तुम्हाला २४ तास जागरूक असणं गरजेचं असतं. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या टीमची मुलाखत घेण्यासाठी त्यांचा शो संपण्याची आठ तास वाट पाहिल्यावर तिला, मुलाखत घेण्याची संधी मिळाली ती पहाटे चारला. स्टेज परफॉर्मन्स दिल्यावर ही टीम मुलाखतीला वेळ देईल का, ही धाकधुक मनात असतानाच त्यांनी मात्र तिला छान मुलाखत दिली. हे सेलेब्रिटीसुद्धा आपल्यासारखे असतात. ते भरपूर मेहनत घेतात पण त्यांनाही थट्टामस्करी करणं आवडतं. त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे ती सांगते. शाहरुखचं न थकता सतत काम करणं आणि आमीरचा आतापर्यंतचा प्रवास तिला भावतो. दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची स्वत:चं अस्तित्व टिकवण्याची धडपडही भारावून टाकणारी असल्याचं ती सांगते.
इंटरनेटचं माध्यम आज फार पुढे गेले आहे आणि आजच्या तरुणाला सर्व काही एका क्लिकच्या अंतरावर मिळू लागलं आहे. पण तरीही भारतीय तरुण आजही त्याच्या संस्कृतीला घट्ट पकडून आहेत. हे विचित्र पण मस्त मिश्रण आहे. या पिढीसाठी मी काम करतेय आणि ते तसंच कायम राहणार. वृत्तपत्रं, टीव्ही चॅनेल यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला थेट संवाद साधता येतो. वाचकांचा फीडबॅक मिळत राहतो. त्यामुळे या माध्यमाने वाचकांच्या अधिक जवळ जाण्याची संधी दिली आहे. वर्ष सरले आहे आणि नवीन वर्षांत अजून काही भन्नाट मनोरंजन घेऊन येण्याचं आश्वासनही मालिनी यानिमित्ताने देते.