लख्ख सूर्यप्रकाश, मोठा दिवस, मोठी सुट्टी आणि भटकंतीची निमित्तं.. यामुळे उन्हाळा आवडता ऋतूही ठरू शकतो. उष्म्याचा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय केले, तर उन्हाळा नक्कीच कूल वाटेल. त्यासाठी काही साध्यासोप्या टिप्स –
भरपूर पाणी प्या : भरपूर पाणी पिणे शरीराला या काळात आवश्यक असते. शरीर हायड्रेटेड राहायला हवं. उन्हाळ्याच्या दिवसात दिवसाला साधारण आठ ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं.
फळे खा : या दिवसात येणारी आंबा, कलिंगड, लिची, प्लम, खरबूज यांसारखी हंगामी फळे अवश्य खाल्ली पाहिजेत. या सर्व फळांना एकत्र करून आणि त्यावर मॅपल सिरप घालून फ्रूट सलाड बनवण्याचा पर्याय टेस्टी आणि हेल्दीही ठरतो.
अतितिखट खाणं टाळा : उन्हाळ्यात मसाल्यांचा पोटाला अधिक त्रास होऊ शकतो. घराबाहेर असतानादेखील मसालेदार आणि तिखट खाणे शक्यतो टाळलेले उत्तम!
बदाम नियमितपणे खा : उन्हाळ्यामुळे सुस्ती येते. थोडेसे बदाम खाल्ल्याने तरतरी येऊन दिवसभर कामासाठी उत्साह टिकून राहायला मदत होते. बदाम त्याच्या पोषक घटकांसाठी पूर्वीपासून प्रचलित आहे. उन्हाळ्यात भूक मंदावते. आहार कमी झाल्यामुळे निर्माण होणारी ‘इ’ व्हिटॅमिन, फायबर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रोटीन, मँगेनीज, कॅल्शियम आदी पोषक घटकांची कमतरता बदामामुळे भरून निघते.
पेपरमिंट आइस्ड टी : उन्हाळ्यासाठी कोणते खास पेय असेल तर ते आहे अर्थातच आइस्ड टी! या उन्हाळ्यात नेहमीपेक्षा थोडा हेल्दी आइस्ड टी – अर्थात पेपरमिंट आइस्ड टी, ट्राय करा. दोन कप उकळतं पाणी किटलीमध्ये घ्या. त्यामध्ये पेपरमिंट टी बॅग्स घाला. काही मिनिटं त्या टी बॅग्सचा फ्लेवर पाण्यात उतरू द्या. मग टी बॅग्स काढून घ्या. गरम चहामध्ये मध आणि लिंबूरस घाला, त्यानंतर दोन कप थंड पाणी घाला. बर्फ घालून सव्‍‌र्ह करा.
सैल आणि फिकट रंगाचे कपडे वापरा : सैल आणि हलक्या रंगाच्या कपडय़ांमुळे सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट व्हायला आणि शरीराचे तापमान स्थिर ठेवायला मदत होते. सुती कपडे कधीही चांगले.
आमण्ड स्मूदी : उन्हाळ्यात तहान अधिक लागते आणि शरीराला पाण्याची नेहमीपेक्षा अधिक गरज असते. अशा वेळी बाहेरच्या फ्लेवर्ड ड्रिंक्सपेक्षा घरगुती बदाम सरबत, केशर-बदाम मिल्क, आमण्ड स्मूदी इत्यादींचे सेवन करणे अधिक श्रेयस्कर.
कोल्ड वॉटर स्पा विथ आइस : हा घरगुती उपाय आहे. घरच्या घरी ही स्पा ट्रीटमेंट घेऊ शकता. थंड पाणी आणि बर्फाने अर्धी बादली भरा आणि त्यात पाय ठेवा. आपल्या शरीरातील उष्णता पाय, चेहरा आणि कानावाटे बाहेर पडते, त्यामुळे यांपैकी कोणत्याही अवयवाला दिलेला थंडावा शरीरातील उष्णता आपसूक कमी करतो. मात्र हा स्पा उन्हातून आल्याआल्या लगेच करू नये. शरीराच्या तापमानात अचानक बदल झाल्याने त्याचा त्रास होऊ शकतो.