20 January 2020

News Flash

द्वंद्व ‘फास्ट आणि स्लो’चं..

सस्टेनेबल फॅशन हा शब्द इतका कॉमन झाला आहे की, सगळेच डिझायनर्स त्याच्या मागे लागले आहेत.

|| वेदवती चिपळूणकर

सस्टेनेबल फॅशन हा शब्द इतका कॉमन झाला आहे की, सगळेच डिझायनर्स त्याच्या मागे लागले आहेत. फास्ट फॅशनला टक्कर देणारी आणि पर्यावरणाचा विचार करणारी म्हणून सस्टेनेबल फॅ शनप्रचलित आहे. मात्र केवळ नाव बदलून पर्यावरणाचं रक्षण होत नाही, तर त्यासाठी खरोखरच प्रत्येक कपडा बनवला जात असताना त्याची त्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते. सस्टेनेबल आणि फास्ट यांच्यातला नेमका फरक आपण दोन आठवडय़ांपूर्वीच्या लेखात समजून घेतला होता. ही पुढची कहाणी सस्टेनेबल विरुद्ध फास्ट या स्वरूपाच्या युद्धाची! २०२०च्या उंबरठय़ावर असताना हे द्वंद्व समजून घेणं गरजेचं ठरणार आहे, कारण यातूनच भविष्यातील आपली फॅ शन वाटचाल यातून आकार घेणार आहे.

कधीकाळी सर्वाच्याच घरात वर्षांतून एकदाच कपडय़ांची खरेदी होत असे. बहुतांशी वेळेला ही खरेदी दिवाळी किंवा गुढीपाडवा अशा मोठय़ा सणांच्या वेळी होत असे. ‘खरेदी’ ही केवळ बाहेरच्या, उत्सवी कपडय़ांचीच केली जाई. घरात घालण्याचे कपडे, फ्रॉक, पायजमे इत्यादी गोष्टी अनेकदा घरातल्या घरात मशीनवर शिवल्या जात. घरातल्या आणि बाहेरच्या दोन्ही कपडय़ांचा प्रवास हा पूर्ण कपडय़ांपासून ते पायपुसण्यापर्यंत निश्चितपणे होत असे. त्यामुळे होणारे फायदे अनेक. मुख्यत्वाने दोन- एक म्हणजे कपडय़ाचा जास्तीत जास्त वापर आणि दुसरा म्हणजे पायपुसण्यासारख्या गोष्टींचा वाचलेला खर्च.. आपल्या आधीच्या पिढय़ांनी दाखवलेला शहाणपणा म्हणजे ‘सस्टेनेबिलिटी’ हे नाव नसलेली, पण पिढय़ान्पिढय़ा त्याच दिशेने पडत असलेली पावलं होती. कॉमर्सच्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या ‘कमोडिटी’चा वापर त्याची संपूर्ण ‘युटिलिटी व्हॅल्यू’ संपेपर्यंत व्हायला हवा हा साधा नियम आपल्या आधीच्या पिढय़ांनी वर्षांनुर्वष पाळला. त्यामुळे फास्ट आणि स्लोचं द्वंद्व कधी उभंच राहिलं नाही. घरात शिवल्या जाणाऱ्या कपडय़ांमुळे आपोआप प्रॉडक्शनचं प्रदूषण वाचलं आणि माणसांचे ‘स्किलसेट्स’ही कायम ताजेतवाने राहिले.

फास्ट फॅ शनचा प्रवेश झाला तो विशेषकरून जागतिकीकरणानंतर.. पहिल्यापासूनच पाश्चात्त्य गोष्टींचं आकर्षण आपल्याला अधिक आणि त्यात त्यांना आपल्या बाजारपेठेत मुक्त प्रवेश मिळायला लागला. अशा वेळी त्यांच्याकडे विचारांत रुजलेली ‘युज अँड थ्रो’ ही संस्कृती आपल्याकडे अगदी पेनांपासून ते चपलांपर्यंत यायला वेळ लागला नाही. या संकल्पनेच्या वाढत्या पॉप्युलॅरिटीने ‘सस्टेनेबल विरुद्ध फास्ट’ या युद्धाची ठिणगी पडली. रॅम्पवर दिसलेली डिझाईन्स जशीच्या तशी, पण तरीही स्वस्तात उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात फॅब्रिक हलक्या दर्जाचं वापरलं जाऊ  लागलं. या हलक्या दर्जाच्या फॅब्रिकच्या निर्मितीमुळे आणि ते फॅब्रिक टाकून दिल्यावर होणाऱ्या कचऱ्यामुळे हळूहळू प्रदूषण वाढायला लागलं. जेव्हा फॅशन इंडस्ट्री आणि ग्राहक म्हणून आपण या प्रक्रियेतून प्रत्यक्ष जात होतो तेव्हा त्याचं गांभीर्य आपल्याला जाणवलं नाही. मात्र वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमधला ‘फॅब्रिक इंडस्ट्री’चा सहभाग वेगवेगळ्या अभ्यासांमधून आणि सव्‍‌र्हेमधून समोर यायला लागला आणि ‘सस्टेनेबल’ फॅ शनची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. कॅरोलिन बेकर लेफहोल्ड आणि मार्क होयर यांनी त्यांच्या ‘इको-फ्रेंडली अ‍ॅण्ड फेअर : फास्ट फॅ शनअ‍ॅण्ड कन्झ्युमर बिहेविअर’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आताच्या फॅ शन इंडस्ट्रीतले प्रॉडक्शन आणि कन्झम्प्शन पॅटर्न्‍स ‘फूलिश म्हणजे मूर्खपणाचे’ आणि ‘डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे घातक’ आहेत. यातूनच पुन्हा सस्टेनेबिलिटीकडे वळण्याचे प्रयत्न केले जाऊ  लागले. मात्र तोपर्यंत फास्ट फॅ शन, युज अ‍ॅण्ड थ्रो, स्वस्तात मिळणारे रॅम्पवरचे कपडे या सगळ्याची आपल्याला इतकी सवय झाली होती की, आता ते सोडून, अधिक पैसे खर्च करून, वर्षभर ठरावीक ड्रेस घालण्याची कल्पनाही आपल्या ‘बस के बाहर’ होती.

सध्याच्या घडीला आपली स्थिती दोलायमान आहे. एक कोणतीही बाजू घट्ट धरून ठेवली तर दुसऱ्या बाजूने आपण अडचणीत येणार आहोत. सस्टेनेबलचा आग्रह धरावा तर संध्याकाळच्या पार्टीचा वेगळा ड्रेस, रात्रीच्या पार्टीचा वेगळा ड्रेस या आपल्या ‘सुखा’वर गदा येणार आणि फास्ट फॅ शनअंगीकारावी तर पर्यावरणाचा ऱ्हास डोळ्यांदेखत बघावा लागणार! यापैकी नेमकं काय श्रेयस्कर आणि परवडण्यासारखं आहे हा निर्णय प्रत्येकाने स्वत:च घ्यायचा आहे. वर्तमानातल्या स्थितीनुसार सस्टेनेबल या ‘टॅग’खाली आपण जे कपडे घेतो ते खरंच सस्टेनेबल आहेत की नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. सस्टेनेबल या नावाखाली डिझाईन्स पर्यावरणाशी जोडणारी वगैरे केली गेली, मात्र प्रत्यक्षात कापड तयार होतानाच्या प्रक्रियेत मोठे बदल होणं गरजेचं आहे.

प्रॉडक्शनच्या पद्धतीत बदल होतील त्याला अजून काही काळ जाईल. मात्र आपण ग्राहक म्हणून पर्यावरणदक्ष नागरिक आणि माणूस म्हणून स्वत:मध्येही काही बदल करणं अनिवार्य आहे. सस्टेनेबल आणि फास्ट फॅ शनयांमधला हा संघर्ष तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत आपण खरोखर सस्टेनेबल असणाऱ्या पर्यायांकडे कायमसाठी वळत नाही. हँडलूमवरचा कपडा वापरणं हा सस्टेनेबिलिटीचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. सोशल मीडियावरही अशी काही मोजकी उदाहरणं दिसतील ज्यांनी ‘अपसायकलिंग’चा विचार करून काही व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू केले आहेत. ‘इको – रिगेन’ हा एक असाच उपक्रम आहे ज्यात आपल्याकडून जुने कपडे, जीन्स या गोष्टी घेतल्या जातात आणि त्या बॅग, पाऊ च, झोळी अशा वस्तूंच्या स्वरूपात आपल्याला परत मिळतात. काही मराठी सेलेब्रिटींनीही या उपक्रमाला हातभार लावला आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या अकाऊंटवरून याबद्दलचे संपूर्ण अपडेट्स सतत मिळत असतात. थोडा मेमरीला ताण दिला तर हेही आपल्याला आठवेल की, ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटात गौरी म्हणजेच मुक्ता बर्वे तिच्या क्लाएण्ट्सकडून जुन्या साडय़ा घेऊन त्याचे मॅटर्निटी गाऊन्स डिझाईन करताना दाखवली आहे. हेसुद्धा अपसायकलिंगचं एक उत्तम उदाहरण आहे. ‘रिसायकल’पेक्षा ‘अपसायकल’ करणं ही खरी काळाची गरज आहे. अशा पद्धतीच्या स्वविचारातून निर्माण झालेल्या प्रोजेक्ट्सची आणि प्रयत्नांची खरं तर पर्यावरणाला गरज आहे. प्रत्येकाने स्वत:ला जरी या सस्टेनेबल विचाराशी खंबीर ठेवलं तरीही बराच मोठा बदल घडवायला आपण सक्षम आहोत.

First Published on August 2, 2019 12:09 am

Web Title: sustainable fashion mpg 94
Next Stories
1 ‘फिटनेस’वाला..!
2 ऑनलाइन खरेदी-विक्रीची ‘गंडा’स्थळे
3 राधिका देशपांडे
Just Now!
X