News Flash

कागद जिवंत करणारी कला!

टीव्हीवरचे शोज बघत त्यापासून प्रेरणा घेत सर्वेशचा या कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला.

|| तेजश्री गायकवाड

रिसायकल, अपसायकल या संकल्पना आजच्या काळात खूप गरजेच्या झाल्या आहेत. सध्याच्या काळात वस्तूंचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्याकडे आपण लक्ष देऊ लागलो आहोत. यातून नवनवीन कलाकृती तयार केल्या जात आहेत. असाच एक तरुण पेपर आर्टिस्ट सर्वेश कीर हाही रिसायकल संकल्पनेचा उपयोग करून घेत रद्दी पेपर, बॉटल यांपासून सुंदर कलाकृती बनवतो. नुकत्याच झालेल्या ‘जागतिक कला दिना’निमित्त ‘व्हिवा’ने सर्वेशला बोलतं करत त्याच्याकडून पेपर आर्टविषयी नव्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न के ला… 

 

टीव्हीवरचे शोज बघत त्यापासून प्रेरणा घेत सर्वेशचा या कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. याबद्दल तो सांगतो, ‘मी अगदी दुसरी – तिसरीत असल्यापासून चित्र काढायचो. मी पाचवीत असताना २०११ साली टीव्हीवर आर्ट शो लागायचे. ‘मॅड’ आणि ‘आर्ट अटॅक’ असे शो तर मी खूप बघायचो. ते बघूनच मला वाटलं की आपणही हे बनवू शकतो. प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून मी सुरुवात केली’. अगदी सुरुवातीला आपल्याला सगळंच काही बनवता येणार नाही, असं त्याला स्वत:लाच वाटायचं. स्वत:बद्दलचं त्याचं हे मत त्यानेच सतत सराव करत मोडीत काढलं. ‘घरात जे सामान उपलब्ध होतं त्याचा वापर करूनच आर्टवर्क करायला सुरुवात केली. माझं सगळ्यात पहिलं आर्टवर्क होतं ते म्हणजे टूथपेस्टच्या बॉक्सपासून बनवलेला ट्रक आणि हेलिकॉप्टर. त्या ट्रक आणि हेलिकॉप्टरनंतर मी खूप आर्टवर्क बनवले. आजही बनवतो आहे. हळू हळू त्यातही एके क प्रयोग करत गेलो’, असं सर्वेश सांगतो.

‘माझ्या या आर्टवर्कला खरी प्रसिद्धी मिळाली ती गणपती बनवणाऱ्या कलाकारांमुळे. मी माझ्या घराजवळच्या गणपती बनवणाऱ्या कारखान्यात गेलो आणि तिथे माझे काही आर्टवर्क दाखवले. त्यांना ते खूप आवडले. त्यांनी त्यांच्या मूर्तीसाठी काही आर्टवर्क बनवून द्यायला सागितलं. मी त्यांना छोट्या मूर्तीसाठी त्रिशूळ, शंकराची पिंडी बनवून दिली होती’, अशी आठवण तो सांगतो. मूर्ती कारखान्यात घडवलेल्या या काही पहिल्या कलाकृतीनंतर आजपावेतो दक्षिण मुंबईतील काही मूर्तिकार सर्वेशकडून आवर्जून गणरायाची मूर्ती किं वा आरास करण्यासाठीचे सजावटीचे सामान बनवून घेतात. गणरायाच्या हातातील शस्त्रे, संगीत वाद्यं अशा अनेक छोट्या-मोठ्या वस्तू त्याच्याकडून तयार करून घेतल्या जातात. ‘त्या वर्षीच्या ऑर्डरनंतर मला अजून काही मूर्तिकारांकडून दरवर्षी ऑर्डर्स यायला लागल्या. मी गेली ६ वर्षे हे काम आवडीने करतो आहे. सार्वजनिक मंडळाकडूनही अनेकदा डेकोरेशनच्या सामानाची ऑर्डर येते. त्यांना त्यांचे लोगो तयार करून मंडपात लावायचे असतात, तेही काम मी करतो’, असं तो सांगतो.

सर्वेश त्याच्या आर्टवर्कचे फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करतो. सोशल मीडियावरूनही त्याला कस्टमाइझ ऑर्डर येतात. लोकांना स्वत:ची बाइक किं वा त्यांच्या इतर आवडत्या गोष्टींची हुबेहूब प्रतिकृती बनवून हवी असते. त्यांच्या आवडीप्रमाणे सर्वेश त्यांना वस्तू बनवून देतो. सोशल मीडिया हे आताच्या काळात काही अंशी तरुणाईकडून वेळ घालवण्याचं साधन म्हणून वापरलं जातं, परंतु याचा योग्य वापर केला तर आपली ओळख व्हायला नक्कीच मदत होते, असं सर्वेश सांगतो.  ‘मी माझं आर्टवर्क सोशल मीडियावर व्यवस्थित फोटो काढून पोस्ट करतो. माझ्यासाठी हे माध्यम म्हणजे माझा डिजिटल पोर्टफोलिओ आहे. मी ११ फुटांचा आयफेल टॉवर आणि मुंबईच्या इमारतीचं थ्रीडी आर्टवर बनवलं होतं जे लोकांना खूप आवडलं. मध्यंतरी मी बुलेटचं छोटं मॉडेल बनवलं होतं, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सगळे पार्ट वेगवेगळे होतात आणि पुन्हा जोडता येतात. मला ती बाइक बनवायला एक महिना लागला होता’, असं त्याने सांगितलं. त्याने बनवलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्टवर्कमध्ये कॅ रिके चर्सचाही समावेश आहे. त्याने पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज वाजपेयी अशा काही कलाकारांचे पेपरपासून कॅरिकेचर बनवले आहेत.

सर्वेश सध्या वरळीच्या रहेजा कॉलेजमध्ये अप्लाइड आटर््सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेतो आहे. त्याला पुढे जाऊन त्यात करिअर तर करायचं आहेच, परंतु त्याबरोबरीने त्याला पेपर आर्टमध्ये अजून काही हटके प्रयोग करायचे आहेत. भारतामध्ये पेपर आर्टवर्कची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. या आर्टचे वर्कशॉपही सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. ‘आपल्या कलेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा. कोणी तुम्हाला तुमच्या आर्ट वर्कबद्दल, त्याच्या प्रोसेसबद्दल विचारलं तर टाळाटाळ न करता आवर्जून माहिती द्या. दुसऱ्याला शिकवल्यामुळे आपलीच कला मोठी होते’, असा सल्ला तो कलाक्षेत्रात धपडणाऱ्यांना देतो. कोणताही कलाकार एक कलाकृती बनवायला खूप मेहनत घेतो. छोटी छोटी वस्तू परफेक्ट बनवण्यासाठी त्याचे अनेक पर्याय त्याला बनवावे लागतात. कलाकाराच्या या मेहनतीची सार्थ जाणीव लोकांनी ठेवायला हवी, असं तो आग्रहाने सांगतो. कलाकार आणि त्यांची कला याविषयी आदरभावना ठेवत लोकांनी त्यांना कायम साथ द्यायला हवी असं त्याला वाटतं आणि ते तो सातत्याने लोकांना सांगण्याचा प्रयत्नही करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:05 am

Web Title: the art of bringing paper to life akp 94
Next Stories
1 मेन इन ‘जॅकेट्स’
2 ढोलताशांचा शांतनाद
3 नवं दशक नव्या दिशा : शरकाराची कैफियत
Just Now!
X