29 March 2020

News Flash

टावल

दर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात...

एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

दर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. त्या त्या प्रदेशाचं पाणी त्या भाषेवर चढतं, त्या प्रदेशाचा वारा लागतो आणि भाषा समृद्ध होत जाते. कोकणात गेल्यावर रत्नागिरी वा राजापूपर्यंत असणारी आमटी वा कालवण सिंधुदुर्गात शिरल्यावर ‘निस्त्याक’ होतं ते याचमुळे. बोलीभाषेच्या बाबतीत असं होणं फारसं नवलाचं नाही. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वत्र बोलल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या बाबतीत हे व्हावं ही गमतीची बाब. वसाहतीच्या वसाहती आपल्या ताब्यात घेत जाताना इंग्रजांना ही सुतराम कल्पनाही नसणार की त्यांच्या इंग्रजी भाषेला त्या त्या प्रांतात किती वेगळा रंग चढत जाणार आहे. आजचा आपला शब्दही असेच विविध रंग घेऊन फिरताना दिसतो. या शब्दाचा साधारणपणे उच्चार होतो ‘टॉवेल’. मग टुवाल, ट्वाल हे आणि असे बरेच उच्चार आपल्या कानी पडलेले असतात. इंग्रजसाहेब आणि अमेरिकन मंडळी मात्र या शब्दाचा उच्चार करतात, ‘टावल’. त्यातही ‘ट’ असा शुद्ध उच्चार नाहीच त्याला थोडेसे ‘ठ’ चे अस्तर आहे. म्हणजे साधारणत: या दोघांच्या मिश्रणातून तयार होतो तो शब्द आहे ‘ट्ठावल’. टॉवेलशी याचं काही संबंध जाणवतो का हो? नाहीच जाणवत. िहदीत टॉवेलचा अपभ्रंश म्हणून ‘टावल’ असा उच्चार आपण ऐकलेला असतो आणि तो चक्कमूळ अचूक उच्चाराशी अगदी मिळताजुळता आहे, पण यात भाषिक उच्चाराच्या जागरूकपणापेक्षा िहदी भाषिक ‘ऑ’ चा ‘आ’ च करतात हा सरळसाधा हिशेब अधिक आहे. टॉवरपेक्षा िहदीत ‘टावर’, पॉवरऐवजी ‘पावर’ हे फार सहज होतं. त्यातून हा ‘टावल’ शब्द रुजलाय. एकुणात मुद्दा असा की ज्याला आपण टॉवेल म्हणतो तो आहे ‘ट्ठावल’ किंवा टावल. जुन्या फ्रेंचमधून हा शब्द इंग्रजीत आला आणि तिथून आपल्याकडे तो इतका घरचा झाला की त्याला पर्यायी मराठी शब्द शोधण्याचा फारसा प्रयत्न झालेला दिसत नाही. आपला मराठी पंचा वेगळा आणि ट्ठावल वेगळं. टíकश टावल असा उल्लेख आपण करतो याचं कारण सहज पाणी शोषून घेणारी ही टावल्स खूपच लोकप्रिय होती, आहेत. ऑटोमन एम्पायरच्या काळात तर ही टावल्स बनवण्यासाठी विणकरांना खास प्रोत्साहन दिलं जाई. गालिच्यावरची कशिदाकारी टावल्सवर उमटे आणि त्यामुळे साहजिकच त्यांची किंमत खूप वाढत जाई. औद्योगिक क्रांतीनंतर या टावल्सची किंमत कमी झाली आणि ती घराघरांचा हिस्सा बनली.
याच टावलशी एक वाक्यप्रयोगही जोडला गेला आहे – To throw in the towel. बॉिक्सगच्या संदर्भात पराभूत होणे, पराभव स्वीकारणे यासाठी हा वाक्यप्रयोग वापरला जायचा, जो आज एकूणच पराभवासाठी वापरला जातो. तर आता या सगळ्या ऊहापोहानंतर प्रश्न उरतो की, टॉवेलचा ट्ठावल वा टावल होणार का? अर्थातच ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष ठरते, पण वारंवार परदेशवारी करणाऱ्या वा अशा प्रकारे इंग्रजी भाषकांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या मंडळींसाठी हा शब्द नेमका कसा? याचा खुलासा करण्यासाठी हे ‘टावल’चे धागे विणले गेले. आपल्या रोजच्या वापरात हा उच्चारांचा बदल कोणी करू इच्छित असेल तर त्याचे स्वागतच होईल.
viva.loksatta@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:01 am

Web Title: towel language
टॅग Language
Next Stories
1 ‘मॉडर्न’ संगीतसम्राट
2 ‘ती’.. तलम, हलकीशी,
3 जुना गडी नवं राज्य
Just Now!
X