17 July 2019

News Flash

भविष्याचे आम्हीही शिलेदार

ट्रान्सजेन्डर स्त्री असो वा पुरुष त्यांना समाजाने दर वेळी नाकारलं.

|| मितेश जोशी

विज्ञान-तंत्रज्ञान युगातील स्त्री बिनधास्त, धाडसी आहे, पण ट्रान्सजेन्डर स्त्री तशी नाही. तिला शिक्षणासाठी, घरासाठी आजही झगडावं लागतं आहे. स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या ट्रान्सजेन्डर तरुणींशी संवाद साधून आजच्या जागतिक महिलादिनानिमित्त स्त्रीरूपात येतानाचा त्यांचा संघर्ष, शिक्षणाने उच्चपदावर कार्यरत असलेल्या या स्त्रियांना समाजाकडून आलेले अनुभव, त्यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा आणि स्त्रीत्वाची त्यांची व्याख्या जाणून घ्यायचा प्रयत्न व्हिवाने केला आहे..

ट्रान्सजेन्डर स्त्री असो वा पुरुष त्यांना समाजाने दर वेळी नाकारलं. आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे त्यांना जगावे लागते आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे. ट्रान्सजेन्डर समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहेत आणि हे प्रयत्न त्यांच्याकडूनच केले जाताहेत हे विशेष. अनेक तरुण ट्रान्स, आम्ही एक समाजाचा भाग आहोत असं म्हणत, समाजात वावरणारे लोक ज्याप्रमाणे शिक्षण घेतात, ज्याप्रमाणे नोकरी करतात, उद्योगधंदा उभा करतात त्याचप्रमाणे तेही सुशिक्षित, सुजाण नागरिक म्हणून पुढे येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कर्नाटकातून मुंबईत स्थलांतरित झालेली ‘श्रीदेवी’ ही ट्रान्सजेन्डर महिला यल्लमा देवीची जोगती आहे. अध्यात्माची आवड असलेल्या श्रीदेवीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं. पण घरातल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि ट्रान्सजेन्डर पंथात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण होऊ  शकलं नाही. श्री सध्या मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण प्राप्त करणारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला आहे. अंगी नाना कला असलेल्या श्रीने मुंबईत रोजीरोटी चालवण्यासाठी चित्रकलेचे क्लासेस थाटले आहेत. ती एक आर्ट टीचर आहे. तिच्या हाताखाली १ नव्हे २ नव्हे तर ६०० विद्यार्थी आहेत. एक ट्रान्सजेन्डर आर्ट टीचर म्हणून मुंबईत वावरताना काय काय अडचणी आल्या, असा प्रश्न श्रीला विचारला असता ती म्हणाली, ‘लहान असतानाच मी हा ट्रान्सजेन्डर पंथ स्वीकारला. घरच्यांची संमती असूनही मला आता घरचे स्वीकारत नाहीत. मी मुंबईला स्वतंत्र राहते. स्वतंत्र राहण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा घर शोधत असताना मला खूप त्रास सहन करावा लागला. माटुंगा ते विरार हा संपूर्ण भाग मी पिंजून काढला. किती घरं पाहिली असतील याची गणती नाही. अखेर मला मालाडला ओळखीतून घर मिळालं. जिथे सध्या मी एकटी राहते. एक आर्ट टीचर म्हणून मला जास्त अडचणी जाणवत नाहीत. मी देशाची नागरिक व समाजाचा भाग आहे. त्यामुळे माझ्याकडे क्लासेसची विचारणा करायला येणाऱ्या पालकांना मी स्पष्टपणे ट्रान्स असल्याची कल्पना देते. काही महिन्यांपासून ९० टक्के पालकांकडून मला ठीक आहे ना! त्याचा आणि आमच्या पाल्याच्या शिक्षणाचा काय संबंध, अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय जो निश्चित सुखावणारा आहे. माझे विद्यार्थीदेखील मला परकं मानत नाहीत. कधीतरी मला ते गुलाबाचं फुल आणून देतात. माझ्या वाढदिवसाला, खास दिवसांना भेटवस्तू देतात. मी त्यांना प्रेम देते, आपलं मानते, त्यांच्या मनात माझ्याविषयी वेगळी भावना जागृत होणार नाही याची खबरदारी घेते म्हणून मलाही त्यांच्याकडून सन्मान मिळतोय. भविष्यकाळ मला आणखी आदराने स्वीकारेल, असं वाटत असल्याचं ती स्पष्टपणे सांगते. आजचा महिला दिन नेमका कसा असावा, यावर बोलताना, माझ्या दृष्टीने ज्या दिवशी महिलांच्या एक-एक समस्या संपतील तो दिवस माझ्यासाठी महिला दिन असेल. माझ्या मते महिलांच्या कार्यकर्तृत्वाची, त्यांच्या शक्तीची आपल्याला आठवण करून देण्यासाठी ८ मार्च हा केवळ एक दिवस पुरेसा नाही. आपली संस्कृती कायम आपल्याला स्त्रियांचा आदर करायला शिकवते, मीदेखील स्त्री आहे. मला कशाचीही गरज पडली तर ती गरज पूर्ण करण्याचं काम समाजाचं आहे. हे जेव्हा आजच्या तरुणाईच्या लक्षात येईल, तो माझ्यासाठी माझा महिला दिन असेल, असं ती म्हणते. तिने मधल्याकाळात मेकअप आर्टिस्टचे कोर्सेस केले. त्यामुळे ती मेकअपच्या ऑर्डर्स घेते. अनेक तरुणी तिच्याकडे बिनधास्तापणे मेकअप करायला येतात, असं श्री सांगते. तिला नृत्यातही रुची असल्याने सध्या ती भरतनाटय़मचे धडे गिरवते आहे. तिने तिच्या गुरूंना ती ट्रान्स असल्याची जेव्हा कल्पना दिली तेव्हा त्यांनीसुद्धा तिचा नि:शंक मनाने शिष्य म्हणून स्वीकार केला. भविष्यात सर्व कला एक छताखाली नांदणारं कलादालन उभ करण्याचं तिचं स्वप्न असल्याचंही तिने सांगितलं.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे प्राधान्य असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया हे चित्र नवीन राहिलेलं नाही. तसं ते ट्रान्सजेन्डर स्त्रियांच्या बाबतीतही तितकं उदासीन राहिलेलं नाही हे करीनासारख्या ट्रान्सजेन्डर्सनी दाखवून दिलं आहे. ठाणेस्थित करीना ही मुंबईतली पहिली ट्रान्सजेंडर टॅक्सी ड्रायव्हर ठरली आहे. मुंबई ही स्वप्नांची मायानगरी आहे. इथे प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण होतं. माझं पण स्वप्न पूर्ण होणार ही खूणगाठ मनाशी पक्की बांधून आपल्या घरातून मराठवाडय़ातून पळून ती मुंबईत आली. तिने काही दिवस स्टेशनवर काढले. तृतीयपंथीयांशी ओळख झाल्यानंतर ती त्यांच्या चमूत सामील झाली. करीना सांगते, मला स्वत:ची ओळख निर्माण करायची होती. म्हणून मी ट्रान्सजेन्डर्सबरोबर एकत्र राहणं सोडून दिलं. माझी मी स्वतंत्र गेले १८ वर्षठाण्यातल्या बाळकुम भागात राहते. कॅब चालवायची कल्पना नेमकी कशी सुचली?, याबद्दल ती म्हणते, गेले चार वर्षमी कॅब चालवते आहे. मला कॅ ब चालवायची कल्पना माझ्या मित्राने दिली. त्यानेच मला मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भरती केलं. लायसन काढायला मदत केली. त्याच्याचमुळे मी पायावर उभी आहे. सुरुवातीला मी ओला-उबेरची कॅ ब चालिका होते. मोजून ११ दिवस मी त्यांच्यामार्फत कॅब चालवली. एकही दिवस मला नकारात्मक अनुभव आला नाही. माझा सर्वात पहिला प्रवास मला आजही चांगलाच आठवतो. ठाणे ते अंबरनाथ ही माझी पहिली सवारी. नवविवाहित दाम्पत्य आणि त्यांची आई कॅ बमध्ये येऊन बसले. तिघांनीही मला आपलं मानलं. अंबरनाथला भाडं पूर्ण झाल्यावर त्यांनी हट्टाने मला घरी जेवायला नेलं. समाजाची ट्रान्सजेन्डर कॅ ब ड्रायव्हर म्हणून माझ्याकडे बघण्याची दृष्टी कशी असेल याची चाचपणी करण्याच्या हेतूने तिने ११ दिवस ती कॅ ब चालवली. त्यानंतर तिला स्वतंत्रपणे एल.एन.टी. पवईतून कॅब ड्रायव्हर होण्यासाठी विचारणा झाली. गेली चार वर्ष ती एल.एन.टी पवईच्या कामगारांना पिकअप आणि ड्रॉप देते आहे. करिनाच्या गाडीत रोज वेगवेगळी माणसं असतात, पण गेल्या चार वर्षांत मला एकही नकारात्मक अनुभव आला नाही, असं ती अभिमानाने सांगते. खरं तर महिला दिन जल्लोषात साजरा करण्यासाठी धडपडणाऱ्या करीनाला आजही अनेक ट्रान्सजेन्डर स्त्रिया सुशिक्षित असूनही व्यसनाच्या मार्गावर आहेत. समाजाने किंवा कुटुंबाने नाकारल्यामुळे त्या वाममार्गाक डे वळतात. अशा स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, ते यशस्वी होतील तेव्हा या दिवसाचा खरा आनंद साजरा होईल, असं ती म्हणते.

आपण पुरुष असूनही पुरुष नाही. आपल्या शरीरात स्त्रीत्वाची लक्षणं अधिक आहेत. हे ओळखून कुटुंबाच्या विरोधात जाऊन स्वत:ला पूर्णपणे स्त्री रूपात आणण्यासाठी अंगी धमक असावी लागते. तेवढंच नाही तर स्त्री म्हणून झालेले बदल स्वीकारत स्वत:वर प्रेम करण्याची मानसिकताही हवी. जी माधुरी सरोदे शर्मा हिच्यात प्रकर्षांने जाणवते. माधुरी ही भारतातली पहिली ट्रान्सजेन्डर आहे जिने एका सामान्य पुरुषाशी सर्व समाज-नातेवाईकांसमोर विवाह केला आहे. ती एल.आय.सीची पहिली ट्रान्सजेन्डर एजंटही आहे. एक ट्रान्सजेन्डर विवाहित महिला म्हणून समाजात वावरताना तुला नेमकी कोणती आव्हानं येतात, या प्रश्नावर माधुरी म्हणाली, मी स्वत:वर मनापासून प्रेम करते. म्हणूनच की काय मला मी जन्मानेच स्त्री आहे, असं लोकांना वाटतं. बऱ्याचदा मला त्यांना सांगावं लागतं की, मी ट्रान्स आहे. मी सर्वाच्या साक्षीने जरी विवाह केला असला तरी मला या विवाहाचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आणि त्यामुळे मी मुलं दत्तक घेऊ  शकत नाही. स्त्रीला पूर्णत्व येतं ते आईपणामुळे. त्यामुळे सध्या विवाहाचं प्रमाणपत्र मिळवणं हे माझ्यापुढय़ात मोठं आव्हान आहे. माधुरी स्वत: कथक नर्तिका आहे. तिच्या नृत्याचे वेळोवेळी प्रयोग होत असतात. त्याचसोबत ज्वेलरी मेकिंगचा तिचा स्टार्टअप आहे. अनेक प्रदर्शनांमध्ये ती स्टॉल लावते. माधुरी सांगते, एक ट्रान्सजेंडरचा इथे स्टॉल आहे हे पाहण्यासाठी आणि कुतूहल म्हणून मला भेटण्यासाठी अनेक स्त्रिया स्टॉलवर येतात. अनेक तरुणी माझ्याकडून फॅन्सी ज्वेलरी ऑर्डर देऊन बनवून घेतात, हा जो स्त्रियांकडूनच सकारात्मक प्रतिसाद मिळतो त्याबद्दल आनंदी असलेली माधुरी आज समाज, आजची तरुण पिढी आम्हाला स्वीकारण्यासाठी पुढे येते आहे. तर त्यांनी दिलेला हात धरून स्वत:ला स्वावलंबी करण्याची जिद्द आमच्यात असायलाच हवी, असं स्पष्टपणे नमूद करते. महिला दिन आजही पारंपरिकपणेच साजरा केला जातो, तिथे ट्रान्स स्त्रियांना जागा नाही. त्या अजूनही मोकळेपणाने हा दिवस साजरा करू शकत नाहीत, अशी खंतही तिने व्यक्त केली. कारण आमच्या हक्कांबाबत, कायद्यांबाबत, आमच्या मागण्यांबाबत सरकारने अजूनही ठाम भूमिका घेतलेली नाही. ती जेव्हा घेतली जाईल त्या दिवशी आम्ही आणखी उंच भरारी घेऊ, हेही ती ठामपणे सांगते.

अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील दिशा या ट्रान्सजेन्डर तरुणीला तृतीयपंथी समुदायात येऊन २० वर्षझाली. दिशाने जेव्हा हा मार्ग स्वीकारला तेव्हा तिला घरातून विरोध झाला, पण कालांतराने तो मावळला. ती तिच्या गुरूंजवळ राहते. कविता तयार करण्याचा तिला छंद आहे. उत्कृष्ट वक्तृत्व शैली, समोरच्याला आपल्या बोलण्यात खिळवून ठेवण्याची ताकद तिच्यात आहे. याचाच फायदा घेऊन सुरुवातीला तिने या समुदायाची ओळख, समस्यांची माहिती सर्वसामान्य जनतेला करून द्यायला सुरुवात केली. हळूहळू तिच्या लक्षात आलं समाजात केवळ माझ्याच समस्या नाहीत. तरुणाईत एल.जी.बी.टी. म्हणजे काय, लैंगिकता म्हणजे काय, स्त्रियांना मासिक पाळी आल्यावर त्यांना चार दिवस का व कसा त्रास होतो, याबद्दल अज्ञान आहे. ती व्याख्यानांमधून याबद्दल जनजागृती करते. कवितेच्या व लिखाणाच्या माध्यमातून जनप्रबोधनाचा वसा घेतलेल्या दिशाला समाजात वावरताना सकारात्मक व नकारात्मक दोन्ही अनुभव येतात. ‘श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात मी राहते. संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसात पोहोचण्यासाठी, प्रबोधनासाठी मी एस.टी., रेल्वेने फिरते. तिकीट आरक्षण करूनसुद्धा मला बऱ्याचदा प्रवास हा चोरासारखा करावा लागतो. माझ्या बाजूच्या सीटवर कोणी बसायला सहसा तयार होत नाही. या सर्व घटनांनी कधी कधी वाईट वाटतं खरं! आजही आम्हाला लोक घाबरतात. आम्ही चोरी केली तर, अश्लील चाळे केले तर असे प्रश्न त्यांच्या मनात असतात. आमच्याबद्दलचे हे गैरसमज दूर करण्याचे काम माझ्या व्याख्यानातून मी करते,’ असं ती सांगते. मात्र आजची तरुणाई ट्रान्सजेन्डर्सबद्दल जागृत आहे, त्यांनी आम्हाला वरवर स्वीकारलेलं नाही हेही ती स्पष्टपणे सांगते. तरुण मुलं-मुली खरोखरच खोलवर जाऊन या लैंगिकतेचा अभ्यास करू इच्छितात. मुंबईतील रुईया महाविद्यालयात मी तीनदा वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय. संवादानंतर मला मिठी मारून कित्येक तरुण मुली रडल्या आहेत, असं दिशा सांगते. महिला दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी सकारात्मक दृष्टी देणारी व्याख्याने, कोर्सेस, यासंदर्भातील चित्रपट आयोजित केले जातात. जेणेकरून तरुणींना प्रेरणा मिळते, आयुष्यात काही तरी करून दाखवण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळे समाजाने पूर्णपणे स्वीकारो किंवा न स्वीकारो महिला दिन असायला हवा, हे ती आवर्जून सांगते.

पुरुषाच्या देहात आपलं स्त्रीमन अडकलं आहे हे लक्षात घेऊन, स्वत:ची खरी ओळख काय हे जाणून घेत त्यासाठी मुळात ते स्वत: स्वीकारायचं. त्यासाठी शारीरिक-मानसिक बदल करून घ्यायचे. आपली लैंगिक ओळख निर्माण करायची आणि त्या रूपातही आपलं आयुष्य कर्तृत्ववान व्हावं यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे इतक्या सकारात्मकतेने वावरणाऱ्या या ट्रान्सजेन्डर स्त्रिया आधुनिक बदलाच्या खऱ्या प्रतीक आहेत. उद्याचा भविष्यकाळ आम्हाला स्वीकारणारच आहे. त्यासाठी आता प्रयत्नांत कसूर नको, या ध्येयाने सुरू असलेला त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने क्रांतिकारी आहे!

First Published on March 8, 2019 12:09 am

Web Title: trans woman international womens day