|| तेजश्री गायकवाड

फॅशनकोरिओग्राफर म्हणून करिअरची सुरुवात करणारा आणि गेली पंचवीसपेक्षा अधिक वर्ष फॅशनइंडस्ट्रीमध्ये नावलौकिक मिळवणारा डिझायनर म्हणजे विक्रम फडणीस. कधी दिग्दर्शक, कधी निर्माता तर कधी वेशभूषाकार अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून विक्रम प्रेक्षकांसमोर नेहमीच येत असतो. सतत काहीतरी नवीन करणारा डिझायनर म्हणून ओळख असलेल्या विक्रमने कधीही शास्त्रशुद्ध पद्धतीने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलेलं नाही. आणि तरीही तो बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर म्हणून ओळखला जातो. फॅ शन इंडस्ट्रीत आणि बॉलीवूडमध्येही तितकीच लोकप्रियता मिळवणारा डिझायनर म्हणून त्याने कशी ओळख कमावली हे खरंच समजून घेण्यासारखे आहे..

डिझायनिंगच्या या क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘मी एक विज्ञानक्षेत्राचा विद्यार्थी आहे. आई-वडील डॉक्टर असल्यामुळे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होणार हेच सूत्र ठरलेलं होतं. आणि त्यामुळेच मी विज्ञान शाखेतून पदवीचा अभ्यास करत होतो. अभ्यास करताना मला आतून हे कळत होतं की मला मनापासून हे करायचं नाही आहे. पण हे नाही तर नेमकं काय करायचं आहे ते मात्र मला समजत नव्हतं. त्या वेळी मी खरोखरच एका लॉस्ट पोजिशनवर होतो.’

एकीकडे आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा शोध घेता घेता विक्रम कॉलेजच्या वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये फॅ शन शो करायला लागला. त्याबद्दलची आठवण सांगताना तो म्हणतो, ‘मी फॅ शनशो करायचो तेव्हा मला स्पर्धामध्ये नेहमीच बक्षीस मिळायचं. एका शोमध्ये प्रसिद्ध मॉडेल मेहर जेसिया यांनी मला बघितलं आणि तू हे प्रोफेशनली का नाही करत? असं विचारलं आणि तिथून माझ्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.’ आपल्याला नक्की काय करायचं आहे हे एकदा समजल्यावर विक्रमची फॅ शन डिझायनिंग क्षेत्रातील घोडदौड सुरू झाली आणि मग त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्याने प्रोफेशनली फॅ शनशो करायला सुरुवात केली तेव्हा कुठे त्याला डिझायनर कपडे म्हणजे नक्की कसे असतात हे बघायला मिळालं, असं त्याने सांगितलं.

फॅशन इंडस्ट्रीत प्रवेश केलेल्या विक्रमची तेव्हा डिझायनिंगशी गाठ पडली नव्हती.‘मला सुरुवातीला अनेक मोठय़ा डिझायनर्सच्या शोजचं बॅकस्टेज करायला मिळालं. त्यातूनच मला समजत गेलं की फॅ शनशोमधील कपडे असे असतात. हे सगळं बघताना, अभ्यासतानाच हळूहळू हे मनात पक्कं होत गेलं होतं की हे आपल्याला जमणारं आहे. मात्र या क्षेत्रात येण्यासाठी म्हणून त्याचं रीतसर शिक्षण घ्यायचं तर त्याला बराच उशीर झाला होता. कारण तोपर्यंत माझं पदवी शिक्षण पूर्ण होत आलं होतं, असं विक्रम सांगतो.

अर्थात, जे आवडतंय आणि जमतंय ते क्षेत्र सोडायचं नाही ही जिद्दही त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा करून बघायचं आणि शिकायचं हा फंडा वापरायचं त्याने ठरवलं. मी सुरुवातीला ८ ते १० कपडे डिझाइन केले. त्यासाठी मी स्वत:च कापड निवडलं. डिझाइन केलं आणि वांद्रे येथील एका टेलरकडून ते कपडे शिवून घेतले. मग ते कपडे मी बहिणींना, मैत्रिणींना दाखवले. त्यानंतर मी त्याच पद्धतीने घरीच ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. थोडा जम बसल्यावर मी घरी मशीनही घेतली, असे विक्रमने सांगितलं.

फॅशनस्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेण्याइतका पुरेसा वेळ नसल्यामुळे विक्रमने ट्रायल आणि एरर तत्त्वावरच शिकत-शिकत पुढे जायचं ठरवून टाकलं होतं. मला ही जी कला समजली होती ती खूप आवडायला लागली होती, असं तो म्हणतो. घरातून सुरू केलेला हा व्यवसाय मग फॅ शन शो, बॉलीवूडपट असा विस्तारतच गेला.फॅ शन डिझायनर म्हणून झालेल्या इतक्या वर्षांच्या प्रवासादरम्यान अनेक चढउतार आले आहेत. हे प्रसंग विसरता येणारे नाहीत. अनेक आठवणीही अशा आहेत ज्या अजून ताज्या असल्यासारख्या मनात घर करून आहेत, असं तो म्हणतो. आठवणींच्या पोतडीतून एक किस्सा त्याने सांगितला. छोटय़ा चणीचा, नाजूकसा हा फॅ शन डिझायनर बॉलीवूडमध्ये भलताच प्रसिद्ध झाला. त्याने जवळपास सगळ्याच आघाडीच्या सुपरस्टार्सबरोबर काम केलं आहे. मात्र एका कलाकाराबरोबर पहिल्यांदा काम करण्याचा क्षण त्याच्या मनात कायम कोरला गेला, असं तो म्हणतो.‘ज्या दिवशी मी सलमान खानबरोबर पहिल्यांदा काम केलं तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. मी १७ वर्ष सलग त्याच्याबरोबर काम केलं आहे. मी जेव्हा सलमानबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा मला खरंच वाटलं की आता माझी लाइफ सेट झाली आहे. माझ्या कामात एक स्थैर्य आलं आहे. एक सुरक्षिततेची भावना माझ्या मनाला सुखावून गेली. सलमान खान यांनी मला कामासाठी निवडणं हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता,’ अशा शब्दांत विक्रमने आपली भावना व्यक्त केली. आणि कुठल्याही फॅ शन डिझायनरसाठी ही सुरक्षिततेची, स्थैर्याची भावना इतरांप्रमाणेच किती महत्त्वाची असते हेही त्याने आपल्या अनुभवावरून सांगितलं.

सध्या फॅशन डिझायनर विक्रम फडणीस एका नव्या भूमिकेतून लोकांना पुन्हा परिचयाचा झाला आहे.‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटातून त्याने दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली. आता त्याचा ‘स्माइल प्लीज’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ‘डिझायनर असल्यामुळे ऑर्गनाइझ करणं, असणं हा गुण आधीच आमच्यात असतो. हाच गुण दिग्दर्शन करताना कामी येतो, असं तो सांगतो. अनेक नवीन मुलं सध्या डिझायनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवू पाहात आहेत. त्यांना हे क्षेत्र बाहेरून खूप ग्लॅमरस वाटतं. पण तसं ते अजिबात नाही, असं विक्रम स्पष्ट करतो. ग्लॅमरस म्हणून या क्षेत्रात येण्याची चूक कधीच करू नका, असं विक्रम ठामपणे सांगतो. फक्त भरघोस पैसा आणि प्रसिद्धी मिळते म्हणून या क्षेत्रात येण्याला अर्थ नाही. तुम्हाला या क्षेत्रात उभं राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, हेही तो बजावून सांगतो. फॅ शन डिझायनर म्हणून प्रत्येक डिझायनरचा त्यांच्या कामामधील काहीतरी आवडता भाग नक्कीच असतो. फॅ शन डिझायनिंग क्षेत्रात काम केल्यामुळे सगळं जग तुम्हाला धुंडाळता येतं. जगभरातलं नवं शोधता येतं.अवकाशात भरारी घेण्याची संधी देणारं म्हणून हे फॅ शन डिझायनिंगचं क्षेत्र आपल्याला जास्त भावतं, असं तो मोकळेपणाने सांगतो.

viva@expressindia.com