गिर्यारोहणासारख्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागणाऱ्या क्षेत्रात मुलींची संख्या मर्यादितच आहे, असं अनेक वेळा ऐकायला मिळतं. येत्या वीकएण्डला मुंबईत होणाऱ्या १५ व्या गिरिमित्र संमेलनाची ‘महिला आणि गिर्यारोहण’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संमेलनाच्या आयोजनात सहभागी असणाऱ्या तरुण मुलींशी बोलून गिर्यारोहणात मुलींचा सहभाग कसा आहे आणि त्यातील अडचणी काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न..

एखाद्या पावसाळी हाईकला मुलांइतकीच मुलींची संख्या, पण तेच रॉक क्लाईंबिंगमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच मुली, तर दुसरीकडे हिमालयातील आरोहणामध्ये सारं लक्ष एव्हरेस्टवर. महिलांचा गिर्यारोहणातील सहभाग नेमका आहे तरी कसा आणि काय, त्यात नेमक्या अडचणी काय आहेत? गिर्यारोहणाची वाट महिलांसाठी बिकट आहे की वहिवाट आहे, असा प्रश्न हमखास पडतोच. गिर्यारोहणासारख्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागणाऱ्या क्षेत्रात महिलांची संख्या मर्यादितच आहे असं देखील अनेक वेळा ऐकायला मिळतं. अर्थात या प्रश्नांची उत्तर शोधताना सुरुवातीस थोडंसं इतिहासातदेखील डोकवावं लागेल.
हौस, छंद आणि नंतर एक क्रीडा प्रकार म्हणून गिर्यारोहणाची सुरुवात आपल्याकडे झाली ती १९५५ पासून. महाराष्ट्रात ५५ ते ७० च्या काळात क्लाईंबर्स क्लब आणि युनिव्हर्सिटी हायकर्स आणि माऊंटेनिअर्ससारख्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलींची डोंगराशी मैत्री झाली. म्हणजेच मुलांच्या बरोबरीनेच मुलींचा वावर अगदी सुरुवातीपासूनच होता. ८० नंतरच्या काळात अनेक संस्थांमध्येदेखील मुलींची संख्या लक्षणीय होती. १९८५ साली तर केवळ महिलांसाठीच डोंगरभटकंतीचे आयोजन करणारी लेडीज माऊंटेनिअिरंग क्लबसारखी संस्था सुरू झाली होती. आज गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थामध्ये केवळ मुलींच्याच विशेष तुकडीला प्रचंड प्रतिसाद आहे. युथ होस्टेलच्या नॅशनल ट्रेकिंग प्रोग्रामला मुलींची संख्या लक्षणीय असते. एखाद्या पावसाळी हाईकला मुलांइतकीच मुलींची संख्या असणं हे तेव्हापण नावीन्य नव्हतं आणि आजदेखील नाही. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांत मुलींचं आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होणं हेदेखील त्यांना या क्षेत्रात स्वत:च निर्णय घेऊन सहभागी होण्यास उद्युक्त करत आहे.
गिरिमित्र संमेलनाच्या ‘महिला आणि गिर्यारोहण’ या मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरून या साऱ्या नव्या-जुन्याचा आढावा घेतला जाणार आहे. जुन्यांचा सन्मान आणि नव्यांना प्रोत्साहन मिळावं हा संमेलनाचा हेतू आहे. मात्र त्यातूनच एक प्रकारचं सिंहावलोकनदेखील अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने संमेलनातील आयोजक मुलींशी संवाद साधल्यावर आज नेमका मुलीचा सहभाग कसा आहे आणि त्यातील अडचणी काय हे थोडंसं स्पष्ट होतं.
सह्य़ाद्रीतल्या डोंगरभटकंतीला पावसाळ्यातील ट्रेकला जशी मुलींची संख्या भरपूर असते, तशी नंतर हिवाळ्यात अथवा मोठय़ा ट्रेकला ही संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीदेखील नसते. तीन-चार दिवस स्वत:चं सामान पाठीवर वाहून नेण्याची अनेक मुलींची तयारी नसते असं प्रीती पटेल सांगते. त्याचबरोबर पावसाळी भटकंतीत अनेक वेळा जोडीदार शोधणाऱ्यांचं प्रमाणदेखील बरंच वाढल्याचं ती नमूद करते.
मुलींमध्ये डोंगरभटकंतीचं सातत्य टिकून राहण्यामागे अनेक मुद्दे आहेत. त्याबद्दल स्वप्नाली धाबुगडे सांगते की, लग्न हा एक अडथऴा असला तरी केवळ तोच एकमेव अडथळा नाही. त्याचबरोबर मुलींचं ग्रुिमग कसं होतंय हेदेखील महत्त्वाचं आहे. लग्नानंतर जोडीदार हे सारं कसं स्वीकारतो हा त्यानंतरचा प्रश्न असल्याचं स्वप्नाली धाबुगडे सांगते. अनेक वेळा पालक मुलींना मोठय़ा ट्रेकला पाठवायला तयार होत नाहीत, असं ती नमूद करते.
घरून स्वातंत्र्य असेल तर लग्नानंतरदेखील डोंगरभटकंती सुरू राहते. ट्रेकर जोडीदार असेल तर त्याला आणखीनच गती मिळू शकते. पण जोडीदार ट्रेकर असून देखील अनेक मैत्रिणी ट्रेकपासून दुरावल्याचं दीपाली भोसले सांगते. जोडीदार ट्रेकर असल्यामुळे ट्रेकला जरी जाता येत असलं तरी घरातील नेहमीच्या जबाबदाऱ्यांबरोबरच ट्रेकच्या तयारीत आणि ट्रेकहून आल्यानंतर ट्रेकसंबधित घरची कामं मुलीलाच करावी लागतात (अगदी ट्रेकचे कपडे धुण्यासारखं साधं काम देखील जोडीदाराकडून होत नाही.) मग अशा वेळी भटकंतीपासून लांब राहणं पसंत करणाऱ्या मुलींची उदाहरणं अनेक पाहिली आहेत, असंही दीपाली सांगते.
मोठय़ा संख्येन हाइकला अथवा ट्रेकला येणाऱ्या मुली बहुतांशपणे ट्रेकिंगवरच थांबतात. पण रॉक क्लाईंबिगमध्ये तुलनेने त्या कमीच येत असल्याचं पल्लवी वर्तक नमूद करते. आवड, शारीरिक क्षमता हे मुद्दे असतीलच. पण हे प्रमाण कमी आहे. मात्र रॉक क्लाईंबिंग आणि माऊंटेनिअिरगमध्ये इतर ट्रेकसारखी जत्रा नसते आणि ही अ‍ॅक्टिव्हिटी कौशल्यपूर्ण ग्रुपबरोबरच होते. अशा अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये ट्रेकमध्ये अनुभवास लागणारे सामाजिक सुरक्षेचे व अन्य अनुभव फारसे फेस करावे लागत नाहीत असे ती सांगते.
आजच्या पिढीतील स्वप्नाली सांगते की, हल्लीच्या मुली स्वतंत्र तर आहेतच, पण त्यांना छंद जोपासण्याचे आणि आनंद मिळवण्यासाठीचे मॉल, पिकनिकसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात सर्वत्रच हे चित्र दिसत नाही. कारण चार भिंतींबाहेरच्या जगाची ओढ लागलेल्या मुली डोंगरभटकंतीनंतर जंगलभ्रमंती, पर्यटन असे अनेक पर्याय हाताळताना पाहायला मिळतात असे प्रीती पटेल सांगते. तुलनेनं कमी शारीरिक श्रमात निसर्गाचा, आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीचा आनंद त्यांना मिळत असावा असे यावरून म्हणता येईल. मात्र अशा वेळी गिर्यारोहण ही त्यांची जीवनशैली होत नाही.
तरीदेखील करिअर म्हणून आऊट डोअर इंन्स्ट्रक्टर आणि कृत्रिम प्रस्तर भिंतीवरील आरोहणाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी प्रगती होताना दिसत आहे. गिर्यारोहणाबरोबरच या क्षेत्रात कार्यरत असलेली ईशानी सावंत सांगते, ‘‘मुलींना एक करिअर म्हणून या क्षेत्रातदेखील स्कोप आहे. देशात अनेक मुली अ‍ॅडव्हेंचर कंपनी चालवत आहेत. पण त्यासाठी प्रचंड स्ट्रगल आहे. एक मुलगी इन्स्ट्रक्टर म्हणून आपल्याला काम करायला सांगते याबद्दल सुरुवातीला तर पुरुष सहकारी साशंकच असतात. एक मुलगी लीड करतेय हा माइंडसेट अजून नाही. त्यासाठी तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. दुसरं असं की आजही एक करिअर म्हणून या क्षेत्राकडे पाहण्याची समाजाची दृष्टी नाही. तुलनेनं परदेशात मुलींना सुविधा, साधनसामग्री आणि प्रोत्साहन मिळत असतं.’’ त्याचबरोबर या क्षेत्रात हाय लेव्हल फिटनेस गरजेचा आहे. त्याबाबतीत कसलीच तडजोड चालत नाही असेही ती नमूद करते.
हाईकिंग ट्रेकिंगमधील वाढती संख्या, प्रस्तरारोहणातील अगदीच मर्यादित संख्या आणि दुसरीकडे एव्हरेस्टवर मात्र मुलींची वाढती संख्या असं आताचं काहीसं चित्र आहे. ह्य़ाबद्दल ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे सांगतात की, महिला किंवा पुरुष असा भेद न करता विचार केला तर एंकदरीतच कष्ट नकोत ही दृष्टी आहे. मुलींच्या बाबतीत गिर्यारोहणाचा विचार करता एव्हरेस्टचं वलय वाढलं आहे आणि आरोहणाच्या अडचणी कमी झाल्यामुळे तुलनेनं सोप्प झालं आहे. त्यामुळे हा ओढा अधिक आहे. पण एव्हरेस्ट झालं की बस्स असा विचार बळावतोय.
सद्य:स्थितीत महिला आणि गिर्यारोहण या विषयाचा विचार करताना ही परिस्थिती जाणवते. आज महिला असोत की पुरुष, ट्रेकिंगच्या तुलनेत एकंदरीतच रॉक क्लाईंबिंग आणि माऊंटेनिअिरगकडे वळणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यातच आपल्याकडील गिर्यारोहणाचा प्रसार झाला तो संस्थात्मक पातळीवर अधिक. पूर्वीसारख्या संस्थादेखील तुलनेनं कमी झाल्या आहेत. त्याचादेखील परिणाम एकूणच या पुढच्या वाटचालीवर जाणवतोय. त्यामुळे महिलांचा टक्का कमी की अधिक अशा विषयांवर चर्चा करण्यात तसा अर्थ नाही. कारण हा खेळ निसर्गाच्या प्रांगणातील आहे. तेथे आव्हानं दोघांसाठी सारखीच असतात. ती आपण कशी आणि कशासाठी स्वीकारतोय हे महत्त्वाचं.
थोडक्यात काय, तर महिलांसाठी गिर्यारोहणाची वाट बिकट की वहिवाट याची चर्चा सुरूच राहील. पण यात फारसं न पडता प्रत्येकीने तिच्यामध्ये दडलेली ही ‘मी’ शोधायचा प्रयत्न करायला हवा. त्यात तिचा वैयक्तिक फायदा आहेच, पण तिच्या या ‘मी’च्या शोधामुळे कुटुंबातील प्रत्येकात दडलेला ‘मी’ व्यक्त होऊ शकेल आणि सामाजिक जडणघडणीच्या दृष्टीने हे अधिक मोलाचं असेल.
डोंगरात जायचं कशासाठी?
डोंगरात जायचंच कशाला, आनंदासाठी की शारीरिक तंदुरुस्तीसाठी, की केवळ आवड म्हणून, की चार दिवसांचा ब्रेक म्हणून. ही बिकट वाट कशासाठी चोखाळायची, हे आजच्या पिढीतल्या मुलींकडूनच जाणून घ्यावं लागेल. त्याबाबत स्वप्नाली धाबुगडेचं उत्तर हे प्रातिनिधिक असचं म्हणावं लागेल. ती सांगते की, डोंगरभटकंतीत आनंद आहेच, त्यातून आत्मविश्वास वगैरे मिळतोच, पण अशा भटकंतीत मला माझ्यातली ‘मी’ सापडते. जी इतर वेळी असंख्य टू डू लिस्टच्या मागे धावत हरवलेली असते. तेव्हा डोंगरभटकंती हे माझं व्यक्त होण्याचं साधन वाटतं. म्हणूनच माझ्यातली ‘मी’ मला खुणावत राहते. खरं तर ट्रेकिंग ही त्या दडलेल्या ‘मी’ साठी असते.
‘एव्हरेस्टपुरता विचार धोकादायक’
गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील मुलींच्या सहभागाबद्दल नेमकं भाष्य करताना ज्येष्ठ गिर्यारोहक
उष:प्रभा पागे सांगतात की, बायका किंवा पुरुष असा भेद न करता विचार केला तर एंकदरीतच कष्ट नकोत ही दृष्टी आहे. मुलींच्या बाबतीत गिर्यारोहणाचा विचार करता एव्हरेस्टचं वलय वाढलं आहे आणि आरोहणाच्या अडचणी कमी झाल्यामुळे तुलनेनं सोप्प झालं आहे. त्यामुळे हा ओढा अधिक आहे. पण एव्हरेस्ट झालं की बस्स असा विचार बळावतोय. तो बळावू नये याकडे लक्ष द्यावं लागेल. दुसरीकडे हल्ली कमी वयात या क्षेत्राची ओळख मुलींना होत आहे. आणि दुसरीकडे लग्नाचं वय वाढलेलं आहे. अशावेळेस तिशी गाठेपर्यंत पाच-दहा वर्षांचा कालावधी त्यांच्या हातात असतो. गिर्यारोहण क्षेत्रातील मुलींना या काळात बरंच काही करता येण्यासारखं आहे, त्याचा योग्य वापर व्हायला हवा असं त्या सांगतात.

kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार

स्वच्छतेचे बेसिक्स
म्डोंगरभटकंतीत मुलींना येणाऱ्या अडचणींमध्ये स्वच्छतागृहांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचं प्रीती पटेल सांगते. खरे तर महिलांच्या बाबतीत शहरांमध्येदेखील ह्य़ाबद्दल असुविधाच आहेत. त्यातच डोंगरात तर होल वावर इज अवर अशीच अवस्था असते. अशा ठिकाणी स्वच्छतागृहासारखी सुविधा असावी असं कधी आपल्या शासनाला वाटलंच नाही. आणि वाटलंच तर पुरातत्त्व खात्याच्या असंख्य नियमांचा बागुलबुवा वाट अडवून उभा असतोच. मग एखाद्या ट्रेकला ठिकाणी कसलाच आडोसा नसेल तर मुलींनी रात्रीची वाट पाहायची का, असा थेट सवाल प्रीती पटेल विचारते. गिर्यारोहणाला नियमांच्या चौकटीत बांधणाऱ्या आपल्या शासनाला इतकी साधी मूलभूत गोष्ट तरी कळायला हवी अशी सर्व मुलींची अपेक्षा आहे.

सामाजिक सुरक्षेची वानवा
महिलांचा सहभाग वाढण्यासाठी आणि तो टिकून राहण्यातील अडथळे अनेक असले तरी सर्वच मुलींना आज सामाजिक सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. पालकांना वाटणारी डोंगरातील अपघाताची भीती तर आहेच, पण त्याचबरोबर बदलत्या सामाजिक दृष्टिकोनामुळे वाटणाऱ्या असुरक्षिततेवर मुली नेमकं बोट ठेवताना दिसतात. अगदी त्यांच्या संख्ये एवढीच मुलं जरी ग्रुपमध्ये असली तरी अनेक वेळा टोमणे आणि विचित्र नजरा पाठराखण सहन करावी लागण्याचे प्रसंग येत असतात. हा त्रास केवळ डोंगरात अथवा पायथ्याच्या गावातच नाही तर अगदी शहरातील वाहतुकीपासून सर्वत्र जाणवत असतो. डोंगरपायथ्याच्या गावांना जरी आता ह्य़ा भटक्यांची सवय झालेली असली तरीदेखील, अनेक ठिकाणी मुलींकडे पाहण्याची दृष्टी बदललेली नसल्याचं दिपाली भोसले सांगते. हल्ली अनेक मुली गिर्यारोहणाचं प्रशिक्षण पूर्ण करतात. त्यामुळे डोंगरातील सुरक्षेबाबत त्या सजग असतात, तरीदेखील केवळ चार-पाच मुली मुलीच एकत्र येऊन एखाद्या ट्रेकला जाताहेत हे चित्र आज तरी आपल्याकडे दिसत नाही. तुलनेनं ८०च्या दशकात अशी उदाहरणं बरीच ऐकायला मिळतात. पण आज हे अशक्यच असल्याचं अनेक जणींना वाटते. यामागे सामाजिक सुरक्षेचेच कारण आहे.
औरंगाबाद परिसरातील डोंगरात भटकताना तेथील गावातील मुलांचा (सोकॉल्ड सामाजिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा) दीपाली भोसलेला आलेला अनुभव याबद्दल खूप काही सांगून जातो. चार मुली आणि पाच मुलांच्या ग्रुपचा हा ट्रेक होता. पायथ्यालाच मुलांचा ग्रुप पुढे गेला. मुली फोटो काढत असताना गावातील मुलांचा ग्रुप ज्या पद्धतीने शेरेबाजी करत होता, त्यामुळे आम्हा सर्वच मुलींना अवघडल्यासारखं वाटल्याचं ती सांगते. आमची फोटोग्राफी सुरू असताना एकाने चोरून आमचा फोटो काढायचादेखील प्रयत्न केल्याचे ती सांगते. अशा अनेक छोटय़ा मोठय़ा घटना पाहता, डोंगरातील सुरक्षेबरोबरच ही सामाजिक सुरक्षादेखील तितकीच महत्त्वाची ठरते.
डोंगर भटकंतीचं बाळकडू घरुनच मिळाल. ट्रेकिंगला गेल्यावर थेट निसर्गाशी कनेक्ट होतो. डोंगरांनी मला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवले. कमीत कमी साधनांमध्ये जगायला शिकले. शहरी चोचल्यांना, सुख-सुविधांना तेथे स्थान नसते. अर्थातच या सर्वाचा उपयोग माझ्या करिअरमध्ये प्रत्येक क्षणी होत असतो. आता मालिकेच्या टाइट शेडय़ुलमधून ट्रेकिंगला वेळ मिळत नाही; पण जुलैमध्ये पावसाळी ट्रेकला मात्र नक्की जाणार..
– ऋतुजा बागवे, अभिनेत्री