आपल्या हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो असं म्हणतात. जिभेला रुचकर पदार्थाची चव लाभली आणि पोट भरले की मन कसं तृप्त होतं. आपल्याला हव्या त्या रेस्टॉरंटमधून आपल्याला हवा असणारा पदार्थ काही क्लिकवर घरपोच आपल्याकडे आला तर?. हो फूड ऑर्डरिंग अ‍ॅपमुळे हे शक्य आहे. टायनी आउल या फूड-शेअरिंग अ‍ॅपची संकल्पना आहे आयआयटीतील तरुणांची.. हर्षवर्धन मंदड, गौरव चौधरी, तनुज खंडेलवाल, शिखर पालीवाल, सौरभ गोयल या पाच मित्रांची! हे पाच तरुण या स्टार्टअपचा कार्यभाग सांभाळतात.

जोधपूरचा गौरव चौधरी या २३ वर्षीय तरुणाने आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केलं आहे. या शिक्षणादरम्यान त्याला अमेरिकेत एका कंपनीत चांगल्या नोकरीची संधी चालून आली होती. पण ती नाकारत त्याने स्टार्टअपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ‘मला मुंबईतच काम करायचं होतं. त्यातच मला इथे चांगली टीम मिळाली. आयआयटी मुंबईत राहिल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम सोडवण्याची सवय झाली आहे. मी टय़ुशन घ्यायचो. त्यामुळे पैशांचा असा काही प्रश्न नव्हता. पण चाकोरीबद्ध नोकरीपेक्षा मनासारखं काम करायला मिळेल म्हणून मी हा पर्याय निवडला’, असं गौरव सांगतो.

टायनी आउल हे पहिलं मोबाईल फूड डिलिव्हरी अ‍ॅप असल्याचा त्याचा दावा आहे. आपल्या जवळपास कुठे उत्तम पदार्थ घरपोच मिळतील, काही वेळा ठरावीक पारंपरिक पदार्थ कुठे मिळतील या सगळ्याचा शोध या अ‍ॅपने घेता येतो. सध्या मुंबई, पुणे, बंगळूरू, गुरगाव, हैदराबाद या शहरांमध्ये टायनी आउलची सेवा सुरू आहे.

vv04मुंबईतल्या हजारहून जास्त रेस्टॉरंटशी आम्ही टायअप केलंय. त्यातून आमच्या ग्राहकांना उत्तम पदार्थ देण्याचा प्रयत्न करत आहोत.
– गौरव चौधरी
viva.loksatta@gmail.com