मुलींवर इम्प्रेशन पडतं म्हणून हिरोसारखी दाढी वाढवणारी मुलं आहेत, तसं गर्लफ्रेंडसाठी क्लीन शेव्ह लुक ठेवणारीही आहेत. लडकी पटाने के लिये कुणी चष्मा लावतं तर कुणी ट्रेण्डी हेअरस्टाइल.. मुलींना नेमकं काय आवडतं? नाव, स्वभाव, कपडे, उंची, रंग..की आणखी काही? काय अपेक्षा असतात नेमक्या?
एकसली मस्त स्माइल आहे ना त्याची.. कॅफेत बसून समोर लावलेल्या होर्डिगकडे बघून नेहाने कमेंट दिली. तिचं होतं न होतं तेवढय़ात ‘बावळट आहेस का? चक्क फावडा आहे अगं तो मुलगा! तुला ना काहीही आवडतं.’ असं एका दमात ऋतुजा वैतागून बोलली. त्यांची तिथेच खडाजंगी सुरू झाली. पण खरंच एखादीला एखाद्यातलं काय आवडेल याचा काही नेम नाही. त्यातही मुलींना मुलांमधलं काय आवडतं हा तर अनेक ठिकाणी संशोधनाचा विषय बनून राहिलाय! म्हणजे एरव्ही कट्टय़ावरच्या चर्चा ऊर्फ गॉसिपिंग किंवा व्हॉट्सअॅप गर्ल स्पेशल ग्रुप्स या पलीकडे जाऊन मानसशास्त्रातदेखील यावर अनेक संशोधनं झाली आहेत.
vv07एखादीला अगदी सिक्स पॅक्स-बायसेप्स वाला जॉन अब्राहम, सलमान खान आवडतो तर एखादीला जरासा खेडवळ भासणारा धनुष आवडतो. कोणाला गोऱ्या रंगाची क्रेझ तर कोणी टिपिकल टॉल-डार्क-हँड्समच्या डेफिनेशनमध्ये अडकलंय. बिअर्ड किंवा केसांचे ट्रेंडसुद्धा आता बदललेत
बरं का! म्हणजे अगदी ‘इफ यु ग्रो बिअर्ड देन ओन्ली आय विल कन्सिडर’ असं जोडीदाराच्या अपेक्षेमध्ये सांगायला मुली कचरत नाहीत. क्लीन शेव्ह हा क्रायटेरिया अजून कालबाह्य़ झाला नसला तरी खुरटी किंवा ट्रीम केलेली दाढी ठेवणारी मुलं ही ‘हॉट फेव्हरेट’ आहेत. केस वाढवून पोनी वगैरे बांधणारी मुलं ही एकतर आर्टिस्टअसतात किंवा मवाली समजली जातात. त्यामुळे मोठे केस ठेवणाऱ्या मुलांबद्दल अजूनही प्रिज्युडायसेस आहेत!
काही वर्षांपूर्वी चष्मा हा लग्नातला अडसर समजला जायचा पण हल्ली ‘स्पेक्ट्स’ असं मुलींना खूप ट्रेंडी किंवा कुल वगैरे वाटतात. (निव्वळ आपल्या गर्लफ्रेंडला आवडतो म्हणून झीरो नंबरचा स्पेक्ट्स घालणारी मुलं काही कमी नाहीयेत!). पुन्हा तो टी-शर्ट घालतो की, फॉर्मल्स की अजून काही यावर, पण बरीच मतं ठरतात.
टी-शर्ट-जीन्स असा कूल पेहराव करणारी मुलं शक्यतो आवडतात. पण एखादी मुलगी जर वर्क ओरिएंटेड-प्रोफेशनल असली तर तिचा चॉइस फॉर्मल वेअर+डिसेंट चष्म्याची फ्रेम असेल एवढं मात्र नक्की!
मुलांची नावं आणि आडनावं हासुद्धा बऱ्याच मुलींचा कन्सर्न असू शकतो. अहो, पांडुरंग नाव असलेल्या मुलाचं नावामुळे चक्क २ वर्ष लग्न जमत नव्हतं! मुलांच्या चालण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती किंवा सवयी किंवा अगदी तो गिअरवाली गाडी चालवतो कि नॉन गिअरवाली गाडी यावरही आवडीनिवडी ठरू शकतात. एका मैत्रिणीने एका मुलाला केवळ तो डोसा काटे चमच्याने खातो म्हणून नकार दिलाय आणि यावर ‘अगं, डोसा कोणी चमच्याने खातं का? किती अति असेल म्हणजे तो मुलगा!’, असं निव्वळ इरॅशनल स्पष्टीकरण दिलं!
आता यामध्ये नमूद केलेले काही मुद्दे अगदीच हास्यास्पद वाटू शकतात, पण त्यामागे कम्फर्ट झोन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकी
कितीही काहीही असलं तरी आजही कोणत्याही नात्यामध्ये मुली ट्रस्टवर्दीनेस किंवा ज्याच्याबरोबर आपण सगळं शेअर करू किंवा जो आपलं बोलणं शांतपणे ऐकून घेईल समजून घेईल असा पार्टनर शोधतात! त्यामुळे  गाइज चिल जस्ट बी युअरसेल्फ! कोणाला तुम्ही कसे आवडाल याचा काही नेम नाही!
भक्ती तांबे  –  viva.loksatta@gmail.com

वेगळी नाती वेगळ्या अपेक्षा
साधारणपणे एखाद्या मुलाला जवळपास सगळ्याच गोष्टी एका मुलीत हव्या असतात. मुलींचं मात्र तसं नसतं. त्यांच्या मित्र किंवा नवरा अशा वेगवेगळ्या नात्यांसाठी काही वेगळ्या अपेक्षा असतात. यामध्ये इमोशनल स्टॅबिलिटी, तिच्या भावनांना समजून घेणारा, कमिटमेंटची खात्री देणारा, टॉलरंट, ज्याच्यासोबत ती कम्फर्टेबल असेल, सगळं शेअर करू शकेल असा मुलगा शक्यतो हवा असतो. अर्थात प्रत्येकाच्या भावनिक गरजा वेगळ्या असतात. परंतु कमी-अधिक प्रमाणात हे मुद्दे सगळीकडे आढळतात. मुलांचे लुक्स किंवा दिसणं-असणं या गोष्टी पण बऱ्याचदा महत्त्वाच्या ठरू शकतात. पुन्हा हा वयाचा आणि आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असतो. एखाद्या १८ वर्षांच्या आणि २४ वर्षांच्या मुलीच्या आवडी या निश्चितपणे वेगळ्या असतात. पण शेवटी दोघींनाही तिला सांभाळून घेऊ  शकेल असाच मुलगा आवडतो!
– डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविश्लेषक.