अस्सल गाणारा श्रोत्यांची दाद येतेय का, याकडे लक्ष देत नाही. तसाच अस्सल खाणारा पानात पडणाऱ्या पदार्थामुळे वजन वगैरे वाढणार आहे का, याची तमा बाळगत नाही. पण मुलुंड पश्चिमेकडील ‘सायप्रस’ भागात असलेल्या ‘अचिजा’ नावाच्या रेस्तराँमध्ये खाबू मोशायने खाल्लेल्या पदार्थामध्ये इतकं चीज टाकलं होतं की, काही वेळासाठी खाबू मोशायला वजन काटा दिसायला लागला होता..
खाबू मोशायला लहानपणापासूनच दुधाचं वावडं! म्हणजे लहानपणी सक्तीचं दूध प्यायला लागतं, त्याच्यानंतर खाबू मोशाय कधी स्वत:हून दुधाच्या वाटय़ाला (किंवा वाटीलाही म्हणा, हवं तर) गेल्याचं त्याच्या तरी स्मरणात नाही. खाबू मोशायला दुधाची शिसारी एवढी की, तो दुधाची तहान ताकावर भागवण्यात समाधान मानतो. पण दुग्धजन्य पदार्थाबाबत त्याला तेवढाच पराकोटीचा ‘जिव्हा’ळा आहे. दुधापासून बनलेले दही एवढय़ा मूलभूत पदार्थापासून ताक, लोणी, तूप, चीज, मिल्कमेड अशा सगळ्या पदार्थावर खाबू मोशाय आडवा हात मारतो. पण मुलुंड पश्चिमेकडील सायप्रस या भागातील ‘अचिजा’ नावाच्या ठिकाणी खाबू मोशाय गेला आणि त्या हॉटेलमधील चीजच्या पदार्थामध्ये टाकलेल्या चीजचं प्रमाण पाहून हडबडला.
गेल्या काही वर्षांमध्ये मुलुंडचा चेहरामोहरा प्रचंड बदलला आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गाला लागून असलेल्या अनेक मिल्स बंद पडल्या आणि या मिल्सच्या ओसाड जमिनींवर मोठमोठे कॉम्प्लेक्स, मॉल्स टेचात उभे राहिले. याच प्रक्रियेत मुलुंड पश्चिमेकडे ‘सायप्रस’ नावाचा एक भाग विकसित झाला. गुर्जर समाजाची वस्ती असलेल्या या भागात निशाजीवन खूपच छान असतं. याच निशाजीवनाचा भाग म्हणजे येथील अचिजा हॉटेल. हे हॉटेल रात्री साधारण एक वाजेपर्यंत सुरू असतं. हादेखील खाबू मोशाय आणि या हॉटेलला जोडणारा दुवा म्हणावं लागेल.
या हॉटेलमध्ये खाबू मोशायने चीज पाव सँडविच नावाचा अद्भुत पदार्थ खाल्ला. चीज टाकलेल्या मसाला पावासारखा दिसणारा हा पदार्थ अंतरंगात मात्र वेगळाच आहे. त्याचप्रमाणे ‘चीज गार्लिक ब्रेड रोल’ या पदार्थानेही खाबू मोशायला खूश केलं. वास्तविक आजकाल गार्लिक ब्रेड ही बाब काही नावीन्याची नाही. पण या गार्लिक ब्रेड रोलमध्ये चीज, त्यावर टाकलेला लसणीचा किस आणि मस्त अर्धा कडक आणि अर्धा नरम ब्रेड यांचं प्रमाण या हॉटेलमध्ये खूपच सुरेख होतं.
या दोन पदार्थानंतर खाबू मोशायच्या मनाचा ताबा ‘चीज शेजवान पिझ्झा’ या पदार्थाने घेतला. पिझ्झा ब्रेडवर शेजवान सॉसमधल्या मसाल्याची पखरण आणि वर भरभरून किसलेलं चीज, असा ऐवज काही काळ बेक करून तुमच्यापुढे आणून ठेवतात. नंतर समोर पावभाजी म्हणून आलेला प्रकार पाहून खाबू मोशाय खरंच गारद झाला. पावांबरोबर नुसतंच तरंगतं चीज दिलंय की काय, हे तपासण्यासाठी खाबू मोशायने चीजचा तो दाट पडदा बाजूला सारला आणि खाली खरंच भाजीही आहे, हे पाहून सुस्कारा सोडला. पण ही पावभाजी आहेदेखील चविष्ट! त्यानंतर आलेल्या चीज तवा पुलावचीही तीच गत! हे पदार्थ साधारण १२० ते १५० रुपयांच्या घरात आहेत. कच्छी भाषेत ‘अचिजा’ म्हणजे ‘पुन्हा या’! आपल्या मराठीत आपण निघताना ‘येतो’ म्हणतो त्यातलाच प्रकार! पण या हॉटेलच्या बाबतीत ‘अचिजा’ हे नाव पदार्थावर टाकलेल्या ‘चीज’च्या प्रमाणामुळे पडले की काय, कोण जाणे!
कसे जाल? – मुलुंड स्थानकात उतरून पश्चिमेला बाहेर आलात की, सरळ रिक्षा करा. रिक्षावाल्याला सायप्रस एरिया सांगा. तिथे आल्यानंतर आयसीआयसीआय बँकेसमोरच अचिजा आहे. एलबीएस मार्गावरून गाडी घेऊन येणार असाल तर मात्र ‘जीपीएस’ झिंदाबाद!
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2015 रोजी प्रकाशित
चिजी अचिजा!
अस्सल गाणारा श्रोत्यांची दाद येतेय का, याकडे लक्ष देत नाही. तसाच अस्सल खाणारा पानात पडणाऱ्या पदार्थामुळे वजन वगैरे वाढणार आहे का, याची तमा बाळगत नाही.
First published on: 03-04-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Achija veg restaurant in mulund west