बीइंग सिंगल

‘व्हॉट्स युअर रिलेशनशिप स्टेटस?’ असा प्रश्न सोशल नेटवर्किंग साइटस्टाइल प्रश्नावर ‘सिंगल’ असं उत्तर देणारी कॉलेजमधली मंडळी आजकाल विरळाच झाली.

‘व्हॉट्स युअर रिलेशनशिप स्टेटस?’ असा प्रश्न सोशल नेटवर्किंग साइटस्टाइल प्रश्नावर ‘सिंगल’ असं उत्तर देणारी कॉलेजमधली मंडळी आजकाल विरळाच झाली. रिलेशनशिप स्टेटस ‘सिंगल’ वरून ‘इन अ रिलेशनशिप’पर्यंत पोचवायला अनेकांची घाई असते. हे असं स्टेटस बदलणं फेसबुकइतकंच प्रत्यक्ष आयुष्यातही सहज झालंय हल्ली. प्रेमात पडणे याला ‘इन अ रिलेशनशिप’ने आता एक वेगळं स्टॅण्डर्ड दिलंय. प्रेम ही एक सुंदर भावना आहे हे खरं, पण ज्या मुलींच्या आयुष्यात हे प्रेम आणि ‘तो’ हक्काचा माणूस आहे त्यांची ‘बात ही कुछ और है’ असं होऊन जातं हल्ली. ‘सिंगल’ आहे म्हणजे ‘बस वो बात नहीं’ अशा निष्कर्षांपर्यंत थेट पोचतात.
सिंगल आहे म्हटल्यावर ‘ओल्ड फॅशनच आहे’, ‘अजून एकदाही प्रेमात पडली नाहीस? हे कसं शक्यय?’, ‘कुछ तो गडबड है’ असं बोलणं अथवा नजरेतलं प्रश्नचिन्ह, उंचावलेल्या भुवया, कटाक्ष खूप काही नकळतच बोलून जात असतात. नाहीतर एकदम ‘शोधू आपण तुझ्यासाठी एखादा’ असं बोलून सहानुभूती पदरात पडते.. न मागताच! तेव्हा म्हणावंसं वाटतं.. ‘चिल! राहावंसं वाटत असेल एखादीला सिंगल सिंगल म्हणजे एकटी नक्कीच नाही. सिंगल असूनही आनंदी राहणारेसुद्धा असतातच ना!’ अशा ‘सिंगल्स पार्टी’पकीच एक प्रियांका म्हणते, ‘आय अ‍ॅम हॅप्पी अ‍ॅज अ सिंगल! हे फ्रीडम मी खूप एन्जॉय करते. माझ्या खूप फ्रेंड्स रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचा तो एकमेकांबद्दलचा ओव्हर पझेसिव्हनेस बघून वाटतं की, आपण सगळ्यात सुखी आहोत. आणि जीवाला जीव देणारे फ्रेंड्स असताना बॉयफ्रेंडची काय गरज?’
सिंगल म्हणजे सतत फोन बिझी राहणार नाही, आई बाबांशी खोटं बोलणं नाही, रात्रभर चालणारं चॅटिंग नाही, भांडणं नाहीत, रागवणं नाही की समजावणं नाही. ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच्या ‘लास्ट सीन’चं एक्सप्लनेशन देण्याची गरजसुद्धा नाही, गिफ्ट काय द्यायचं हा प्रश्न नाही, कसली कटकट नाही आणि असं बरंच काही! एकूणच काय स्वत:ला हवं तसं स्वच्छंदी जगता येतं बॉयफ्रेंड नसल्यावर.
मात्र काही जणांना सिंगल असण्याची खंतसुद्धा असते बरं का! ‘आपल्यावर कोणी प्रेम करणारं नाही, मत्रिणींना बॉयफ्रेंड आहे आणि मला नाही, म्हणजे माझ्यातच काही कमी आहे, असं म्हणून वाईटही वाटतं. ‘प्रॉम नाइट’ला कोणासोबत जायचं ही मोठी गोचीच असते’, एक ‘सिंगल- रेडी टू मिंगल’ गटातली मैत्रीण म्हणाली. ‘व्हॅलेंटाइन डे’, ‘रोझ डे’ हे तर सिंगल असण्याची खंत करण्याचे हमखास दिवस वाटू लागतात. ‘कधी कधी बरं वाटतं- सिंगल आहे. कारण कसली भीती नाही, बंधन नाही. कोणाशी बोलताना विचार करावा लागत नाही; पण जेव्हा अचानक आनंद किंवा दु:ख होतं तेव्हा वाटतं की कोणीतरी ‘आपलं’ हवं हे सगळं शेअर करायला..’, अशी प्रांजळ कबुलीही एका मत्रिणीने दिली. ‘आमच्या ग्रुपमध्ये माझ्या सगळ्या मत्रिणींना बी.एफ. आहेत. त्यामुळे त्यांचं आपसात ‘लव्ही डव्ही सीन’पासून भांडणापर्यंत सगळ्याचं शेअरिंग चालतं. अशा वेळी माझ्याजवळ बोलण्यासारखं काहीच नसतं. गप्प बसून ऐकण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा वाटते खंत.. सिंगल असल्याची!’  
सिंगल असणं किंवा रिलेशनशिपमध्ये असणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी तळ्यात असणाऱ्याला मळ्यात उडी मारावीशी वाटणं तितकंच स्वाभाविक आहे, अर्थात या गोष्टीला काही अपवाद असतातच.
सिंगल विथ एक्सपिरिअन्स
रिलेशनशिप स्टेटस ‘सिंगल अगेन’ असं असेल तर उसके पीछे लंबी कहानी होती ही है! प्रत्येक ‘सिंगल अगेन’मागे एक ‘सॅड स्टोरी’ दडलेली असते असं म्हणतात. कारण सिंगल अगेन किंवा सिंगल विथ एक्सपिरिअन्स म्हणजे रिलेशनशिप तर आलीच आणि त्या मागोमाग ‘ब्रेकअप’ला सामोरं जाणंही आलंच.. त्यासोबत कडूगोड आठवणीसुद्धा! त्यामागची कारणं वेगळी असतील प्रत्येकीची. पण त्याच स्टेटसमध्ये किती काळ रमायचं ? की,त्या नात्यासारखंच ते सोडून द्यायचं.. हे ज्याने त्याने ठरवायला हवं. भूतकाळातल्या त्या गोष्टी इतरांना सांगून कोळशासारख्याच कितीही उगाळल्या तरी काळ्याच होत जाणार. त्यापेक्षा ‘लेट इट गो’ म्हणून ‘मूव्ह ऑन’ करणं केव्हाही चांगलंच. ‘सिंगल’ आणि ‘सिंगल अगेन’ यात तसा एका अनुभवाचा फरक म्हणायला हवा. पण पुढे भविष्यात एक सुंदर रिलेशनशिप करण्याची संधी नेहमीच ‘सिंगल’ असणारीला असते, हे लक्षात ठेवायला हवं!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Advantages and disadvanteges of remain being a single