विनय जोशी
‘मेरे को रूल्स पता है इसलिए आप रूल्स समझाने मत बैठना।’ ९-१० वर्षांचा मुलगा म्हणाला. त्याच्या वयाच्या दुसऱ्या मित्राला? छे! शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांना. तेसुद्धा ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर बसून. हा चिमुरडा पर्याय ऐकून घ्यायलाही तयार नव्हता. ‘मुझे ऑप्शन्स की जरूरत ही नहीं है’ – त्याचा (अति)आत्मविश्वास. पुढचा प्रश्न विचारायला क्षणभर उशीर झाल्यावर ‘आप अगला सवाल पूछो’ त्याची (अति)घाई. आणि मग याच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चुकीचं उत्तर तितक्याच ठामपणे देऊन हा बालबृहस्पती पाचव्या प्रश्नाला बाद झाला. हा व्हिडीओ या आठवड्यात सोशल मीडियावर चांगलाच गाजला. यावर पोस्टींचा रतीब पडला, मीम्स रचले गेले, तज्ज्ञांना बोलावून पॉडकास्ट्स पाडले गेले.

बऱ्याच नेटिझन्सनी त्याला उर्मट, अतिशहाणा ठरवलं. कोणी त्याच्या पालकांना संस्कारांचे दाखले देत ट्रोल केलं. अनेकांनी तर ही पिढीच अशी उद्धट म्हणून बोटं मोडून घेतली. पण अशा उतावीळपणे, काहीशा उर्मटपणे व्यक्त होणारा हा जगातला एकमेव मुलगा आहे का? ट्रोलिंगचा धुरळा खाली बसला आणि आपल्या सभोवताली पाहिलं तर सगळ्या वयाची अशी अनेक लहान मुलं नजरेस पडतील. तीन वर्षांच्या ईशाला सारखी नवीन खेळणी हवी असतात. जुनी खेळणी लगेच बोअर वाटू लागतात. दुसरीतला रेयांश त्याच्याशी मोठी माणसं बोलत असताना लक्षच देत नाही. आठ वर्षांच्या आदित्यला मैदानात जाऊन खेळायला आवडत नाही, इतर मुलांशी त्याला जुळवून घेता येत नाही. सहावीतल्या आर्यनला टीचर जे शिकवणार आहे ते त्याला आधीच माहिती असतं, त्यामुळे त्याला शाळा ‘स्लो’ आणि बोअर वाटते. अद्विका स्वतःची चूक कधी मान्यच करत नाही. बऱ्याच मुलांना सभोवताली काय घडतं आहे हे जाणण्यात काही रस नसतो. अनेकांना वाट पाहणं अजिबात आवडत नाही. सगळ्यांवरच असंस्कारी, उद्धट, लाडावलेली अशी लेबल लावायची का?गेली अनेक वर्षं शालेय विद्यार्थ्यांसोबत कार्य करणाऱ्या समुपदेशक तृप्ती मुळे म्हणतात, “हल्ली मुलांमध्ये उतावळेपणा, चंचलता आणि आक्रमकता यांचं प्रमाण वाढताना दिसतं आहे. बहुतांश मुलं लगेच व्यक्त होतात; त्यांना समोरच्याचं मत पूर्ण ऐकून घेणं अवघड जातं. काहींमध्ये स्वतःविषयी अतिआत्मविश्वास आढळतो. यालाच दुजोरा देत अनेक शिक्षक सांगतात की आजची मुलं शिक्षणकांविषयीचा आदर हरवत आहेत. ‘मुलं घरी ऐकत नाहीत, वाचन त्यांना कंटाळवाणं वाटतं, फारसे छंद नाहीत,’ असं पालकही वारंवार सांगताना दिसतात.

या बदलामागचं खरं कारण शोधायचं झालं तर गेल्या दोन दशकांतील डिजिटल क्रांती हे सर्वात मोठं कारण ठरतं. गेल्या १५-२० वर्षांत जग अक्षरशः झपाट्याने बदलून गेलं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल, स्वस्त आणि सहज उपलब्ध इंटरनेट, सोशल मीडियाचं वर्चस्व या सर्वांनी आपल्या जगण्याचं रूपच बदललं आहे. आणि या संपूर्णपणे डिजिटल वातावरणात जन्मलेली मुलं म्हणजेच जनरेशन अल्फा. २०१० ते २०२४ दरम्यान जन्मलेली ही पिढी खऱ्या अर्थाने डिजिटल नेटिव्ह आहे, मोबाइल आणि इंटरनेट तर यांच्यासाठी जणू पाचवीलाच पुजलेलं! आणि जानेवारी २०२५ पासून जन्माला येणारे आणि एआयची चोखणी चोखत मोठे होणारे जनरेशन बीटा हे यांच्यापुढचं व्हर्जन असणार आहेत. त्यामुळे या मुलांच्या वर्तनावर चर्चा करताना त्यांच्या लहानपणापासून डिजिटल माध्यमांचा त्यांच्यावर झालेला एकंदर परिणाम यावर विचार करणं अगत्याचं ठरतं.

सध्याच्या ० ते १० अशा वयोगटाच्या बालगोपाळांचा जन्मापासून जीवनपट डोळ्यासमोर आणला तर काय दिसेल? आई-बाबा यांच्यानंतर तिसरं तोंड बाळाने मोबाइलचं पाहिलेलं असतं, कारण अमेरिकेतल्या त्याच्या आत्याने व्हिडीओ कॉल केला असतो. काहींच्या तर पाळण्याच्या वर टांगलेल्या भिरभिऱ्यातही स्क्रीन असते. आपल्या पालकांच्या हातात सतत दिसणारा मोबाइल हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असतो हे बाळकडू त्यांना पाळण्यातच मिळतं. लवकरच बाळाच्या जीवनाचा तो भाग होतो. जेवण भरवायला ‘चिऊचा घास, काऊचा घास’ करायला वेळ कुणाकडे आहे? त्यापेक्षा मोबाइलवर व्हिडीओ लावून देणं सोपं आहे. बबड्याला भरवायचं आहे? बाळ रडतंय? द्या मोबाइल. लुडबुड करतोय, पसारा करतोय, काम करू देत नाहीये? त्याच्यासोबत खेळायला कोणी नाहीये कारणं अनेक; उपाय एकच मोबाइल!मुलांच्या आयुष्यात पालकांनी कळत नकळत केलेल्या अशा डिजिटल कृतींचे काही तात्कालिक आणि काही दूरगामी परिणाम होताना दिसतात. पालक मुलांना आवडतात म्हणून त्यांना कोकोमेलन किंवा बेबी शार्कसारखे व्हिडीओ दाखवतात. या व्हिडीओंमध्ये मुलांचं लक्ष पकडून ठेवण्यासाठी चटकदार रंग, शब्दांची सतत पुनरावृत्ती आणि दर १ ते ३ सेकंदांनी बदलणारी दृश्यं अशा विविध क्लृप्त्या वापरल्या जातात, पण यातून त्यांच्या मेंदूला सतत तीव्र दृश्य-श्राव्य उत्तेजन (stimulation) मिळत राहतं. मुलांच्या विकसित होत असलेल्या मेंदूसाठी हे जणू ‘अतिउत्तेजनाचं प्रशिक्षण’ (hyper-stimulation training) ठरतं. परिणामी उत्तेजन नसणारी साधी खेळणी, गोष्टी ऐकणं, बडबडगीत गाणं हे मुलांना कंटाळवाणं वाटू लागतं. नंतरच्या काळात वाचन, अभ्यास, हस्तकला, शांत खेळ अशा हळू आणि संयमी क्रिया त्यांना बोअर किंवा कठीण वाटू लागतात.

‘आमच्या छबूला फक्त जेवतानाच मोबाइल लागतो’, अनेक पालक असं कौतुकाने सांगताना दिसतात, पण हेच खरं तर सगळ्यात जास्त घातक आहे. बाळाचं लक्ष पूर्णपणे स्क्रीनकडे केंद्रित राहिल्याने भूक लागणं, तृप्तीची जाणीव होणं हे नैसर्गिक संकेत जाणवेनासे होतात. तसंच भविष्यात स्थूलता, अपचन, भावनिक खाणं (emotional eating) अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जेवताना मोबाइल पाहिल्याने अन्नाची चव, सुवास, रंग, स्पर्श या अनुभवांपासून मूल दूर जातं. अन्नाशी भावनिक नातं हळूहळू कमी होतं. तसेच पुढे शाळेत, प्रवासात स्क्रीनशिवाय जेवणं त्यांना कठीण वाटू शकतं.नाशिकच्या आनंद निकेतन शाळेतल्या बालवाडी विभागाच्या शिक्षिका मुक्ता पुराणिक याबाबत एक अनुभव सांगतात. ‘बालवाडीची बरीच मुलं जेवताना डब्याचं झाकण बाटलीला टेकून उभं करतात आणि त्याच्याकडे बघत जेवतात असं आमच्या लक्षात आलं. घरी मोबाइल बघत जेवायची मुलांना इतकी सवय होते की शाळेत स्क्रीन न मिळाल्याने मुलांनी असा उपाय केलेला असतो.’ जेवताना मोबाइल बघण्याचा मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज यायला हे उदाहरण बोलकं आहे.मानसशास्त्रज्ञ स्वाती चौगुले म्हणतात, मुलांच्या शारीरिक, भावनिक, भाषिक आणि सामाजिक विकासात बालपणीचा मोबाइलचा अतिरेकी वापर हा मोठा अडथळा ठरतो. वाढलेल्या स्क्रीनटाइममुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणं, उतावळेपणा, झोपेच्या तक्रारी आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव अशा वर्तनविषयक समस्या वाढताना दिसत आहेत, असं त्या नमूद करतात.सुरुवातीला पालकांनी त्यांची गरज म्हणून दिलेला मोबाइल पुढे मुलांसाठी त्यांच्या गरजेचा कधी होऊन जातो कळतही नाही. बोअर होतंय? – ऑनलाइन गेम खेळू, चित्र काढायचंय – गूगलवर पाहू, काही तरी क्राफ्ट करायचं आहे, शाळेचा प्रोजेक्ट काय करावा – यूट्यूब किंवा चॅटजीपीटीला विचारू. प्रत्येक प्रश्नासाठी मोबाइल हे उत्तर मुलांनी त्यांचंच शोधून काढलेलं असतं. परिणामी पालकांच्या जेवण भरवणं, गोष्टी सांगणं, सोबत खेळणं, मस्ती करणं अशा विविध कृतींतून मुलांसोबत होऊ शकणारा भावनिक बंध घट्ट होण्यात अडथळे येऊ शकतात.

फक्त मुलांच्या नाही तर घरातल्या इतर सदस्यांच्या डिजिटल कृतींचाही परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो. घरातल्या वातावरणातूनच मुलं शिकतात. घरात सगळ्यांचेच डोळे मोबाइलला चिटकलेले असतील तर मुलंही तेच शिकणार. चिमुरडा उत्साहाने काही दाखवत असेल, बोबड्या बोलात काही सांगत असेल आणि तेव्हा जर त्याच्या नजरेला नजर न देता पालक मोबाइलमध्ये बघत असतील तर समोरचा व्यक्ती बोलत असताना त्याला महत्त्व नाही दिलं तरी चालतं असं नकळत त्यांच्या मनावर आपणच बिंबवतो. त्यामुळे भविष्यात आमचा बबड्या आमच्याशी नीट बोलत नाही, कोणी पाहुणे आले की बाहेर येत नाही, अशा तक्रारी करण्यात फार अर्थ उरणार नाही.

मुलं मोबाइल बघताना एक रील संपायच्या आत पुढचं स्क्रोल करतात. या सततच्या स्क्रोलिंग सवयीने मेंदूला ‘झटपट बदल’ (rapid change) आणि ‘तात्काळ समाधान’ (instant reward) याची सवय लागते. हा उतावळेपणा त्यांच्या दैनंदिन जीवनातही शिरतो.पूर्वी ज्ञानाचे स्रोत पुस्तकं, वर्तमानपत्रं असे मर्यादित होते. आणि त्यातलं ज्ञान समजावून सांगायलासुद्धा मोठी माणसं लागायची. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनापासून आदर निर्माण व्हायचा. ज्ञान हे कष्टसाध्य होतं म्हणूनच ज्ञानदात्यांची किंमत होती. आज जेव्हा एका क्लिकवर माहितीचं भांडार उघडतं तेव्हा इतर कोणाला विचारायची गरजच पडत नाही. शिक्षकांविषयी आदर कमी होण्याचं कारण कदाचित यात असावं.

चला, म्हणजे जेन अल्फाच्या मुलांना पूर्णपणे दोषी ठरवता येणार नाही. मग प्रश्न उभा राहतो या परिस्थितीचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं? अर्थातच, त्यांच्या पालकांच्या! परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन, संस्कार या मोजपट्ट्या तर नेहमीच तयार असतात. पण गंमत अशी की, जशी जेन अल्फा ही पहिली पूर्णपणे डिजिटल पिढी आहे, तसेच त्यांचे जन्मदाते मिलेनियल्स आणि काही जेन झी हे पहिले डिजिटल पालक आहेत. पूर्वी आधीच्या पिढ्यांची पालकत्वाच्या अनुभवांची शिदोरी मदतीला होती. आता डिजिटल पालकत्वाविषयी सगळ्यांचीच पाटी कोरी. ‘सुजाण पालकत्व’ छाप पुस्तकांमध्येही स्क्रीन टाइम, ऑनलाइन व्यसन, सायबर धोके, डिजिटल वर्तनशास्त्र याबद्दलची ठोस मार्गदर्शक माहिती क्वचितच सापडते. त्यात मुलांना द्यायला वेळ कमी. आपण मोबाइलच्या आहारी गेलो आहोत हे बऱ्याच पालकांनाच अजून जाणवलं नाहीये, तर मग त्यांना आपल्या मुलांचं डिजिटल व्यसन कसं कळणार?यावर उपाय काय? सोपं आहे की… आजपासून मुलांचा मोबाइल बंद. पण मुलांना असं सांगण्यापूर्वी तुकोबांची एक गोष्ट आठवावी लागेल. संत तुकारामांकडे एका महिलेने तिचा मुलगा खूप गूळ खातो अशी तक्रार केली. तुकोबांनी तिला एक महिन्याने मुलाला घेऊन यायला सांगितलं. त्याप्रमाणे तो आल्यावर तुकोबांनी त्याला गूळ न खाण्याचा साधा उपदेश केला. ‘हेच सांगायचं होतं तर इतके दिवस का थांबावं लागलं’, महिलेने रास्त विचारलं. तुकोबा म्हणाले, तेव्हा मी पण गूळ खात होतो. महिनाभर गूळ खाणं बंद केलं, तेव्हा इतरांना तसा सल्ला देण्याचा मला नैतिक अधिकार मिळाला.

वयानुसार स्क्रीन टाइमचं लिमिट ठरवावं लागेल. दिवसातल्या काही वेळा ‘नो स्क्रीन टाइम’ घोषित करता येतील. सगळ्या कुटुंबाने ते काटेकोर पाळावं लागेल. आईचा फोन नाही तर आज्जीचा मिळतोय असं होऊन चालणार नाही. आपले पालक मोबाइल बघणं याशिवाय पण इतर गोष्टी करतात हे मुलांना दिसू द्यावं लागेल. आणि मुख्य म्हणजे मुलांना स्टिम्युलेशनशिवाय डोपामिन मिळवायची सवय पुन्हा लावावी लागेल. यासाठी त्यांच्यासोबत खेळ, भटकंती, गप्पाटप्पा, गोष्टी सांगणं अशा अनेक गोष्टी पालकांना जाणीवपूर्वक कराव्या लागतील.

पूर्वी संगोपनात आईवडिलांच्या मदतीला अनेक हात होते. एकत्र कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकू अशी सगळीच मंडळी मुलांचे पालक असत. एखादे दामू काका चाळीतल्या, सोसायटील्या सगळ्या मुलांवर लक्ष ठेवून असतात. सध्या जितक्या वेगाने तंत्रज्ञान वाढतं आहे, त्या तुलनेने ही संगोपनाची सपोर्ट सिस्टीम कमी होते आहे. अशा वेळी फक्त लेबलिंग आणि ट्रोलिंग सोडून समाज म्हणून आपलीही जबाबदारी वाढली आहे.

आधीच पालकत्व ही एक मोठी जबाबदारी असते. डिजिटल युगात हे आव्हान आणखी वाढलं आहे, पण ते पेलणंही तितकंच गरजेचं आहे. बदकांसारख्या काही पक्ष्यांमध्ये कधी कधी एक गमतीशीर गोष्ट आढळते. अंड्यातून बाहेर पडताच पिलाला जी गोष्ट प्रथम दिसते, तिलाच ते आपली आई समजून तिचं अनुकरण करू शकतं. अर्थात, माणसांमध्ये असं घडणं शक्य नाही; पण जर जेवण घालणं, झोपवणं, खेळवणं, हसवणं शिकवणं… या सगळ्या मूलभूत कृती मोबाइलच्या साथीने होत असतील, तर मुलांनी मोबाइललाच ‘त्वमेव माता च पिता त्वमेव’ म्हटलं तर आश्चर्य वाटू नये. हे होऊ नये, यासाठी आजच जाणीवपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे. प्रवास थोडा अवघड आहे, पण अशक्य नाही.