वेदवती चिपळूणकर परांजपे

ती अमेरिकेत राहते. ती लहानपणापासून सामान्य मुलांसारखी शाळेत जात होती. शिक्षक सांगतील ते शिकत होती, ऐकत होती, वाचत होती. लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, परीकथा, लघुकथा अशा अनेक प्रकारच्या कथा ती वाचत होती. एक दिवस तिला एक गोष्ट खटकली. मग तिने वारंवार सगळीच पुस्तकं परत वाचली. त्यानंतर तिला प्रत्येक पुस्तकातली, प्रत्येक गोष्टीतली ती विशिष्ट बाब खटकू लागली. परीकथा असोत, टीनेज स्टोरीज वा हायस्कूल स्टोरीज असोत.. अशा कोणत्याही पद्धतीच्या गोष्टींमध्ये तिला गोऱ्या वर्णाचे लोकच प्रमुख कॅरेक्टर म्हणून दिसत होते. तिची आई जमैका आणि वडील केप वेर्दे इथले असल्याने ती स्वत:देखील गोऱ्या वर्णाची नाही. त्यामुळे तिला ही गोष्ट प्रकर्षांने जाणवली आणि त्यासाठी काहीतरी करायला हवं, ही गोष्ट आपलीही असायला हवी अशी तीव्र इच्छा तिच्या मनात जागली होती.

Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
hotel owner attempts suicide in front of police station
हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न; काय आहे प्रकार?

इतक्या लहान वयातच जिने इतकी मोठी प्रस्थापित संकल्पना बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला ती मुलगी म्हणजे मार्ले डायस. तिला मनापासून वाटलेल्या कारणासाठी तिने स्वत: कृती करण्याआधी अभ्यास केला. एका स्टडीनुसार २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ३४०० पुस्तकांपैकी केवळ ८.४ टक्के पुस्तकांमध्ये आफ्रिकन – अमेरिकन मुख्य व्यक्तिरेखा होत्या. इतर वर्णाची म्हणजे लॅटिन, अमेरिकन – इंडियन, स्थानिक अमेरिकन अशांची टक्केवारी तर अजूनच कमी होती. त्यामुळे मार्लेने तिचं म्हणणं अधिक ठाम केलं आणि त्यावर काम करण्याचं ठरवलं. तिच्याकडे तीन पर्याय होते, असं ती सांगते. एक म्हणजे स्वत:साठी स्वत:ला हवी ती पुस्तकं विकत घेणं, दुसरा पर्याय म्हणजे काही लेखकांना भेटून त्यांना कृष्णवर्णीय मुलींना मुख्य कॅरेक्टर घेऊन गोष्टी लिहायची विनंती करणं आणि तिसरा पर्याय म्हणजे असलेली पुस्तकं गोळा करून सगळयांना वाचायला मिळतील अशी सोय करणं. यातला मार्लेने तिसरा पर्याय निवडला आणि त्यामुळेच ‘मार्ले डायस’ हे नाव जगभरात प्रसिद्ध झालं.

वयाच्या अकराव्या वर्षी हा विचार तिला जाणवला आणि तिने ही परिस्थिती बदलायची ठरवलं. ही मनातली खदखद तिने तिच्या आईला बोलून दाखवली. तिची आई डॉ. जेनिस डायस ही एक सामाजिक संस्था चालवते. मार्लेने सांगितलेल्या प्रॉब्लेमवर ‘तू नक्की काय करणार आहेस’ असं आईने तिला विचारलं. मार्लेकडेही यावर उत्तर तयारच होतं. आईच्या संस्थेच्या मदतीने मार्लेने एक ड्राइव्ह सुरू केला #1000 BlackGirlBooks या नावाने. ज्या पुस्तकांमध्ये प्रमुख कॅरेक्टर ही कृष्णवर्णीय मुलगी असेल अशा गोष्टींची, यंग अ‍ॅडल्ट कादंबऱ्यांची, लघुकथांची एक हजार पुस्तकं जमा करण्याचं तिचं ध्येय होतं. तिच्या या ड्राइव्हला जगभरातल्या लोकांनी उचलून धरलं. अ‍ॅक्टिव्हिस्ट, लेखक, ब्लॉगर्स, सोशल वर्कर अशा लोकांना ही तिची चळवळ आवडली. आणि त्यांनी मार्ले डायस हे नाव जगप्रसिद्ध केलं. काही महिन्यांतच तिच्या या ड्राइव्हला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि तिच्याकडे नऊ हजार पुस्तकं जमा झाली.

एका उद्देशाने जमा केलेली ही पुस्तकं मार्लेने स्वत: शिकलेल्या शाळेत आणि आसपासच्या शाळांमध्ये वाटून दिली. लहानपणी ‘कंपल्सरी रीिडग’ ही शाळेत असणारी अवांतर वाचनाची अ‍ॅक्टिव्हिटी आपल्या मनासारखी व्हावी, त्यात आपल्याला हवी ती पुस्तकं वाचता यावी यासाठी मार्लेने सुरू केलेला हा ड्राइव्ह होता. त्यामुळे शाळांना ही पुस्तकं पुरवणं आणि मुलांना ती उपलब्ध करून देणं या उद्देशाने तिने ती पुस्तकं शाळांना देऊन टाकली. त्यानंतर मार्लेच्या मुलाखती गाजू लागल्या. तिचं हे काम जगभरातल्या वेगवेगळया मॅगझिन्स, वर्तमानपत्र, वेबसाईट्स, ब्लॉग्समध्ये नावाजलं गेलं. तिच्या मुलाखती ठिकठिकाणी प्रसिद्ध होऊ लागल्या. २०१८ मध्ये तिचं पुस्तक ‘मार्ले डायस गेट्स इट डन – सो कॅन यू’ हे प्रकाशित झालं आहे. ‘फोर्ब्स थर्टी अन्डर थर्टी’च्या यादीत स्थान मिळालेली सर्वात लहान व्यक्ती ही मार्ले डायसची आजची ओळख सगळयांसाठीच एक प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे.

गेल्या चार वर्षांपासून ती जगभरातल्या व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रातीत लोक, साहित्य क्षेत्रातील लोक यांच्याशी बोलून तरुणाईची मतं निर्णय प्रक्रियेत घेतली जायला हवीत हे मत पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. जगभरात नवीन तरुणाईच्या मतांकडे दुर्लक्ष केलं जातं असं तिचं निरीक्षण आहे आणि त्यामुळे तरुणाईचा आवाज बनण्याचा ती प्रयत्न करते आहे. आताची तरुणाईसुद्धा पूर्वीसारखाच वर्णद्वेष, गरिबी, अयोग्य शिक्षण, विनाकारण उद्भवणारा िहसाचार अशा अनेक समस्यांचा सामना करते आहे, असं मार्ले म्हणते. पुढील जगात, भविष्यात जर काही चांगल्या गोष्टी पाहायच्या असतील तर त्याची सुरुवात करण्यासाठी तरुणाईला आज आत्तापासूनच संघर्ष करावा लागेल. आणि हा संघर्ष आपापल्या शहरापासून अगदी स्थानिक पातळीपासून करावा लागेल, असं ती म्हणते.

भविष्यात जगभरात कुठेही वर्णद्वेष शिल्लक राहू नये हे उद्दिष्ट मनात घेऊन मार्ले त्यादृष्टीने प्रयत्न करते आहे. तिच्या शहरात राहणारे आफ्रिकन, इंडियन, लॅटिन अशा विविध वर्ण आणि प्रकारच्या लोकांची टक्केवारी किती आहे आणि प्रत्यक्षात त्यांना टाऊन अथॉरिटीमध्ये किती प्रतिनिधित्व आहे यातला विरोधाभास संपवणं हे मार्लेसाठी महत्त्वाचं आहे. अगदी कथा-कादंबऱ्यांतील गोष्टी, माणसं आपली व्हावीत या एका विचाराने सुरू झालेली मार्लेची लढाई अधिक व्यापक झाली आहे. वर्णद्वेष येत्या काळात पूर्ण नष्ट करायचा असेल तर तरुण पिढीने आताच आवाज उठवणं गरजेचं आहे असं मार्लेला वाटतं. आणि या नवतरुणाईला वर्णद्वेषाच्या या समस्येवर जागृत करण्याचं, त्यांना त्यासाठी प्रत्यक्षात काम करायला प्रेरित करण्याच्या उद्देशाने मार्ले काम करते आहे. लढवय्यी तर ती आहेच, आता वर्णद्वेषाविरोधातील तिचा लढा अधिक प्रखर होऊ पाहतो आहे.

viva@expressindia.com