मितेश जोशी

‘बाईपण भारी देवा’ या सुपरहिट चित्रपटातील ‘चारू’ या आजच्या काळातल्या व्यक्तिरेखेमुळे आणि झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे दीपा परब चौधरी. दीपाला गुजरात, पुणे आणि कोकण या तीन खाद्यसंस्कृतींने आपलेसे कसे केले आहे हे वाचू या आजच्या फुडी आत्मामध्ये..

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

दीपाच्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने होते. चित्रीकरणासाठी सकाळी आठ वाजता सेटवर पोहोचल्यानंतर ब्लॅक कॉफी आणि उकडलेली अंडी अशी तिची न्याहारी असते. घरून नाश्त्यासाठी सेटवर आणलेला डबा ती जेवणाच्या आधी भूक लागली तर त्यासाठी राखून ठेवते. नाश्त्याच्या डब्यात कधी पोहे, खजूर, फळे किंवा इडली चटणी असते. रोजच्या चित्रीकरणामुळे व्यायामाला तितकासा वेळ देता येत नाही. त्यामुळे खाण्यावर खूप कंट्रोल ठेवावा लागतो, अशी प्रतिक्रिया दीपाने दिली. दुपारच्या जेवणात ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी तर कधी भात आणि चिकन असा थाट असतो. तिचा दुपारच्या जेवणाचा डबा सेटवर येतो. दुपारचं जेवण गरमागरम आणि पौष्टिक मिळायला हवं या विचाराने तिने सेटच्या जवळच्याच मावशींकडे डबा लावला आहे. तिचं खाणं खूप कमी आहे, त्यामुळे ती टप्प्याटप्प्याने खाते. दुपारची चारची भूक ताक पिऊन शमवण्याचा ती प्रयत्न करते. संध्याकाळी ग्रीन टी, भेळ तर कधी कडधान्य खायला तिला आवडतं. रात्रीच्या जेवणात घरी जे काही आई बनवेल ते स्वाहा हे तिचं रुटीन.     

हेही वाचा >>> फुडी आत्मा : रोजच्या जेवणातला हिरो

दीपाची आई माहेरची गुजराती आहे. तिचे बाबा कोकणातले तर सासर पुण्याचं, त्यामुळे तीन वेगवेगळय़ा खाद्यसंस्कृतींतून जिव्हातृप्ती घेण्याची संधी तिला मिळाली आहे. दीपा सांगते, ‘लग्नाच्या आधी मला भाताचा कुकरही लावता येत नव्हता. मी एकत्र कुटुंबात वाढल्याने आई नसली तर काकू किचनमध्ये उभी असायची. त्यामुळे मला किचन ओटय़ाची सवय नव्हती. त्यात लग्नाच्या आधी माझं करिअरवर लक्ष जास्त असल्याने माझ्या आईनेच मला किचनजवळ वेळ वाया घालवू दिला नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर मी अंकुशमुळे स्वयंपाक शिकले. तो काही फुडी नाही, पण त्याला चांगलंचुंगलं खायला आवडतं. आता बऱ्यापैकी स्वयंपाक बनवायला येतो मला तरी अजूनही मी विद्यार्थिदशा काही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही’ असं ती म्हणते. काळानुरूप गरजा बदलत गेल्याने जिभेवरची चवदेखील वेगवेगळय़ा पदार्थाची मागणी करू लागली आहे. मी काहीच दिवसांपूर्वी आईकडून चिकन मोमोज बनवायला शिकले. आता बदल म्हणून या रेसिपी शिकण्याच्या दृष्टीने मी विद्यार्थिदशा सोडणार नाही, असं ती स्पष्ट करते.  

आईकडून आणि सासूबाईंकडून मी बरेच पदार्थ शिकले असं म्हणणारी दीपा त्यांच्या हातच्या खाद्यपदार्थाच्या आठवणींविषयी भरभरून बोलते. ‘माझी आई पुरणपोळय़ा उत्तम बनवते. तिने बनवलेल्या सात ते आठ पुरणपोळय़ाही मी एका दमात फस्त करू शकते. रोजच्या डब्याच्या भाज्या, वेगवेगळय़ा कोशिंबिरी, पराठे, गुजराती डाळी, पुरणपोळय़ा, दिवाळीचा फराळ इत्यादी पदार्थाचे धडे मी आईकडेच गिरवले. माझ्या सासूबाई पुण्याच्या असल्याने त्यांच्याकडून मी कांद्याची चटणी बनवायला शिकले. मला भाकरी थापायलाही त्यांनीच शिकवले. त्यांना भाकरी करताना पाहायला मला खूप आवडायचं, त्यांच्या हाताला भाकरीचं पीठ मळण्यापासूनच एक फार छान लय होती. एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर कुठल्याशा रंगात बुडवून ब्रश टेकवला आणि एक नागमोडी, गोलाई असलेला आकार तो ब्रश न उचलता हात काढतच गेला तर त्या हाताला जी गोलाईयुक्त सुसंगती असेल तशी काहीशी सासूबाईंच्या भाकरीचे पीठ मळण्याला असायची. म्हणजे त्यांनी पाण्यात बुडवायला हात उचलला तरी उचललाच नाहीये असं वाटायचं. भाकरीही तव्याइतकी मोठी आणि गोल. एका झपक्यात तव्यावर डौलदार पडताच पहिल्यांदा उलटली गेली की सासूबाईंचा भाकरीवरून फिरणारा पाण्याचा ओला हात. तो हात फिरताक्षणी जणू ते पीठ मोहरल्यासारखं झालं आहे, त्यांना प्रतिसाद देतं आहे असंच वाटायचं. लगेचच भाकरीचा मंद वास दरवळायला लागतो, तो वास ती जसजशी भाजली जाईल तसतसा वाढतच जातो. एका क्षणी सासूबाई तवा काढून नुसत्या गॅसवर ती भाकरी भाजायला घ्यायच्या. मला काय हे गणित कळायचंच नाही, पण नंतर कळू लागलं की गॅसवर भाकरी ठेवल्यावर ती टम्म फुगते. या सगळय़ा वेगवेगळय़ा कृतींमध्ये सासूबाईंचा हात आणि घडत जाणारी भाकरी हे एकमेकांशी बोलत आहेत असं वाटायचं. हे टम्म फुगणं हा या संवादाचा परमोच्च िबदू’ असं रसभरित वर्णन दीपा करते. लग्न झाल्यावर सुरुवातीला ती गरम भाकरी ताटात घेऊन मी नुसतीच पाहात राहायचे. तिचा वरचा पापुद्रा उचलून आतल्या खरबरीत भागावरून हळूच हात फिरवायला खूप आवडायचं. सासूबाई त्या भागावर थोडंसंच मीठ शिंपडून त्यावर तुपाचा हात फिरवायच्या. त्यानंतर जेव्हा त्या भाकरीचा पहिला घास तोंडात जायचा तेव्हा काय व्हायचं हे कुठल्या शब्दांत सांगू? असं ती म्हणते.       

हेही वाचा >>> फुडी आत्मा : छान चाऊन चाऊन खा!

लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला सासरी रुळायला काही वेळ द्यावाच लागतो. भले आजच्या युगात तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा किंवा प्रेमविवाह करा. मुलींना बाकी कशात रुळायला वेळ लागला नाही तरी चालेल, पण सासरच्या खाण्यापिण्याच्या संस्कृतीत रुळायला वेळ लागतोच. तसंच माझंही काहीसं झालं, असं सांगत दीपा पुढे म्हणाली, ‘अंकुशशी लग्न करून चौधरींच्या घरी सून म्हणून आले तेव्हा त्यांचे भाज्यांचे प्रकार बघितल्यावर मला जरा धडकीच भरली. कांद्याची चटणी हा पदार्थ घरी भाकरीबरोबर भाजीच्या नावाखाली खाल्ला जायचा. तेव्हा ‘अरे बापरे !’ असं झालं होतं माझं.. कारण अगदीच परस्परविरोधी पदार्थ सासरी ताटात पाहायला मिळत होते. आमटीसुद्धा आंबट-गोड असायची. मी त्या काळातली सून होते जेव्हा स्विगी, झोमॅटोचे दिवस नव्हते. जेवण पटलं नाही तर चला पटकन बाहेरून मागवू असं आतासारखं खपवून घेतलं जायचं नाही. त्यामुळे सासरच्या खाण्यापिण्याच्या चालीरीती स्वीकाराव्या लागायच्याच आणि  स्वत:च्या माहेरून घेऊन आलेल्या खाण्यापिण्याच्या चालीरीती सासरच्यांना पटवून द्याव्या लागायच्या’. माहेरी मासे आणि चिकन खाण्यावर जास्त जोर होता, तर सासूबाई शाकाहारी होत्या. तरी त्यांनी माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं आणली नाहीत. उलट, माझ्या माहेरच्या पद्धतीचे मासे अंकुशला आणि माझ्या नणंदेला खूप आवडायचे आणि आजही आवडतात. त्यामुळे आम्हा फिश लव्हरचा चांगलाच ट्रीयो झाला, असं दीपा सांगते.     

दीपाची आई माहेरची गुजराती असल्यामुळे गुजराती पदार्थ मला खूप आवडतात असं सांगतानाच तिने गुजरात, काठियावाड, कच्छ आणि सुरत या प्रत्येक विभागात त्यांच्या चवी कशा वेगवेगळय़ा असतात याचीही माहिती दिली. ‘गुजराती पदार्थ हे एकाच वेळी गोड, खारट आणि तिखट असू शकतात. गुजरातमध्ये जैन धर्माचा जास्त प्रभाव असल्यामुळे मुख्यत्वे शाकाहारी पदार्थ जास्त खाल्ले जातात’ असं ती सांगते. गुजरातमध्ये फक्त ब्राह्मणच नव्हे तर इथला हिंदू बहुजन समाजही पूर्वीपासून शाकाहारी आहे. फक्त मुसलमान, ख्रिश्चन, आदिवासी, दलित आणि ठाकोर यांसारख्या काही ठरावीक जमातीच मांसाहार करतात. लहानपणी आम्ही वलसाडला माझ्या आजीकडे जायचो. आजीकडे मसालेदार पदार्थ जास्त असायचे. खमण ढोकळा, मुगाची भजी, खांडवी, डाळ ढोकळी आणि आमरस हे पदार्थ मला प्रचंड आवडायचे. मामाकडे पायरी आंब्याचा बादली भरून आमरस केला जायचा आणि जेवणात फक्त आणि फक्त आमरस पुरीचा बेत असायचा. घरीसुद्धा भांडं भरून आमरस बनवला जायचा, पण जोडीला वरण-भात लागायचाच हा मुख्य फरक होता.  सँडविच, पाणीपुरी, चाटपदार्थ आजीच्या घरी रात्रीच्या जेवणात असायचे, त्यामुळे खूप मज्जा यायची. तर बाबा कोकणातले त्यामुळे तिथला हापूस आंबा आणि आई गुजराती त्यामुळे इथला पायरी, केशर, बलसाड हापूस आंबा असे वेगवेगळे आंबे मला खायला मिळाल्याने मी माझं आंबाप्रेम अधिकच वृिद्धगत करून घेतलं, अशा आठवणी तिने सांगितल्या.   

हेही वाचा >>> फुडी आत्मा: प्रत्येक हाताची चव वेगळी..   

केवळ जेवणच नाही तर पान वाढण्याची आपली विशेष पद्धतही तिला आवडते. ताटातील पदार्थ कसे वाढावेत यामागचं लॉजिक आपल्याला जास्त आकर्षित करत असल्याचं तिने सांगितलं. ‘ताटातले उजव्या बाजूचे पदार्थ म्हणजे भाजी, आमटी उजव्या हाताच्या जवळ असतात. साहजिकच हात लवकर तिथे पोहोचतो म्हणून ते जास्त खाल्ले जातात. किंबहुना आहारशास्त्राचा विचार करता ते जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत म्हणून ते उजव्या बाजूला असतात. डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, लोणचं, पापड, भजी, मिष्टान्न हे रुचिपालट म्हणून वाढलेले असतात. त्यामुळे ते आवश्यक, पण कमी प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. हाताला जरा वळून त्रास घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. तशीच त्याची रचना असते. ताटातला मधला भाग ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे त्या प्रमाणात खावा. ताटात ठरावीक पद्धतीने जेवण वाढण्यामागेसुद्धा आरोग्याचा विचार दडलेला आहे’ असं ती म्हणते. शिवाय सौंदर्य, शिस्त तर आहेच, त्यामुळे मन आणि जिव्हा दोन्ही प्रसन्न होते, हे नमूद करतानाच मस्तपैकी खाऊन-पिऊन रोज ‘जिव्हा करा रे प्रसन्न’ असा सल्ला ती देते, कारण दिवसभराच्या आपल्या सर्व शक्तीचे तेच एकमेव कारण आहे हे ती आवर्जून सांगते. viva@expressindia.com

Story img Loader