वेदवती चिपळूणकर

मालिकांच्या किंवा चित्रपटांच्या सुरुवातीच्या नावांमध्ये जास्त महत्त्वाची मानली जाणारी नावं दाखवली जातात. त्यात लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशी काही नावं असतात. ‘निर्माता’ या शीर्षकाखाली जे नाव दिसेल त्या व्यक्तीकडे प्रचंड पैसा आहे, त्यांनी तो पैसा या प्रोजेक्टमध्ये ओतलाय आणि त्यातून ते भरपूर पैसा कमावणार आहेत अशा समजुतीत सामान्य प्रेक्षक असतो. प्रोडय़ुसर म्हणजे चकाचक ऑफिस, हाताखाली कामाला भरपूर माणसं, खुर्चीत बसून निवांत काम करायचं इत्यादी.. अनेक गोष्टींचा प्रेक्षकांनी कल्पनाविस्तार केलेला असतो. प्रत्यक्षात मात्र या कल्पनाविस्तारातला थोडासाच भाग खऱ्या प्रोडय़ुसरच्या वाटय़ाला येतो. केवळ मेहनतीच्या जोरावर ‘प्रोडय़ुसर’ या भूमिकेपर्यंत पोहोचलेल्या सुवर्णा रसिक राणे प्रेक्षकांना केवळ मालिकेच्या स्क्रोल्समधून माहिती आहेत.

सुवर्णा यांच्या कामाची सुरुवात तीस वर्षांपूर्वी ‘असिस्टंट डायरेक्टर’ म्हणून झाली होती. त्यांच्या करिअरच्या बदलत्या ग्राफबद्दल त्या सांगतात, ‘प्रोडय़ुसर व्हायचं असं काही माझं स्वप्न वगैरे कधी नव्हतं. मी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून फोटोग्राफीमध्ये पदवी घेतलेली आहे. त्यामुळे माझं काम मुळात त्या क्षेत्रात सुरू झालं. सुप्रिया मतकरी ही माझी जे. जे. स्कूलमधली मैत्रीण.. त्यांच्या ‘बेरीज-वजाबाकी’ या मालिकेच्या सेटवर एक दिवस कॅमेरामन आला नव्हता. त्यामुळे तिच्या बोलावण्यावरून त्या दिवशी मी स्टील फोटोग्राफी करायला सेटवर गेले आणि त्यानंतर मतकरींना डायरेक्शनमध्ये असिस्ट करायला सुरुवात केली. स्टील फोटोग्राफर, मग असिस्टंट डायरेक्टर, असोसिएट डायरेक्टर, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ुसर, क्रिएटिव्ह प्रोडय़ुसर आणि अखेरीस प्रोडय़ुसर असा माझा प्रवास झालेला आहे’. इतक्या मोठय़ा अनुभवानंतर सगळ्या क्षेत्रांत काम करून मग निर्मितीच्या क्षेत्रात स्थिरावले आहे, असं त्या सांगतात. सगळ्या क्षेत्रांच्या कामाच्या पद्धती माहीत असल्यामुळे त्या स्वत:च्या कामाचा आपसूकच सर्वागांनी विचार करतात. त्यांच्या या अनुभवाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्ध केलं आहे असं त्या आवर्जून सांगतात.

स्त्रियांनी घराबाहेर पडून काम करणं बऱ्यापैकी उशिरा सुरू केल्याने कोणतंही कामाचं क्षेत्र हे कायमच पुरुषसत्ताक राहिलेलं आहे. हळूहळू स्त्रियांनी सगळ्या कार्यक्षेत्रांत पाय रोवायला सुरुवात केली तशी ही विचारसरणी बदलत गेली. मात्र तरीही ‘मेल इगो’ दुखावल्याचे आणि ‘हिला कसं जमेल?’ या विचारांचे काही अनुभव अधूनमधून स्त्रियांना जवळपास प्रत्येक क्षेत्रात येतच असतात. ‘मी प्रेग्नन्सी ब्रेकनंतर जवळपास अडीच वर्षांनी इंडस्ट्रीत परत आले. माझ्या मुली लहान आहेत, घरसंसार आहे, सासूसासरे आहेत या सगळ्यामुळे मला लगेच भरपूर काम करायला जमणार नाही, असं काही जणांनी परस्पर ठरवून टाकलं होतं. आणि मी कामासाठी सक्षम असतानाही मला एखाददोन संधी नाकारल्या गेल्या’, असा अनुभवही त्यांनी सांगितला. स्त्रियांबद्दल आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल परस्पर गृहीतकं मांडण्याचा अनुभव त्यांना आलाच होता. प्रत्यक्ष काम करताना केवळ ‘एका स्त्रीचं आम्ही का ऐकायचं’ या वृत्तीचा अनुभवही त्यांनी घेतला. त्या सांगतात, ‘माझ्या हातात सगळ्या कलाकारांच्या वेळा मॅनेज करायची ऑथॉरिटीही होती आणि त्या मॅनेजमेंटमध्ये माझा हातखंडाही होता. तरीही एखादी गोष्ट केवळ मी सांगितली म्हणून सेटवर ऐकली गेली नाही किंवा मी सांगितल्याच्या बरोबर उलटंच काम केलं गेलं. मी जर एखाद्या सीनला चार तासांची वेळ ठरवून दिली तर ती वाढवत वाढवत सहा तासांवर नेली गेली. या ना त्या पद्धतीने मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत’.

स्वत:ला कितीही त्रास झाला तरी प्रोजेक्टच्या चांगल्यासाठी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, या तत्त्वानेच सुवर्णा यांनी काम केलं आणि त्यामुळे मुद्दामहून दिल्या जाणाऱ्या त्रासाने त्यांनी कधी ते क्षेत्र सोडायचा विचार केला नाही. त्यांच्या तत्त्वांबद्दल त्या अतिशय शांतपणे पण ठामपणे बोलतात, ‘मला मुद्दामहून त्रास दिला तरीही नुकसान अख्ख्या युनिटचं होतं, संपूर्ण प्रोजेक्टचं होतं. जी व्यक्ती त्रास देते ती तिथून जाणार नाही आणि त्रास द्यायचं थांबवणारही नाही. अशा वेळी एकत्र काम करत राहणं हे सगळ्यांसाठीच अडचणीचं असणार होतं. त्यामुळे अशा वेळी मीच स्वत:हून त्या प्रोजेक्टमधून बाजूला होत गेले. जिथे जिथे माझ्या कामाच्या मध्ये पॉलिटिक्स आलं तिथे तिथे मी ते काम सोडून बाहेर पडले’, असं त्या सांगतात. आपल्या कामाचं अंतिम आउटपुट चांगलंच मिळावं यासाठी आग्रही असलेल्या सुवर्णा यांनी स्वत:चं काम मात्र कधीच कमी पडू दिलं नाही. प्रोडय़ुसर असलं म्हणजे त्याच्या डोक्यावर कोणीच बॉस नाही आणि सगळं मनासारखं करता येतं हा गैरसमज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रॉडक्शन हाऊसचं प्रेशर, पैशांची जुळवाजुळव, कलाकारांच्या वेळा, शूटिंगचा वेळ अशा सतराशे साठ गोष्टी एकावेळी कराव्या लागतात तेव्हा एक एपिसोड टेलिकास्ट होऊ  शकतो. त्यातही प्रॉडक्शन हाऊसचा शब्द अंतिम असल्याने आपल्याला कितीही चांगलं वाटलं तरीही सगळं प्लॅनिंग आपल्या मनाप्रमाणे करता येत नाही आणि त्या वेळी केवळ ‘जे होतं ते प्रोजेक्टच्या चांगल्यासाठी’ असं म्हणून काम करावं लागतं, असंही त्या म्हणाल्या.

एखाद्या मालिकेच्या किंवा चित्रपटाच्या निर्मात्याचं नाव मोठय़ा अक्षरात सुरुवातीलाच झळकतं. ते नाव झळकण्याचा एक क्षण सुखावणारा असला तरी त्यामागे नऊ  क्षण टेन्शनचे असतात, असं सुवर्णा सांगतात. तांत्रिक अडचणींपासून ते वेळेच्या अडचणींपर्यंत सगळं काही प्रोडय़ुसरला सांभाळावं लागतं, सोडवावं लागतं. ‘वेळच्या वेळी एपिसोड सबमिट करण्याचं सगळ्यात जास्त प्रेशर असतं. अचानक कितीही मोठी समस्या उद्भवली तरी ती डेडलाइन चुकवून चालत नाही. दिवसभर केलेलं सगळं शूटिंग एका चिपवर घेतलं जातं आणि ती चिप घेऊन तो मुलगा ऑफिसमध्ये जातो. एकदा एका मालिकेच्या शूटिंगची चिप शनिवारी करप्ट झाली आणि तो एपिसोड सोमवारी टेलिकास्ट करायचा होता. हार्डवेअरच्या माणसांनी चोवीस तास मेहनत घेऊन त्या चिपमधला एपिसोड परत मिळवून दिला आणि सोमवारी तो टेलिकास्ट झाला. तोपर्यंत आम्ही सगळे प्रचंड प्रेशरखाली होतो. दुसऱ्या एका मालिकेचं शूटिंग करत असताना ती चिप घेऊन निघालेल्या मुलाची ती बॅगच रस्त्यात चोरीला गेली आणि परिणामी आमची चिपही गेली. मग शोधाशोध, पोलीस कम्प्लेंट अशा सगळ्या गोष्टी झाल्या. एका दिवसाचं शूटिंग वाया गेलं तर होणारा खर्च आता लाखाच्या घरात आहे. त्यामुळे यातलं काहीच परवडणारं नसतं. अशी असंख्य वादळं पार करून स्क्रीनवर झळकणाऱ्या त्या नावाचा आनंद घेता येतो’, असं त्यांनी सांगितलं.

नाव जसं फिरत्या स्क्रोलवर दिसत असतं तसंच चोवीस तास सुवर्णा कामाच्या चक्रात बांधलेल्या असतात. वैयक्तिक आयुष्य आणि करिअरच्या गरजा या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळत, तीस वर्षांच्या करिअरमध्ये सगळ्या प्रकारच्या व्यक्तींना आणि प्रसंगांना तोंड देत त्या खंबीरपणे आपलं स्थान राखून आहेत. कॅ मेऱ्यातून पडद्यावर दिसणारं जग आपल्याला सुखावत असलं तरी त्यासाठी कॅमेऱ्यामागे अनेक चेहरे प्रचंड कष्ट घेत असतात. सुवर्णा रसिक राणे यांच्यासारख्या स्त्रियांची कॅमेऱ्यामागची मेहनत म्हणूनच लाखमोलाची ठरते.

या क्षेत्रात येण्याचं केवळ फॅसिनेशन आहे म्हणून येऊ  नका. या इंडस्ट्रीत येण्याचा विचार करणाऱ्यांनी सगळ्या प्रकारच्या कामांचा आधी अनुभव घ्या, मग आपल्याला काय आवडतंय आणि जमतंय ते पाहा आणि त्यानंतर एका प्रकारच्या कामात स्थिर व्हा. त्यासाठी इतरांच्या सांगण्याबरहुकूम काम करण्याचीही तयारी ठेवावी लागते आणि पैशांचा विचार सुरुवातीला तरी करता येत नाही. यातून पटकन पैसे मिळतील वगैरे अशा अपेक्षांवर राहू नका. प्रचंड कष्ट करून इथे सेट व्हावं लागतं.’

– सुवर्णा रसिक राणे

viva@expressindia.com