डॉ. अपूर्वा जोशी

स्टार्टअपच्या दुनियेत वावरताना समाजासमोरचा कोणता तरी प्रश्न सोडवायचा आहे ही कल्पना जशी महत्त्वाची असते तशीच ती सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मांडणेपण तितके च महत्त्वाचे असते. एलेव्हेटर पीच हा त्या मांडणीचा लहान प्रकार, आजकाल तर एखाद्या ट्वीटमध्येही तुमच्या व्यवसायाची पूर्ण मांडणी करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची नवी प्रथा रूढ होत चालली आहे.

२००४ सालातली गोष्ट असेल. आयआयएम अहमदाबादने तेव्हा उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक बिझनेस प्लॅन स्पर्धा भरवलेली होती. भारतातील स्टार्टअपच्या भविष्याची ती नांदी होती. भारतातून १०० तरी स्पर्धक आपल्या कल्पना मांडायला तिथे जमलेले. यात एक २४ – २५ वर्षांची छोटय़ा चणीची एक मुलगीपण होती, तिचं नाव होतं कल्याणी दामले.

स्पर्धकांमध्ये एकटीच मुलगी असल्याने, कौतुकाने असेल पण तिला बाकीचे सर्वच स्पर्धक विचारत होते की तुझा प्लॅन काय आहे? सगळी तयारी करून आल्याप्रमाणे तीही व्यवस्थित सांगत होती मी आगारोजच्या किमती कमी करायची पद्धती शोधून काढली आहे. आगारोज म्हटल्यावर प्रश्नकर्त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे विचित्र भाव तिच्या नजरेतून सुटत नव्हते. ‘आगारोज’ हा कोणाला गुलाबाचा (रोज) प्रकार वाटत होता तर कोणाला बस उभी करायची जागा (आगार) वाटत होती.

तिला लक्षात आलं आगारोजच जर लोकांना माहिती नसेल तर आपलं संशोधन किंवा पेटंट यांचा ही स्पर्धा जिंकण्यासाठी काहीच फायदा होणार नाही. तिने थोडी जोखीम उचलली आणि ऐन वेळेस तिने तिचं एलेव्हेटर पीच बदललं आणि परीक्षकांसमोर केवळ असं सांगितलं की मी एक अशी पद्धती शोधून काढली आहे ज्यामुळे बिल क्लिंटन आणि मोनिका लेविन्स्की प्रकरणात के ल्या गेलेल्या डीएनए टेस्टचा खर्च ४ टक्केपर्यंत कमी झाला असता. या पीचचा योग्य परिणाम दिसून आला, परीक्षकांनी तिला तांत्रिक प्रश्न तर विचारलेच नाहीत आणि वर या स्पर्धेत आगारोजला उपविजेतेपदही मिळाले.

करारमदार पूर्ण झाल्यावर आयआयएम अहमदाबादकडून एक लाख रुपयांचे बीज भांडवलदेखील तिला मिळाले. कल्याणी दामले ही आयआयएम अहमदाबादची बिझनेस प्लॅन स्पर्धा जिंकलेली पहिली मराठी मुलगी ठरली.

स्टार्टअपच्या दुनियेत वावरताना समाजासमोरचा कोणता तरी प्रश्न सोडवायचा आहे ही कल्पना जशी महत्त्वाची असते तशीच ती सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मांडणेपण तितके च महत्त्वाचे असते. एलेव्हेटर पीच हा त्या मांडणीचा लहान प्रकार, आजकाल तर एखाद्या ट्वीटमध्येही तुमच्या व्यवसायाची पूर्ण मांडणी करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची नवी प्रथा रूढ होत चालली आहे. एलेव्हेटर पीचमध्ये खूप ताकद असते, पण श्रोता पाहून त्यात बदल करणे हे एका उत्तम व्यावसायिकाचे लक्षण असते, योग्य गुंतवणूकदार पाहून आपली कल्पना मांडल्यास त्याचा मोठा फायदा होतो.

एलेव्हेटर पीच तयार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे गुंतवणूकदार समजावून घेणे. प्रत्येक गुंतवणूकदाराची एक ठरावीक कार्यपद्धती असते. तुमची कल्पना उत्तम आहे म्हणून कोणीही गुंतवणूकदार त्यावर पैसे लावत नसतात. काही गुंतवणूकदार हे फक्त ई – कॉमर्समध्येच पैसे लावतात तर काही जण फिनटेक कं पन्यांवर. अशा गुंतवणूकदारांना तुमचे इलेक्ट्रॉनिक व्हेईकल कसे क्रांती घडवेल हे सांगून काहीच फायदा नसतो. काही गुंतवणूकदार हे कल्पनेवर पैसे लावतात तर काही जण त्या कल्पनेतून निर्माण झालेल्या व्यवसायावर पैसे लावतात. काही गुंतवणूकदार हे स्वत:चे पैसे लावतात तर काही जण उधारीवर पैसे घेऊन पैसे लावतात. स्टार्टअपच्या दुनियेत दोन संज्ञा खूप महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे ‘एंजल्स’ आणि ‘व्हेंचर कॅपिटॅलिस्ट’.

एंजल्स हे वैयक्तिक गुंतवणूकदार असतात, एखाद्या मोठय़ा कंपनीच्या प्रमुखपदी अथवा वित्तीय प्रमुखपदी राहिलेले असल्याने त्यांच्याकडे स्वत:चे खर्च भागवून पैसे शिल्लक असतात, जे त्यांना चांगल्या कल्पनांमध्ये गुंतवायची इच्छा असते. शेअर बाजारात पैसे लावणं हा एक मार्ग त्यांच्याकडे असतो, पण कल्पनेत केलेली गुंतवणूक सगळ्यात जास्त परतावा मिळवून देते हे त्यांना व्यवस्थित माहिती असते. शेअर बाजार १२ ते १५ टक्के परतावा देतो तर कल्पनेतील गुंतवणूक १२ ते १५ पट परतावा देते. भारतात मुंबई एंजेल्स, बंगलोर एंजेल्स असे अनेक समूहही आहेत जिथे वैयक्तिक गुंतवणूकदार एकत्र येऊन पैसे गुंतवतात.

एंजेल्स स्वत: कमावलेले पैसे एखाद्या व्यवसायात टाकतात तर दुसऱ्या बाजूला ‘व्हेंचर कॅपिटॅलिस्ट’ म्हणजे एक कंपनी अथवा संस्था असते. या कंपनीकडे थोडे फार स्वत:चे भांडवल असते, पण अनेक ठिकाणहून पैसे उभे करून हे व्हेंचर कॅपिटॅलिस्ट एखाद्या चांगल्या व्यवसायावर पैसे लावत असतात.

एंजेल्स एखाद्या कल्पनेत पैसे गुंतवतो तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट कल्पनेतून निर्माण झालेल्या व्यवसायात पैसे गुंतवत असतात. पैसे गुंतवल्यानंतर एंजेल्स रोजच्या घडामोडीतपण सहभागी असतात तर व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे फक्त महत्त्वाच्या निर्णयात सहभागी असतात.

एंजल असोत की व्हेंचर कॅपिटॅलिस्ट हे तीन प्रकारे पैसे गुंतवत असतात-

१.   कर्जाच्या स्वरूपात

२.   परिवर्तनीय रोखे खरेदी करून

३.   समभाग खरेदी करून

याशिवायदेखील नवीन नवीन पद्धतीचे गुंतवणुकीचे प्रकार बाजारात येत आहेत, पण थोडक्यात काय तुमची कल्पना कितीही चांगली असली तरी त्याचं एलेव्हेटर पीच बनवणे आणि परिस्थितीनुसार त्यात बदल करून आपण ते कोणासमोर मांडतो हे समजून घेणं ही एका यशस्वी स्टार्टअपची पायाभरणी होऊ  शकते.

viva@expressindia.com