राधिका कुंटे

चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुचते एक कल्पना. नदीच्या पाण्यापासून वीज निर्मिती करून गावात वीजपुरवठा करण्याची. प्रणव देशपांडे, आदित्य भालेराव, शंतनू कुलकर्णी आणि तनय आखेगावकर या महाविद्यालयीन विद्यार्थी-संशोधकांच्या प्रयोगाच्या धडपडीची ही गोष्ट.

अनेक खेडोपाडय़ांमध्ये विजेची समस्या म्हणावी तितक्या चांगल्या तऱ्हेने सुटलेली दिसत नाही. त्यामुळे वीज तयार करून काहीतरी समाजोपयोगी काम करण्याची प्रेरणा चार विद्यार्थी संशोधकांना सुचली आणि त्यासाठी निमित्तमात्र ठरली ‘आविष्कार’ ही स्पर्धा! प्रणव देशपांडे, आदित्य भालेराव, शंतनू कुलकर्णी आणि तनय आखेगावकर हे सध्या नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘आर. एच. सपट ऑफ इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च’मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला आहेत. दुसऱ्या वर्षांला असताना त्यांनी हे संशोधन केलं. विद्यार्थ्यांंमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी, यासाठी राज्यात ‘आविष्कार’ ही स्पर्धा घेतली जाते. ही स्पर्धा विद्यापीठ पातळीवर आणि राज्य पातळीवर भरवली जाते.

चौघांना शालेय जीवनापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती. घरच्या घरी काही छोटेसे प्रयोग करून पाहिले जात. प्रणव देशपांडे ‘डॉन बॉस्को स्कू ल’चा, आदित्य भालेराव हा ‘भोसला मिल्रिटी स्कूल’, शंतनू कुलकर्णी ‘आदर्श विद्यालया’चा आणि तनय आखेगावकर ‘एम. एस. कोठारी विद्यालया’चा. हे चारही विद्यार्थी प्रथम वर्ष मेकॅनिकलच्या वर्गात भेटले. सगळ्यांच्या समान आवडी आहेत हे कळल्यावर काही स्पर्धामध्ये टीम म्हणून सहभागी झाले. मार्गदर्शक प्रा. श्रद्धा देशपांडे यांनी त्यांना या स्पर्धेत सहभागी व्हा, असं सुचवलं. प्रा. देशपांडे यांनी वीज तयार होणं ही संकल्पना घ्यावी, असं सुचवलं. त्यांनी उदाहरण दिलं की, शिवणाचं मशीन पेडल मारल्यावर चालतं, तशा प्रकारचं उपकरण तयार होऊ  शके ल का ते बघा.. त्यावर या चौघांनी सगळ्या बाजूंनी विचार केला. मात्र त्यातून फारसं काही हाती लागलं नाही. पण विजेशी संबंधितच काहीतरी करायचं हे त्यांच्या डोक्यात होतं. त्यातून एक विचार पुढे आला की, नदीच्या पाण्याच्या साहाय्याने वीज तयार करायचा प्रयत्न करावा. आपल्याकडे खूप नद्या आहेत. नदीकिनारी असणाऱ्या गावांमध्ये वीज पुरवता येऊ  शकेल, असं वाटलं आणि त्यावर त्यांचं काम सुरू झालं. या टीमला महाविद्यालयाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. पी. एम. देशपांडे आणि महाविद्यालयाचे डॉ. पी. सी. कुलकर्णी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.

चौघांनी काही कामं वाटून घेतली होती. प्रणव आणि आदित्यने नदीच्या प्रवाहावर काम केलं. प्रणव सांगतो की, ‘पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहतं. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीज निर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असं त्याचं तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. त्या ठिकाणी रोटर्स लावण्यात अर्थ नव्हता. मग एका ठरावीक खोलीवर रोटर्स लावले तर त्याचा उपयोग होतो. आम्ही नाशिकमधल्या गोदावरी नदीत हा प्रयोग करायचं ठरवलं. प्रत्यक्ष नदीवर जाऊन ही सगळी निरीक्षणं आणि पाहणी केली. गोदावरी नदीच्या प्रवाहाच्या गतीची माहिती इंटरनेटवर मिळत नव्हती. ती शोधण्यासाठी मी, तनय आणि आदित्य सोमेश्वरला गेलो. तिथे प्रवाहाची गती वाढलेली दिसते आहे. प्रवाहाची गती मोजण्यासाठी म्हटलं तर तात्काळ उपलब्ध झालेलं साधन वापरलं. तिथे लोकांनी खाऊन टाकलेली मक्याची कणीसं पडलेली असतात. ते पाण्यात टाकून ते ठरावीक जागेवरून दुसरीकडे किती वेळात जातं आहे, हे मोजून पाहिलं आणि प्रवाहाची गती मोजायचा प्रयत्न केला. पहिल्याच ठिकाणी काम न झाल्याने दोन-तीन ठिकाणी सतत चार – पाच वेळा हा प्रयोग करून गती पक्की ठरवावी लागली. कारण गती मोजायचं उपकरण आम्हाला उपलब्ध झालं नव्हतं आणि ठरावीक काळात या गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. त्यानंतर ९ मीटर खोली निश्चित केली. पाण्याचा वेग मोजण्यासाठी केलेला प्रयोग हा म्हटलं तर एक जुगाड होता. तोवर तनय आणि शंतनू यांनी टर्बाइनच्या संदर्भातली तांत्रिक माहिती काढली. प्रयोगाच्या पुढच्या टप्प्यात सगळ्या गोष्टी नीट जुळून आल्यावर या प्रयोगाद्वारे १२ किलोव्हॅट वीजनिर्मिती होऊ  शकते’.

‘आविष्कार’साठी तात्त्विक भाग पाठवायची अंतिम मुदत ऑक्टोबर होती. डिसेंबरअखेरीस नाशिकमध्ये पहिली फेरी होती. तिथे प्रबंधाविषयीची माहिती सादर करायची होती. या चौघांच्या प्रबंधाचं शीर्षक होतं –  ‘डय़ुएल अ‍ॅक्सिस इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय रिव्हर वॉटर’. त्यानंतर पुण्यात मूळ संकल्पना प्रत्यक्षात साकारून किंवा पोस्टर स्वरुपात सादर करायची होती. त्यांनी पोस्टर सादर केलं. सगळ्या नोंदी सादर केल्या होत्या. मात्र त्यांना स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जायला मिळालं नाही; कारण विद्यापीठाचीच परीक्षा होती आणि ती देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वर्ष फुकट जायची जोखीम त्यांनी पत्करली नाही. त्यामुळे अर्थात स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. आता त्यांचं शेवटचं वर्ष आणि अभ्यास या समीकरणांमुळे या विषयाला एक अल्पविराम मिळाला आहे. त्यामुळे हे संशोधन पूर्ण व्हायला अजून साधारणपणे वर्ष लागेल.

या सगळ्या नोंदी करण्यासाठी जवळपास ८ महिन्यांचा कालावधी लागला. या गोष्टींसाठी सगळ्यांच्या घरच्यांचा चांगला पाठिंबा लाभला. काही वेळा नाइलाजाने अभ्यासाची लेक्चर्स बंक करावी लागत होती, कारण हातात वेळ फारच कमी होता. तनय आणि शंतनू या दोघांचे बाबा इंजिनीअर आहेत. त्यांच्या अनुभवाचा या प्रयोगात उपयोग झाला. प्रणवच्या बाबांचा प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. पोस्टर तयार करताना चौघांच्या मनात असणारं चित्र प्रत्यक्षात उतरवलं ते प्रणवच्या बाबांनी. प्रा. देशपांडे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांना या टप्प्यावर पोहोचता आलं, याविषयी चौघं कृतज्ञता व्यक्त करतात. काही काळानं या संकल्पनेचं पेटंट घ्यावं, असं त्यांच्या मनात आलं. प्रणव सांगतो की, ‘मुंबईत इंडियन पेटंट अ‍ॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस’मध्ये पेटंट आणि ट्रेडमार्कची नोंदणी होते. तिथे आम्ही गेलो. तिथले आवश्यक ते फॉर्म भरले. स्पर्धेत सहभागी झाल्याने आमची या विषयाच्या माहितीची सगळी कागदपत्रं तयारच होती. आमच्या नावाने पेटंटची नोंद केली. त्यानंतर मुलाखत घेतली गेली. मात्र पेटंट रजिस्ट्रारमध्ये सविस्तर नोंदवणं अजून बाकी आहे; कारण आमच्या प्रबंधाच्या तांत्रिक नोंदी अद्याप नोंदवायच्या असून त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईला फेरी करावी लागेल’. त्याच्या मते, या क्षेत्रात येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनापासून इच्छा असणं. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, खूप वाचन किंवा इंटरनेटचा योग्य वापर करणं. तसंच नैराश्य न येऊ  देता अपयश पचवायची तयारी हवी. प्रचंड धडपड करण्याची मानसिकता असणं हे गुण आवश्यक आहेत. पदवी मिळाल्यानंतर प्रणव आणि शंतनू एमबीए / एम.ई / एम.एस / एम.टेक. करायचा विचार करत आहेत. आदित्यला सी.डी.एस. (कंबाईण्ड डिफेन्स सर्व्हिसेस) करायचं असून तनयच्या डोक्यात स्टार्टअपचा विचार सुरू आहे. शेवटच्या वर्षांत अभ्यासक्रमातला एक मोठा प्रकल्प चौघांना मिळून करायचा आहे. केवळ अभ्यास एके अभ्यास याच चौकटीत हे रमत नाहीत. आदित्य आणि प्रणवला बासरी वाजवायला आवडतं. तनय बॅडमिंटनचा राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू असून शंतनू ड्रम शिकतो आहे. चौघांनाही त्यांचे छंद जोपासायला पुरेसा वेळ मिळावा आणि त्यांनी यशाची अनेक शिखरं गाठावीत, यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.

viva@expressindia.com