जीजिविषा
सामाजिक पुरुषार्थाच्या संकल्पनेचे धडे मुलांना लहानपणापासूनच गिरवायला शिकवले जाते. या सगळ्यात त्यांचेच नाही तर नुकसान होते ते सगळ्यांचे. मुलं आपल्या भावना लपवू लागतात, पण भावना या हुशार असतात. खरंतर दीडशहाण्या असतात असं म्हणायलाही हरकत नाही. वेळीच तुम्ही त्यांना योग्य त्या मार्गाने बाहेर पडू दिले नाही तर त्या रूप बदलून या ना त्या मार्गाने बाहेर पडतात. आणि ते रूप बऱ्याचदा बीभत्स असते.
प्रिय वाचक मित्र,
आज खूप दिवसांनी ‘दिल चाहता है’ हा चित्रपट बघितला. आत्यंतिक जिव्हाळ्याचा आणि आवडता असा हा चित्रपट. खरंतर तुम्हाला पत्र लिहायला बसायचे होते, पण समोर चित्रपट लावला आणि जरा वेळ गेला. त्या बालकवितेत म्हणतात तसे म्हणायचे झाले तर, पिक्चर बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला. बघता बघता एक खूप विनोदी सीन सुरू झाला. तुम्हाला माहितीच असेल ‘हाँ मैं, मगर वो..’ हां , तोच सीन. समीरचा ब्रेकअप होतो आणि त्यानंतर आमिरचे पात्र म्हणजे आकाश त्याला म्हणतो, ‘मर्द बन.. बी अ मॅन’. त्याच वेळी मला आणखी एक आठवण झाली ती अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या डायलॉगची.. तो आहे ‘मर्द को दर्द नहीं होता’. बस्स्! मला अचानक आजच्या पत्राचा विषय मिळाला.
पुढच्या महिन्यात ‘जागतिक महिला दिन’ आहे. त्यानिमित्ताने मी काहीतरी लिहीनच, पण आजचा लेख खास मुलांसाठी आहे. बऱ्याचदा तुम्ही ही काही प्रसिद्ध वाक्यं ऐकली असतील, ‘बॉइज विल बी बॉइज’ किंवा ‘मुलीसारखा रडू नकोस’ इत्यादी. आमच्या शाळेत तर कित्येकदा मुलांनी केस वाढवले की त्यांचे केस बो किंवा हेअर बँडने बांधून त्यांना प्रत्येक वर्गात नेलं जायचं. आम्हाला तेव्हा हसू यायचं, पण आज लक्षात येतं की ते किती चुकीचं होतं. ते चुकीचं असण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत.
१. एकतर इतर मुलामुलींमध्ये या मुलांना ‘मुलगी’ बनवून त्यांची लाज काढली जायची. त्यांना मुलगी मुलगी म्हणून चिडवले जायचे. मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी.. असे चिडवण्यात काय गैर आहे हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको.
२. त्याचबरोबर एका मुलाने कसे असावे आणि कसे दिसावे याबद्दलची एक आखणी यातून तयार केली जायची.
का बरं असं असावं? जसं मुलींना किंवा स्त्रियांना त्यांनी मुलींसारखे राहावे, वागावे, बोलावे हे सांगणे चुकीचे आहे तसेच हेदेखील चुकीचेच आहे. लहानपणापासूनच मुलांना धीट हो, रडू नकोस, असं सांगितलं जातं. सामाजिक पुरुषार्थाच्या संकल्पनेचे धडे त्यांना लहानपणापासूनच गिरवायला शिकवले जाते. या सगळ्यात त्यांचेच नाही तर नुकसान होते ते सगळ्यांचे. मुलं आपल्या भावना लपवू लागतात, पण भावना या हुशार असतात. खरंतर दीडशहाण्या असतात असं म्हणायलाही हरकत नाही. वेळीच तुम्ही त्यांना योग्य त्या मार्गाने बाहेर पडू दिले नाही तर त्या रूप बदलून या ना त्या मार्गाने बाहेर पडतात. आणि ते रूप बऱ्याचदा बीभत्स असते. क्रोध, हिंसा..हे सगळे याचेच साइड इफेक्ट्स आहेत. आपल्या बोलीभाषेत ज्याला ‘माचो’गिरी म्हणतात ते हेच.
आपल्याकडे पुरुषार्थाच्या संकल्पना मुळातच आत्यंतिक बुळचट आणि सनातनी आहेत. भावना या लिंग बघत नाहीत, समाज बघतो. समाज ठरवतो की कुणी कोणत्या प्रकारची भावना किती तीव्रतेने दाखवायची. अरे भावना या गहू, तांदूळ आहेत का मोजायला? मुळातच पुरुषार्थ आणि स्त्रीत्व या कृत्रिम संकल्पना आहेत हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यांना त्याच ठिकाणी ठेवायला हवे.
एखादा मुलगा जरा नाजूक, जरा कोमल स्वभावाचा असला की त्याला नामर्द, बायकी असे म्हणून चिडवणे हे आत्यंतिक चुकीचे आणि अमानुष आहे. चारचौघांत मारामारी करणे, शिवीगाळ करणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या गोष्टींना बढमवा देणे, किंवा त्या गोष्टीला पुरुषत्वाची एक खूण म्हणून मान्यता देणे हे खरंतर ‘मूर्खपणाचे’ लक्षण आहे.
तुमच्यापैकीही अनेकांना लहानपणापासून असे सांगण्यात आले असेलच. पण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की ‘इट्स ओके टू क्राय’ आणि ‘इट्स ओके टू हॅव फीलिंग्ज’. तुमच्या भावना वैध आहेत, तुम्हाला वाटणारे दु:ख, प्रेम, न्यूनगंड हे सगळं सगळं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच वैधही आहे. पुरुषीपणाच्या त्या जुन्या कल्पना विसरून जा. त्या मुळतच का आहेत?, याबद्दल प्रश्न विचारा आणि लक्षात ठेवा, रडणे किंवा व्यक्त होणे हे कमकुवतपणाचं लक्षण नसून माणूस असण्याचं लक्षण आहे.
जाता जाता एक टीप – कोणतेही काम खूप डोईजड वाटू लागले की त्याला टप्प्याटप्प्यांत विभागून घ्या. एक मोठे ध्येय साध्य करण्यापेक्षा त्याकडे पोहोचवणारे अनेक छोटे छोटे टप्पे गाठणे सोपे जाते.
कळावे,
जीजि