वेदवती चिपळूणकर
प्रत्येक मुंबईकराच्या कानात आणि मनात असलेली, ‘मुंबई की रानी’ हे बिरुद मिरवणारी, एकाच वेळी अनेक क्षेत्रांत काही तरी करू पाहणारी हेडस्ट्राँग एण्टरटेनर म्हणजे मलिष्का. एकाच करिअरच्या चौकटीत अडकून न पडणारी मलिष्का ‘परफॉर्मन्स’लाच पॅशन मानते. तिने ‘डिस्कव्हरी’च्या हिंदी चॅनेलसाठी व्हॉइसओव्हरही दिला आहे आणि म्युझिक बँडसोबत गाणीही गायलेली आहेत. मनोरंजनाच्या सगळ्या क्षेत्रांत काही तरी ‘करून बघायचं’ हा तिचा उसूल आहे.
‘मला माझ्या कामाचा अभिमान आहेच, पण म्हणून मला कोणी त्या एका क्षेत्रापुरतं मर्यादित ठेवलेलं अजिबात आवडणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत मलिष्का आपली भूमिका मांडते. नवनवीन गोष्टींना सतत आपलंसं करू पाहणारी मलिष्का शब्दश: ‘खतरों की खिलाडी’ आहे. रेडिओबद्दल बोलताना मलिष्का म्हणते, ‘मी जे बोलते ते मनापासून बोलते. माझ्या बोलण्याने कोणाच्या आयुष्यात काही चांगला फरक पडत असेल तर मला त्या गोष्टीचा आनंद होतो. एका वेळी अनेक लोक मला ऐकत असतात, माझ्या बोलण्यावर विचार करत असतात. त्यातल्या एखाद्याच्या तरी आयुष्यात माझ्या बोलण्याने काही तरी फरक पडत असतो. यामुळे आपोआप मला ती जबाबदारीही वाटते आणि त्याचं समाधानही मिळतं’. रेडिओवर सगळं लाइव्ह सुरू असल्याने उत्स्फूर्त बोलण्याला खूप महत्त्व असतं. मी कदाचित परफेक्ट टॉकर नसेन, माझे हिंदी – इंग्लिश उच्चार वेगळे असतील, पण माझ्या बोलण्याचा आशय नेहमी खरा असतो, कारण मी ते मनापासून बोलते. मी मनापासून बोलते म्हणूनच माझ्या बोलण्याचा लोक गांभीर्याने विचार करतात आणि म्हणूनच मी, छोटासा का होईना, पण काही तरी बदल घडवू शकते, असे ती अभिमानाने सांगते.
आपल्या कामात आपण अधिकाधिक प्रगती करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. प्रगतीच्या संकल्पना आणि व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, किंबहुना असतातच. काहीजण वाढत्या कमाईला प्रगती मानतात तर काहीजण वाढत्या प्रसिद्धीला! मलिष्काच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीची प्रगती ही त्या व्यक्तिमत्त्वाची असायला हवी. ‘टू बी ऑथेंटिक व्हर्जन ऑफ मायसेल्फ’ हे तिचं उद्दिष्ट आहे. ‘आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो तरी आपोआपच कामाच्या ठिकाणी आपली एक इमेज बनत जातेच. मनोरंजन क्षेत्रात किंवा माध्यमांत तर प्रत्येकच गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. आपण आपली प्रत्येक वैयक्तिक बाजू प्रत्येकाला सांगत नाही किंवा प्रत्येक भावनाही व्यक्त करत नाही. त्यामुळे जे व्यक्त होतं, बोललं जातं, सांगितलं जातं तेच तुमचं व्यक्तिमत्त्व म्हणून मोजलं जातं. मी माझी अशी डय़ुअल पर्सनॅलिटी तयारही केलेली नाही आहे आणि असलेली इमेज सांभाळतही बसत नाही. त्यापेक्षा जास्तीत जास्त खरं वागण्याचा माझा प्रयत्न असतो’, असं ती सांगते. मी जितकी स्ट्राँग जगाला वाटते तितकीच मी भावनिकही आहे. जगाला मी स्ट्राँग वाटते म्हणून मी माझ्या भावना लपवायला जात नाही. ‘खतरों के खिलाडी’मध्ये मला जेव्हा जेव्हा भीती वाटली तेव्हा तेव्हा मी रडलेले आहे. स्क्रीनवर मी रडणं योग्य आहे किंवा नाही, माझ्या स्ट्राँग इमेजचं काय होईल, वगैरे कोणतेच प्रश्न मला तेव्हा पडले नाहीत. कारण स्वत:ला कोणत्याही एका प्रतिमेपुरतं मर्यादित ठेवणं हे मला आवडत नाही’, असंही मलिष्का मोकळेपणाने सांगते.
मलिष्काला लहानपणापासून बोलण्याची, सादरीकरणाची, सगळ्यांना जमवून इव्हेंट्स करण्याची आवड होती. स्वत:हूनच रेडिओ हे क्षेत्र तिने करिअर म्हणून निवडलं. मात्र शक्य तितक्या सगळ्या माध्यमांत आपण प्रयत्न केले पाहिजेत, हा तिचा आग्रह होता. त्यामुळे तिने करिअर सेट करत असतानाच चित्रपटासारख्या माध्यमातही पाय रोवायला सुरुवात केली. कोणत्याही माध्यमात किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात थोडाफार संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. कधी खरं बोललं म्हणून तर कधी स्त्री म्हणून संघर्षांचे प्रसंग येतात. ‘काही वेळा स्त्री म्हणून एखादं विशिष्ट काम नाकारलं जाणं किंवा कितीही चांगली कल्पना असली तरी ती नाकारणं असे प्रसंग येतात. स्त्रिया त्यांच्या पोस्टवर ठाम राहून काम करतात, मात्र त्या त्यांचे काम करत असताना बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना त्यांच्याबद्दल असूया आणि परिणामी राग वाटायला लागतो. कोणी पुरुष कोणत्याही स्त्रीला मुद्दाम त्रास देत असेल तर त्याबद्दल बोललं पाहिजे,’ असं मलिष्का म्हणते. ‘मला एखादी अन्यायकारक गोष्ट माहिती आहे आणि तरीही मी बोलले नाही तर ती माझी सगळ्यात मोठी चूक ठरते. त्यामुळे न घाबरता अशा प्रसंगांना तोंड दिलं पाहिजे’, असा ठाम सल्लाही ती देते.
मलिष्काच्या दृष्टीने ती एक सामान्यच मुलगी आहे. प्रत्येक सामान्य माणसात कोणती ना कोणती ताकद असते. काहीजण त्या क्षमतेचा उपयोग करून घेतात तर काहीजणांना ते जमत नाही. सामान्य माणसातल्या बोलण्याच्या, व्यक्त होण्याच्या भीतीवर मात करून बोलघेवडी मलिष्का असामान्य ठरते.
मी रेडिओमध्ये आले, मात्र मला अनेक गोष्टी करायची इच्छा होती, उत्सुकता होती आणि नवीन गोष्टी ट्राय करून बघण्याची तयारीसुद्धा होती. येणाऱ्या नवीन मुलामुलींनी पेशन्स ठेवणं, ओपन माइंड ठेवणं आणि आपलं काम एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. एकाच चौकटीत अडकून न पडता अनेक गोष्टी करणं आणि रोज काही तरी नवीन करत राहणं, स्वत:मध्ये चांगले बदल करत राहणं गरजेचं आहे. मी सतत काही तरी नवीन करत राहते, ज्याने मी माणूस म्हणून नवीन अनुभव घेत असते, काही तरी बदल घडवत असते. आपण आपल्या एथिक्स आणि मॉरल्सची घडण पक्की ठेवली तर कोणत्याही क्षेत्रात टिकणं सोपं जातं.
– मलिष्का
viva@expressindia.com