डॉ. अपूर्वा जोशी

स्टार्टअपचं विश्व काही निराळंच असतं. मध्यंतरी एका शिक्षण संस्थेत व्याख्यान देण्यासाठी मी गेले होते, तिथे अनेक विद्यार्थी बसलेले. काही श्रोते हे ‘लोकसत्ता’मध्ये मी लिहीत असलेल्या सदराबद्दल बोलायला आलेले. त्यांच्यापैकीच एक होते विनय मोघे. पुण्यातल्या काही महत्त्वाच्या इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्सपैकी एक असलेल्या मोघेंना स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायची असल्याने ते माझ्या व्याख्यानाला तिथे आले होते.

माझं भाषण संपल्यावर मला डायसवरून खाली येताना थोडा वेळ लागणार होता, तेवढय़ात एक विद्यार्थिनी मोघेंजवळ गेली आणि तिने काही गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि मी तिथे पोचेपर्यंत ती निघूनपण गेलेली. थोडय़ा वेळाने माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले की मी खरंतर आलेलो तुम्हाला स्टार्टअपबद्दल काही गुंतवणुकीच्या संधी आहेत का हे विचारायला.. पण मला आत्ताच एका मुलीने तिच्या विजेची गरज कमी करणाऱ्या एका उपकरणाबद्दल माहिती दिली. मी तिला पुन्हा बोलावलं आहे संपूर्ण बिझनेस प्लॅन घेऊनच. म्हणजे मी डायसवरून खाली उतरून प्रवेशद्वारापर्यंत येईपर्यंत, काही क्षणांत एका होतकरू व्यावसायिकाने आपली कल्पना गुंतवणूकदाराला सांगितली होती. स्टार्टअपच्या भाषेत या घटनेला ‘एलेव्हेटर पीच’ असे संबोधले जाते.

मागच्या सदरात मी म्हटल्याप्रमाणे नुसती कल्पना असून व्यवसाय बांधता येत नाही त्यासाठी कल्पना जोपासायला लागते, त्यावर सतत विचार करायला लागतो. स्टार्टअपच्या विश्वात वावरत असताना तुम्हाला अनेक मंडळी भेटत असतात. सध्या काय करतोस?, असा साधा प्रश्न विचारणाऱ्या आप्तेष्टांपासून ते एखाद्या मोठय़ा गुंतवणूकदारांच्या मेळाव्यापर्यंत अनेक ठिकाणी तुम्हाला तुमच्या व्यवसायाबद्दल बोलावं लागतं, यासाठी करावा लागतो तो अभ्यास. व्यवसाय कितीही क्लिष्ट प्रश्न सोडवणारा असला तरी तुम्हाला तो समोरच्याला सोप्या शब्दांत सांगता आला तरच त्याचे कुतूहल जागृत होते.

स्टार्टअप विश्वात गुंतवणूकदार खूप महत्त्वाचा मानला जातो, तो केवळ पैसे गुंतवतो म्हणून महत्त्वाचा नसतो तर तुमच्या स्वप्नांवर, तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवणारा आणि तुमची कल्पना पुढे रेटणारा महत्त्वपूर्ण दुवा असतो.

बरेचदा गुंतवणूक ही पैशासाठी घेतली जात नाही तर त्या गुंतवणूकदाराच्या नावामुळे होणाऱ्या फायद्यांसाठी घेतली जाते. गुंतवणूक ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत करावी लागते, पण गुंतवणूकदारांमुळे उघडणारी संधीची दारं ही त्या गुंतवणुकीपेक्षा महत्त्वाची ठरतात. अनेकदा गुंतवणूकदार मंडळी एखाद्या वस्तूचा खप वाढवायलादेखील मदत करतात.

लिफ्टमधला प्रवास असा किती वेळ चालतो? मुंबईमधली ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ची लिफ्ट कदाचित दोन मिनिटं वरखाली करत असेल, पण आमच्या ऑफिसच्या लिफ्टचा प्रवास काही सेकंदांत संपतो. प्रत्येक प्रवासाकरता भिन्न प्रकृतीचा एलेव्हेटर पीच तयार करणे आवश्यक असते. एलेव्हेटर पीच ही तुम्ही तुमच्या व्यवसायाची केलेली एक अभ्यासपूर्ण जाहिरात असते, लिफ्टमध्ये गुंतवणूकदार भेटल्यास त्याला तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल अशा काय गोष्टी सांगाल ज्यामुळे तो म्हणेल छान मला अजून ऐकायचं आहे तुझ्या व्यवसायाबद्दल किंवा तो तुम्हाला कार्ड देऊन सांगेल की मला माझ्या ऑफिसवर येऊन भेट. या एका भेटीसाठी तुम्हाला खूप तयारी करायची असते, खूप लिखाण करायचं असतं, कारण एलेव्हेटर पीच हे काही फक्त तुमच्या कल्पनेबद्दल नसतं तर ते तुमच्याबद्दल समोरच्याचं पहिलंवहिलं इम्प्रेशन असतं. भले तुमचे काम होवो अथवा ना होवो तुम्हाला त्या माणसावर तुमची छाप सोडायची असते. कमीतकमी शब्दांत तुमच्या व्यवसायाची माहिती देण्याची सवय एकदा लागली की मग तुमच्या व्यवसायाला तुम्ही इतरही लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकता.

गेल्या काही महिन्यांत मला अनेक स्त्री उद्योजिका भेटल्या, त्यांच्या व्यवसायाच्या विविध कल्पना असतात. मध्यंतरी मला एक ताई भेटलेली ती पाळीव कुत्र्यांच्या मालकांसाठी एक संकेतस्थळ बनवत होती, पण मी जेव्हा तिला विचारलं की तू नक्की काय करते आहेस? त्यावर तिने मला उत्तर दिलं की मी पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी फेसबुक बनवते आहे. हे सगळ्यात सुंदर एलेव्हेटर पीच, तिने फार काही न सांगताच मला तिच्या व्यवसायाची पूर्ण जाणीव झाली.

बऱ्याचदा समोरच्या माणसाला पाहून तुम्हाला तुमची कल्पना सांगावी लागते.  साधारणपणे तुमच्या एलेव्हेटर पीचमध्ये जर खालील घटक असतील तर गुंतवणूकदार किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींची उत्सुकता नक्की ताणली जाते.

आज समाजासमोर अमुक एक प्रश्न आहे, जो मी अमुक एका पद्धतीने सोडवणार आहे, त्याची बाजारपेठ अमुक एक कोटींची आहे, त्यातली किमान अमुक एक टक्के बाजारपेठ माझ्या या प्रयोगाने मी काबीज करू शकते, पण अमुक-तमुक कारणांसाठी मला तुमची भेट घ्यायची आहे. ही चार-पाच वाक्यं ऐकल्यानंतर समोरच्याला तुमच्या पूर्ण कल्पनेची जाणीव झाली तरच तुमचे एलेव्हेटर पीच यशस्वी झाले असं समजायचं.

viva@expressindia.com