जीजिविषा काळे

मुलांना तुम्ही अनेकदा ब्रो-कोडबद्दल बोलताना ऐकले असेलच, पण हा आहे सिस-कोड. ज्याचा एक नियम हा आहे की, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीची निंदा करू नये. कुणी इतर वाईट आहे म्हणून तुम्ही चांगल्या आहात हे तुम्हाला तरी पटेल का?

प्रिय वाचक मित्र,

८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो हे आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अनेक वेळा माझे मित्र माझ्याशी वाद घालत असतात की मेन्स डे का नाही? वुमेन्स डे साजरा केला जातो तो लिंगभेद याबद्दल भाष्य करायची संधी मिळण्यासाठी.. अनेक वर्षे झाली तरी आपल्या समाजात अजूनही स्त्रियांना दुय्यम दर्जाचे मानले जाते आणि याबद्दल दुमत असणे शक्य नाही. त्यामुळे या विषयाबद्दल जाणीव होत रहावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ज्या दिवशी ही जाणीव करून द्यायची गरज भासणार नाही त्या दिवशी असा एक दिवस साजरा करायचीही गरज भासणार नाही.

पण आजचे हे माझे पत्र माझ्या पुरुष मित्रांसाठी नसून स्त्रियांसाठी आहे. रोजच्या जीवनात तुम्हाला अनेक वेळा दुय्यम स्थान दिले जाईल, तुमच्या क्षमतेवर प्रश्न केले जातील, तेव्हा तुम्हाला सतत स्वत:ला सिद्ध करण्याचे शिवधनुष्य उचलावेच लागेल; पण हे सर्व करत असतांना हे मात्र विसरू नका, की इतर स्त्रियाही त्याच त्रासातून जात आहेत. अनेक वेळा तुम्ही तुमच्यापेक्षा मोठय़ा बायकांकडून ऐकले असेलच, ‘बाईचा जन्म फार वाईट बाई’. का म्हणत असतील बरे त्या असे? कारण त्यांना लहानपणापासूनच सोशिक असण्याचे धडे गिरवायला लावले होते. स्त्री ही परावलंबी असते हे तर गुरुजी अगदी लग्न लावतानादेखील बोलून दाखवतात. तुम्हीच सांगा, मग का बरे आवडेल कुणाला स्त्रीचा जन्म? पण मला आवडतो.

मुलगी म्हणून टप्प्याटप्प्यावर मला सतत स्वत:ला सिद्ध करावे लागते, पण तरीही मला स्त्री म्हणून जन्म घेतल्याचा आनंद आहेच, कारण जेव्हा मी प्रगती करते तेव्हाच मी माझ्याबरोबर आणखी स्त्रियांना मदत करू शकते. या जगात तुम्ही कुणाला सगळ्यात मोठी मदत करू शकत असाल तर ती ही आहे, ज्यांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी संधी निर्माण करण्याची मदत. हे सर्व करत असताना विसरू नका, की तुमची आई, आजी, मामी, मावशी, घरी काम करायला येणाऱ्या मावशी या सगळ्याच स्त्रिया आहेत. अनेक वेळा मी बघते की, ज्या मुली स्वत:ला स्त्रीवादी म्हणवतात त्यांना स्वत:ला तर समान हक्क हवा असतो, पण त्या या बाकीच्या सर्व गोष्टी विसरतात. घरातली कामे मीच का करायची, असे म्हणून चिडून बसतात, पण वडिलांना किंवा भावाला कामाला लावायचे पाऊल उचलत नाहीत. मग काय होते? आईला सगळ्यांची कामं करायला लागतात. हेही तितकेच चुकीचे आहे. समान हक्क हा फक्त आपल्या सोयीनुसार मागून चालत नाही.

दुसरे आणि अगदी चुकीचे विधान जे एक कौतुक म्हणून घेतले जाते ते म्हणजे, ‘तू इतर मुलींसारखी नाही आहेस’. यात मुळात कौतुक वाटण्यासारखे काहीच नाही. कारण जेव्हा आपण हे कौतुक मानून घेतो तेव्हा आपण एका झटक्यात आपल्या पूर्ण स्त्रीजातीकडे स्वत:च तुच्छतेने बघू लागतो. आपण पुरुषाच्या नजरेतून स्वत:चे मूल्य स्वीकारू लागतो. इतर मुली जशा आहेत तशा आहेत, त्यांच्यात वाईट गुण असतील तसेच चांगलेही असतीलच ना? कुणीही तुमचे कौतुक करते तेव्हा लक्ष द्या की ते तुमचे कौतुक आहे की इतरांची निंदा.. जेव्हा कुणी तुम्हाला हे म्हणेल त्यांना आवर्जून सांगा, की तुला माझ्यात काय आवडते ते सांग, त्यासाठी इतरांमध्ये काय कमी आहे, काय वाईट आहे ते नको सांगूस आणि मग ऐका त्यांचे काय म्हणणे आहे ते.

मुलांना तुम्ही अनेकदा ब्रो-कोडबद्दल बोलताना ऐकले असेलच, पण हा आहे सिस-कोड. ज्याचा एक नियम हा आहे की, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या स्त्रीची निंदा करू नये. कुणी इतर वाईट आहे म्हणून तुम्ही चांगल्या आहात हे तुम्हाला तरी पटेल का? कोणतीही स्वाभिमानी स्त्री या अशा हलक्या कौतुकाला बळी पडावी असे मला वाटत नाही म्हणून मी हे तुम्हाला सांगते आहे.

बाकी जाता जाता आजची टीप – मुळात ही टीप नसून ‘मोहब्बते’ं चित्रपटातला एक डायलॉग आहे सगळ्यांसाठी.. कोई प्यार करे, तो तुमसे करे. तुम जैसे हो, वैसे करे. और अगर कोई तुम्हे बदल के प्यार करे वह प्यार नहीं सौदा है!

कळावे,

जीजि