तन्मय गायकवाड
गेल्या काही वर्षांत सायन्स आणि टेक्नॉलॉजी कॉलेजमधले फेस्टिव्हल हे अगदी सर्वसामान्य माणसांनाही आकर्षित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पनाशक्तीने अभ्यासपूर्वक बनवलेल्या गोष्टी बघण्याचं हक्काचं स्थान म्हणजे हे टेक्निकल फेस्टिव्हल. देशभरात सध्या अनेक कॉलेजेसमध्ये टेक्निकल फेस्टिव्हल झाले आहेत किंवा अनेक ठिकाणी फेस्टिव्हल्सना नुकतीच सुरुवात झाली आहे. या टेक्निकल फेस्टिव्हलमध्येही दरवर्षी बाकीच्या फेस्टिव्हलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्ड पाहायला मिळतात. अशाच काही ट्रेण्डिंग टेक्निकल गोष्टींचा आढावा..
कॉलेज म्हटलं की तिथे सेलिब्रेट होणारे डेज, स्पर्धा, आय.व्ही., मज्जा मस्ती आणि अभ्यास हा आलाच. याच बरोबरीने कॉलेजला जाणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणींसाठी महत्त्वाचा असतो तो त्यांच्या कॉलेजचा फे स्टिव्हल. नाच, गाणं, नाटक याबरोबरीने टीम वर्क, मार्केटिंग, प्रेझेंटेशन अशा अनेक गोष्टींना वाव देणारं व्यासपीठ म्हणून कॉलेज फेस्टिव्हलकडे पाहिलं जातं. अर्थात, प्रत्येक कॉलेजचा फेस्टिव्हल हा वेगळाच असतो हे लक्षात घेतलं तरी आर्ट्स, कॉमर्स कॉलेजचे फेस्टिव्हल आणि सायन्स-टेक्नॉलॉजी कॉलेज फेस्टिव्हल यामध्ये फरक असतो. प्रत्येकाच्या विषयानुसार फेस्टिव्हलची थीम असते. तिथे होणारे इव्हेंट असतात. पण गेल्या काही वर्षांत सायन्स आणि टेक्नॉलॉजी कॉलेजमधले फेस्टिव्हल हे अगदी सर्वसामान्य माणसांनाही आकर्षित करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या अफाट कल्पनाशक्तीने अभ्यासपूर्वक बनवलेल्या गोष्टी बघण्याचं हक्काचं स्थान म्हणजे हे टेक्निकल फेस्टिव्हल. देशभरात सध्या अनेक कॉलेजेसमध्ये टेक्निकल फेस्टिव्हल झाले आहेत किंवा अनेक ठिकाणी फेस्टिव्हल्सना नुकतीच सुरुवात झाली आहे. या टेक्निकल फेस्टिव्हलमध्येही दरवर्षी बाकीच्या फेस्टिव्हलप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेण्ड पाहायला मिळतात.
यंदा अगदी पबजी गेमपासून ते रोबोवॉरपयर्ंत अनेक ट्रेण्ड वेगवेगळ्या कॉलेजच्या फेस्टिव्हलमध्ये दिसून आले. ‘पबजी’सारख्या मोबाइल गेमने सगळ्याच तरुणांना वर्षभर आपल्यापाशी घट्ट धरून ठेवलं आहे. हेच हेरून अनेक टेक्निकल फेस्टिव्हलमध्ये यंदा पबजी गेमचं आयोजन केलेलं पाहायला मिळालं. एकीकडे या गेमचे व्यसन लागलेल्या तरुणाईला त्यापासून दूर ठेवण्याची ओरड होत असताना फेस्टिव्हल्समधून मात्र त्यासाठी खुलं आवतन होतं. हा गेम नक्कीच ट्रेण्ड सेटर आहे कारण अशा पद्धतीचा मोबाइल गेम पहिल्यांदाच कॉलेज फेस्टिव्हल्समध्ये इव्हेंट म्हणून खेळवला जातो आहे. या खेरीज गेल्या काही वर्षांपासून ट्रेण्डमध्ये असलेले पी सी गेम्स अर्थात संगणकावर खेळले जाणारे खेळही ट्रेण्डमध्ये होते. यामध्ये सी. एस. गो. (काऊंटर स्ट्राईक) गेम, डोटा गेम आणि पबजी पीसी गेमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकंदरीत यातून मुलांना डिजिटली वॉर खेळायला जास्त आवडतं हे दिसून येतं. खेळानंतर ट्रेण्डमध्ये बाजी मारली ती ड्रोनने. ड्रोन चॅलेंज हे तर सगळ्याच कॉलेजेसच्या इव्हेंटमध्ये पाहायला मिळालं. ‘एफ.पी.वी.’ म्हणजे ‘फर्स्ट पर्सन व्ह्य़ू’ या पद्धतीचे ड्रोन ‘ड्रोन रेसिंग’ या इव्हेंटमध्ये वापरले जात आहेत. यामध्ये ड्रोन चालवणारा ड्रोन गॉगल घालतो. त्यामुळे ड्रोनवर लावलेल्या कॅमेऱ्यामधून टिपले जाणारे दृश्य थेट तो चालवणाऱ्याला दिसू शकतं. या ड्रोनचा वापर फक्त अशा स्पर्धा खेळण्यासाठी किंवा रेसिंगसाठीच होतो.
ड्रोनचा सर्वाधिक वापर सध्या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये केला जातो आहे. फक्त सिनेमॅटिक शॉट घेण्यासाठी त्यावर कोणताही अॅक्शन कॅमेरा लावला जातो. ड्रोनमुळे अनेक लांबची किंवा उंचावरची दृश्ये घेणं सहजशक्य झालं आहे. ड्रोनप्रमाणेच फेस्टिव्हल्समधून रोबो वॉरची चर्चाही चांगलीच रंगली होती. रोबो वॉरमध्ये रोबोच्या वजनानुसार लढत होते. कोणत्याही वजनाचे रोबोट इतर कोणत्याही वजनाच्या रोबोटपुढे लढतीसाठी कधीही उभे केले जात नाहीत. समसमान वजनाच्या रोबोमधेच नेहमी वॉर रंगते. समोरचा रोबोट संपूर्णपणे निकामी होईपर्यंत हे वॉर रंगते. काही वॉरमध्ये रोबोटला त्याच्या मेकरकडून हॅन्डल केलं जातं तर काही स्वत:हून वॉर करणारे रोबोटही असतात. रोबोटमध्ये कोडिंग केली जाते आणि त्याला सिस्टीमने ट्रेन केलं जातं. अशा रोबोसोबत लाइन फॉलोईंगचे अनेक खेळ खेळले जातात. कॅरमप्रमाणे कवडय़ा गोलमध्ये ढकलायचे खेळसुद्धा रोबोच्या मदतीने खेळले जातात. यात मोठय़ा बॉक्समध्ये प्रतिस्पर्धी दोन रोबोट असतात त्यांना बॉक्समध्ये असलेले क्यूब बरोबर बॉक्सच्या भोकात ढकलायचे असतात. धोक्याची सूचना देण्यासाठी बनवलेल्या रोबोचीही यंदा चर्चा आहे. अनेकदा पोलीस किंवा अन्य सिस्टीम्स धोक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. अशावेळी तिथे जाऊन तिथला जागेचा नकाशा किंवा चित्रं मिळवण्याचं काम करता येईल असेही रोबो तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, एआयचा प्रभाव इथेही दिसून आला.
आर्टिफिशियल इंटिलिजन्स असलेले रोबोही अनेक कॉलेज टेक्निकल फेस्टिव्हलचे आकर्षण होते. यामध्ये परदेशातून आलेल्या ‘सोफिया’ची क्रेझ आजही असल्याचं दिसून येतं आहे. कारण तिला किंवा तिच्या सारख्या रोबोटला बघण्यासाठी अनेकदा लोक तासन्तास रांगेत उभे राहतात. आपल्यासारखी उत्तरं देऊ शकणाऱ्या रोबोटला काही प्रश्न विचारून उत्तर मिळवण्याची मजा अनुभवतानाही तरुणाई दिसते आहे. तुम्हाला एखाद्या जागेवर उभं राहून दूरच्या ठिकाणी किंवा देशात गेल्याचा अनुभवता घेता आला तर? किती मस्त ना. हे असं शक्य आहे. ऑग्मेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या तंत्रामुळे फेस्टिव्हलमधली रंगत वाढत चालली आहे. हे तंत्रही यंदा ट्रेण्डमध्ये असल्याचं दिसून आलं. व्हर्च्युअल रिअॅलिटीचे गॉगल डोळ्यांवर चढवून एकाच ठिकाणी उभं राहून अनेक ठिकाणचा अनुभव घेण्यातला आनंद अनेकांनी कॉलेज फे स्टिव्हलमधून लुटला आहे. भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्या संस्थांचं प्रेझेन्टेशन आणि मॉडेलरूपी प्रोजेक्टही या वर्षी अनेक टेक्निकल फेस्टिव्हलमध्ये दिसले. यामुळे तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या देशातील या महत्त्वाच्या संस्थांविषयी आणि त्यांच्या कामाविषयी माहिती मिळत होती. आपल्या देशातील कोणत्या भागात कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि त्यांचं काम कसं चालतं याची माहिती कॉलेज फेस्टिव्हल्समध्ये सहज मिळाली. अशा खेळांसोबत टेक्निकल क्विझची सुद्धा चलती यंदा पाहायला मिळाली. यामध्ये ट्रेण्डिंग टेक्निकल टम्र्स, रोबोट सिस्टीम, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या संस्था, शास्त्रज्ञ याबद्दलचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. वायर मेज, रोबोट फुटबॉल, जाळीमध्ये टच न करता ड्रोन उडवणे असे अनेक टेक्निकल खेळही यंदा ट्रेण्डमध्ये होते. असे खेळ फेस्टिव्हलमधून सर्वसामान्यही सहजपणे आणि आवडीने खेळताना दिसत आहेत. याशिवाय, तेल आणि पाणी वेगवेगळं करणारं यंत्र, एकाचवेळी अनेक सव्र्हरद्वारे अनेक यंत्रणांशी संपर्क साधण्यासाठी तयार केलेलं यंत्र, एखादं यंत्र किंवा सिस्टीम बंद पडली तर स्वत:हून लोकांची मदत होईल अशी सिस्टीम, सीसीटीव्ही पेक्षाही हुशार, संशयास्पद हालचालींना सहज टिपणारा कॅमेरा अशा प्रकारचे अनेक प्रोजेक्ट्स यंदा टेक्निकल फे स्टिव्हल्सचे आकर्षण ठरले आहेत.
एकंदरीत टेक्निकल फे स्टिव्हलमध्ये समाजोपयोगी आणि पर्यावरण पूरक अशा गोष्टींचा ट्रेण्ड पाहायला मिळतो आहे. आजची तरुण पिढी आपल्या आजूबाजूला जे सुरू आहे ते टिपून त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करतेय. समस्यांचं मुळापासून उच्चाटन जरी होत नसलं तरी काही प्रमाणात तरी ती समस्या सुटेल अशा गोष्टी बनवण्याचा प्रयत्न आजची तरुण पिढी करते आहे. याची जाणीव करून देणारे हे टेक्निकल फेस्टिव्हल्स म्हणजे एकाअर्थी भविष्यातील तंत्रज्ञानाची झाँकी आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये!
viva@expressindia.com