वेदवती चिपळूणकर, गायत्री हसबनीस viva@expressindia.com

तोच कॉलेजचा कडक चहा मिळणार का, आपला ग्रुप कॉलेजमध्ये इतक्या दिवसांनी भेटणार तेव्हा काय फीलिंग असेल, लायब्ररीतल्या पुस्तकांचा परत एकदा सुवास घ्यायला मिळणार का, कॉलेज कट्टा पूर्वीसारखा बहरणार का, अड्डय़ावरील गप्पा कशा असतील, कॉलेज रोमिओंना पूर्वीसारखी हिरवळ पाहायला मिळेल का, अशा अनेक शंकाकुशंका या तरुण पिढीच्या मनात नक्कीच आहेत. पण या प्रश्नांपलीकडे जात त्यांच्या मते हे न्यू नॉर्मल लाइफ पूर्णत: पदरी पडलं नसल्याने या सगळ्याची हळूहळू सुरुवात होते आहे, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे सगळी बंधनं झुगारून परत पहिल्यासारखं कूल वागून चालणार नाही, नाही तर आपणच फूल होऊ याचीही खात्री त्यांना आहे.

करोनाचा काळ पूर्ण संपला असं जरी म्हणता येत नसलं तरी बहुतेक सर्वच बाबतीत आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर यायला लागली आहे. शाळा-कॉलेजेस पुन्हा सुरू झाली आहेत. अगदी पूर्वीसारखी नाहीत, तरी निदान मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता येतं आहे, थोडीफार धमाल करता येते आहे, शिक्षकांशी थेट संपर्क होतो आहे. आणि या सगळ्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम सगळ्यांच्याच मनावर होतो आहे. केवळ शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे तर कॉलेजमधले इतर कर्मचारीसुद्धा ‘बॅक टू नॉर्मल’ फीलचा आनंद घेत आहेत. कॅन्टीनमध्ये पुन्हा आवाज गजबजतोय, लायब्ररीत पुस्तकांवरची धूळ झटकली जाते आहे, गेटवरच्या वॉचमन काकांना पुन्हा रोज गुड मॉर्निग ऐकायला मिळतं आहे. या सगळ्याने कॉलेजमधल्या तरुणाईत पुन्हा उत्साह संचारला आहे. दीड वर्षांत जे जे काही हरवलं होतं, मिस केलं होतं ते आता नव्याने सुरू होते आहे. न्यू नॉर्मल लाइफमधील प्रवेशाने तरुणाईला आनंद झालाय खरा, पण या सेलिब्रेशनकडे पॉझिटिव्हली पाहत तरुण पिढी आपल्या महाविद्यालयीन आयुष्यात काकणभर जपून उत्साहाचा आनंद लुटते आहे, हे खुद्द त्यांच्याशीच बोलल्यावर समजले.

तरुणाईला महाविद्यालयीन आयुष्याचे वेड अधिक आहे, त्यामुळे अभ्यास, परीक्षा इत्यादींचीही जवळीक त्यांना मनापासून हवी आहे हे त्यांच्या बोलण्यावरून कळते. ‘कॉलेज प्रत्यक्ष सुरू झाल्याने काही वेळा प्रॅक्टिकल करताना येणाऱ्या अडचणी नक्कीच सुटणार आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष जाता आल्याने लेक्चरमधला सहभाग वाढेल आणि गोष्टी समजायला अजून चांगली मदत होईल,’ असं मतं मिहिर शेटे या ‘जेएमसी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’तून एम.ए. करणाऱ्या तरुणाने व्यक्तके ले. तर ‘कॉलेज सुरू झाल्याने यापुढील परीक्षा या ऑनलाइन होणार नाहीत याचा आनंदच अधिक आहे. परीक्षेला जाण्यासाठी होणारी घाई, आगाऊपणे आयत्या वेळी केलेला अभ्यास, मित्रांसोबत परीक्षेअगोदर होणाऱ्या गप्पा या ऑनलाइनमुळे झाल्याच नाहीत. त्यामुळे एक प्रकारे कॉलेज सुरू होण्यासाठी परीक्षेचा तो अनुभव परत मिळेल यानेच खूप आनंद झाला आहे,’ असं ठाण्यात शिकणारा मित्र सागर म्हणतो. एका मैत्रिणीने असंही सांगितलं की, शिक्षकांशी असणारा रॅपो आता परत घट्ट होईल, कारण मित्रांप्रमाणे शिक्षकांबरोबरचे मैत्रीपूर्ण नातेही अनन्यसाधारण असते.  काहींच्या मते प्रत्यक्ष होणारा अभ्यास हा जास्त सखोल असतो, तर काहींच्या मते शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलणं होणं हे विषय समजण्यासाठी गरजेचं असतं. मात्र केवळ अभ्यासाच्या दृष्टीनेच नव्हे तर आयुष्य पुन्हा सुरळीत होतं आहे, अशी भावना सगळ्यांची आहे. लवकर उठून कॉलेजला पळायचं, वेळेच्या आत कसंबसं पोहोचायचं, एका लेक्चरमधून दुसऱ्या लेक्चरमध्ये पळायचं, ढीगभर फॉम्र्स आणि फी भरण्यासाठी रांगा लावायच्या, या आणि अशा अनेक मोडलेल्या सवयी पुन्हा लावून घेताना आता तरुणाईला त्रास कमी आणि  उत्साह जास्त वाटतो आहे. आरोग्याची संपूर्ण काळजी घेत, कोणताही हलगर्जीपणा न करता आणि तरीही मजेत आपलं ‘कॉलेज लाइफ’ एन्जॉय करायला तरुणाई शिकली आहे. महाविद्यालयाचा पहिला दिवस हाऊसफुल्ल जरी असला तरी कित्येकांनी कॉलेजला दांडीही मारली. नवरात्र नुकतीच संपून दिवाळीचे दिवस उजाडले होते त्यात आणखी एक धमाका म्हणजे चित्रपटगृहे, नाटय़गृहे सुरू झाली. महिनाभर बातम्यांमधून नाटक पाहिले, आता मन ताजंतवानं होईल असं खरंखुरं अर्थपूर्ण नाटक  पाहू या म्हणून तरुण ठाणेकरांनी, पुणेकरांनी नाटकांना हजेरी लावली. सिनेमांच्या तुलनेत मराठी नाटक पाहायला ही मंडळी धावली होती. काहींच्या मते सिनेमा तर ओटीटीवर पाहतच होतो, त्यातून थिएटरमध्ये सिनेमा पाहायची इच्छा आहेच; परंतु नाटकं पाहण्याची झिंग दीड वर्षांने अनुभवायला मिळणार होती. त्यामुळे पहिले प्राधान्य नाटकांनाच दिले. आता अर्थात जेम्स बॉण्डच्या चित्रपटाला कोण नाही म्हणणार? त्यामुळे तोही पाहून झाला. ‘सूर्यवंशी’ पाहण्याचाही काही तरुण मित्रमैत्रिणींचा प्लॅन आहे, जो कॉलेज कट्टय़ावर पहिल्याच भेटीत ठरला आहे. मुलींसाठी तर सध्या खरेदी किती करू आणि किती नाही असंच झालं आहे. कॉलेज लाइफची सुरुवात ही खरेदीने नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे मुली काय, मुलं काय.. सर्वाचे खरेदीचे मनसुबे पूर्ण झाले आहेत. दिवाळी पार्टी कॉलेजमध्ये करायची असंही काहींचं ठरलं आहे. ज्यांचे कॉलेज घराजवळ आहे त्यांना तरी कॉलेजला यायला जमेल तेव्हा निदान कमीत कमी गर्दी जमवत त्या पद्धतीने पार्टी करायला काय हरकत आहे? म्हणून योग्य काळजी घेत तरुणाईची धमाल-मस्ती तरी यानिमित्ताने सुरू झाली आहे. कॅन्टीन बंद असल्याने काही कॉलेजमध्ये मित्रमंडळींच्या घराच्या डब्याची चवही घेता आली. आता दिवाळीची सुट्टी पडल्याने कॉलेज काही दिवस तरी पाहता येणार नसलं तरी या नव्याने सुरू झालेल्या पर्वामुळे जुनंच नव्याने सेलिब्रेट करता आलं, असं तरुणाईला प्रामाणिकपणे वाटतं आहे.