|| वैष्णवी वखारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाइन बनवणं हा माझ्या बाबांचा छंद आहे. लहानपणापासून मी त्यांना द्राक्ष, अननस, बीट इत्यादींपासून वाइन करण्यासाठी मदत करते आहे. त्यातूनच मला वाइनविषयी गोडी लागली. पुढे वाइनमध्येच करिअर करण्याचं निश्चित झाल्यावर बारावी सायन्सनंतर ‘कोकण कृषी विद्यापीठा’तून बी.टेक. (फुडटेक) केलं. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फूड टेक्नॉलॉजी’, ‘युथ हॉस्टेल ऑफ इंडिया’ आणि ‘मुंबई खगोल मंडळा’ची मी सदस्य आहे. मला मोडी लिपीचीही जाण आहे. वाइनरीमध्ये इंटर्नशिप करायची असल्याने आणि आमच्या महाविद्यालयात हा विषयच नवीन असल्याने मीच धडपड करून वाईला एक वाइनरी शोधून काढली. वाइनरीच्या संचालकांना विनंती करून तिथे इंटर्नशिप केली. तिथल्या चार महिन्यांच्या इंटर्नशिपमध्ये मला कॅनडाचे प्रसिद्ध फ्रुट वाइनतज्ज्ञ आणि सल्लागार डॉमनिक रीवार्ड्स यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी ‘युनिव्हर्सिटी कॅटोलिका डेल सॅक्रो क्युओर’वगळता दुसऱ्या कोणत्याच विद्यापीठात अर्ज केला नाही.

या अनवट विद्यापीठाचे एजंट वगैरे नसल्याने सगळी प्रवेशप्रक्रिया स्वत:च पार पाडली. संपूर्ण फीच्या ३० टक्के स्कॉलरशिप मला मिळाली. या अभ्यासक्रमामध्ये मास्टर्सला केवळ २०जणांनाच प्रवेश असतो. एसबीआयकडून शैक्षणिक कर्ज विनासायास मिळालं. अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे म्हणजे इटलीचा व्हिसा. या प्रक्रियेचा फारच त्रास झाला. दहावीपासून ते बी. टेकपर्यंतची सगळी सर्टिफिकेट्स, मार्कशीट्स आणि इतर कागदपत्रं इटालियन भाषेत भाषांतरित करावी लागली. त्यासाठी बक्कळ पैसे मोजावे लागले. पार परराष्ट्र मंत्रालयातून सर्टिफिकेटवर शिक्के मारून आणावे लागले. वकिलांकडून काही अ‍ॅफिडेव्हिट्स करून घ्यावी लागली. इतके सगळे सोपस्कार, मुलाखत पार पाडूनही जाण्याच्या केवळ दोन दिवसच आधी व्हिसा हातात मिळाला. परिणामी विमानाचं तिकीटही फार महाग पडलं.

‘युनिव्हर्सिटी कॅटोलिका डेल सॅक्रो क्युओर’ म्हणजेच ‘कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ सेक्रेड हार्ट’ या जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित असलेल्या विद्यापीठाची स्थापना १९२० मध्ये झाली. इटलीमध्ये विद्यापीठाचे चार प्रमुख कॅम्पस असून माझा कॅम्पस पियाचेन्झा इथे आहे. ‘व्हिटीकल्चर आणि इनॉलॉजी’ अर्थात द्राक्षोत्पादन आणि वाइननिर्मिती या विषयात पदव्युत्तर शिक्षण हा पठडीबाहेरचा अभ्यासक्रम असल्याने तो जगात फारच कमी ठिकाणी उपलब्ध आहे. त्या अभ्यासक्रमांची सखोल माहिती काढल्यावर इटलीमधील हा अभ्यासक्रम शिकवणारी युनिव्हर्सिटी कॅटोलिका निश्चित केली. कारण इटली हे वाइनचं माहेरघर असून हा सर्वात मोठा वाइन उत्पादक देश आहे. हा एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इच्छा असल्यास तिथेच इन्टर्नशिप करता येते. माझा अभ्यासक्रम संपायला अद्याप पाच महिने अवकाश आहे. मनाजोगत्या वाइनरीत इन्टर्नशिप मिळाल्यास ती करेन.

आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास आणि तोही एकदम परदेशात, एकटीने. पण प्रयत्नपूर्वक आत्मविश्वास मेन्टेन केला होता. इटलीमध्ये केवळ इटालियन भाषाच चालत असल्याने घरच्या घरीच इटालियनचा जुजबी अभ्यास केला होता. त्यामुळे मुंबई ते मिलानचा मालपेन्झ विमानतळ, तिथून बसने मिलानो सेंट्राले हे मुख्य रेल्वे स्टेशन आणि तिथून रेल्वेने पिआचेन्झला उतरून कॉलेज कॅम्पस हा सगळा प्रवास केला. विशेष अडचण आली नाही. मी मिस फ्रांचेस्का यांच्या अपार्टमेंटमध्ये भाडय़ाने राहते. त्या फारच प्रेमळ आणि मनमिळाऊ आहेत. सर्व सोयींनी सुसज्ज असणारं हे घर महाविद्यालयापासून जवळ आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचला. आम्ही एकमेकींना इंग्रजी आणि इटालियन शिकवतो.

विद्यापीठाचा कॅम्पस अ‍ॅग्रिकल्चरल असल्याने तो विस्तीर्ण आहे. या भागात जगातील सर्वोत्तम वायनरीज आहेत. अनेकदा क्लासेसच्या वेळा बदलतात आणि ते आम्हाला कळवलं जातं. प्रत्येक विषय सगळ्यांना कळला असल्याची खात्री करून घेऊनच शिकवतात. एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले असं वाटल्यास पुन्हा परीक्षा देऊन गुण वाढवण्याची संधी असते. आम्हाला शिकवण्यासाठी चार नियमित प्राध्यापक आणि दोन निमंत्रित प्राध्यापक आहेत. डॉ. स्टीफोनो पोनी हे आमचे विभागप्रमुख आहेत. इथे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यासाठी खास कक्षांची सोय आहे. सगळे विषय पीपीटी पद्धतीने इंग्रजीत शिकवले जातात.

माझ्या वर्गात अमेरिका, रशिया, स्पेन, पोर्तुगाल या देशांतील आणि स्थानिक विद्यार्थी आहेत. आम्हा दोन-तीनजणांचा अपवाद वगळता इतरांना काही वर्षं वाइनरी किंवा विनयार्डसमधील कामाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं. सगळ्या विद्यार्थ्यांचा स्वभाव मदतीस धावून जाण्याचा आहे. आम्ही विविध विषयांवर गप्पा मारल्या तरी मुख्य विषय वाइन हाच असतो. त्यांना भारतीय जेवणाचं फार कौतुक आहे. म्हणून होळीच्या दिवशी त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. त्यांना मसालेदार पदार्थ आवडत असल्याने सगळे अगदी खूश झाले होते. बदलापूरमधून थेट युरोपमध्ये एकटीने गेल्याने आणि इथल्या राहणीमानाशी जुळवून घेतल्याने आता जगात कुठेही वास्तव्य करू शकते, असा आत्मविश्वास वाटतो. संवादक्षमता वाढली. दृष्टिकोन व्यापक झाला. गोष्टी समजून घेण्याची क्षमता आली. संयम वाढला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराचं आणि घरच्यांचं महत्त्व कळलं.

विविध विनयार्ड्स आणि वाइनरीजच्या नियमित अभ्याससहली आयोजित केल्या जातात. काही वाइनरीज दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या असून त्यांना युनेस्कोचा दर्जा मिळालेला आहे. काही घरगुती वायनरीजही इथे पाहायला मिळाल्या. त्या मला जास्त आवडल्या. काही वाइन्स मर्यादित उत्पादन आणि अतिशय उत्तम दर्जा असलेल्या असतात. या वाइननिर्मितीची पूर्ण प्रक्रिया ते वाइन टेस्टिंग, त्यातले वेगवेगळे प्रयोग हे सगळं तपशीलवार दाखवतात. त्यापैकी दोन भेटी आमच्यासाठी विशेष ठरल्या. पहिली होती ‘आमोरीम कॉर्कस्’ कंपनी या जगातील सगळ्यात मोठय़ा कॉर्क मॅन्युफॅ क्चरिंग कंपनीतील भेट. वेगवेगळ्या प्रतीची आकारांची कॉर्क कशी बनवतात, त्यावर छपाई कशी करतात हे सगळं पाहायला मिळालं. दुसरं म्हणजे ‘एईबी टेक्नॉलॉजी’ या वाइनरीजसाठी उपकरणं बनवणाऱ्या बडय़ा कंपनीला दिलेली भेट.

सप्टेंबरमध्ये एका रविवारी मी लेक कोमो या ठिकाणी फिरायला गेले होते. तिथल्या प्रसिद्ध कॅथ्रेडलमध्ये जगातील सेलिब्रेटींची लग्नं होतात. पाहाते तर इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्यासह त्यांचे कुटुंबीय साखरपुडय़ाच्या समारंभानंतर बाहेर पडत होते. जेमतेम १० ते १२ फुटांवरून ते माझ्या बाजूने गेले. फक्त दोन युरोपियन कमांडोज त्यांच्यासोबत होते. त्यांच्यामागून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, ए. आर. रहमान आदी बरेच सेलिब्रेटीज होते. मी उद्धव ठाकरे यांना नमस्कार करून ‘जय महाराष्ट्र सर’ असं म्हणाले. गंमत म्हणजे तेही माझ्याकडे बघून हसले आणि त्यांनीही नमस्कार केला. आणखीन एक लक्षात राहिलेला किस्सा म्हणजे मी मिलानमधल्या जगप्रसिद्ध कॅथ्रेडलमध्ये फिरायला गेले होते. तिथे दोन व्हायोलिनवादक त्यांच्या हॅट्स रस्त्यावर उलटय़ा ठेवून पाश्चात्त्य धून वाजवत होते. पर्यटकांची गर्दी असल्याने त्या धून ऐकत बरेच लोक उभे होते. हॅटमध्ये पैसैही टाकत होते. अचानक त्यांनी आवारा हूँ.. या राज कपूर यांच्या गाण्याची धून वाजवली. प्रेक्षकांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ती दाद पाहून मन भरून आलं.

उच्चशिक्षणासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा नेहमीच्या ठिकाणी जायचं नाही हे आधीच ठरवलं होतं. म्हणून इटलीची निवड केली. हा अत्यंत सुंदर, निसर्गरम्य देश आहे. लोक मनमिळाऊ आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेणारे आहेत. जीवन अतिशय संथ आहे. पुण्यासारखेच इथलेही व्यवहार दुपारी बंद असतात. लोकांना मोठय़ा आवाजात हातवारे करून बोलण्याची सवय आहे. शक्यतो स्थानिक बाजारपेठेत खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसतो. लोक प्रेमळ आणि मदतीस तत्पर आहेत. इथलं जीवन माझ्या प्रकृतीला फारच मानवणारं आहे. सुट्टीच्या दिवशी मी मिलान, क्रेमोना इत्यादी ठिकाणी आणि भोवतालच्या खेडय़ांत फिरायला जाते. ख्रिसमसच्या सुट्टीत माझी मित्रमंडळी आपापल्या घरी गेली होती. मी मात्र त्या काळात इटालियन भाषेचा अभ्यास केला आणि थोडं फिरून घेतलं. पुढच्या सुट्टीच्या काळात रोम, व्हेनिस, पिसा आणि ‘गॉडफादर’ डॉन विटो कार्लिऑनच्या सिसीलीला भेट द्यायचा विचार आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या वाइनरीमध्ये एक-दोन वर्षे काम करून प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. युरोपमध्ये अनेक वाइनरीज असल्या तरी त्या मानाने तज्ज्ञांची संख्या कमी आहे. भारतातही वाइननिर्मितीला सरकारने साहाय्य आणि प्रोत्साहन दिलेलं असल्याने तिथंही इनोलॉजिस्टना चांगली संधी आहे. मला फ्रुट वाइन, स्पार्कलिंग वाइन इत्यादी प्रकारांत प्रावीण्य मिळवायचं आहे. कल्पक लोकांना या विषयात अनेक संधी आहेत. थोडा अनुभव गाठीशी बांधल्यावर स्वत:ची वाइनरी काढायची आहे. शिवाय ‘मास्टर्स ऑफ वाइन’ हा अभ्यासक्रम शिकायचाही विचार आहे. जगभरात ही पदवी फार कमी व्यक्तींनी मिळवली आहे. भारतात केवळ सोनल हॉलंड यांनीच ही पदवी प्राप्त केलेली आहे. असं म्हणतात की, स्काय इज द लिमिट..!

कानमंत्र

  • विद्यार्थ्यांनी नेहमीचेच विषय सोडून कृषीक्षेत्र किंवा अन्य अनवट विषयात प्रावीण्य मिळवलं पाहिजे. कारण त्या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता असल्याने संधी मिळून प्रगतीही होते.
  • मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि इंग्रजीखेरीज एक परकीय भाषा शिकणं ही काळाची गरज आहे.

शब्दांकन : राधिका कुंटे
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Catholic university of the sacred heart
First published on: 19-04-2019 at 00:04 IST