तेजश्री गायकवाड

सुरुवातीला फक्त २१ दिवसांचा लॉकडाऊन होता. त्यामुळे अनेकांनी स्वत:चं रुटीनही बदललं नाही.  काही दिवसांची गोष्ट आहे.. आपण पुन्हा प्रत्येकाला भेटू, मित्रांसोबत फिरायला जाऊ असे अनेक प्लॅन सुरू होते. दिवस पुढे सरकत राहिले तसे लॉकडाऊनच्या तारखा वाढतच गेल्या आणि आठवणीतले मित्रमैत्रिणी व्हर्च्युअल झाले.. पुढे त्यांचा हा आभासही नको. मला खरी सोबत हवी आहे या भावनेतून तरुणाईने त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टी, माणसं यांच्यात मैतर शोधायला सुरुवात के ली. या नव्या मैत्रीमुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचं आपले मित्रमैत्रिणी सांगतायेत..

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा के ला जाणारा आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस पुण्याचा हृषीकेश मराठे चक्क नव्या वृक्षवल्ली सोयऱ्यांबरोबर साजरा करणार आहे. लॉकडाऊनमध्ये स्वत:ला कायम पॉझिटिव्ह आणि फ्रेश ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी मी करू शकत होतो; पण तरीही सतत आपण बंदिस्त असल्याच्या भावनेने फ्रे श राहणं शक्य होत नव्हतं. एरवी काहीही वाटलं तर पटकन मित्रांची भेट घेता येते. आता मात्र कॉल आणि मेसेजशिवाय पर्याय नाही. मग मी अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या झाडांशीच मैत्री केली. आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवला, की आपोआप आपण फ्रेश राहातो. नेमकी अशीच काहीशी मैत्री माझी आणि टेरेसमधल्या माझ्या झाडांची आहे. मुळात मी कोकणातला असल्यामुळे निसर्गाची ओढ अजून तशीच आहे. लहानपणापासून झाडांसोबत मैत्रीचं नात गुंफलं गेलंय; पण रोजच्या आयुष्यात त्या मैत्रीचा विसर पडलेला. पुण्यात फ्लॅट घेताना ‘टेरेस बाल्कनी’चा माझा आग्रह होता, आता ही बाल्कनी नेहमी झाडांनी बहरलेली असते, असं हृषीके श सांगतो.

झाडांना स्प्रेने पाणी घालणे, सुकलेली पानं काढणे, माती मोकळी करून रिपॉटिंग करणे, वेळोवेळी खत घालणे, सरफेस क्लीनिंग, कटिंग करून सॅपलिंग करणे, कलम करणे, वेलींना आधारासाठी काठय़ांचा तंबू करणे, पेस्टिसाइड्स मारणे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे या सगळ्याचं ‘रिटर्न’ म्हणून आलेली फुलं गोळा करणे. अशा अनेक गोष्टी मी माझ्या या मित्रांसोबत करत असतो, असं तो म्हणतो. झाडांबरोबर झालेल्या या बॉण्डमुळे एरव्ही सतत जाणवणारा कामाचा ताण, घरातले छोटे-मोठे वाद यातून येणारी नकारात्मकता दूर पळाली आहे. लॉकडाऊनमुळे हे जुने मित्र नव्याने मिळाल्याच्या सुखात तो रमला आहे.

घरात किचनशी जास्त जवळीक ही सहसा मुलींची असते, पण कल्याणमध्ये राहणाऱ्या आनंद लेलेची मैत्री त्याच्या किचनशी झाल्याचं तो सांगतो. सुरुवातीला फक्त मज्जा म्हणून सुरू झालेला किचनमधला वावर आता हवाहवासा झाला आहे. वेळेला स्वत:चं पोट भरता येईल एवढे पदार्थ मला बनवता येत होते, पण नवनव्या रेसिपी शिकायची संधी मिळाली नव्हती. लॉकडाऊनला सुरुवात झाली तेव्हा रोजच लोक काही ना काही बनवून पोस्ट करत होते. मीही आईच्या मदतीने काही पदार्थ बनवले. त्याचं खूप काैतुक  झालं आणि मग अब रुकना नही.. म्हणत मी कधीच घरी न केलेले पदार्थसुद्धा बनवले, असं आनंद सांगतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये माझी आपसूकच किचन, त्यात असणारे डबे, मसाले, गॅस, चमचा, ताट अशा प्रत्येक गोष्टीशी मैत्री झाली. मला या सगळ्यांसोबत वेळ घालवायला फार आवडतो हे माझ्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे मी ज्या दिवशी स्वयंपाक करत नाही त्या दिवशी भाजी धुणे, चिरणे अशा छोटय़ा गोष्टी तरी नक्कीच करतो. मी जेवण बनवताना या सगळ्यांशी गप्पासुद्धा मारतो, असं सांगणाऱ्या आनंदने  मित्रमंडळींसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावेत तसे त्याने बनवलेल्या डिशबरोबरचे फोटो पोस्ट के ले आहेत. इतक्या दिवसांच्या या मित्रांसाठी गिफ्ट म्हणून त्याने ‘गृहिणीची भांडीकुंडी’ अशी सुंदर कविताही लिहिली आहे.

अभिनेत्री सोनल पवारने तर चक्क गॅलेक्सी अर्थात आकाशगंगेलाच आपला मित्र बनवलं आहे. ती म्हणते, माझ्या मित्राला आकाश-तारे यांची आवड आहे. त्यामुळे तो त्याचा अभ्यास करायचा. त्यासाठी तो एक अ‍ॅपही वापरायचा. मी एकदा उत्सुकतेपोटी ते अ‍ॅप घेतलं, पण रोजच्या कामाच्या रगाडय़ात वर्षभर त्या अ‍ॅपचा मी कधीच वापर केला नाही. लॉकडाऊन सुरू झालं, शूटिंग थांबलं. सुरुवातीला इतरांप्रमाणे डान्स-गाणी करून झाल्यावर मी काही दिवसांनी रोज सकाळी गच्चीवर योगा करायला जाऊ लागले. रात्री शतपावली करायला गच्चीत जायचे तेव्हा सहज आकाशाकडे लक्ष गेलं आणि मला त्या अ‍ॅपची आठवण झाली. इथूनच माझ्या आगळ्यावेगळ्या मैत्रीची सुरुवात झाली. त्यानंतर तिने आकाश, तारे, चंद्र याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. ‘‘मी जास्तीत जास्त वेळ माझ्या या नवीन दोस्तासोबत घालवत होते. आपल्याला पौर्णिमा, अमावास्या एवढंच माहिती असतं, या अ‍ॅपमुळे माझी वेगवेगळ्या ताऱ्यांशी मैत्री झाली. शुक्र तारा मला आता जास्त जवळचा वाटतो. मी माझ्या या नवीन मित्रांची ओळख जुन्या मित्रमैत्रिणींनाही करून देते आहे,’’ असं सोनल सांगते.

पेट फ्रे ण्ड्सही सध्या खूप पाहायला मिळतात, मात्र पुण्यातील अक्षय गायकवाडची परिसरातील श्वानांशी घट्ट मैत्री जमली आहे. ‘‘कधीकधी आपली एखाद्या व्यक्तीशी अचानक एकदम घट्ट मैत्री होते ना तशीच माझी या श्वानांशी  झाली आहे. गेले दोन महिने मी रात्री जेवण झाल्यावर सगळे नियम पाळून खाली शतपावली करायला जातो. एका ठिकाणी २-३ श्वानांचा ग्रुप नेहमी बसलेला दिसायचा. मी एक दिवस सहज म्हणून त्यांना बिस्किटं खाऊ घातली. त्या दिवसापासून मी नित्यनेमाने त्यांना खाऊ घालतो. बेस्ट फ्रे ण्ड्सप्रमाणे रोज भेटतो. तेही माझ्याबरोबर फि रतात, बसलो की माझ्याबरोबर बसतात. गप्पा मारल्या तर प्रतिसादही देतात. दिवसभरातल्या माझ्या गोष्टी मी त्यांना सांगतो, मला ऐकू न घेणारे-माझ्याशी संवाद साधणारे असे ते माझे मित्र आहेत,’’ असं अक्षय सांगतो.

नुकतंच अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या प्रज्ञेश तारीची घरच्यांशी मैत्री झाली आहे. ‘‘अभिनय क्षेत्राच्या उलटसुलट शेडय़ुलमध्ये मी सेट होतच होतो तोवर लॉकडाऊनमुळे घरी बसावं लागलं. सुरुवातीला मी खूप सिनेमे बघितले, पुस्तकं ही वाचली. मित्रांशी मधूनमधून गप्पा होत होत्या; पण हळूहळू हे सगळंच नको वाटायला लागलं. मग आई-बाबा, भाऊ यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात के ली आणि जणू खूप जुने मित्र पुन्हा भेटावेत असं आमचं झालं. आम्ही मित्रांप्रमाणे चेस, उनोपासून ते अगदी क्रिकेटसुद्धा खेळतो. घरातच नाइटआऊटही करतो. रात्री चक्क मस्त काढा किंवा हळदीच्या दुधासोबत आमची गप्पांची मैफल रंगते. कधी तरी तुटलेला हा संवादाचा धागा मैत्रीतून नव्याने घट्ट झाला आहे,’’ असं प्रज्ञेश सांगतो. मित्र कोणीही असोत यामुळे मैत्रीतला आनंद हरवत नाही, उलट वाढतोच. या नव्याने सापडलेल्या आगळ्यावेगळ्या मित्रमैत्रिणींसह तुम्हालाही मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

viva@expressindia.com