चित्रपटसृष्टीत इतकी स्पर्धा आहे की, इथे निखळ मैत्री जुळणं अवघड, असं काहीजण सांगतात. पण सगळ्यांचच तसं नाही. चित्रपट- नाटय़ आणि टीव्हीच्या दुनियेत मुखवटे रंगवून वावरावं लागत असलं तरी मैत्रीचे बंध इथेही जमतात. सेलिब्रिटींचा दोस्ताना त्यांच्याच तोंडून..

ताईच उत्तम मैत्रिण – प्रार्थना बेहरे</strong>
बदलत्या काळासोबत काही गोष्टींच्या व्याख्या बदलल्यात, तसे मैत्री व प्रेम यांच्याबाबत झाले आहे. पूर्वी प्रेम निरंतर म्हणत, आता प्रेम तात्कालिक असू शकते. पण ‘उत्तम मैत्री’ कायमचीअसते. त्यात ‘वयाची अट’ नाही.माझी पाच वर्षांने मोठी असणारी ताई उत्तम मैत्रिण आहे, ती आबूधाबीला असते, तिच्याशी मी सर्व गोष्टींबाबत बोलते. एक मैत्रिण बंगलोरला असते, आम्ही फोनवर संपर्कात आहोत. मी आता चित्रपट उपयोगात मुरत जात असताना नवे मित्र भेटू लागलेत. पूर्वी सण म्हटलं की सगळे नातेवाईक एकत्र जमत, आता अशा दिवशी सगळे मित्र जमत, मित्र ही आयुष्यातील ‘फार मोठी’ गरज आहे. म्हणूनच ‘मैत्री दिवस’ खूप आनंदाचा!

डॅडू सर्वात जवळचे मित्र – आदिनाथ कोठारे
माझे सर्वात जवळचे मित्र म्हणजे माझे डॅडी. मी त्यांना प्रेमाने डॅडू म्हणतो. तसेच वयाच्या पाचव्या वर्षांपासूनचा प्रसिद्ध भट्ट नावाचा मात्र मित्र आहे. त्याला मी सिद्धू म्हणतो. माझी बायको उर्मिला ही माझी मैत्रिणदेखील आहे. एमबीएमधील माझ्या मित्रांचा गोतावळा किती सांगू? अभिजीत शेट्टी, शाल्डन मेनेझिस, कालिंद देसाई, अजय बालोन, पियुष बागला, अश्विन बारबोझा तर रुईयामधील अंकित घोष, आदित्य शेट्टी.. मी चित्रपटसृष्टीत आल्यावरही माझी या सगळ्यांशी दोस्ती कायम आहे. चित्रपटसृष्टीतही माझी बरीच ‘दोस्त’ मंडळी आहेत. काहींशी कामाच्या निमित्ताने ‘दोस्ताना’ होतो.. माझ्या जुन्या मित्रांसोबत मी ‘अभिनेता’ आहे हे विसरून वावरतो, तरच मैत्रीचा खरा व भरपूर आनंद घेता येईल यावर माझा विश्वास आहे. कोणत्याही भिंती अथवा मर्यादा न ठेवता मित्रांच्यात वावरतो,  तेथे ‘डिप्लोमसी’ अजिबात नसते

चित्रपटक्षेत्रात मित्र मिळणं मुश्कील – अतुला दुगल
सगळ्याच गोष्टी आई-बाबांसोबत बोलता येत नसतात, त्यासाठी खऱ्या मित्रांची अत्यावश्यकता असते. ते खूप नसले तरी चालतील, पण मोजके व हक्काचे मात्र हवेत. ते वर्षभरातून एक-दोनदा भेटले तरी चालेल, पण ते आपल्या गरजेला धावून यायला हवेत व आपल्यालाही त्यांच्यासाठी मुदत करावीशी वाटायला हवे. शाळा-कॉलेजमधील मित्र हेच खरे व तेच आयुष्यभर सोबत करतात असे मानले जाते, पण मला हे तितकेसे पटत नाही. कारण, पुढील आयुष्यात आपण नवीन वळणावर असतो, तेथे काही चांगले मित्र भेटू शकतात. आज मी मराठी चित्रपट व मालिका यांच्या क्षेत्रात आहे आणि येथील संधी व स्पर्धा पाहता ओळखी खूप होतात, पण येथे खरे मित्र भेटण्याची शक्यता खूप कमी असते, त्याबाबत तक्रार न करता मित्र करावेत. आमच्या पुण्यात माझे खूप मित्र-मैत्रिणी आहेत. चित्रपट-ट्रेकिंग व हॉटेलिंग यातून आमची ‘मस्त धमाल’ सुरू असते, त्यातून भरपूर आनंद व विरंगुळा मिळतो, ‘सुखी आयुष्या’साठी चांगले मित्र अत्यंत गरजेचे असतात.

चित्रपटसृष्टीतही अनेक मित्र – चिन्मय मांडलेकर
मी दोस्तीच्या नात्याला फार मानतो. खूप जपतो. नातेवाईक निवडता येत नाहीत. (तसे तेही चांगलेच असतात.) पण मित्र निवडता येतात. अर्थात पलिकडून मित्रदेखील आपली निवड करतात. शाळा-कॉलेजमधील मित्रांशी मी आजही फेसबुक-वॉटसअप यांच्या माध्यमातून संपर्कात आहे, महत्त्वाचे म्हणजे तेथे सगळे आम्ही जुन्या नावानेच एकमेकांना भेटतो, त्यात ठेवलेली नावे, टोपण नावे असतात. दोनेक महिन्यात प्रत्यक्ष भेटतोदेखील. तेव्हा माझ्याभोवतीचे वलय नसते. एकाच क्षेत्रातील कोणीही मित्र बनत नाहीत अथवा मनोरंजन क्षेत्रात कोणीही कोणाचाच मित्र नसतो असे म्हणतात, पण मला हे मान्य नाही. जितेंद्र जोशीसोबत मी एकदाही काम केले नाही, पण तो माझा चांगला मित्र आहे. संतोष जुवेकर, प्रसाद कांबळी, विवेक कोरे यांच्याशी माझी अगदी घट्ट मैत्री आहे.

फॅमिली, फिल्म अ‍ॅण्ड फ्रेंड्स – मनीषा केळकर
मैत्रीचा एकच दिवस असतो असे नव्हे तर खरे मित्र चोवीस तास, आपल्यासोबत असतात. खऱ्या मैत्रीत कसलीही देवाणघेवाण नसते, ती नि:स्वार्थी, निरपेक्षच असायला हवी. त्या मैत्रीत एकमेकांचा आनंद वाटता यायला हवा व एकमेकांचे दु:ख विसरायला यायला हवे. सुदैवाने माझा ‘मित्र-परिवार’ अगदी तसा आहे. शाळा-महाविद्यालयाच्या काळापासून माझी अनेकांशी मैत्री असून अभ्यासाच्या गांभीर्यापासून सहलीची मौज-मस्तीपर्यंत आम्ही बरेच काही केले. माझ्या मैत्रीचे सर्वात मोठे विशेष म्हणजे, सर्वधर्मसमभाव. त्यांची नावे तर ऐका, साकेत कपूर, कौशल सामंत, सतीश दुबे. मैत्री करताना धर्म वा जात आडवी येऊ नये. त्रिखा, अश्विनी, पल्लवी अशा माझ्या केव्हापासूनच्या तरी मैत्रिणी आहेत. आपल्या चित्रपटसृष्टीत पूजा सावंत, सीमा पाटील अशा काही मैत्रिणी आहेत. एकाच क्षेत्रातील व्यक्तींशी मैत्री होऊ शकत नाही हे म्हणणे मला मान्यच नाही. निकोप स्पर्धा असेल तर कोणत्याही समव्यावसायिकाशी मैत्री होते. मैत्री मला प्रचंड दर्जा देत असते. फॅमिली, फिल्म व फ्रेन्डस हे तीन ‘एफ’ मला मोलाचे.